वर्तमान सहस्रकाच्या पहिल्याच वर्षाच्या ११ सप्टेम्बरला अमेरिकेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला आणि तेव्हापासून गेली ११ वर्ष ११ सप्टेम्बर ही तारीख आली की स्वाभाविकच त्याचे स्मरण होते. त्याची चर्चाही होते. यावर्षी तर या घटनेला ११ वर्ष पूर्ण झाल्याने चर्चा थोडी अधिकच झाली. परंतु या घटनेच्या बरोब्बर १०८ वर्ष आधीही याच तारखेला म्हणजे११ सप्टेम्बरलाच अमेरिकेला असाच एक जबरदस्त धक्का बसला होता. तो धक्का दहशतवादी नव्हता, बौद्धिक होता, वैचारिक होता. ११ सप्टेम्बर १८९३ हाच तो दिवस. या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्मपरिषदेत गाजलेले त्यांचे भाषण केले होते. आजही जगभर त्याचे स्मरण होते. जगाच्या विचारविश्वात मोठे परिवर्तन घडवून आणणारे ते भाषण होते. मात्र ही घटना तेवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. हे भाषण, त्यापूर्वीच्या घटना आणि त्यानंतरच्या घटना असे हे `शिकागो पर्व' होते. ज्या पर्वाने भारतावर आणि संपूर्ण जगाच्या भविष्यावर एक अमिट छाप उमटविलेली आहे.
या पर्वाची सुरुवात १८९३ च्या जानेवारीत झाली. १८८६ साली गुरु रामकृष्ण परमहंस यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर वराहनगर मठाची उभारणी आणि काही कौटुंबिक जबाबदार्या पार पाडल्यानंतर स्वामीजी भारताचे परिभ्रमण करण्यासाठी निघाले. १८८८ साली सुरू झालेले हे भारतभ्रमण १८९२ च्या डिसेंबरमध्ये संपले. २४, २५,२६ डिसेंबर १८९२ असे तीन दिवस स्वामीजी कन्याकुमारीला समुद्रातील शिलाखंडावर ध्यानस्थ बसले होते. हीचत्यांच्या परिव्राजक पर्वाची समाप्ती. आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचेआहे याचा साक्षात्कार त्यांना येथेच झाला. तेथून ते मद्रास व पांडिचेरिला गेले. तेथे त्यांना काही हितचिंतक भेटले. त्याच दरम्यान त्यांनाअमेरिकेच्या शिकागो शहरी होणार्या सर्वधर्म परिषदेची माहिती कळली. आपण या परिषदेला जायला हवे असे त्यांना वाटले आणि त्यांनी ती इच्छा काही परिचितांना सांगितली. सगळ्यांनीच ती कल्पना उचलून धरली. परंतु शिकागोला जाणे आणि परिषदेत भाग घेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. एक तर स्वत: स्वामीजींना त्यासाठी आध्यात्मिक संकेत मिळावा असे वाटत होते. त्यासोबतच पैसा हीही एक मोठीसमस्या होती.
असे सारे सुरू असतानाच रामकृष्ण परमहंसांनी स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला. त्याविषयी स्वामीजी म्हणतात, एक दिवस स्वप्नात मला गुरुदेव दिसले. ते समुद्राच्या पाण्यावरून पुढे पुढे जात होते आणि मागून येण्यासाठी मला खुणावत होते. विवेकानंदांना हा एक शुभसंकेत वाटला. त्याच सुमारास त्यांच्या गुरुमाता सारदादेवी यांचेही आशीर्वादपर पत्र त्यांना प्राप्त झाले. अन् त्यांनी शिकागोला जाण्याचा निश्चय पक्का केला. आता प्रश्न होता पैशाचा. त्यासाठी त्यांच्या मद्रासी हितचिंतकांनी पुढाकार घेतला. यात अळसिंगा पेरूमल या साध्या शिक्षकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कुठल्या तरी अनामिक प्रेरणेने ते कामाला लागले. लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यांनी पैसा उभा केला. अन्य लोकांचेही त्यांना साहाय्य लाभले. खेत्री संस्थानाच्या महाराजांनीही भरघोस मदत केली. ३१ मे १८९३ या दिवशी मुंबई बंदरातून पेनिन्शुलर जहाजाने त्यांचा प्रवास सुरू झाला.
हितचिंतकांनी दिलेले भरपूर सामान, शिष्यांनी गोळा केलेले आणि महाराज अजितसिंग यांनी पाठवलेले पैसे सांभाळत; वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये वावरत असताना पाळावयाचे शिष्टाचार शिकत आणि पाळत विवेकानंदांचा १३ हजार किलोमीटरचा हा प्रवास सुरु झाला. भारतीय उद्योगाचे जनक सर जमशेटजी टाटा हेदेखील याच जहाजाने मुंबईहून शिकागोलाच जात होते. जहाजाच्या कप्तानाकडून स्वामीजींनी जहाजाची सारी माहिती समजून घेतली. श्रीलंका, हॉंगकॉंग, जपान येथे जहाज थांबले तेव्हा त्यांना या देशांचे, तेथील माणसांचे थोडेफार दर्शन घडले. तेथील मंदिरे व बौद्ध स्तुपही त्यांनी पाहिले.तेथील पोथ्या, मंत्र हेदेखील पाहिले. अनेक ठिकाणी हे सारे बंगाली भाषेत असल्याचे त्यांना आढळले. चीनमधील दारिद्र्य आणि स्त्रियांची दारूण स्थिती; तसेच जपानमधील शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा, उद्योगी वृत्ती हेदेखील त्यांनी टिपून घेतले. त्यांनी आपल्या शिष्यांना लिहिलेल्या पत्रातून हे सारे व्यक्त झाले आहे.
१४ जुलै रोजी योकोहामाला `एम्प्रेस ऑफ इंडिया’ या सहा हजार टन वजनाच्या दुसर्या जहाजात ते चढले आणि त्यांनी आशिया खंड मागे टाकला. Pacific महासागरातील प्रवास मात्र त्यांना त्रासदायक झाला. याचे एकमेव कारण थंडी. या थंडीची कल्पना नसल्याने त्यांच्याजवळ लोकरी कपडे मुळीच नव्हते. त्यामुळे हा प्रवास त्यांना निभावून न्यावा लागला. २५ जुलै रोजी स्वामीजी दक्षिण कनाडाच्या Vancouver बंदरात पोहोचले. येथून ते दुसर्या दिवशी, २६ जुलै रोजी निघाले. लोहमार्गाच्या या प्रवासात दोन ठिकाणी गाडी बदलून ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता स्वामीजी शिकागोला पोहोचले. कुठे जायचे हे माहित नव्हते. त्यामुळे एका चांगल्या हॉटेलमध्येच त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. शिकागोत त्यांना एकामागोमाग एक अनेक धक्के बसले. पहिला म्हणजे सर्वधर्म परिषद सुरु होण्याला अजून पाच आठवडे अवकाश होता. दुसरा धक्का म्हणजे, परिषदेला उपस्थित राहायचे असेल तर कोणत्या तरी संस्थेचे अधिकृत पत्र हवे. विवेकानंदांकडे तसे पत्रही नव्हते. मुख्य म्हणजे प्रतिनिधी म्हणून नाव नोंदवण्याची तारीखही संपून गेली होती. त्यातच भर म्हणजे थंडी आणि महागाई. स्वामीजींना दररोज पाच डॉलर खर्च येत होता. एक डॉलर म्हणजे साधारण तीन रुपये असा त्यावेळी हिशेब होता. त्यांच्याजवळील पैसेही झपाट्याने संपत चालले होते. अन मदतीसाठी सोबत कुणी नव्हते. अखेर त्यांनी आपले तामिळ शिष्य अळसिंगा यांना एक तार पाठवली. तारेत लिहिले होते, `starving. All money spent. Send money to return at least.’ अर्थात, याचा अर्थ आपण ज्या कामासाठी येथे आलो आहोत त्यावरचा आणि त्यातील दैवी योजनेवरचा स्वामीजीचा विश्वास संपला होता असे नाही. आपण ही तार एका दुबळ्या क्षणी पाठवली होती, असे नंतर त्यांनीच म्हटले आहे.
याच वेळी शिकागोत एक औद्योगिक प्रदर्शन भरले होते. मिशिगन सरोवराच्या काठावर सातशे एकर जागेवर हे प्रदर्शन उभे करण्यासाठी सात हजार मजूर दोन वर्षे राबत होते.त्यातील १८ मृत्युमुखी पडले तर सातशे जखमी झाले होते. अडीच कोटीहून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. विवेकानंद सात दिवस रोज हे प्रदर्शन पाहायला जात होते. विज्ञान, तंत्रज्ञानातील अद्ययावत ज्ञान, यंत्रे, उपकरणे या सार्याचं एकत्रित दर्शन या प्रदर्शनात होत होते. एक दिवस कपूरथळ्याचे महाराज आणि एक नखचित्र विकणारा मराठी माणूस या प्रदर्शनात फिरत होते. स्वाभाविकच अमेरिकन पत्रकारांनी त्यांना गाठले. या मराठी माणसाने राजाबद्दल त्यांना काहीबाही सांगितले. दुसर्या दिवशी स्वामीजी पाहतात तर काय, त्या मराठी माणसाने राजाबद्दल जे काही सांगितले होते ते स्वामीजींबद्दल लिहून आले होते! या प्रदर्शनात फिरत असतानाच एका व्यक्तीने त्यांच्या कफनीचे टोक मागून ओढले आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मागे वळून इंग्रजीत त्याला हटकले तेव्हा तो खजील झाला.
बॉस्टनला तर त्यांना विचित्र अनुभव आला. ते रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या खांद्यावर काहीतरी आदळले. त्यांनी वळून पहिले तर मागे लोकांचा जमाव होता. त्यांना परिस्थितीची कल्पना आली. ते लगेच पळत सुटले अन एका वळणावर अंधार्या गल्लीत नाहीसे झाले. त्यामुळे बचावले. ते कृष्णवर्णीय आहेत असे समजून त्यांच्यावर हल्ला झाला होता. असा प्रसंग एखादाच घडला तरी, एकूण व्यवहारात मात्र वर्णभेदाचे अनेक विपरीत अनुभव त्यांना आले. म्हणूनच अमेरिकेतीलच एका व्याख्यानात त्यांनी थेट श्रोत्यांनाच प्रश्न विचारला होता की, `केवळ मी एक हिंदू आहे या एका कारणासाठी मला काही वेळा बसण्यासाठी साधी खुर्ची नाकारली गेलेली आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?’
दरम्यान, शिकागोत दिवस कसे काढायचे हा प्रश्न होताच. रेल्वेच्या प्रवासात भेटलेल्या केट सानबोर्न यांची त्यांना आठवण झाली. त्या बोस्टनला राहतात आणि तेथील राहणी तुलनेने स्वस्त आहे. शिवाय त्यांनी बोलावलेही होते आणि गरज पडल्यास मदत करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे ते शिकागोहून बोस्टनला आले. केट सानबोर्न त्यांना breezy meadows या आपल्या शेतावरील बंगल्यात घेऊन गेल्या. त्यांचा चुलत भाऊ एक विख्यात पत्रकार होता.त्याचीही त्यांनी विवेकानंदांशी ओळख करून दिली. त्याने स्वामीजींना अनेक ठिकाणी नेले. काही छोट्या गटांसमोर त्यांची भाषणेही घडवली. काही विद्वानांशीही त्यांचा परिचय करून दिला. तेथील महिला सुधारगृहात त्यांना बोलावण्यात आले तेव्हा ते तिथेही गेले. संस्थेचा परिचय त्यांनी करून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा व्याख्यान देण्यासाठी ते त्या सुधारगृहात गेले होते. अमेरिकेतील त्यांचे हे पहिले व्याख्यान.`भारतातील चालीरीती आणि जीवनपद्धती’ या विषयावरील. त्या व्याख्यानाची बातमीही वृत्तपत्रात छापून आली होती. सानबोर्न यांनी स्वामीजींना आजूबाजूचा परिसरही दाखवला. त्यामुळे स्वामीजींना अमेरिकन समाजाचे जवळून आणि सूक्ष्म निरीक्षण करता आले.
याच सुमारास केट सानबोर्न यांचा पत्रकार भाऊ फ्रांक्लीन स्वामीजींना भेटायला आला. एका व्याख्यानाचे निमंत्रण त्याने दिले. या व्याख्यानापूर्वी स्वामीजींची हार्वर्ड विद्यापीठातील प्रा. जॉन राईट यांच्याशी भेट झाली. प्रा. राईट भाषाशास्त्र व इतिहास या विषयांचे अध्यापन करीत असत. अमेरिकेतील बुद्धिवंत वर्गात त्यांना मोठा मान होता. प्रा. राईट यांनी स्वामीजींना आपल्याकडे राहायला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार तीन दिवस स्वामीजी त्यांच्याकडे मुक्कामाला होते. या ठिकाणी त्यांचा अनेक विचारवंतांशीही संवाद झाला. एका चर्चेत तर त्यांनी एकूणच मानवी सभ्यतेचे अत्यंत परखड विश्लेषण केले. `भारत आपल्या चुकांचे प्रायश्चित्त सध्या भोगतो आहे. पण युरोपलाही त्याच्या निर्दयीपणाचे प्रायश्चित्त लवकरच भोगावे लागेल. अंधारयुग येईल,’ असे भाकीत त्यांनी केले होते. त्यानंतरच्या उण्यापुर्या ५२ वर्षांच्या काळात दोन महायुद्धे झाली हे जगाने अनुभवले. अमेरिकन व युरोपीय सभ्यता आत्ता कुठे बाल्यावस्थेत आहे, असेही मत त्यांनी मांडले. प्रा. राईट यांच्याकडे जमलेले विद्वान स्वामीजींचे विश्लेषण ऐकून विचलित झाले होते. याच मुक्कामात एका चर्चमध्येही प्रा. राईट यांनी त्यांचे व्याख्यान घडवून आणले.
या मुक्कामात `आपण सर्वधर्म परिषदेत जाण्याचा विचार सोडून दिला आहे’ असे मनोगत स्वामीजी बोलून गेले. परंतु प्रा. राईट यांनी त्यांचे मन वळवले आणि त्यांना त्या विचारापासून परावृत्त केले. आपल्याकडे परिचयपत्र नाही असे जेव्हा विवेकानंद म्हणाले, तेव्हा प्रा. राईट यांचे उत्तर होते- `स्वामीजी, सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तुमच्याकडे परिचयपत्र मागणे, हे सूर्यानं आपला प्रकाशण्याचा अधिकार सिद्ध करावा असं म्हणण्यासारखं आहे.’ सार्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही प्रा. राईट यांनी त्यांना दिले. लगेच आयोजन समिती, प्रतिनिधी निवड समिती, निवास समिती, अन्य प्रमुख कार्यकर्ते यांना प्रा.राईट यांनी पत्रेही लिहिली. एका पत्रात ते म्हणतात, `मला असे आढळून आले आहे की, अमेरिकेतील आपणा सर्वांचे ज्ञान एकत्रित केले तरी, त्याहून या तरुण संन्याशाची विद्वत्ता अधिक भरेल.’ त्यांनी शिकागोपर्यंतच्या स्वामीजींच्या प्रवासाची व्यवस्था केली, थोडे पैसेही दिले आणि परिचयपत्रेही दिली.आता स्वामीजींच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या. जणू तेवढ्यासाठीच नियतीने प्रा.राईट यांच्याशी त्यांची गाठ घालून दिली.
प्रा. राईट यांच्याकडून निघाल्यावर विवेकानंदांचा मुक्काम एक आठवडा सालेम येथे होता. तेथेही त्यांची व्याख्याने झाली. भारत हा रानटी लोकांचा देश आहे हा अमेरिकेतील समज पूर्णपणे खोटा आहे असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले. एक दिवस तर फक्त लहान मुलांसाठी त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यात भारतातील लहान मुलांचे खेळ, शाळा, शिक्षण अशा विषयांची माहिती त्यांनी दिली. फ्रांक्लीन सानबोर्न यांनी पूर्वीच दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे स्वामीजी सालेमहून साराटोगा येथे पोहोचले. तेथे `अमेरिकन सोशल सायन्स असोसिएशन’च्या परिषदेत त्यांची व्याख्याने आधीच ठरली होती. `भारतातील मुस्लिमांचा अंमल’ आणि `भारतात चांदीचा केला जाणारा उपयोग’ या विषयांवर ते बोलले. साराटोगा येथे त्यांची एकूण पाच व्याख्याने झाली.
१८९३ च्या जुलै महिन्याच्या अखेरीस स्वामीजी शिकागोला पोहोचले. दुसर्याच आठवड्यात त्यांची स्थिती अतिशय शोचनीय झाली होती. एकाकी, निराधार, अनोळखी, अकिंचन, निराश अशी... परंतु घटना घडत गेल्या आणि त्यानंतरच्या तीन आठवड्यात त्यांना अमेरिकन समाजाचे आणि अमेरिकन समाजाला त्यांचे धावते दर्शन होऊन गेले. या तीन आठवड्यात ते चार ठिकाणी राहिले, त्यांनी ११ व्याख्याने दिली, मुले, स्त्रिया, विद्वान, या सार्यांशी परिचय झाला. अमेरिकन कुटुंबाची, वृत्तपत्रांची, समाजजीवनाची थोडीफार ओळख झाली. आणि अदृश्य नियतीच्या इच्छेनेच सर्वधर्म परिषदेच्या आदल्या दिवशी, १० सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामीजी पुन्हा शिकागो स्थानकावर पोहोचले.
आता काहीही अडचण नाही असे त्यांना वाटत होते. पण तसे नव्हते. स्वामीजींच्या कार्यामागे प्रखर ईश्वरी संकेत आहे याची जाणीव आणखीन तीव्रतेने त्यांना आणि जगाला व्हावयाची होती. स्वामीजी स्थानकावर उतरले आणि सर्वधर्म परिषदेचा पत्ता असलेला कागद हरवला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विचारपूस केली पण काही उपयोग झाला नाही.अखेर मालगाडीच्या एका डब्यात त्यांनी रात्र काढली सकाळी उठल्यावर ते स्थानकाबाहेर आले आणि आपल्याला जायचे आहे त्या स्थानाचा शोध घेऊ लागले. बरीच पायपीट झाली तरी पत्ता सापडला नाही, तेव्हा एका रस्त्याच्या कडेला ते बसून राहिले. थोड्याच वेळात त्या रस्त्याच्या पलीकडील घरातून एक स्त्री बाहेर आली. ती कडेला बसलेल्या स्वामीजींजवळ आली आणि तिने विचारले, `आपण सर्वधर्म परिषदेसाठी आला आहात का?’स्वामीजींना आश्चर्य वाटले. त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. ती महिला त्यांना आपल्या घरी घेऊन गेली. तिने रेल्वे स्थानकावरून त्यांचे सामान आणवले. स्वामीजींचे स्नान, विश्रांती, खाणेपिणे झाले आणि ती महिला त्यांना परिषदेच्या कार्यालयात घेऊन गेली. तेथे अन्य भारतीय प्रतिनिधींबरोबर त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. ज्या महिलेने त्यांना परिषदेच्या स्थानी पोहोचवले त्या महिलेचे नाव होते, मिसेस हेल. पुढे या हेल कुटुंबाशी स्वामीजींचा आजन्म घनिष्ठ संबंध राहिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा