गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

पुज्यांचे प्रलाप, मठ्ठांची मूर्खता

सध्या विद्वान म्हणवणार्यांना संघ आणि संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा प्रचंड पोटशूळ उठला आहे आणि एकदा पोटशूळ उठला की, माणूस वेदनेने तळमळून जसा काहीही बरळत सुटतो तसेच हे बरळत सुटले आहेत. लोकमतचे सुरेश द्वादशीवार यांनी भागवतांना पुज्य म्हणजे शून्य ठरवून कंडू शमवून घेतला, तर आयबीएन लोकमत वाहिनीवर नेहमी दिसणारे हेमंत देसाई यांनी तर, सरसंघचालकांना घट्ट आणि मठ्ठ म्हणत आपली खाज बोळवून घेतली आहे. असा सरसंघचालक असेल तर संघाचे कसे होईल, अशी चिंताही देसाईने व्यक्त केली आहे. जसे काही संघ खूप वाढला पाहिजे अशीच याची तळमळ आहे. सगळ्यांनीच हे लक्षात ठेवले पाहिजे की, संघ कोणाच्याही आशीर्वादानी, शुभेच्छांनी वा कृपेवर चालत नाही. त्याच्यावर कोणी कधी कृपाही करू शकला नाही आणि कधी अवकृपाही करू शकला नाही. अनेकांनी अवकृपा करण्याचा प्रयत्न केला. अगदी आटोकाट प्रयत्न केला. संघ मात्र त्या साऱ्याला नेहमीच पुरून उरला.

मोहनजी भागवत गेली १५ वर्षे संघाच्या अखिल भारतीय मंडळात आहेत. ज्याला संघाची थोडीही माहिती आहे, त्याला हे माहित असते की संघाचे अखिल भारतीय अधिकारी सतत देशभर भ्रमण करीत असतात. त्यांना स्वत:चे कुटुंब नसते, पगार मिळत नाही, सुट्ट्या नसतात. सतत फक्त प्रवास, कार्यकर्त्यांच्या भेटी, बैठका, कार्यक्रम, चर्चा, विचारपूस अशा अनेक गोष्टी सुरु असतात. अखंडपणे शेकडो, हजारो लोकांना ते भेटत असतात. यात पुरुष असतात, महिला असतात, शिक्षित- अशिक्षित- उच्चशिक्षित, धनी- निर्धन, आबालवृद्ध, विविध भाषांचे लोक, विविध संस्था- संघटना चालवणारे- सांभाळणारे सारेच असतात. सरसंघचालकांना नागपूरबाहेर पडण्याचा सल्ला देण्यापूर्वी ते नागपुरात किती असतात याचा तपशील या दीड शहाण्या पत्रकाराने मिळवायला हवा होता. आजकाल तर सुरक्षा व्यवस्था हा एक मोठा भाग झाला आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेकडून सहज सरसंघचालकांच्या प्रवासाबद्दल त्यांना तपशीलवार माहिती मिळाली असती. सरसंघचालक हे काही अहवालांवर विसंबून कचेरीत बसून काम करणारे सरकारी अधिकारी वा तत्सम कुणी नाहीत. देशभरातील विचारप्रवाह, स्पंदने याची त्यांच्याएवढी जाण कदाचितच कोणाला असेल. गांधीजी देशभर फिरत असत. पण आता राजकारणातही कोणी लोकांमध्ये मिसळत नाहीत. पत्रकारिताही आता लोकांमध्ये मिसळून होत नाही, तर हॉटेल आणि बारमधील रात्रीच्या बसण्यातून होत असते. अशा लोकांनी संघाची उठाठेव करावी हे दुर्दैवी तर आहेच, पण संतापजनक आणि घृणास्पद आहे.

दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत लिहिलेल्या आपल्या लेखात हेमंत देसाई नावाचा हा माणूस लिहितो, `भाजपात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांनी भागवतांचा निषेध केला पाहिजे.' का? हा निर्बुद्ध माणूस म्हणतो म्हणून? एकीकडे म्हणायचे भाजपात कर्तृत्ववान महिला आहेत. आहेत ना त्या कर्तृत्ववान, मग ठरवू दे ना त्यांना निषेध करायचा की नाही ते !! तू कशाला सांगतोस बाबा? त्या कर्तृत्ववान आहेत म्हणजे त्यांना बरं- वाईट, योग्य- अयोग्य हे कळते, असेच ना? मग त्यांना जर नाही वाटत भागवतांच्या म्हणण्यात काही गैर, तर तू कोण होतोस त्यांना सल्ला देणारा? या माणसाने आपल्या लेखाची सुरुवात गोपाळ गणेश आगरकर यांच्या काही वाक्यांनी केली आहे. समाजाला कल्याणकारक काय आहे हे आपणासच समजते असे मानणारे काही लोक असतात आणि तेच समाजाचे नुकसान करीत असतात, असा त्याचा अभिप्राय आहे. आपले मत मांडतानाच भाजपच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या महिलांना सल्ले देण्याचा अगोचरपणा करणाऱ्या या माणसाला हाच अभिप्राय खरे तर शोभून दिसतो.

राहिला मुद्दा ज्यावरून वाद सुरु झाला तो. आता हे एवढे स्पष्ट झाले आहे की, सिल्चर येथे सरसंघचालक जे काही बोलले त्याचा विपर्यास करण्यात आला आणि इंदोर येथे तर चक्क ते जे बोललेच नाहीत त्यावरून गदारोळ माजवण्यात आला. फक्त क्षणभरासाठी हे मान्य केले की `भारत' `इंडिया' असे काही मोहनजी बोलले, तरी त्याचा अर्थ फक्त एवढाच होईल की, याबाबत त्यांची माहिती अपुरी आहे. (वास्तविक तसे नाही. लोकसत्ता या संघद्वेष्ट्या दैनिकानेच दोन आठवड्यांपूर्वी लोकरंग पुरवणीत जगभरातले २०१० सालचे बलात्काराचे आकडे छापले आहेत. टक्केवारी पाहता अमेरिकेत, ब्रिटनमध्ये हे प्रमाण किती मोठे आहे हे सहज स्पष्ट होऊन जाईल. दीड शहाण्या देसाईने ते पहावे.) पण त्याचा अर्थ चुकूनही, ते महिला विरोधी आहेत असा कसा काढता येईल? त्यांचं पूर्ण वाक्य ऐकणारा कोणीही शहाणा माणूस हे म्हणणार नाही की, ते महिला विरोधी आहेत. पण हा देसाई नावाचा माणूस तर एकाऐवजी दीड शहाणा आहे ना? तो इतका सरळ कसा राहू शकेल? किरण बेदी, चेतन भगत, सागरिका घोष वगैरे लोकांनी खेद व्यक्त केला तरीही या मठ्ठाच्या ओकाऱ्या सुरूच आहेत.

कोट्यवधी लोक मूर्ख आहेत. त्यांना काही कळत नाही. कळते ते फक्त मलाच, असे या बिनडोक देसायाचे मत आहे. कोट्यवधी लोक सरसंघचालकांचे का ऐकतात? कसे ऐकतात? त्यांना का मानतात? हे प्रश्न याला पडतही नाहीत आणि ते त्याला समजूनही घ्यायचे नाहीत. सरसंघचालक कोणाला काय देतात? वा कोणाचे काय बिघडवू शकतात? तरीही लोक त्यांना मानतात. का होते असे, असा साधा प्रश्नही त्याला पडत नाही. सगळे आपल्यासारखे स्वार्थी नसतात आणि जे स्वार्थाचे थडगे बांधून केवळ देश आणि समाजासाठी आयुष्य उधळून देतात त्यांच्या एकेका शब्दासाठी लोक जीव ओवाळून टाकतात. सरसंघचालक अशा श्रेणीत येतात. हेमंत देसाई सारख्या लाळघोट्याना हे जन्मजन्मान्तरीही समजू शकत नाही.

सुरेश द्वादशीवार यांच्याबद्दल काय बोलावे? माझा त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. मी त्यांच्या हाताखाली १०-१२ वर्षे काम केले आहे. एवढा प्रदीर्घ काळ एकत्र काम केल्याने स्वाभाविकच अनेक व्यक्तिगत प्रसंग आणि अनुभवही आहेत. माझ्या अनेक व्यक्तिगत प्रसंगांमध्ये त्यांनी समजूतदार भूमिका घेतली, मला समजून घेतले, माझ्या कामाचे खाजगीत आणि जाहीरपणे कौतुकही केले आहे; यात वादच नाही. त्याविषयीची कृतज्ञता मी खासगीत तर व्यक्त केलीच आहे, पण ती कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त करण्यातही मला मुळीच संकोच नाही. हां, विचारांच्या बाबतीत आणि विशेषत: संघाच्या बाबतीत ते नेहमीच असहिष्णू आणि आकसपूर्ण आहेत हे मात्र नक्की. माझ्या कामाचे कौतुक करूनही माझ्या करियर संबंधी त्यांना फारशी आस्था कधीच नव्हती, याचे कारणही मी संघाचा निष्ठावान स्वयंसेवक असणे हेच होते. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सहस्रचंद्रदर्शन प्रसंगी मी त्यांच्यावर लिहिलेल्या पानभर लेखाचे कौतुक करतानाच `आपल्याला रज्जूभैया वगैरे चालणार नाहीत' अशी पुस्ती त्यांनी जोडलीच होती. मी संघ सोडण्याचा वा लपवण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु त्यामुळे पदोन्नती वगैरेसाठी माझा विचार कधीही झाला नाही हेही वास्तव आहे.

१९९७ साली स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विदर्भातील स्वातंत्र्य संग्रामावर आधारित स्तंभ मी विदर्भरंग पुरवणीत लिहिला होता. मात्र तो पूर्ण वर्षभर न चालता मधेच थांबला. यामागेही संघद्वेष हेच कारण होते. तो स्तंभ सुरु असताना एका आठवड्यात, महात्मा गांधीजी यांनी वर्धेच्या संघ शिबिराला दिलेली भेट, यावर मी लेख लिहिला होता. द्वादशीवार यांनी मात्र तो लेख छापू दिला नाही. हा संघाच्या लोकांचा खोटानाटा प्रचार आहे, असे त्यांचे म्हणणे. संघ आणि महात्मा गांधी यांच्यात संवाद होता हे मान्य करणे त्यांच्या सारख्यांना सोयीचे नाही ना? मग, संघानेच गांधींना मारले, या दाव्यातील जोर कमी होईल त्याचे काय? म्हणजे न्यायालयाने, तत्कालीन कॉंग्रेसच्या नेहरू सरकारने संघाला निर्दोष ठरवले तरी काय झाले? आम्हाला संघाला झोडपायचे आहे आणि आम्ही ते करणारच, असा त्यांचा प्रण आहे.

या घटनेच्या सुमारे दहाएक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. त्यावेळी मी द्वादशीवार यांना ओळखतही नव्हतो, पाहिलेही नव्हते. नागपूरच्या रेशीमबागेत संघ शिक्षा वर्ग सुरु होता. त्यावेळी मोहनजी भागवत नागपूरचे प्रचारक होते. रात्रीच्या जेवणासाठी मोहनजी, मी वगैरे पंक्तीत बसलो होतो. वाढप सुरु व्हायचे होते. गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात संघाचे तेव्हाचे विदर्भाचे प्रांत प्रचारक बाबाराव पुराणिक आमच्या पुढच्या रांगेत येऊन बसले. स्वाभाविकच मोहनजींनी त्यांची चौकशी केली. कुठून आलात? प्रवास कसा झाला? तेव्हा बाबारावांनी सांगितले की, ते चंद्रपूरचा एक कार्यक्रम आटोपून आले. मोहनजींनी लगेच विचारले, सुरेश द्वादशीवार कार्यक्रमाला होते का? पुढे मोहनजी म्हणाले, `ते फार छान आणि अभ्यासपूर्ण लिहितात.' एकूणच कोण कसा विचार करतात हे यावरून स्पष्ट व्हावे. त्या काळात द्वादशीवार `तरुण- भारत'साठी लिहित असत. ते आसाम आणि पंजाब समस्यांवर लिहिण्यासाठी त्या दोन्ही राज्यात गेले होते आणि जाताना संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे आशीर्वादही घेऊन गेले होते. संघाबद्दल व हिंदुत्वाबद्दल मात्र त्यांना त्यावेळीही प्रेम वा आस्था नव्हती. मोहनजी तर त्यांच्यापेक्षा सहा वर्षाने लहान आहेत. दोघेही चंद्रपूरचे. हा कालचा छोकरा देशभर ओळखला जातो, एवढेच नाही तर त्याच्या शब्दाला केवढे वजन... अन आपली गणिते, आपल्या महत्वाकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नाहीत याचा भयंकर पोटशूळ अलीकडे त्यांना त्रास देतो आहे. अनेक वाद प्रवाद त्यांच्याविषयीही आहेतच ना? संघानेच अनेकांना मोठे केले, पण शेवटी- `पय:पानं भूजन्गानाम, केवलं विषवर्धनम' हेच खरे, असे त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकांचे मत असते.

वास्तविक संघ, हिंदुत्व वगैरेचा तात्त्विक विरोध वगैरे फार भुक्कड गोष्टी आहेत. लोकसत्ताचे कार्यालय अंबाझरीच्या पायथ्याशी होते तेव्हाचा एक प्रसंग. एकदा त्यांच्यात व माझ्यात तात्त्विक चर्चा झाली. त्यांच्या केबिनमध्येच. चांगली अर्धा-पाऊण तास चर्चा रंगली. नंतर बाहेर आल्यावर न्यूज रूममध्ये बसलेले तेव्हाचे मुख्य वार्ताहर शैलेश पांडे यांना ते म्हणाले, `अरे शैलेश, आज तर श्रीपादने माझी परीक्षाच पाहिली.' त्यामुळेच तात्त्विक विरोध वगैरेंना फारसा अर्थ नाही. आम्ही आकसाने विरोध करणार. आणि करणार म्हणजे करणारच, हीच त्यांची भूमिका आहे. देव, धर्माच्या वगैरे बातम्या छापायच्या नाहीत अशा सूचना राहत असत. का? त्यांना पटत नाही म्हणून !! एखाद्याला पटते वा नाही, कोणी नास्तिक आहे की देव मानणारा आहे हा मुद्दाच गैरलागू आहे. देव, धर्म, धार्मिक आयोजने, उपक्रम हा समाज जीवनाचा मोठा आणि मुख्य भाग आहे. त्यामुळेच त्याला एक `बातमीमूल्यही' आहे. पण तरीही ते नाही छापायचे. याला असहिष्णुता याशिवाय काय म्हणायचे? तसेच कोणाविषयी आदर दाखवायची गरज नाही, ही भूमिका. वास्तविक एखाद्याबद्दल आदरार्थी बोलण्याने तसे बोलणारच मोठा होतो. पण तेही त्यांना मान्य नसे. आमदार शोभाताई फडणवीस यांना शोभाताई नाही लिहायचे, फक्त शोभा फडणवीस लिहायचे. अशा अनेक गोष्टी.

आज जाहीरपणे सांगावसं वाटतं, द्वादशीवार सर- अनेक कमी अधिक गोष्टी आधीही होत्याच. कधी त्याचा राग यायचा, कधी दुर्लक्ष केले. पण सरसंघचालकांबद्दल तुम्ही जे काही लिहिले आणि ज्या पद्धतीने लिहिले ते दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मुळात त्याविषयीचं तुमचं आकलनही खूप कोतं आहे. तुमच्याबद्दलचा सारा आदर संपला आहे, सर.

- श्रीपाद कोठे
नागपूर

1 टिप्पणी: