गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

अश्रू आटू नयेत, मधुरता संपू नये

१६ डिसेंबर रोजी दिल्लीत एका बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर अमानुश बलात्कार झाला आणि तेव्हापासून देशात त्याच एका विषयाची चर्चा सुरु आहे. ती तरुणी हे जग सोडून गेली तरीही त्याची चर्चा सुरूच आहे अन अजून काही दिवस तरी ती सुरूच राहील. सारा देश केवळ भारत-पाक सामने वा युद्ध याशिवायही एक होऊ शकतो, अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध एकत्रित येऊ शकतो हे एक चांगले चिन्ह म्हणावे लागेल. या निमित्ताने गेल्या दोन आठवड्यात अनेक गोष्टींचा खल झाला. त्याचा विचार करण्यापूर्वी पीडित मुलगी मरण पावल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याची दाखल घेणे आवश्यक आहे.

२९ डिसेंबर हा `शरमेचा दिवस' आहे असे म्हटले जात आहे. देशाची मान शरमेने खाली गेली वगैरे म्हटले जात आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी तर `आज ती मुलगी नव्हे, तर माणुसकी मेली आहे' अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शाहरुख खान याने तर या समाजात जन्माला आलो याची लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. अनेकांच्या अशाच अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. या सार्याला भावनांचा उद्रेक यापलीकडे महत्व देण्यात येऊ नये. खरे तर समाज ज्यांच्याकडे icon म्हणून पाहतो त्यांनी अशी बेजबाबदार विधाने करण्याचे टाळले पाहिजे, हे नम्रपणे पण ठामपणे सांगितले पाहिजे.

१६ तारखेला ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ज्या प्रकारे देशभर त्याची प्रतिक्रिया उमटली ती पाहता माणुसकी मरण पावली आहे असे खरेच म्हणता येईल का? जी काही घटना घडली ती अन्याय्य, अमानुष अशीच होती. परंतु सहा बलात्कारी तरुणांचा निषेध करण्यासाठी त्याच्या लाखो पटींनी समाज उभा होतो, एवढेच नाही तर त्या अपराधी तरुणांच्या घरची संतप्त मंडळीही त्यांना फाशी द्यावी अशी जाहीर मागणी करते; हे सारे शरम वाटण्यासारखे आहे की समाधान देणारे? आणि दीडदमडीच्या शाहरुखबद्दल तर काय बोलावे? hit and run च्या कितीतरी घटना बॉलीवूडच्या नावावर आहेत, पण त्या बॉलीवूडचा भाग असल्याबद्दल त्याला कधी लाज काय खंतही वाटत नाही. अन इस्लाम (म्हणजे शांतता) च्या नावाने जेव्हा अशांतता माजवली जाते, हजारो निरपराधांचे बळी जातात तेव्हा त्या धर्मात जन्माला आल्याबद्दल त्याला लाज वाटत नाही. भावानोद्रेकाच्या पलीकडे जाऊन थोडा शांततेनेही विचार करायला हवा.


बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी ही मागणी लोकसभेत केली. त्यामुळे त्याला आणखी बळ मिळाले. हाही एक भावनोद्रेकाचा मुद्दा. नंतर तर केवळ याच मागणीसाठी दिल्लीत निदर्शने सुरु आहेत. याआधीही बलात्काराच्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यात नवीन काही नाही. पण बलात्काराला फाशीच द्यावी अशी मागणी करणार्यांचे म्हणणे असे की, या गुन्ह्याला फाशीशिवाय अन्य कोणतीही शिक्षा नकोच. फक्त फाशी. हा शुद्ध वेडेपणा होय. अगदी प्रत्येक खुनासाठीही फाशी देण्यात येत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. गुन्हे, गुन्ह्याची मानसिकता आणि अन्य अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. घेतले पाहिजेत. अनेकदा बलात्काराच्या तक्रारी मागेही घेतल्या जातात हे पोलिसांच्या डायर्या पाहिल्यास लक्षात येईल. शिवाय जी तरतूद कायद्याद्वारे केली जाईल त्याचा दुरुपयोग होऊ शकतो हेही लक्षात घेतले पाहिजे.


१६ डिसेंबरला दिल्लीतील घटना घडली त्यानंतर दोनच दिवसांनी ठाण्याहून कल्याणची एक बातमी प्रसिद्ध झाली. त्यात एका विवाहित तरुणीने आपल्याच नवर्याला मारून टाकले, त्याचे ११ तुकडे केले आणि ते तुकडे भरलेले पोते टिटवाळा येथे टाकून दिले, अशी माहिती होती. त्याचे कारण होते दीराशी असलेले तिचे संबंध. ही घटना भयानक, भीषण, अमानुष, क्रूर नाही का? महिलांना विशेषाधिकार देणारे जे कायदे आज विद्यमान आहेत त्यांचाही अनेकदा दुरुपयोग होतो, हेही वास्तव आहे. आज महिलांच्या नावे असणारे गुन्हे महिलांवर होणार्या अन्यायाच्या तुलनेत कमी आहेत. पण केवळ संख्यात्मक कमी असल्यामुळे त्यांचे महत्व आणि तीव्रता नाही असे म्हणता येईल का? असेही म्हणता येऊ शकते की, एकूण सामाजिक वातावरणामुळे, तशी संधी कमी मिळते म्हणून त्यांच्या नावे गुन्हे कमी आहेत. अन्यथा महिलांच्या गुन्ह्याची संख्याही वाढू शकते. अनेकांना हे विचित्र वाटेल, अनेकांना याचा रागही येईल. पण माणूस, मानवी मन, मानवी वर्तन, त्याच्या प्रेरणा, मानवी जीवनामागे चालणारे मनोव्यापार नीट समजून घेतल्यास यात वावगे काहीही नाही हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. महिला करीत असलेले दृश्य गुन्हे कमी असले तरीही मनस्ताप देण्यात त्या किती पुढे असतात हे जग जाणते. `आम्ही बायांनी पायाने मारलेल्या गाठी तुम्हा पुरुषांना हातानेही सोडवता येत नाहीत' हे काय तुम्ही आम्ही ऐकलेले नसते काय? याचा अर्थ मी स्त्रीद्वेष्टा व महिला विरोधी आहे असा काढला जाईल. अर्थ काढणारे काय काहीही अर्थ काढू शकतात. प्रश्न आहे, समस्या नीट समजून घेण्याचा. नीट विश्लेषण करण्याचा.


मनुस्मृती म्हटले की अनेकांच्या भुवया अनेक कारणांनी वर चढतात. तरीही त्याचा उल्लेख करतो आहे. मनुस्मृतीत मनुने सांगितले आहे, `आततायी माणसाची हत्याच करायला हवी. आततायी व्यक्ती ब्राम्हण असो, क्षत्रिय असो, शुद्र असो की स्त्री असो.' मुद्दा आहे तो हा. बलात्कारी व्यक्तीला फाशीच द्यावी अशी तरतूद करायला काहीच हरकत नाही, पण त्यापूर्वी एखादी महिलाही बलात्कार करू शकते, हे किमान तत्व म्हणून मान्य करावे. हे नक्कीच गदारोळ निर्माण करणारे मत आहे. मात्र गुण वा अवगुण जसे जात, पात, धर्म याच्याशी बांधील नसतात तसेच ते लिंगसापेक्षही नसतात. आमच्या परंपरेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे माणसाचे सहा शत्रू आहेत असे सांगितले आहे आणि अहंकार हा सगळ्यात मोठा दुर्गुण म्हटला आहे. हे स्त्री वा पुरुष दोघांनाही सारखेच लागू आहे. त्यामुळेच या संबंधात शांतपणे सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून, अगदी टोकाच्या वाटणाऱ्या बाबींचाही उहापोह करून, समाजमंथन होऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.



आणखीनही काही बाबी आहेत ज्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. एकीकडे आपण नेहमी एक गोष्ट ऐकत असतो की भावनांचे महत्व असले तरीही, भावनेच्या आहारी जाणे वाईट असते. पण आपण वागतो मात्र विपरीत. तसे होऊ नये म्हणून दुर्लक्षित मुद्यांची चर्चाही आवश्यक ठरते. पहिला मुद्दा म्हणजे १६ डिसेंबरचीच एवढी चर्चा का? प्रसार माध्यमांनीही तीच का उचलून धरली? ती दिल्लीत घडली म्हणून? त्यामागे काही राजकारण आहे म्हणून की अन्य काही? सुमारे वर्षभरापुर्वी आसामात एका युवतीला भर रस्त्यात ज्या प्रकारे काही गुंडांनी निर्वस्त्र केले होते ती घटना गंभीर नव्हती काय? की एखादी घटना गंभीर ठरण्यासाठी एखादा जीव जाणे आवश्यक असते? दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने एक fear psychosis निर्माण केला जात होता तो बरोबर आहे का? ही घटना आणि त्यावरील घडामोडी सुरु असतानाच लाखो मुली आपापले व्यवहार सुरळीतपणे पार पाडीत होत्या. अनेक मुलींशी मी स्वत: बोललो, त्यांची प्रतिक्रिया होती की, आमच्या मनात भीती वगैरे नाही. हां, स्त्रीच्या मनात कायम एक भय असतं. ते तिलाच नव्हे तर अनेक अभ्यासकांनाही आजवर उलगडलेलं नाही. आजच्या परिस्थितीत ते भय थोडं वाढलं असेल इतकंच. पण धास्ती निर्माण झाली असं नाही. भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसा प्रकार व्हायला नको. घटना दुर्दैवी आणि काळजी करण्यासारखी असली तरीही तिचा बागुलबुवा किती निर्माण करायचा? पत्रकारितेत एखादी बातमी overplay करणे वा underplay करणे असे दोन भाग असतात. आपण चिंता व्यक्त करताना या गोष्टी overplay करत आहोत का याचाही विचार करायला हवा



तिसरा मुद्दा, जो माझ्या दृष्टीने पहिल्या दोन मुद्यांपेक्षाही विचारणीय आहे; तो म्हणजे self negation चा. या घटनेच्या काहीच दिवस अगोदर अमेरिकेत एका शाळेत हत्याकांड घडले. २० चिमुकले त्यात ठार झाले. ही घटना काय कमी दर्दनाक होती? पण आपल्याच समाजाचा धिक्कार केलेला पाहायला मिळाला नाही. काही महिन्यांपूर्वी नॉर्वेत एका भारतीय दंतवैद्यक महिलेला तेथील गर्भपात कायद्याचा फटका बसला अन जीव गमवावा लागला. त्या कायद्यात बदल करावा ही तेथील जनतेचीही मागणी होतीच. त्याचा फटका तेथील समाजालाही बसत होताच. पण त्यांनी स्वत:च्या समाजाच्या नावे गळे काढले नाहीत. ऑस्ट्रेलियात अनेक भारतीय विद्यार्थ्यांची हत्या झाली, अमेरिकेतच गुरुद्वारावर हल्ला झाला आणि लोक मेले; पण आपण त्या समाजांच्या नावाने गळे काढले नाहीत. त्या समाजांचा साधा निषेध केला नाही. जगाच्या प्रारंभापासून आजतागायत जगाच्या पाठीवर एक तरी समाज असा आहे का की, जिथे दुराचार- दुर्वृत्ती- अन्याय नाही? समाज ही बाबच व्यामिश्र आहे. सद्गुण आणि दुर्गुण एकत्र असतातच. परंतु दुराचार आणि दुर्गुणांवर मत करून, त्यावर अंकुश ठेवून चांगल्या गोष्टींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्या समाजाची सामूहिक संकल्पशक्ती ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आम्ही ती विसरून गेलो आहोत आणि समाजाच्या नावाने टाहो फोडतो आहोत, हे दुर्दैवीच नाही तर घृणास्पद आहे. महेश भटसारखे दीडदमडीचे विद्वान तर सगळी देवीची मंदिरे बंद करा वगैरे बेताल बडबड करू लागले आहेत. जिचे नावही आपल्याला माहित नाही, त्या बिचार्या दुर्दैवी मुलीच्या आडून उपटसुंभ लोक आपापला कार्यक्रम कसा राबवीत आहेत, हेच यातून दिसून येते. पुरुषी मानसिकतेचा गदारोळही असाच. असंख्य पुरुष या व अशा घटनांविरुद्ध उभे राहतात, आवाज उठवतात. अशा अयोग्य गोष्टीत पुरुषार्थ मानणारा वर्ग थोडा असतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सतत पुरुषी मानसिकतेचा धोशा लावून स्त्री विरुद्ध पुरुष असे एक भ्रामक वातावरण पसरवण्यात काय हशील? स्त्री व पुरुष हे दोन्ही या जगाचे अपरिहार्य घटक आहेत. त्यांच्या नात्यातील मधुरता कायम राहायला हवी याचे विस्मरण होऊ देऊ नये.



चवथा मुद्दा आहे, तरुणाईने आत्मपरीक्षण करण्याचा. एखाद्या मुलीवर बलात्कार ही गोष्टच चीड आणणारी आहे. त्यातही ज्या अमानुष, राक्षसी पद्धतीने तो झाला ती आणखीनच चीड आणणारी बाब आहे. परंतु बेफाम तरुणाई सर्वत्र ज्या पद्धतीने वागते तीही चिंतेचीच बाब आहे. वेगाच्या नशेवर स्वार होऊन गाड्या हाकणारी तरुणाई अनेकांचा बळी घेत असते. क
र्णकर्कश्श हॉर्न आणि गाणी यांचा किती लोकांना कसकसा त्रास होतो याची त्यांना जाणीवही नसते. उलट आपल्यासारखे जे वागणार नाहीत त्यांचा, ज्येष्ठांचा उपमर्द अन पाणउतारा करण्यातच ती धन्यता मानते. असे वागणाऱ्या तरुणांचा हात धरण्याची कृती आज जागा झालेला युवक करेल तर आजच्या संतापाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. एका अनाम, अश्राप, दुर्दैवी मुलीसाठी अनावर झालेले अश्रू आटून जायला नकोत. आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत जगातील कोणत्याही दु:ख, दुर्दैव आणि अन्यायाविरुद्ध ते पेटून उठायला हवेत.


मुलींच्या- महिलांच्या पेहेरावाविषयीही स्वाभाविकच चर्चा झाली. स्त्रियांच्या तोकड्या कपड्यांमुळे बलात्कार होतात का, हा जगभरात वादाचा मुद्दा आहे. त्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही आहे. शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला देहदंड दिला होता, तो एका निष्पाप महिलेवरील बलात्कारासाठीच. त्यावेळी कुठे होते तोकडे कपडे? बलात्कार ही एक मनोविकृती आहे. हां, ही विकृती आजकालच्या वातावरणात वाढू शकते, हेदेखील मान्य केले पाहिजे. मुली व महिला तोकडे व आव्हानात्मक कपडे का घालतात हा प्रश्न कोणीही विचारत नाही. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे असे म्हणून विषय संपवला जातो. त्यांना पर्याय उपलब्ध नाही म्हणून त्या असे कपडे घालतात का? तसे नक्कीच नाही. मग का? दोन मुलींनी याचे उत्तर दिल्याचे मी आत्तापर्यंत ऐकले आहे. एक म्हणजे राखी सावंत. तिने स्पष्टच सांगितले की, माझ्याकडे दाखवण्यासारखे काही आहे. म्हणून मी ते दाखवते. दुसरी आहे दिव्या दत्ता नावाची नटी. दिल्ली घटनेवरील चर्चेतच एका वाहिनीवर तिचे उद्गार होते, `आम्ही कमी कपडे घालतो. शरीराचं प्रदर्शन करतो. त्याचं पुरुषांना आकर्षण असतं. दाखवतो ते पहा. त्याचा आनंद घ्या. that's it.' यावर आणखीन काही बोलावं असं नाही.


स्त्री देह ही आकर्षक गोष्ट आहे, सुंदर गोष्ट आहे यात दुमत होण्याचे कारण नाही. पण त्यासोबतच एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, त्या सौंदर्याला पुरुषांच्या कामभावना उत्तेजित करण्याचा गुणही निसर्गानेच (पुरुषांनी नाही) जोडून दिलेला आहे. स्त्री ज्यावेळी घराबाहेर पडते त्यावेळी ती समाजाचा एक भाग होते. त्यात कोणाच्या मनात केव्हा काय येईल हे काय सांगता येते का? लाखो पुरुष तिच्याकडे पाहत असले तरीही एखाद्याच्या मनात विकृती येणारच नाही का? येऊ नये ही आदर्श स्थिती झाली, पण विकृती निर्माण होऊ शकते हे वास्तव आहे. त्यापेक्षा सुंदर परंतु आव्हानात्मक नसलेला पोशाख करायला काय हरकत आहे? असला आव्हानात्मक पोशाख केला नाही तर स्त्री जात मागास ठरेल, अधोगतीला जाईल असे तर नाही ना? मुळात आम्ही सौम्य पोशाख करणार नाही असा जो हेका पाहायला मिळतो, तो कितपत समर्थनीय म्हणता येईल? मुलींचे तोकडे कपडे हे प्रतिक आहे एका संस्कृतीचे. `स्व'ला अवास्तव महत्व, अहंकाराची जपणूक, समाजापासून फटकून वागणे, शेजारधर्मही त्याज्य, उन्माद, उर्मटपणा, उन्मत्तता, अविचार; ही या संस्कृतीची काही लक्षणं सांगता येतील. त्यामुळेच अगदी देवळात जातानाही देवापुढे नतमस्तक होण्याऐवजी कपड्यांकडे लक्ष देण्याची गरज भासते. दिल्ली प्रकरणाच्या आडोशाने मुक्त समाजाचा जो अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होतो आहे तो नक्कीच निषेधार्ह आहे. बॉलीवूड या बाबतीत पुढे आहे. दिल्ली प्रकरणी बॉलीवूड रस्त्यावर आले हे नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु समाज बिघडवण्यात त्याची जी भूमिका आहे त्याचे social auditing होणेही गरजेचे आहे. एवढेच कशाला, ज्या पैशावर या लोकांचे इमले उभे आहेत तो पैसा आणि बॉलीवूडमधील दाउद आणि मंडळींचे involvment जगाला काय माहित नाहीत? त्यापायी कितीएक जीव निजधामाला गेलेत हा एक शोध पत्रकारितेचा विषय ठरावा. हा सामाजिक आणि नैतिक गुन्हा नाही काय? काय शिक्षा द्यायची यांना? खरे तर यांचे महत्व आणि स्तोम समाजातून कसे कमी करता येईल याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.

राजकारण, राजकीय- शासकीय व्यवस्था, त्यांचे तोकडेपण, त्याचे दोगलेपण, सामाजिक नाकर्तेपण या सगळ्या गोष्टी आहेतच. त्या सार्यावर चर्चा आणि विचार करतानाच मुळाचा वेध घ्यायला हवा अन्यथा ही सारी जागृती हे एक अरण्यरुदनच ठरेल.

- श्रीपाद कोठे
नागपूर,
रविवार, ३० डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा