गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

थोरामोठ्यांच्या नजरेतून स्वामी विवेकानंद

एकोणिसावे शतक म्हणजे आधिभौतिक शास्त्रांच्या उत्कर्षाचे उच्च स्थान मानलेआहे. अशा प्रकारच्या शतकाच्या उत्तरार्धात, हजारो वर्षांपूर्वी हिंदुस्थानात प्रचलित असलेलेआध्यात्मिक शास्त्र पश्चिमेकडील राष्ट्रातील विद्वानास समजून सांगून, त्यांच्याकडून सदर शास्त्राच्या अपूर्वतेबद्दल मान्यता मिळविणे आणि ज्या राष्ट्रात अशा प्रकारचे शास्त्र निर्माण झाले, त्यातील लोकांबद्दल सहानुभूती उत्पन्न करणे- हे काही लहानसहान काम नव्हे. हिंदू धर्माच्या अद्वैत ज्ञानाची पताका अग्रभागी नेउन लावण्याचे सर्व श्रेय स्वामी विवेकानंद यांचेकडे आहे. असे सत्पुरुष हजार-बाराशे वर्षांपूर्वी एक शंकराचार्य होऊन गेले एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस स्वामी विवेकानंद झाले. त्यांनी आम्हावर जे उपकार करून  ठेवले आहेत त्याची उतराई होण्यास त्यांनी घालून दिलेलाच धडा आम्हास गिरविला पाहिजे, हे उघड आहे.
-लोकमान्य टिळक

गतकाळाच्या पायावर उभे असून आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा जाज्वल्य अभिमान बाळगूनही जीवनातील प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीआधुनिक प्रागतिक होती. दलित पतित हिंदू जातीला संजीवित करून त्यांनी तिला आत्मनिष्ठा प्रदान केली. तिच्या ठायी गतगौरवाची एक जिवंत जाणीव निर्माण केली.
-
श्री. जवाहरलाल नेहरू

आम्ही म्हणतो - `पहा! मातृभूमीच्या जागृत आत्म्यामध्ये विवेकानंद अजूनही जिवंत आहेत. भारतमातेच्या संतानांच्या हृदयामध्ये विवेकानंद अद्यापही अधिष्ठित आहेत.'
-
योगी अरविंद
त्यांच्या पत्रांनी व्याख्यानांनी मला सर्वात जास्त प्रबोधित केले होते. त्यांच्या लिखाणातूनच त्यांच्या आदर्शाचा प्रमुख सूर मला समजला. मानवजातीची सेवा आत्म्याची मुक्ती, हाच होता त्यांच्या जीवनातील आदर्श. मानवजातीची सेवा म्हणजे स्वदेशाचीही सेवा, असाच अर्थ विवेकानंदांना अभिप्रेत होता.
- नेताजी सुभाषचंद्र बोस
स्वामी विवेकानंदांच्या वाणीतून आणि लेखणीतून निर्माण झालेल्या साहित्याद्वारे एकीकडे जसा समग्र जगताला अमर ज्ञानज्योतीचा लाभ झाला, तशीच दुसरीकडे हिंदू संतानांना स्वत:च्या धर्माची अधिकृत सनद प्राप्त झाली. स्वत:च्या धर्मासंबंधी आपण बाळगीत असलेल्या आपल्या धारणा बरोबर आहेत किंवा नाहीत हे पडताळून पाहण्यासाठी हिंदू माणूस आणि स्वत:च्या मुलाबाळांना त्यांच्या पूर्वजांचा धर्म काय होता हे शिकवू इच्छिणारी हिंदू आई ही, प्रत्ययोत्पादक आणि विश्वसनीय ज्ञानासाठी यापुढे कित्येक युगे याच ग्रंथांच्या पानांकडे वळतील. भारतातून इंग्रजी भाषेचा लोप झाल्यानंतरही त्या भाषेतून अवघ्या जगाला प्रदान केलेले हे पसायदान चिरकाल तसेच अक्षुन्ण राहून प्राच्य आणि पाश्चात्य देशांमध्ये सारखेच फलद्रूप होत राहील. हिंदू धर्माला जर कशाची आवश्यकता होती, तर ती म्हणजे स्वत:च्या ज्ञानाचा साठा एकत्रित आणि सुसंघटीत करण्याची. जगाला आवश्यकता होती- जिला सत्याचे भय नाही अशा धर्मश्रद्धेची. स्वामी विवेकानंदांच्या संदेशाने ही दोन्ही कार्ये साधली आहेत.
- मार्गारेट नोबल (भगिनी निवेदिता)


स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथांचा कुणीही परिचय करून देण्याची गरज नाही, असे ठामपणे म्हणता येईल. ते आपोआपच थेट हृदयाला जाऊन भिडतात.
- महात्मा गांधी


या ग्रंथांच्या पानांवर विखुरलेली त्यांची वचने उच्चारली जाण्यास आज तीस वर्षांचा काळ लोटला आहे. मध्ये या एवढ्या प्रदीर्घ काळाचे अंतर असून सुद्धा, आजही या ग्रंथांना हात लावताना माझ्या सार्या शरीरभर कशा विद्युल्लहरी खेळून गेल्याप्रमाणे वाटल्याखेरीज राहात नाही.  मग हे जळजळीत शब्द त्या नरवीराच्या प्रत्यक्ष तोंडून ऐकताना ऐकणार्यांना किती हादरे बसले असतील! कशी धुंदी चढली असेल!!

- रोमां रोलां

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा