छोट्या पडद्यावर सध्या एका विमा कंपनीची जाहिरात पाहायला मिळत आहे.
पती-पत्नी व त्यांचा छोटा मुलगा सकाळच्या न्याहारीसाठी टेबलवर बसलेले
असतात. घरचा काम करणारा गडी नाश्ता आणून देतो. वडील मुलाला सांगतात, `बेटा
thank u कहो.' मुलगा म्हणत नाही. तो आईकडे पाहतो, तिने आपली बाजू घ्यावी
म्हणून. आई लक्ष देत नाही. मुलगा विचारतो, `क्यूँ thank u कहना?' वडील
म्हणतात, `ब्रेकफास्ट दिया इसलिए.' मुलगा पुन्हा म्हणतो, `वो तो रोज
ब्रेकफास्ट देते है.' वडील म्हणतात, `इसलिए रोज thank u कहना.' तरी मुलगा
म्हणत नाही. वडील दटावून पुन्हा म्हणतात, `मै राह देख रहा हूँ' आणि मग
मुलगा thank u म्हणतो. त्यापुढे विमा कंपनीचा संदेश आहे. या जाहिरातीने मन
आकर्शुन घेतले.
thank u चा, कृतज्ञतेचा हा भाव खूप छोटा वाटणारा
पण अतिशय महत्त्वाचा. अतिशय सहजपणे सुटून जाणारा, पण सुटून जायला नको असा.
व्यवहारात प्रत्येक वेळी तो व्यक्त होईलच असे नाही. ते आवश्यकही नाही. तसे
झाले तर ते हास्यास्पद होईल. त्याचं महत्वही राहणार नाही. पण आवश्यक तेव्हा
आणि आवश्यक तेथे तो व्यक्त व्हायलाच हवा, नाही का? आणि व्यक्त किंवा
अव्यक्त, पण अखंडपणे, अगदी २४ तास, तो मनात असायला हवाच.
खरं
तर प्रत्येक गोष्ट ही कुठल्या तरी अन्य गोष्टीवर अवलंबून असतेच. पूर्णपणे
सुटं असं आपलं आयुष्य कधीच असत नाही. न्याहारी किंवा जेवणाचं साधं उदाहरण
घेतलं तरी जाणवतं, किती जणांचा त्यात सहभाग आहे. मी जे धान्य, भाजी खातो ते
पिकवणारा शेतकरी किती काबाडकष्ट करतो तेव्हा मला अन्न प्राप्त होतं.
त्यानेच रात्री बेरात्री, जशी वीज उपलब्ध झाली असेल तसे, पिकांना पाणी दिले
असेल. रानडुकरांनी पीक खाऊन टाकू नये म्हणून रात्री जागून गस्त घातली असेल
तेव्हा अन्नधान्य, भाजीपाला माझ्यापर्यंत पोहोचतो. ते वाहून आणणारे मजूर,
ते विकणारा दुकानदार, साफसुफ करणारे घरचे वा बाहेरचे लोक, घरात व्यवस्थित
साठवून ठेवणारी घरमालकीण, सिलेंडर आणून देणारा, ते तयार करणारे, स्वयंपाक
करणारी आई, बायको, बहिण, अन्य महिला वा पुरुष, माझ्यासमोर ते वाढणारे
हात... हे सारे सारे माझ्या मुखात जाणार्या प्रत्येक घासामागे असतात. हे
सारं केवळ पैशात तोलणं ही कृतघ्नता होईल. पैशापलीकडील काही तरी या सार्या
व्यवहारात असतं. ते समजून घेणं आमच्या माणूस असण्याला अर्थ प्रदान करतं.
आपल्याकडे
भोजनाआधी श्लोक, मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. आपल्या भोजनासाठी ज्यांचा
ज्यांचा हातभार लागला असेल त्या सार्यांना ईशरूप मानून त्या ईश्वराचे स्मरण
करून, मनात कृतज्ञतेचा भाव ठेवून जेवणाला सुरुवात करावी असा विचार
त्यामागे आहे. आजकाल घरांमधून ही पद्धत लुप्त होत आहे. मठ-मंदिरे, धार्मिक
आयोजनात मात्र ही पद्धत अजूनही पाहायला मिळते. ख्रिश्चन धर्मातही ही पद्धत
आहे. अन्य धर्म-संप्रदायात ती आहे वा नाही ठाऊक नाही. थोडे आधुनिकतेचे वारे
वाहू लागल्याने संकोचाचा भावही पाहायला मिळतो किंवा असे काही करणे हा
जुनाटपणा आहे अशी समजूतही आढळून येते. वास्तविक तसे समजण्याची आवश्यकता
नाही. अभिमानपूर्वक हे thank u म्हणायला हवं. श्लोक, मंत्र येत असो, नसो;
तो म्हटला जावो, न जावो; पण क्षणभर डोळे मिटून समोरच्या अन्नाला नमन करून
मग जेवता येऊ शकतं. यात लाज, कमीपणा, मागासलेपणा काहीही नाही हे मात्र
प्रथम स्वत:ला पटायला हवं.
आपल्याकडे आणखीनही एक पद्धत आहे. सकाळी
उठल्यावर अंथरुणातून बाहेर पडण्याआधी पृथ्वीची, भूमातेची क्षमा मागण्याची.
`समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले.. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं
क्षमस्वमे' असे म्हणून, आपले पाय तिला लागणार म्हणून तिची क्षमा मागायची.
किती हृद्य आणि उदात्त भाव यात भरलेला आहे. एखाद्याला चुकून आपला पाय लागला
तरी आपण त्याला नमस्कार करतो, sorry म्हणतो; पण ज्या पृथ्वीवर आपण सतत
चालतो, फिरतो, जी आपल्याला सारं काही देते, आपल्याला नको असलेलं सारं काही
स्वत:च्या पोटात घेते; तिचं स्मरण करून तिची क्षमा मागणे, तिला वंदन करणे,
तिला thank u म्हणणे यात कसला आला कमीपणा? यात कसली आली लाज? यात कुठला
मागासलेपणा?
भारतीय संस्कृति पृथ्वीला मृण्मयी नाही तर चिन्मयी
समजते. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी झाडांना जीव आहे, म्हणजेच वनस्पतीसृष्टी
चेतन आहे हे सप्रयोग, वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले. पुढे जाऊन असे म्हणता
येईल की, या वनस्पतींमध्ये ही चेतना येते कुठून? बीजाला या मृण्मयीकडून
चेतनेचा स्पर्श होतो, तेव्हा ते अंकुरित होते. ही मृण्मयी चिन्मयी आहे हे
सिद्ध करायला आणखी काय हवं? पण आपण तिची कुठलीही हयगय करीत नाही. अनेक
गोष्टी तर आपल्याही हाती नाहीत. पण मग या भूमातेबद्दल आदराची, सन्मानाची,
कृतज्ञतेची भावना तर असू शकते आणि दिवसाला सुरुवात करताना तिची एकदा क्षमा
तर मागितली जाऊ शकते.
नागपुरात सायकल रिक्षा हे एक वाहतुकीचे साधन
आहे. आजकाल याचा वापर कमी झाला आहे. पूर्वी या सायकल रिक्षा मोठ्या
प्रमाणावर होत्या. सायकलसारखी रचना असलेल्या या रिक्षा एक माणूस चालवतो.
त्यात २-३ व्यक्ती बसू शकतात. चढावाचा रस्ता असला तर रिक्षा ओढायला त्रास
होतो. पायडल मारता येत नाही. मग रिक्षा चालवणारा खाली उतरून रिक्षा हाताने
ओढतो. हा त्याचा व्यवसाय आहे. त्याला लोकांना वाहून नेण्याचे पैसे मिळतात.
लोकांना वाहून नेणे हे त्याचे काम असते. मात्र लहानपणीचे एक चित्र मला
अजूनही आठवते. चढावाचा रस्ता आला की वडील खाली उतरत असत आणि मागून रिक्षाला
ढकलत असत. म्हणजे रिक्षा चढाव चढत असे. हादेखील कृतज्ञतेचाच भाग नव्हे का?
जगरहाटी
मुख्यत: व्यवहारावर चालते. ते योग्यही आहे. व्यवहार कुणाला चुकला आहे?
मात्र आमचा हा व्यवहारही विशिष्ट परिस्थितीतच सुरळीत चालू शकतो आणि ती
परिस्थिती आमच्या हाती नसते. आम्ही महामार्गावरून प्रवास करीत आहोत. गाडी
पंक्चर झाली तर? पंक्चर दुरुस्त करणारा सापडणे आणि त्याने आमचे काम करून
देणे हे आमच्या हाती नसते. म्हणूनच फार यातायात न करता जेव्हा गाडीचा
पंक्चर दुरुस्त केला जातो तेव्हा आम्ही म्हणतो, अगदी देवासारखा सापडलास
बाबा! आम्हाला गाण्याची आवड असते, आम्ही गाणे ऐकायला जातो किंवा सीडी आणून
गाणी ऐकतो अन् आनंदित होतो. मात्र, गाणं शिकून ते म्हणावं, त्यात करियर
करावं हे कुठे तरी, कोणाला तरी वाटतं म्हणून आम्हाला आनंद मिळतो. आम्ही
पैसा देऊन ते गाणं मिळवू शकतो पण गाणार्याच्या मनातील प्रेरणेबद्दल मात्र
कृतज्ञताच व्यक्त करता येईल, नाही का?
माझी शांतता, सुरक्षा,
उदरभरण, सारेच व्यवहार समाजावर अवलंबून आहेत. ते सारे पैशाने मोजता येतही
नाहीत आणि मोजूही नये. अनेकदा पैसा असूनही अनेक गोष्टी अडून जातात. आमच्या
प्रत्येक व्यवहारात व्यवहाराच्या पलीकडचं सूक्ष्म असं काही तरी असतं. ते
समजणं आणि त्याबद्दलचा योग्य भाव मनात बाळगणं आमच्या माणूसपणाची यत्ता
वाढवित असतं. माणुसकी, माणूसपण याबद्दल आपण खूप काही बोलत असतो. पण स्वत:चं
माणूसपण तपासण्याची आणि त्याची यत्ता वाढवण्याची तसदी मात्र कमी घेतो.
असंख्य छोट्या छोट्या गोष्टींना रोजच्या जीवनात बाणवून ही कृतज्ञतेची ज्योत
आपल्याला सतत तेवत ठेवता येईल का? आपल्याला म्हणजे मला... आणि मला म्हणजे
प्रत्येक `मी'ला.
- श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, १३ डिसेंबर २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा