माघ वद्य एकादशी, जी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते; हा गोळवलकर गुरुजींचा
जन्मदिवस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणून ते ओळखले
जातात. हिंदू संघटनेच्या कामासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित
केले होते. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. इस्लाम किंवा ख्रिश्चन यांच्या
जन्माच्याही कितीतरी आधीपासून हे राष्ट्र अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्या
एखाद्या समूहाच्या, विचाराच्या विरोधात ते उत्पन्नही करावयाचे नाही आणि
उभेही करावयाचे नाही. त्याचे स्वयंभू असे व्यक्तिमत्व आहे, हा विचार
त्यांनी आयुष्यभर मांडला. हे हिंदू राष्ट्र कशासाठी? अन कोणासाठी याचेही
विस्तृत विवेचन त्यांनी वेळोवेळी केले. कार्यकर्ते, जनता, पत्रकार, विद्वान
अशा अनेकांपुढे त्यांनी वेळोवेळी याविषयीचे विचार मांडले. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या सिंदी (मार्च १९५४), इंदोर (मार्च १९६०) आणि ठाणे
(ऑक्टोबर, नोव्हेंबर १९७२) चिंतन बैठकांमध्ये देखील हिंदू राष्ट्र कशासाठी?
कोणासाठी? याचे सखोल विवेचन त्यांनी केले आहे.
सिंदी बैठकीच्या
पहिल्याच दिवशी, ९ मार्च १९५४ रोजी त्यांनी या विषयावर विचार व्यक्त केले.
जागतिक वाद, तत्वज्ञान, राष्ट्रीयता, आंतरराष्ट्रीयता, राष्ट्रभावना समाप्त
करता येईल वा नाही, विश्वराज्य संकल्पना या साऱ्याचा उहापोह करून गुरुजी
म्हणतात, `आपल्यापुढे राष्ट्र आणि जग यांच्या समन्वयाचा मार्गच तेवढा
शिल्लक राहतो. जर राष्ट्रभावना आपण नाहीशी करू शकत नाही आणि विश्वराज्याची
शक्यताही जर दिसत नाही तर मग कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा? आपल्याकडे
याचे उत्तर आहे पण भौतिकता हा त्याचा आधार नाही. भौतिकता ही एकाला
दुसऱ्यापासून दूर ठेवण्याचेच काम करते. विश्वैक्यासाठी भौतिकतेहून अधिक
उच्च भूमिकेची आवश्यकता आहे.' स्पष्ट आहे की ही भूमिका हिंदूंची आध्यात्मिक
भूमिका होय. या आध्यात्मिकतेचे थोडक्यात विवेचन करून गुरुजी पुढे म्हणतात,
`हिंदूजवळ हे ज्ञान सुरक्षित आहे. अन्य कोणाजवळ हे नाही. जो समाज हे ज्ञान
बाकीच्या समाजाला देण्यासाठी वेळोवेळी श्रेष्ठ महापुरुष निर्माण करतो त्या
समाजाने उत्तम रीतीने जिवंत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच सामर्थ्य निर्माण
करण्यासाठी आम्ही संघटना करतो. म्हणूनच आमची ही संघटना जगाच्या
कल्याणासाठीच आहे.' हाच विषय पुढे नेउन त्यांनी तो राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या परिघातून बाहेर काढला आहे. याचे अंतिम स्वरूप काय असेल याबद्दल
गुरुजी म्हणतात, `हिंदू समाजाला आपण इतके जागृत केले पाहिजे की, तो निश्चल
भावाने, आत्मविश्वासाने, जगाच्या बाहेर पाहणाऱ्या प्रवृत्तीला अंतर्मुखी
करून हे ज्ञान जगाला शिकवू शकेल.' परंतु त्यांचे हे व्यापक चिंतन केवळ
स्वप्नरंजन नाही. अतिशय जमिनीवर राहून ते पुढे म्हणतात, `जगाच्या गोष्टी
करावयाच्या म्हणजे घरच्या गोष्टी सोडावयाच्या हा भाव अशुद्ध आहे.दोघांचाही
समन्वय हाच श्रेष्ठ आणि उत्तम आहे.'
या सिंदी बैठकीतच त्यांनी या
विषयाचा आणखी विस्तार केला आहे. ते म्हणतात, `आम्ही राष्ट्रांचा विनाश
नव्हे समन्वय चाहतो. म्हणून आम्ही आपल्या राष्ट्रजीवनाची वैशिष्ट्ये जतन
करून मानवतेसाठी त्याचा विकास करू. आपल्या राष्ट्राचे त्याच्या संपूर्ण
वैशिष्ट्यांसह संवर्धन करणे हेच हिंदू राष्ट्र निर्माण करणे होय. जगाला
संपूर्ण मानवाच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल.
हिंदूंची विशेषता कायम राखण्यातच विश्वाचे कल्याण होईल. आपली प्रकृती काय
आहे? भौतिकतेचा कमाल विचार करूनही आपण त्यापलीकडे जी वस्तू आहे तिचा
साक्षात्कार केला आहे.त्याच दृष्टीने आपण समाजालाही पाहिले पाहिजे.'
सिंदी
बैठकीतील सूत्रच इंदोर बैठकीतही कायम असल्याचे पाहायला मिळते. यासंबंधीचे
आपले विचार आणखीन स्पष्ट करताना इंदोर बैठकीत गुरुजी म्हणतात, `साऱ्या जगात
ज्या ज्या म्हणून राज्यव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था आहेत त्यात
मनुष्यमात्राच्या जीवनाचे लक्ष्य ऐहिक सुख समृद्धीत मानलेले आहे. म्हणजेच
खाणे-पिणे, वस्त्र-प्रावरणे, निवासाची स्थाने, सुखोपभोग, वासनावृद्धी,
वासना संतुष्ट करणाऱ्या साधनांची वृद्धी, त्या साधनांची उपलब्धी,
मनोरंजनाची भिन्न भिन्न साधने हेच जगातील सर्व देशात सर्वसाधारण लक्ष्य
त्या देशांनी स्वत:समोर ठेवलेले आहे असे आढळून येते. ज्याचे खूप प्रगतीमान
असे वर्णन केले जाते तेथे सामान्य माणसाकडे टेलिफोन, मोटार, मोटारसायकल आदी
ऐहिक सुखाची साधने हाच प्रगतीचा मानदंड मानला जातो. वास्तविक मानवाच्या
प्रगतीचा हाच मानदंड आहे का?' असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणतात, `आमच्या
पूर्वजांनी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखाची आणि ऐश्वर्याची इच्छा बाळगूनही
तेच काही जीवनाचे अंतिम लक्ष्य मानलेले नाही. तर मग जीवनाचे लक्ष्य कोणते?
चिंतनानंतर त्यांना जे उत्तर मिळाले ते शब्दांच्या पलीकडचे आहे. आपल्या
राष्ट्राचे लक्ष्य काय आहे? या अवस्थेच्या प्राप्तीसाठी व्यक्ती अग्रेसर
होईल अशी विशुद्ध प्रेरणा देणे हेच ते लक्ष्य होय. प्रत्येक मानव मग तो
वन्य अवस्थेतील मानव का न असो, त्याच्या हृदयात ही प्रेरणा जागृत करून तो
या लक्ष्यप्राप्तीसाठी वाटचाल करील आणि या सुखाचा अधिकारी ठरेल हा आमचा
राष्ट्रीय संकल्प आहे.'
माणसाने चोवीसही तास पोटाच्याच मागे धावावे
काय? असा भेदक प्रश्न उपस्थित करून गुरुजी म्हणतात, `खाणे पिणे आणि सुखाने
झोपणे हेच त्यांचे लक्ष्य असल्यामुळे आणि हे जीवन प्राय: पशुसारखेच
असल्यामुळे मानवाला पशुसमान बनविणारी रचना त्यांनी केली. आपले लक्ष्य
पशुत्वाकडून देवत्वाकडे जाणे हे आहे.' जगातील अन्य व्यवस्थांचे असे
विश्लेषण करून आपल्या व्यवस्थेसंबंधी ते म्हणतात, `नवे घर तयार करावयाचे तर
जुने घर पाडावे लागते. आजची जी विकृत झालेली समाजरचना आहे तिची इथून
तिथपर्यंत पाडापाड करून ढीग रचून ठेवू. मग त्यातून पुढे जे काही विशुद्ध
रूप उभे होईल ते होईल. आज तर सर्वांचा एकरस असा समूह बनवून, आपल्या विशुद्ध
राष्ट्रीय तत्वाचे संपूर्ण स्मरण अंत:करणात ठेवून, राष्ट्राच्या नित्य
चैतन्यमय व सूत्रबद्ध सामर्थ्याची आकांक्षा अंत:करणात जागृत राखणारा समाज
उभा करावयाचा आहे.'
याच सूत्राचा पुढे विस्तार करताना गुरुजी
म्हणतात, `प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात सत्याच्या आविष्काराचा अनुभव आणि
अखिल सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवून; मानवाला सुखशांतीचा अनुभव प्राप्त
करून देणे यातच मनुष्य जीवनाची खरी सार्थकता आहे, हे पटवून देणे हीच ती
मुलभूत प्रेरणा आहे. हे कार्य आपल्याला अखिल जगतात प्रसृत करावयाचे आहे. या
जगात आपले एक फार मोठे कार्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले हे
प्राचीन राष्ट्र आहे आणि त्याचे जीवन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आहे. परंतु
आपण आपल्या देशातील जीवन ठीक करू शकलो नाही, आपण स्वत:ला ओळखू शकलो नाही
आणि जगाचे अज्ञान दूर करण्याचा संकल्प केलेले आम्ही जर स्वत:लाच विसरून
बसलो तर आपले `वर्ल्ड मिशन' आपण कसे पूर्ण करू शकू?'
हे `वर्ल्ड
मिशन' पूर्ण करायचे म्हणजे इतर साऱ्यांचे अस्तित्व आणि वैशिष्ट्य मिटवून
टाकायचे का? किंवा या अतिभव्य लक्ष्याकडे वाटचाल करताना हे लौकिक जग सोडून
द्यायचे का? या ऐहिक जगातील साऱ्या क्रियाकलापांचे स्थान काय राहील?
याविषयी गुरुजी म्हणतात, `निरनिराळे भौतिकतावादी समूह त्यांचाच विचार सर्व
लोकांच्या माथी मारून त्यांची डोकी बिघडविण्याचा प्रयत्न करतात, तशी काही
आपली कल्पना नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. याउलट प्रत्येक समाजाला
त्याच्या प्रकृतीनुसारच उन्नती, उत्कर्ष आदीची प्रेरणा देत देत त्याच्यावर
अंतिम सत्य आणि सद्गुणांचा सत्संस्कार योग्य प्रकारे केला पाहिजे हीच आपली
दृढ धारणा आहे. परंतु यासाठी प्रभुत्वसंपन्न, शक्तीसंपन्न, सद्गुण आणि
सद्भावनांनी ओतप्रोत; पारलौकिक ज्ञान आणि ऐहिक वैभव यांनी युक्त असे
राष्ट्रजीवन प्रथम आपल्या घरी आपण निर्माण करू. आज जगात जितके भौतिक
म्हणजेच केवळ जडवादी कार्य चालते त्यांची कबर येथेच बांधली जाईल यात मला
मुळीच शंका नाही. या बाबतीत मी बिलकुल निश्चिंत आहे. पण त्यासाठी खूप कष्ट
सहन करावे लागतील. खूप किंमत द्यावी लागेल. पण अशा सर्व कार्यांना मूठमाती
देऊन श्रेष्ठ मानव जीवनाची निर्मिती आपण करून दाखवूच.'
ठाणे
बैठकीतही याच गोष्टीचा निर्देश गुरुजींनी केला. ते म्हणाले, `आपल्या
प्राचीन, चिरंतन हिंदू राष्ट्राला जगात पुन्हा श्रेष्ठ स्थान प्राप्त करून
देण्याचे ; या राष्ट्राला बलसंपन्न, विजयशाली, सुखी व विश्वातील सर्व
मानवांचे कल्याण करण्यास सक्षम बनविण्याचे जे उदात्त ध्येय आम्ही
आपल्यासमोर ठेवले आहे त्याची पूर्ती करण्यासाठीच विविध कार्ये व
कार्यक्रमांची रचना करण्याकडे आम्ही सर्वांनी लक्ष द्यावयास हवे.'
या
ठाणे बैठकीत गुरुजींशी कार्यकर्त्यांशी चर्चाही झाली. अनेक प्रश्नही
त्यांना विचारण्यात आले. त्यातील एका प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिले ते
फार मार्मिक आहे. गुरुजी म्हणाले, `ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू या सर्वांनी
एकत्र नांदावे, हे केवळ हिंदूच म्हणत असतो. मुसलमान किंवा ख्रिश्चन म्हणत
नाही. आमचा कोणत्याही उपासना पद्धतीला विरोध नाही. पण एखादा कोणी राष्ट्र
विघातक कार्य करीत असेल; तर तो कोणीही का असेना - प्रत्यक्ष पुत्र असला तरी
- त्याची गय आम्ही करणार नाही. अहल्याबाई आणि शिवाजी महाराज यांचा आदर्श
याबाबतीत आमच्यासमोर आहे. तेव्हा राष्ट्रद्रोही व्यक्ती जर इतर धर्माची
असेल तर तिच्याशी आम्ही तसाच व्यवहार करू, असे म्हणताना कचरण्याचे आम्हाला
काही कारण नाही. आज मात्र नेमके उलटे होते आहे. शत्रू असूनही देशभक्तीचा
मुखवटा धारण करणाऱ्यास मित्र बनविले जाते आणि जे रात्रंदिवस देशाचेच
हितचिंतन करतात त्या आपल्याच लोकांचा निषेध केला जातो.'
या सगळ्या
विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाव
धारण करणारा आणि फक्त लौकिक गोष्टींच्या मागे धावत सुटलेला जमाव नाही. या
लौकिक जगाकडे (देव संकल्पनेसह साऱ्या गोष्टींकडे. कारण देव ही सुद्धा लौकिक
गोष्टच आहे.) अलौकिक दृष्टीने पाहण्याची आमची आध्यात्मिकता लक्षात घेऊन
संपूर्ण जगासाठी जिवंत राहणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसांचा समाज असे या हिंदू
राष्ट्राचे स्वरूप आहे. ते कोणाच्याही विरोधात नाही, कोणावरही दडपशाही करू
इच्छिणारे नाही, जुन्याला कवटाळून बसणारे नाही, ऐहिकता नाकारणारे नाही,
नवीनतेचे विरोधी नाही.परंतु त्याच वेळेस अरेरावी खपवून घेणारे, स्वार्थी,
सुखलोलुप, विधीनिषेधशून्य, एकांगी असेही नाही. हिंदू राष्ट्र हे सगळ्या
जगासाठी आणि संपूर्ण जगाच्या सात्विक सुखशांतीसाठी आहे.
`मल्याळम
मनोरमा' या केरळातील मासिकाचे तत्कालीन संपादक के. पी. के. पिशाद्री यांचा
अभिप्राय मननीय आहे. पिशाद्री हे स्वत: गांधीवादी होते. संघ वगैरेंशी
त्यांचा काहीही संबंध नव्हता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर शिवनी
कारागृहात गुरुजींना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण त्यांना भेट
नाकारण्यात आली होती. १९६५ साली गुरुजी आयुर्वेदिक उपचारासाठी पालघाटला
असताना मात्र ते गुरुजींना भेटले. त्यानंतर अनेकदा त्यांची गुरुजींशी भेट व
चर्चा झाली. ते म्हणतात, गुरुजींशी चर्चा करून आणि संघाचे साहित्य वाचून
माझ्या सर्व शंका दूर झाल्या. ते मुळीच धर्मांध नव्हते.
हिंदू
राष्ट्राचे पुरस्कर्ते, पाठीराखे, हितचिंतक, कार्यकर्ते (संघाचे व अन्यही),
विरोधक, विश्लेषक या सगळ्यांनीच हिंदू राष्ट्राचा हा व्यापक, भावात्मक आशय
आणि दिशा लक्षात घेणे आवश्यक आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा