१९४२ च्या इंग्रजांविरुद्धच्या `चाले जाव' आंदोलनातील प्रखर नेता,
आणिबाणीसाठी कारण ठरलेल्या नवनिर्माण आंदोलनाचे प्रणेते, संपूर्ण क्रांतीचे
उद्गाता अशा विविध नात्यांनी परिचित असलेल्या जयप्रकाश नारायण यांचा जन्म
बिहारमधील ज्या गावी झाला तेथे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतर आता नुकतीच
वीज पोहोचल्याची बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचण्यात आली. या गावाची
लोकसंख्या आहे १८ हजार. एखाद्या महानगरपालिकेच्या एका वार्डचीही लोकसंख्या
याहून जास्त असते. या बातमीतही तसे नवीन काही नाही. सुमारे वर्षभरापूर्वी
गोंदिया जिल्ह्यातील एका गावाची अशीच बातमी होती. गावात वीज पोहोचल्याची.
ते गाव आहे फक्त ५ घरांचे. गावात वीज पोहोचणे म्हणजे काय हे शहरी लोकांना
`स्वदेस' पाहून थोडेबहुत माहित आहे. आज देशात अशी अनेक गावे विखुरलेली
आहेत. वीज, पाणी, पूल, रस्ते, पोलीस ठाणी, वाहतुकीची साधने, आरोग्य
व्यवस्था अशा अनेक अतिशय साधारण अशा गोष्टींपासून खूप दूर अशी. शहरे आणि
गावे यांचा प्रचंड असा असमतोल आपल्या देशात आहे आणि ते एक मोठे आव्हान आहे.
`इंडिया आणि भारत' अशी त्याची विभागणीही कधी कधी काही लोक करतात.
शहरांच्या
आपल्या समस्या आहेत. छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या निमित्ताने त्या पाहायला
मिळतात. त्यावर चर्चाही झडतात. या समस्या दूर करण्यासाठी निधीची सोय हाही
एक महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा असतो. मुंबईसारख्या आर्थिक राजधानी
समजल्या जाणार्या महानगरात आजही ५०-६० टक्के लोक झोपडपट्टीत वा त्यासारख्या
स्थितीत राहतात. ३०-४० टक्के लोक प्रातर्विधीसाठी नाले, जंगल, झुडुपे
यांचा आसरा घेतात. जमिनीची उपलब्धता, पाणीपुरवठा, मलनि:सारण, स्वच्छता,
यातायात, वाहतूक, प्रदूषण, आरोग्य, वेळेचा अपव्यय, गुन्हेगारी,
व्यक्ती-समाज-शहर यांचे चेहरा हरवणे अशा एक ना अनेक समस्या मुंबईच नव्हे
तर बहुतेक महानगरामध्ये भेडसावत आहेत.
दुसरीकडे छोटी गावे सर्व
प्रकारच्या अभावात जगत आहेत. त्यांचे जीवन मानवी सभ्यतेवर प्रश्नचिन्ह
लावणारेच म्हणता येईल. परंतु त्यांना सार्या सोयीसुविधा पुरवण्यातही अनेक
अडचणी आहेत. त्यांचा आकार ही मोठी समस्या आहे. एखाद्या ५ घरांच्या गावाला
वीज पुरवायची तर ती परवडत नाही. शिवाय वीजगळती वगैरे गोष्टी आहेतच. आजच्या
महागाईत त्या वापरलेल्या विजेचे पैसे हे लोक किती भरू शकतात हाही प्रश्नच.
त्यात होणारे नुकसानही मोठे असते. रस्ता करायचा तरीही तेच. एखादा डॉक्टर
तिथे दवाखाना खरंच काढू शकेल का? गावातच शाळा, बाजार, चित्रपटगृह उपलब्ध
होऊ शकेल का? हे सारे अशक्य कोटीतील आहे.
दोन्ही बाजूला समस्या आहेत.
शहरांच्या आणि शहरीकरणाच्या समस्या आहेत आणि गावांच्या आणि ग्रामीण
जीवनाच्याही समस्या आहेत. ज्यांनी या समस्या सोडवाव्या अशी अपेक्षा आहे;
त्यासाठी धोरण, नियोजन व निर्णय घेण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत ते या
बाबतीत आश्वासने देतात. जशी वेळ येईल तसे काहीबाही करीतही असतात. अनेकदा
दुर्लक्षही करीत असतात. यात त्यांची चूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण
या बाबतीत आपण फार काही करू शकत नाही याची त्यांनाही जाणीव असते. पण ही
अगतिकता ते बोलूही शकत नाहीत कारण तसे केले तर मतदारराजा नाराज होईल,
सामाजिक कल्याणाच्या त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल. अशी सगळी इकडे आड तिकडे
विहीर अशी स्थिती असल्याने गाडे रेटत राहणे एवढ्यावरच समाधान मानावे
लागते.
या स्थितीतून मार्ग काढायचा असेल तर मुलभूत आणि स्वतंत्र विचार
करावा लागेल. नवीन रचना, नियोजन करावे लागेल. त्याची अंमलबजावणी करावी
लागेल. पण या सार्या सहजासहजी होणार्या गोष्टी नाहीत. त्यासाठी अनेक
स्तरांवर प्रयत्न व्हावे लागतील. मुख्य म्हणजे सर्व स्तरांवर सार्थक संवाद
होणे आवश्यक आहे. त्यासाठी नेते, विचारवंत, चिंतक, लेखक, संपादक, प्रसार
माध्यमे, शिक्षित आणि समजूतदार वर्ग या सार्यांनी औपचारिक, अनौपचारिक
प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपापल्या कोषात राहून, वातानुकूलित दिवाणखान्यात व
कार्यालयात बसून, आदेश सोडून होणार नाही. प्रत्यक्ष जमिनीवर यावे लागेल.
लोकांशी प्रत्यक्ष बोलावे लागेल. त्यांच्या शंका दूर कराव्या लागतील.
त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्या लागतील. व्यवस्थेच्या अडचणी त्यांना
समजावून सांगाव्या लागतील. काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही आग्रह सोडावे
लागतील. त्याची मानसिकता बनवावी लागेल. प्रथम हे सारे नीट समजावून घ्यावे
लागेल. एक मोठे जनप्रबोधन व्हावे लागेल. वागण्याबोलण्याची, विचार करण्याची
रीत बदलावी लागेल. आकाराचा आणि व्यवस्थेचा अस्ताव्यस्तपणा दूर करण्याचा
प्रयत्न करावा लागेल. ध्येय निश्चित करावे लागेल. त्यासाठी ज्याला ज्याला
मनापासून काही चांगले व्हावे असे वाटते त्याने पुढाकार घेऊन कामाला सुरुवात
केली पाहिजे.
नेमके काय करता येऊ शकेल?
शहरीकरण आणि ग्रामजीवन यांच्या
समस्येवर मात करण्यासाठी प्रथम आकारावर लक्ष केंद्रित करायला हवे. ५-१०
घरांचे गाव किंवा हजार- पाच हजार लोकवस्तीचे गाव काय किंवा एक कोटीहून अधिक
लोकसंख्येचे महानगर काय, दोन्हीकडे माणसे जिवंत असतात पण जगतात किती हा
प्रश्नच आहे. व्यक्तीमध्ये जशी कुपोषण आणि लठ्ठपणा या समस्या असतात, तसेच
समाजाचेही आहे. त्यामुळेच मोठमोठ्या शहरांचा आकार कमी करायला हवा आणि
छोट्या छोट्या गावांचा आकार वाढवायला हवा. आज आपल्या देशाची लोकसंख्या १२१
कोटी आहे. आज देशभरात ६४१ जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात साधारण १०
तालुके आहेत. सगळ्या राज्यांमध्ये तालुका हा शब्दप्रयोग वापरला जात नाही.
काही राज्यात मंडळ, उपविभाग, ब्लॉक, ओरिसात तर पोलीस स्टेशन असे म्हटले
जाते. ही संख्या सुमारे सहा ते सात हजार भरेल. या जिल्हा आणि तालुका
स्थानांवर लक्ष केंद्रित करून त्यांची फेररचना करावी. प्रत्येक जिल्हा
स्थान हे १० लाख लोकसंख्येचे आणि प्रत्येक तालुका स्थान हे एक लाख
लोकसंख्येचे व्हावे असा ठोस प्रयत्न करायला हवा. यामुळे लोकसंख्येचा असमतोल
नष्ट करून विकास करता येईल.
मुळात चांगले जगण्यासाठी माणसाला
सामान्यपणे काय हवे? रोजगार आणि जगण्याच्या चांगल्या सोयी, वातावरण. एक लाख
लोकसंख्या ही सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी पुरेशी लोकसंख्या
होऊ शकेल. तर १० लाख ही लोकसंख्या सोयीसुविधांवर भार येणार नाही अशी
लोकसंख्या ठरू शकेल. एक लाख लोकसंख्येचे शहर म्हणजे सुमारे २० हजार परिवार.
या लोकांना, परिवारांना काय लागणार नाही? शाळा, महाविद्यालये, दवाखाने,
डॉक्टर, किराणा दुकाने, मंदिरे, उद्याने, भाजी- फळे, पाणी, हॉटेल्स,
दुध-दुभते, कपडेलत्ते, वाहने, यातायात व्यवस्था, नळापासून तर संगणकापर्यंत
सोयी आणि त्यांच्या दुरुस्तीची व्यवस्था, बँका, विमा, सुरक्षा, प्रशासन...
एक ना अनेक गोष्टी. यातूनच पुरेसा रोजगारही उपलब्ध होईल आणि लोकांना चांगले
जीवनही. प्रत्येक ठिकाणी वीज लागणारच. विजेचे उत्पादन, वितरण स्थानिक
पातळीवर नक्कीच होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्थानक, विमानतळ हेदेखील
उभारता येईल. शिवाय शेती आहेच. महाकाय शहरातून बाहेर जाऊन शेती करणे शक्य
होत नाही, त्यासाठी लागणारी मानसिकताही लोप पावते. पण लहान शहरे असल्यास
शहराला लागून शेती राहील त्यामुळे ती सुलभतेने करता येईल. पंचक्रोशीत
फिरण्यासाठी छोट्या छोट्या बसेसची round the clock व्यवस्था केली की अनेक
गोष्टी साध्य होतील. फक्त शाळा म्हटल्या तरीही मोठ्या आकाराच्या २०-२५ शाळा
लागतील. म्हणजेच सुमारे हजारेक लोकांना रोजगार मिळणार. असे सारे तपशील आणि
त्याचे नियोजन हा काही मोठा प्रश्न नाही. ते सहज करता येऊ शकेल. प्रत्येक
ठिकाणी काही ना काही मोठा उद्योग राहू शकेल. छोटे छोटे उद्योग देखील
राहतीलच. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकवटण्याची मानसिकता मात्र बदलावी
लागेल.
आकार आटोपशीर होतील त्यामुळे गुन्हेगारी, दहशतवाद काबूत आणणे
शक्य होईल. आज मुंबईसारख्या शहरात कोण राहतो अन काय करतो हेच कळत नाही.
त्या समस्येवर मात करता येईल. देशभरातील माणसांसकट सार्याच गोष्टींची
माहिती सुसूत्रपणे ठेवता येईल. वेळेचा अपव्यय थांबवता येईल. प्रदूषण काबूत
ठेवता येईल. प्रत्येकाला आरोग्यपूर्ण आणि सुसंस्कृत आयुष्य जगण्याची संधी
देता येईल. माणूस हा केवळ आर्थिक प्राणी, सामाजिक प्राणी वा विशिष्ट
व्यवस्थेतील एक नट-बोल्ट न राहता त्याचे आयुष्य समृद्ध होऊ शकेल. माहिती
तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे तर अनेक गोष्टी सहज करता येतील.
असे केल्यास
अनेकांचे हितसंबंध अडचणीत येऊ शकतील. त्याची परवा न करताही सगळ्यांच्या
भल्यासाठी काहीतरी करण्याची उर्मी असलेल्यांना कठोरपणे हे हितसंबंध मोडून
काढावे लागतील. खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सुरु असलेला law of
jungle कठोरपणे चिरडावा लागेल. विचारांच्या स्तरावर व्यक्तीस्वातंत्र्य,
मानवता, मानवी जगण्याचे उद्दीष्ट या आणि अशा गोष्टींना संकल्पनात्मक आणि
व्यावहारिक उत्तरे द्यावी लागतील. जगण्याची सार्थक शैली रुजवावी लागेल.
मोठ्या शहरातील लोकांची लहान शहराकडे जाण्याची मानसिकता तयार करावी लागेल,
गावातील लोकांची गाव सोडण्याची मानसिकता तयार करावी लागेल. आम्ही अमुक
शहरात राहतो ही तशी निरर्थक पण मानसिक स्तरावर भासात्मक समाधान देणारी
वृत्ती बदलावी लागेल.
हे सारे रेटण्यासाठी नेते लागतील. हे नेते केवळ
राजकीय असून चालणार नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक,
विद्यार्थी, महिला अशा समाजाच्या सगळ्या वर्गातील नेतृत्व लागेल. नेत्यांसह
काम करणारे कार्यकर्तेही लागतील. एक सकारात्मक बदल व्हायला हवा असे
वाटणारे लोक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली तर त्यातून नेते,
कार्यकर्ते उभे होतील. हे सारे भगीरथ प्रयत्नांचे काम आहे. यात संघर्ष
असेल, समन्वय असेल, पुरेसा दीर्घ काळ प्रयत्न करावा लागेल. टोकाचे विचार
करण्याची सवय टाकून द्यावी लागेल. त्यासोबतच पर्याय शोधण्याची अन त्यातही
सुलभ आणि तयार पर्याय शोधण्याची वृत्तीही टाकून द्यावी लागेल. पर्याय
विकसित करण्याची, त्यासाठी शरीराला, मनाला, बुद्धीला कष्ट देण्याची तयारी
ठेवावी लागेल. मुळातून आणि स्वयंभू विचार करणे बाणवावे लागेल. कोणी काय
केले याकडे केवळ संदर्भ या दृष्टीनेच पाहायला शिकले पाहिजे. अनुकरण
करण्यासाठी कोणी काय केले याचा विचार करण्याची गरज नाही. जग काय करते
यापेक्षाही आपण आपले मॉडेल विकसित करून ते जगासमोर सादर करू अशी पुरुषार्थी
आकांक्षा बाळगायला हवी.
हे काही रोल मॉडेल आहे असे नाही. पण सकारात्मक
चर्चेच्या दिशेने ही सुरुवात ठरू शकते. आज सत्ता, संपत्ती यांचे एकत्रित
केंद्रीकरण झाले आहे. त्याला झुंड आणि गुंड शक्तीचे सहकार्य लाभत आहे.
त्यांच्या हातीच जणू सारी सूत्रे आहेत. वरील सारे विवेचन या सार्या
घटकांनाच मोडित काढणारे आहे. परंतु `सर्वेपि सुखिन: सन्तु' यासाठी ते
आवश्यक आहे. असे होईल वा न होईल, स्वप्न पाहायला तर काही हरकत नाही ना?
-श्रीपाद कोठे, नागपूर
रविवार, २९ एप्रिल, २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा