आज वर्षप्रतिपदा. गुढीपाडवा. भारतीय कालगणनेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस. मातीच्या पुतळ्यांमध्ये
 प्राण फुंकून त्यातून विक्रम अर्जित करणारे लढवय्ये उभे करून विजय संपादन 
करणाऱ्या पराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाचा विक्रम संवत आजच्याच 
दिवशी सुरु होतो. आजपासून विक्रम संवत २०६९ सुरु होणार. महाभारत युद्धाचा 
आधार घेऊन करण्यात येणारी कालगणना युगाब्द. आजपासून युगाब्द ५११४ सुरु होत 
आहे. नवसृजनाची चाहूल घेऊन येणाऱ्या चैत्रालीने नटलेल्या चैत्राची सुरुवात.
 आजच्याच दिवशी १८८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. 
हेडगेवार यांचा जन्म नागपुरात झाला होता. युगपुरुष असेच त्यांचे वर्णन 
करावे लागेल. समाज संघटनेचा मंत्र आणि तंत्र देणारा एक लोकविलक्षण 
कर्मसाधक! संघात व्यक्तीमहात्म्याला स्थानच नसल्याने डॉ. हेडगेवार यांचीही 
जयंती वगैरे साजरी केली जात नाही. केवळ त्यांच्याविषयीचा श्रद्धाभाव व्यक्त
 करण्यासाठी त्यांना आद्य सरसंघचालक प्रणाम देण्यात येतो. तोही ध्वज उभारून
 प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी. अर्थात त्यांच्या चरित्राचे 
चिंतन, मनन संघात नेहमीच होत असते. स्वयंसेवक, कार्यकर्ते यांच्यापुढे 
त्यांचाच आदर्श वारंवार ठेवण्यात येतो. परंतु डॉ. हेडगेवार यांचे जीवन 
समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक म्हणावे असेच आहे.
इ.स.
 १८८९ ते १९४० असे उणेपुरे ५१ वर्षांचेच आयुष्य त्यांना प्राप्त झाले होते.
 ते रूपवान नव्हते. रंग पक्का काळा. चेहऱ्यावर लहानपणीच झालेल्या देवीचे 
डाग. छाप पडावी अशा व्यक्तिमत्वाचा अभाव. ना घणाघाती वक्तृत्व. वयाच्या १४ 
व्या वर्षी एकाच दिवशी, काही मिनिटांच्या अंतराने आई-वडील दोघांचाही 
स्वर्गवास. दोघांचीही अंत्ययात्रा एकाच तिरडीवरून आणि दोघांचाही अंत्यविधी 
एकाच चितेवर करण्यात आला होता. घरी अठरा विश्वे दारिद्र्य. चुलीत सारायला 
लाकूड नाही म्हणून खाटसुद्धा तोडावी लागत असे. कोणी मोठा पाहुणा आला अन 
त्याला चहा द्यायचा तर स्वत: डॉक्टर मागील दाराने वाण्याकडे जाऊन तेवढ्यापुरती चहा साखर उधारीवर घेऊन येत, अशी स्थिती. पण हृदयातील देशभक्तीचा ज्वालामुखी सतत धगधगलेला.
 म्हणूनच १८९७ साली वयाच्या केवळ आठव्या वर्षी राणी व्हिक्टोरियाच्या 
राज्यारोहणानिमित्त शाळेत मिळालेली मिठाई त्याने कचर्यात फेकून दिली होती. 
तर १९०८ साली वयाच्या १९ व्या वर्षी शाळेत आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे 
स्वागत `वंदे मातरम' घोषणेने करून शाळेतून काढून टाकल्याची शिक्षा आनंदाने 
भोगली होती.
त्यानंतर यवतमाळच्या राष्ट्रीय
 वृत्तीच्या नेत्यांनी चालवलेल्या शाळेतून त्यांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण
 केली आणि १९१० साली तत्कालीन थोर नेते डॉ. बा. शि. मुंजे यांच्या 
प्रेरणेने व प्रयत्नाने कलकत्ता येथे डॉक्टर होण्यासाठी गेले.
तेथे 
वैद्यकीय शिक्षणासोबतच त्यांनी `अनुशिलन समितीच्या' क्रांतिकार्यातही भाग 
घेतला. शिक्षण संपवून नागपूरला परतल्यावरही त्यांचा क्रांतिकार्याशी संपर्क
 होताच. सोबतच काँग्रेसच्या माध्यमातूनही त्यांनी देशसेवेत स्वत:ला झोकून दिले होते. हळूहळू काँग्रेसच्या आघाडीच्या 
 नेत्यांत त्यांची गणना होऊ लागली. परंतु अनुभव वाढू लागला, निरीक्षण 
परिपक्व होऊ लागले, आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक घटना उलगडू लागल्या आणि 
क्रांतिकारी काय व काँग्रेसचे कार्य काय; त्यातील फोलपणा आणि मर्यादा 
त्यांना तीव्रतेने जाणवू लागल्या. त्या मंथनातूनच; या समाजाची मूळ धाटणी, 
विचार करण्याची पद्धती, त्याच्या सवयी वगैरे मुलभूत गोष्टी बदलत नाही तोवर 
आम्ही महान राष्ट्र म्हणून जगात उभे राहू शकणार नाही या निष्कर्षावर ते 
आले. त्यासाठी समाज संघटित करायला हवा हा निश्चय त्यांनी केला. त्यांचे 
विचार मुळातून आणि विस्ताराने समजून घेतले आणि आपल्या ठरवलेल्या कामासाठी 
त्यांनी जे सायास केले त्याचा इतिहास पाहिला तर, डॉ. हेडगेवार यांना झालेले
 ते एक दिव्य दर्शन होते असे म्हणावे लागेल.
संघ स्थापनेचा विचार पक्का 
होऊन १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 
केल्यानंतरचे त्यांचे जीवन लोकविलक्षण असेच म्हणावे लागते. या कामासाठी 
पूर्ण आयुष्य झोकून देण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अविवाहित 
राहण्याचा निर्धार केला आणि तो अखेरपर्यंत पाळला. आध्यात्मिक साधनेसाठी 
अविवाहित राहण्याची परंपरा आहे, पण डॉक्टर समाजाच्या सेवेसाठी अविवाहित 
राहिले. महात्मा गांधींची त्यांच्याशी भेट झाली तेव्हा गांधीजींनीही यावर 
आश्चर्य व्यक्त करून त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले होते. राष्ट्रीय 
स्वयंसेवक संघाच्या मंत्र-तंत्राचा विकास हा एक अजोड इतिहास आहे. त्यातील 
डॉक्टर हेडगेवार यांचे समर्पण, कामाशी एकरूपता, अपार कष्ट, एकेका गोष्टीचा 
अतिशय मुळातून केलेला विचार, अहंकाराचे अजोड विसर्जन, लोकप्रियतेपासून 
सहजतेने दूर राहण्याचा संयम, स्वत:च्या स्वभावातील परिवर्तन, लोकसंग्रहाचे 
कौशल्य, लोकव्यवस्थेची अचूकता, लोकांच्या मनात जागवलेली प्रखर प्रेरणा आणि 
सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यक्तीनिरपेक्षपणे व सातत्याने चालू शकेल अशी 
कार्यपद्धती आणि संस्कार व प्रेरणा यांचा अखंडित प्रवाह हे सारे अद्भुत 
म्हणावे असेच आहे.
त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज 
त्यांच्यानंतर ७० वर्षांनंतरही सुरूच आहे. आज संघाबद्दल बरेच काही बोलले 
जाते. मात्र संघ काय आहे, संघाच्या यशाचे गमक काय हे समजून घ्यायचे असेल तर
 प्रथम डॉ. हेडगेवार यांना समजून घ्यावे लागेल. खरे तर आज आपल्या राष्ट्रीय
 जीवनातील संघाचे काम खूप महत्वाचे आहे. अनेकदा अनेक जण त्याची नक्कल 
करण्याचाही प्रयत्न करतात. पण ज्यांना मनापासून समाजासाठी, राष्ट्रासाठी 
काही करावयाचे असेल त्यांनी मतभेद बाजूला ठेवून डॉ. हेडगेवार यांच्या 
चरित्राचा अभ्यास करायला हवा. प्रामाणिक, निस्वार्थी, कळकळीच्या कोणत्याही 
कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या चरित्रात आहे.
त्यांच्या
 अखेरच्या आजारात त्यांच्या मणक्यातून पाणी काढण्यात आले. साधारणत: अशा 
वेळी थेंब थेंब पाणी निघते. पण डॉक्टरांवर शस्त्रक्रिया झाली तेव्हा 
त्यांच्या पाठीतून पाण्याची धार निघाली होती. आपल्या अंगीकृत कार्यासाठी 
त्यांनी अक्षरश: रक्ताचे पाणीच केले होते. अशा या महान युगपुरुषाचे  आज स्मरण करू या.
-श्रीपाद कोठे, नागपूर
गुरुवार, दि. २२ मार्च २०१२
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा