महिला सुरक्षा व सन्मानाचा विषय आज सकाळपासून पुन्हा नवीन जोमाने चर्चेत 
आला. निमित्त आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे 
एक विधान. `बलात्कार इंडियात होतात, भारतात नाही,' असे त्यांचे विधान. सारी
 प्रसार माध्यमे आणि स्त्रियांचे कैवारी त्यांच्यावर तुटून पडले आहेत. आता 
दिल्ली, मुंबईतही भारत आहे आणि एखाद्या हजार- बाराशे वस्तीच्या खेड्यातही 
इंडिया आहे वगैरे विचार करण्याची वगैरे गरज नाही. भागवतांनी म्हटले म्हणजे 
ते तुटून पडण्यासारखेच. कारण ते आहेत संघाचे प्रमुख. संघ म्हणजे हिंदू 
संस्कृती. अन हिंदू संस्कृती, हिंदू किंवा भारतीय आचार- विचार, दृष्टीकोन 
म्हणजे काय? नाक चिमटीत पकडून समुद्रात दूर कुठेतरी बुडवून टाकण्याच्या 
लायकीचेच काही तरी नाही का? outlook साप्ताहिकाच्या वेबसाईटवर तर सत्यव्रत 
सेनगुप्ता नावाच्या बुद्धिवंताने `आरएसएस : रेपिस्ट सुरक्षा संघ' अशा 
शीर्षकाचा लेखही लिहून टाकला. इंडिया टुडेच्या वेबसाईटवर प्रतिक्रियांचा 
पडलेला पाऊसही पाहायला मिळाला.
छोटा पडदा तर काय विचारता? जग टिकवायचं 
असेल तर आता तुम्ही सुटा, असं म्हणे ब्रम्ह्देवानेच त्यांना काही 
दिवसांपूर्वी सांगितलं आहे. भागवतांच्या वक्तव्यावर `तुमच्या रामराज्यात 
असेच चालणार का?' असा प्रश्न एका वाहिनीने भाजपलाही विचारून टाकला आहे. 
रामराज्याची संकल्पना ज्या गांधीजींनी मांडली त्यांनी पाश्चात्य संस्कृतीवर
 कोणाहीपेक्षा कडक प्रहार केलेले आहेत. एवढेच नव्हे तर ही पाश्चात्य 
संस्कृती मानवजातीला रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही, असे रोखठोकपणे 
सांगितले आहे, हे कोणाला माहीत असण्याची शक्यताही नाही अन माहिती करून 
घेण्याची गरजही कोणाला वाटत नाही. इंडिया टीव्ही नावाच्या वाहिनीने तर 
संध्याकाळी सात ते रात्री १० या वेळात दर अर्ध्या तासाने देशभरातील सात 
शहरात स्त्रियांवर कसा अन्याय होतो आहे हे दाखवले. कोणत्या शहरात पुरुष 
महिलांकडे डोळे रोखून पाहतात, कुठे शिट्टी मारतात वगैरेही त्यात आहे. महिला
 सन्मान या विषयाला किती चिल्लर करावे याचे ते जिवंत उदाहरण म्हणता येईल. 
हा सगळा गोंधळ पाहून खूप काही लिहायची इच्छा झाली होती. पण स्वत:ला आवर 
घातला आणि फक्त सुचलेले उपाय सांगावे असे ठरवले.
एकूण सगळे विचारमंथन आणि जनभावना पाहून वाटले ते असे-
१)
 तमाम महिला वर्गाला कपडे घालण्यावर कायद्याने बंदी घालावी. स्त्री 
सुधारणेचा, स्त्री स्वातंत्र्याचा आणि स्त्री सन्मानाचा सर्वोच्च बिंदू 
त्यामुळे लगेच एका झटक्यात गाठता येईल.
२) तमाम पुरुष वर्गाचे डोळे 
काढून घ्यावेत, जिभा हासडून टाकाव्या आणि हात तोडून टाकावेत. पाय तेवढे 
राहू द्यावे. स्त्रियांमधील दयाभावना म्हणून.
बास, एवढे केले की झाले. सारा अन्याय, अत्याचार, गुलामी, अनाचार संपून जाईल.
सुषमा
 स्वराज, साध्वी ऋतंभरा, माता अमृतानंदमयी, स्मृती इराणी, राष्ट्र सेविका 
समिती, शारदा मठ वगैरेंनी याबद्दल आपले मत आतापर्यंत दिलेले नाही. या 
साऱ्या गोंधळात त्यांना काही मत आहे की नाही कळले नाही. त्यांनीही आपले मत 
एकदाचे देऊन टाकावे. महिला सन्मानासाठी त्यांचे मत योग्य वाटले नाही तर 
तमाम स्त्री वाद्यांनी, माध्यमांनी आणि भारतीय विचार, वृत्ती आणि व्यवहार 
जाळून टाकण्याच्या कामाचे आहेत असे वाटणार्यांनी; त्यांचे काय करायचे ते 
ठरवावे. त्या महिला असल्या तरीही त्यांचा मुलाहिजा करण्याची गरज नाही.
हां,
 तेवढे त्या सायरा बानुलाही जरा विचारून घ्यावे. देव आनंद साहेबां बरोबर 
त्यांनी केलेला `पूरब और पश्चिम' आमच्या अजूनही लक्षात आहे; म्हणून म्हटले.
 बाकी काही नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर                 
                            
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा