आपली पाश्चात्य शिष्या कु. जोसेफिन मक्लिऑड यांना स्वामी विवेकानंद यांनी
अखेरच्या काळात लिहिलेले, जीवन निवृत्तीचे वेध लागलेल्या काळातील हे
भावपूर्ण, भावस्पर्शी पत्र. एका वेगळ्याच विवेकानंदांचे दर्शन या पत्रातून
होते.
अलमेडा, कालीफोर्निया ; १८ एप्रिल १९००
प्रिय जो,
तुमचे
आणि श्रीमती बुल यांचे अशी दोन पत्रे आत्ताच मिळाली. आनंद वाटला. मी हे
पत्र लंडनला पाठवीत आहे. श्रीमती लेगेट यांची प्रकृती निश्चितपणे सुधारत
आहे हे वाचून अत्यानंद झाला. श्रीयुत लेगेट यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा
दिल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. असो, गोंधळात आणखी भर पडू नये म्हणून मी
गप्प बसतो.
माझ्या पद्धती अतिशय कडक असतात हे तुम्हाला ठाऊकच आहे आणि जर
का मी एकदा क्षुब्ध झालो तर मी अ-ला असा धारेवर धरेन की त्याची मानसिक
शांती भंग होऊन जाईल. श्रीमती बुलविषयीच्या त्याच्या कल्पना पूर्णपणे
चुकीच्या आहेत हे त्याला जाणवावे एवढ्यासाठीच मी त्याला पत्र लिहिले होते.
कार्य
करणे हे नेहमीच कठीण असते. जो, माझ्यासाठी अशी प्रार्थना करा की माझी कामे
कायमची थांबावित आणि माझा आत्मा जगन्मातेच्या ठायी लीन होऊन जावा. तिची
कामे तिलाच ठाऊक.
पुन्हा एकदा लंडनमध्ये आपल्या जुन्या मित्रमंडळींबरोबर
राहायला मिळाल्याने तुम्हाला आनंद झाला असेल. आपल्या जुन्या मित्रांचा मी
ऋणी आहे. त्यांना माझा नमस्कार कळवा.
माझी प्रकृती ठीक आहे.
मन:स्वास्थ्यही खूप चांगले आहे. माझ्या शरीरापेक्षा माझ्या आत्म्याला अधिक
शांती लाभत आहे असे मला वाटते. युद्धात मी जिंकलो आणि हरलोही. मी सगळी
बांधाबांध केली असून त्या मोक्षदात्याची प्रतीक्षा करीत आहे.
`हे शिव, हे शिव, माझी नौका परतीरी ने.'
जो,
काहीही झाले तरी अजून मी तोच मुलगा आहे की जो, दक्षिणेश्वरच्या त्या
वटवृक्षाखाली बसून श्रीरामकृष्णांच्या मुखातून निघणारे अद्भुत शब्द
आश्चर्यचकित होऊन एकाग्र चित्ताने ऐकत असे. तोच माझा खरा स्वभाव आहे; कामे,
परोपकाराची कृत्ये आणि इतर साऱ्या गोष्टी मजवर लादल्या गेल्या आहेत. आता
पुन: मला त्यांचा आवाज ऐकू येत आहे.तोच जुना परिचित आवाज माझ्या हृदयाला
कंपायमान करीत आहे. बंधने निखळून पडत आहेत, प्रिय जनांविषयीची आसक्ती दूर
होत आहे, काम निरस होऊ लागले आहे, जीवनाचे आकर्षण मावळू लागले आहे. फक्त
आता प्रभूंचे आवाहन ऐकू येत आहे.
`येतो प्रभू मी येतो.'
`गतगोष्टींचा विचार करू नको. माझ्यामागून ये.'
`येतो मी. प्रिय प्रभू, येतो मी.'
खरेच
येतो मी. निर्वाण मला समोर दिसत आहे. कधीकधी मला त्या अनंत शांतीसागराची
स्पष्टपणे प्रतीती येते. किंचित देखील वारा किंवा लाट त्याची शांती भंग
करीत नाही.
मी जन्माला आलो त्याबद्दल मला आनंद होतो, मी यातना सोसल्या
याबद्दलही मला आनंद होतो, मी मोठमोठ्या चुका केल्या याबद्दलही मला आनंद
होतो आणि आता चिरशांतीच्या राज्यात प्रवेश करतानाही मला आनंद होत आहे. मी
कोणालाही बंधनात टाकून जात नाही, मी कोणतीही बंधने घेऊन जात नाही. हे शरीर
पतन पावून मला मुक्ती मिळो किंवा मला जीवनमुक्ती लाभो, माझे जुने
व्यक्तित्व गेले, कायमचे गेले, ते पुन: कधी परत येणार नाही. मार्गदर्शक,
गुरु, नेता, शिक्षक विवेकानंद निघून गेला आहे; मागे राहिला आहे बालक,
शिष्य, प्रभूचा सेवक.
अ-च्या कामात मी ढवळाढवळ का करीत नाही ते तुम्हाला
आता कळले असेल. जो, एखाद्याच्या कामात ढवळाढवळ करणारा मी कोण? नेत्याचे पद
मी केव्हाच त्यागिले आहे- मला आता काहीही बोलण्याचा अधिकार नाही. या
वर्षाच्या सुरुवातीपासून मी भारतातील कार्यासंबंधी कोणतीही आज्ञा दिलेली
नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही आणि श्रीमती बुल यांनी आतापर्यंत
माझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे.
तुम्हावर शुभाशीर्वादांचा सतत वर्षाव होवो. मी जेव्हा प्रभूच्या इच्छेच्या
प्रवाहाबरोबर वाहत जात असे तेव्हाचे क्षण हे माझ्या आयुष्यातील मधुरतम क्षण
होत; मी पुन: एकदा त्या प्रवाहाबरोबर वाहत जात आहे. समोर सूर्य तळपत आहे,
सभोवार झाडे-झुडपे आहेत, आणि या उन्हात सगळे कसे शांत, स्थिर आहे. आणि
नदीच्या उबदार पात्रातून मी सुस्तपणे वाहत जात आहे. ती कमालीची नीरवता,
स्तब्धता भंगेल या भीतीने हातापायांची कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यास
मी धजत नाही. ती स्तब्धताच तुम्हाला निश्चितपणे जाणवून देते की, हे जग
म्हणजे माया आहे, मृगजळ आहे.
माझ्या कार्यामागे महत्वाकांक्षा होती.
माझ्या प्रेमामागे विशिष्ट व्यक्तींविषयी आसक्ती होती. माझ्या
पावित्र्यामागे भीती होती, माझ्या नेतृत्वामागे सत्तेची तृष्णा होती, त्या
सर्व आता अस्तंगत होत आहेत आणि मी पुढेपुढे वाहत चाललो आहे. मी येतो! माते,
मी येतो! तू आपल्या उबदार कुशीत घेऊन मला जेथे नेशील तेथे मी येतो. मी आता
प्रेक्षक म्हणून येत आहे. अभिनेत्याची माझी भूमिका संपली आहे.
आहा!
किती गंभीर शांती ही ! माझ्या हृदयाच्या अगदी आत आत असलेल्या अत्यंत दूरस्थ
अशा स्थानापासून माझे विचार येत आहेत असे भासते. ते दुरून येणाऱ्या
अस्पष्ट कुजबुजीसारखे वाटत आहेत. ती मधुर, मधुरतम शांती सर्वत्र पसरली आहे.
निद्रादेवीच्या अधीन होण्यापूर्वी काही क्षण माणसाला जसे वाटत असते,
त्यावेळी वस्तू दिसतात, पण त्या जशा छायांसारख्या वाटतात, त्यावेळी जसे भय
नसते, प्रेम नसते, कोणतीच भावना नसते, तशीच माझ्या मनाची सध्या अवस्था झाली
आहे. सर्वत्र मधुरमधुर शांती पसरलेली आहे. चोहो बाजूंनी पुतळ्यांनी व
चित्रांनी घेरलेले असताना माणसाची शांती भंगण्याचे जसे कारण उरत नाही
तद्वतच माझ्या या अवस्थेत जगाकडे पाहून शांतीला मुळीच बाधा पोहोचत नाही. मी
येतो, प्रभू- मी येतो.
जग आहे पण ते सुंदर नाही अथवा कुरुपही नाही.
कोणत्याही भावना न उचंबळविणाऱ्या संवेदनांसारखे ते आहे. आहा ! जो, किती
आनंदाची अवस्था आहे ही. सर्वच गोष्टी चांगल्या आणि सुंदर आहेत; कारण माझ्या
शरीरासकट सर्व वस्तूंच्या सापेक्ष गुणदोषांची, त्यांच्या
चांगल्यावाईटपणाची, उच्चनीचपणाची वगैरे माझी जाणीव गळून पडत आहे. ओम तत्सत !
लंडन
आणि फ्रांस येथे तुम्हाला पुष्कळ चांगल्या गोष्टींचा अनुभव येईल अशी मी
आशा करतो. तुम्हाला नवीन नवीन प्रकारचा आनंद मिळेल, शरीर- मनाला पुष्टीकारक
असे नवीन नवीन अनुभव येतील. श्रीमती बुल यांना सप्रेम नमस्कार सांगावा.
तुमचा
विवेकानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा