जयपूरच्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अतिरेक्यांना प्रशिक्षण
देतात असा आरोप केला आणि एक घनघोर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी त्याचा
प्रतिवाद केला. पण शिंदे म्हणाले त्यात, खरेच काय खोटे आहे? आक्षेप
घेण्यासारखे काय आहे त्यात? संघात अतिरेकी तयार केले जातात हे अगदी खरे
आहे. गेली ८७ वर्षे लाखो अतिरेकी संघाने तयार केले आहेत. आज संघाच्या ५०
हजार शाखा देशभरात आहेत. या शाखा चालवणारे लाखाहून अधिक मुख्य शिक्षक,
कार्यवाह; देशभरातील हजारो प्रचारक अतिरेकी नाहीत तर काय आहेत? चांगले
शिकले सवरलेले तरुण स्वत:चं घरदार सोडून आयुष्यभर संघ सांगेल ते काम, संघ
म्हणेल तिथे करत असतात. हा अतिरेक नव्हे तर काय? पगार नाही, बँकेत खातं
नाही, घरदार नाही, बायको- पोरं नाहीत, स्वत:चं असं काही नाही. असे हे
प्रचारक. दरवर्षी असे प्रचारक घर सोडून संघाच्या कामासाठी बाहेर पडतात. हा
सारा अतिरेक नाही तर काय? लाखो लोक आपापले उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या
सांभाळून; घरदार, संसार सांभाळून अक्षरश: रोज संघाचे काम करतात. कोणता
कार्यकर्ता संघाच्या कामाला किती वेळ देतो, याची चर्चा संघाच्या बैठकात
होते. हे सारे आपापला वेळ पैसा खर्च करून काम करतात. त्यापायी कधी
घरच्यांची, कधी बाहेरच्यांची नाराजीही ओढवून घेतात. हा सारा अतिरेक नाही तर
काय?
बरे संघ काय काम करायला सांगतो? ओरिसा, आंध्र प्रदेश, गुजरात,
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल कुठेही पूर आला, भूकंप
आला, युनियन कार्बाइडसारखी दुर्घटना घडली, अन्य काही नैसर्गिक वा
मानवनिर्मित आपत्ती आली तर धावून जा, शक्य ती सारी मदत करा. जिथे, जिथे जो
काही अभाव असेल तो दूर करा. शाळा चालवा, दवाखाने चालवा, अन्य सेवेची कामे
करा. समाजात चांगले उपक्रम करा. युद्ध वगैरे सारख्या प्रसंगी तू-तू-मी-मी न
करता खांद्याला खांदा लावून काम करा. पाकिस्तान आणि चीन युद्धाच्या वेळीही
हेच सांगितले संघाने म्हणूनच तर पंडित नेहरू यांनी प्रजासत्ताक दिनाला
संघाला परेडसाठी बोलावले आणि लालबहादूर शास्त्रींनी उच्चस्तरीय बैठकीसाठी
गुरुजींना बोलावून घेतले होते.
आणखीन काय काय करायला सांगतो संघ?
संघ म्हणतो या देशाला आपली माता माना. सगळ्या लोकांना आपले बंधू माना. अभाव
असतील ते दूर करा. अभावच राहू नयेत यासाठी प्रयत्न करा. एकोप्याने राहा.
माना झुकवून जगू नका आणि माना झुकवून जगायला लावू नका. मुसलमानही याच
देशाचे आहेत हे त्यांना समजावून सांगा. म्हणूनच मग राष्ट्रवादी मुस्लिम मंच
स्थापन करा. ख्रिश्चन धर्मगुरूंशी संघाच्या अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणा.
कोणी पंजाब वगैरेसारखा वेडेपणा केला तरीही तुम्ही वेडेपणा करू नका. काही
माथेफिरू पंजाबात वेडेपणा करीत होते तेव्हा म्हणूनच संघाने सुदर्शनजींना
विशेष प्रयत्न करण्यासाठी तिथे पाठवले होते. केशधारी आणि सहजधारी असे
वातावरण तापले असतानाच सुदर्शनजी तिथे घरोघरी फिरून एकतेचा संदेश देत होते.
संघाचा हा संदेश न आवडून वेड्या लोकांनी एक दिवस मोगा येथील संघशाखेवर
चक्क गोळीबार केला होता आणि भगव्या ध्वजापुढेच २० संघ स्वयंसेवक रक्ताच्या
थारोळ्यात धराशायी झाले होते. संघाने मात्र त्यांच्यासाठी कोणतीही पदकांची
वगैरे मागणी केली नव्हती. आपण आपल्या आईची सेवा करतो ती काय पुरस्कारासाठी
करतो का? असा संघाचा सवाल असतो. म्हणूनच सहजपणे काश्मीरच्या एकतेसाठी
श्यामाप्रसाद मुखर्जी आपल्या जीवाची बाजी लावतात. भारतीय जनसंघाची वाढती
शक्ती सहन न होऊन कोणाचे तरी माथे ठणकते आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय
यांच्यासारखा द्रष्टा नेता बेवारस मृतावस्थेत सापडतो. तरीही संघ शांतच
असतो. देशात आणीबाणी लावली जाते आणि हजारो स्वयंसेवक विनाकारण १८ महिने
तुरुंगात डांबले जातात. पण संघ सांगतो आपलीच जीभ चावली गेली तर आपण दात
पडून टाकतो का? मग जाऊ द्या, झाले गेले विसरून जा. सगळेच आपले आहेत.
प्रात:स्मरणीय महात्मा गांधीजींच्या हत्येचा आरोप करून हजारो स्वयंसेवकांना
आयुष्यातून उठवले जाते, पण संघ सांगतो- आपले काम कोणाच्याही विरोधात नाही.
सारा समाज आपलाच आहे.
हे सारे अतिरेकी नाही तर काय? काहीही न
मागता, कशाचीही अपेक्षा न ठेवता, स्वत:चाच वेळ-पैसा खर्च करून, कधी काही
करायचे असते का? कोणी आपल्या विरोधात काहीही केले तरी त्याबद्दल कटुता
बाळगायची नाही, असे कधी असते का? देशभरात केवळ ८०० लोकांना खासदारकीची संधी
असताना लाखो लोकांना काम करायला लावायचे म्हणजे काय? काही द्यायचे नाही तर
काम कशाला सांगायचे नाही का? सगळा अतिरेकच नाही तर काय.
कोण म्हणतो
अतिरेक फक्त वाईट, दुष्ट, समाजविघातक, राष्ट्रविघातक गोष्टींचाच असतो?
संघाने ८७ वर्षात साऱ्या जगाला हे दाखवून दिले आहे की- निस्वार्थता,
निरपेक्षता, समाजाच्या आणि देशाच्या कल्याणाची कळकळ यांचाही अतिरेक असतो.
आणि संघाने असा अतिरेक केला आहे. आता गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
यांच्याशिवाय अन्य कोणाला हा अतिरेक लक्षात आला नाही त्याला ते तरी काय
करणार? होय ना हो शिंदेजी?
- श्रीपाद कोठे
नागपूर
३१ जानेवारी, २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा