स्वामी विवेकानंदांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, `बल हेच जीवन. निर्बलता 
म्हणजे मृत्यू.' त्यांच्या सगळ्या विचारातून हीच शक्तीची उपासना झळकताना 
पाहायला मिळते. पण ही शक्ती कुठेही एकांगी झालेली पाहायला मिळत नाही. याचे 
कारण त्याला असलेली करुणेची जोड. शक्तीच्या महावस्त्राला स्वामीजींनी 
करुणेचे अस्तर लावलेले आहे. करुणा हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. ही 
करुणा एखादी विशिष्ट व्यक्ती, विचार, संदर्भ किंवा अन्य कशाशी बांधलेली 
नाही. तर स्वामीजींच्या करुणेचा हा प्रवाह अप्रतिहत सर्व चराचरासाठी 
अबाधपणे वाहत असल्याचे पाहायला मिळते. आत्मविकास, आत्मसंघर्ष, 
आत्माभिव्यक्ती, सामाजिक उत्थान, आध्यात्मिक उन्नती अशा साऱ्याच पैलूंमध्ये
 ही करुणा ओतप्रोत भरलेली दिसून येते.
स्वामीजी वृंदावनला जात होते,
 तेव्हाचा एक प्रसंग. सुमारे ५० किलोमीटर अंतर स्वामीजी पायी चालत गेले. 
वीसेक किलोमीटर चालून गेले असतील. थकून गेले होते. तेवढ्यात एक माणूस 
रस्त्याच्या कडेला बसून चिलीम ओढत असलेला त्यांना दिसला. आपणही एकदोन झुरके
 मारावे म्हणजे जरा हुशारी वाटेल, असे पायपीट करून दमलेल्या स्वामीजींना 
वाटले. ते त्या माणसाजवळ गेले आणि त्यांनी त्याला चिलीम मागितली. तो घाबरून
 म्हणाला, `महाराज आपण साधू आहात. मी भंगी आहे. आपल्याला माझी चिलीम चालणार
 नाही.' हे ऐकताच स्वामीजी आपल्या वाटेने चालू लागले. काहीच अंतर चालून 
गेले असतील, त्यांच्या मनात विचार आला- आपण संन्यासी आहोत. सर्वाभूती 
परमेश्वर पाहतो आणि तो माणूस भंगी आहे म्हणून त्याची चिलीम आपल्याला चालत 
नाही. असे कसे? पुढे गेलेले स्वामीजी परत फिरले. त्या माणसाच्या जवळ बसले 
अन त्याला म्हणाले, `मला चिलीम भरून दे.' तो माणूस गयावया करू लागला. परंतु
 स्वामीजींनी त्याला समजावले आणि आग्रह केला. त्याच्या हातची चिलीम त्यांनी
 ओढली. ताजेतवाने झाले आणि मगच पुढच्या मार्गाला लागले. या छोट्याशा 
प्रसंगात आपल्या मर्यादेतून बाहेर पडण्याचा आत्मसंघर्ष जसा आहे, तसाच 
मानव्याचा दाट गहिवर सुद्धा आहे. खरे तर हा गहिवर असल्याशिवाय कशालाही काही
 अर्थ नाही, असा दूरगामी संदेशही आहे.
स्वामीजींच्या भारतभ्रमणात 
घडलेला आणखीन एक प्रसंग असाच बोलका आहे. राजस्थानातील खेत्री संस्थानात 
त्यावेळी स्वामीजी वस्तीला होते. एक दिवस संस्थानाचे महाराज अजितसिंग एका 
नर्तकीचे गाणे ऐकणार होते. त्यांनी स्वामीजींना निरोप पाठवला. आपण संन्यासी
 असल्यामुळे नर्तकीच्या गाण्याला येऊ शकणार नाही, असे स्वामीजींनी कळवले. 
त्या गायिकेला हा निरोप झोंबला. तीही चतुर असली पाहिजे. तिने सुरदासाचा एक 
अभंग गायला घेतला. अभंग होता, `प्रभू मोरे अवगुण चित ना धरो, समदर्सी है 
नाम तिहारो, चाहे तो पार करो.' ती गायिका अतिशय करुण स्वरात आळवीत होती, 
`हे प्रभू तू तर समदर्शी आहेस.' पुढील चरणात म्हटले होते, `लोखंडाचा एक 
तुकडा देवमूर्तीच्या रुपात असतो आणि दुसरा कसायाच्या हातातील सुरीच्या 
रुपात असतो. पण परिसाचा स्पर्श झाला की, दोन्हीचे सोने होते.' हे प्रभू 
तूही तसाच आहेस. तुझ्यापुढे पुण्यवान काय नि पापी काय, सगळे सारखेच. सारी 
तुझीच लेकरे. सूरदासांच्या या पदातील आर्त व्याकुळता स्वामीजींच्या हृदयाला
 घर करून गेली आणि त्यांनी गाणे संपल्यावर त्या गायिकेची क्षमा मागितली. 
मनातील अपार करुणेशिवाय हे शक्य आहे का? असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात व
 आजूबाजूला घडतच असतात, पण साधारणपणे त्याकडे दुर्लक्ष करण्याचीच प्रवृत्ती
 आपण पाहतो.
मात्र ही करुणाशीलता एवढ्यापुरतीच नव्हती. स्वामीजींना 
त्यांच्या प्रवासात त्यावेळच्या समाजाचे विदारक दर्शन होत होते. दारिद्र्य 
आणि अज्ञान यांच्या विक्राळ दर्शनाने त्यांना अस्वस्थ केले होते. म्हणूनच 
अनेकदा ते महाराज अजितसिंग यांच्याशी याबद्दल बोलत असत. पैसा आणि सत्ता 
हाती असलेल्या संस्थानिकांनी यावर उपाय करायला हवा, अशी कर्तव्याची जाणीव 
ते सतत करून देत असत. सामान्य माणसाला शिक्षण द्यावे. हे शिक्षण त्याच्या 
हाताला काम देणारे आणि त्याचे मन सदाचाराकडे वळवणारे असावे, असा त्यांचा 
आग्रह राहत असे. याच प्रवासात अबुमार्ग स्थानकावर त्यांची आपले गुरुबंधू 
ब्रम्हानंद आणि तुरीयानंद यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलतानाही 
त्यांनी या दारिद्र्याचा आणि लोकांच्या हलाखीचाच उल्लेख केला. ही परिस्थिती
 पाहून आपल्याला रात्र रात्र झोप येत नाही, असे आपल्या गुरुबंधूंना सांगता 
सांगताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्याला फार मोठे काम 
करावे लागेल, असेही ते त्यांच्याशी बोलताना म्हणाले.
मादाम एम्मा 
काल्व्हे ही त्या काळातील युरोप व अमेरिकेतील रंगभूमीवरील एक आघाडीची 
गायिका होती. तिच्याही बाबतीत एक विलक्षण प्रसंग घडला. सौंदर्य, संपत्ती, 
प्रसिद्धी हे सारे काही पायाशी लोळण घेत असूनही ती मनाने प्रचंड अस्वस्थ, 
एकाकी आणि खचलेली होती. विवेकानंदांचा मुक्काम त्यावेळी ऑपेरा हाऊसचे मालक 
मिल्वर्ड अडम्स यांच्याकडे होता. तिने विवेकानंदांना भेटावे असे काही 
जणांनी तिला सुचवले पण ती काही गेली नाही. एक दिवस तिचा प्रयोग सुरु होता. 
पहिला अंक झाला. पण दुसऱ्या अंकात आपण काम करू शकणार नाही, आपणास अस्वस्थ 
वाटते आहे असे ती म्हणाली. तरीही सगळ्यांनी तिला दुसऱ्या अंकासाठी तयार 
केले. दुसरा अंक संपला आणि मग मात्र ती अस्वस्थ मन:स्थितीतच आपल्या खोलीत 
गेली. नेहमीप्रमाणेच खोलीबाहेर अनेक लोक उभे होते. पण क्षणभरात तिला लक्षात
 आले की लोक आहेत पण नेहमीची गडबड गोंधळ नाही. ती बाहेर आली तेव्हा 
व्यवस्थापकांनी सांगितले की, तिची सहा वर्षांची मुलगी अपघाताने जळून मरण 
पावली आहे. तिला ही घटना माहीत नसतानाही अंतर्मनातील कुठल्याशा संवेदनेने 
ती पहिल्या अंकानंतर अस्वस्थ झाली होती. या घटनेनंतर ती पूर्णच ढासळली. ती 
आत्महत्येचा विचार करू लागली. आपण मिशिगन सरोवरात उडी घ्यावी म्हणून ती 
बाहेर पडत असे. पण नकळत तिची पावले विवेकानंदांच्या मुक्कामाच्या घराकडे 
वळत; अन स्वप्नातून बाहेर आल्याप्रमाणे ती भानावर येत असे. ती 
विवेकानंदांना भेटायला मात्र गेली नाही. चार-पाच वेळा असे झाल्यानंतर मात्र
 एक दिवस ती मनाचा हिय्या करून स्वामीजींना भेटायला गेली. तिने खोलीत 
प्रवेश केला तेव्हा स्वामीजी ध्यान करीत होते. एम्मा काल्व्हेने खोलीत 
प्रवेश करताच ते म्हणाले, `ये मुली. ये. कोणतीही भीती बाळगू नकोस.' एवढ्या 
शब्दांनीच ती शांत झाली. नंतर त्यांनी तिच्याकडे न पाहताच तिच्या 
जीवनाविषयी बोलायला सुरुवात केली. अनेक खाजगी गोष्टींचाही त्यांनी उहापोह 
केला. त्यावर काल्व्हेने विचारले, आपणास हे कोणी सांगितले? त्यावर स्वामीजी
 उत्तरले, कोणी काही सांगण्याची गरज आहे असे तुला वाटते का? मी तुझे मन 
एखाद्या पुस्तकासारखे वाचू शकतो. नंतर त्यांनी तिला मन शांत आणि प्रसन्न 
करण्यास सांगितले. तब्येत सुधारून घेण्यास सांगितले. अतिशय समाधानाने एम्मा
 काल्व्हे तिथून बाहेर पडली. भाषा, भूषा, देश सारं काही टोकाचं वेगळं 
असलेल्या एका अपरिचित गायिका नटीविषयी देखील स्वामीजींची वृत्ती केवढी 
करुणार्द्र होती.
पाश्चात्य देशातील आपला दुसरा प्रवास आटोपून 
स्वामीजी परतत होते. चार दिवसांचा ग्रीसमधील मुक्काम आटोपून ते इजिप्तला 
आले होते. एक दिवस संध्याकाळी सोबतच्या काही लोकांसह ते इजिप्तची राजधानी 
कैरो येथील रस्त्यांवरून फिरत होते. बोलायला अनेक विषय होते. कुठलाही 
कार्यक्रम नसल्याने सारेच गप्पा आणि भटकण्याच्या मन:स्थितीत होते. चालता 
चालता अचानक सोबत्यांच्या लक्षात आले की ते नकळत वेश्यांच्या वस्तीत आले 
आहेत. लगेच सगळे माघारी वळले. त्यांच्यासोबत स्वामीजीही मागे फिरले. पण आपण
 मागे का फिरलो याचे त्यांना भानच नव्हते. तशात तेथील एका स्त्रीने त्यांना
 आवाज दिला आणि स्वामीजी सरळ तिच्या समोर जाऊन उभे राहिले. तिचे हावभाव आणि
 बोलणे स्वामीजींनी ऐकले आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले, 
`किती दुर्दैवी जीव! आपण स्वरूपत: कोण आहोत याचा तिला पूर्ण विसर पडला आहे.
 आपलं सारं ईश्वरत्व तिने केवळ आपल्या शरीरात विसर्जित करून टाकलं आहे.' 
त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले अन त्यांनी हात जोडले. 
स्वामीजींची ही प्रतिक्रिया पाहून त्या स्त्रियाही भांबावून गेल्या. त्यात 
सामान्य पुरुषी प्रतिक्रियेचा तर लवलेशही नव्हता, पण घृणा, तिरस्कार, राग, 
द्वेष इत्यादीही नव्हते. होती ती केवळ अपार करुणा. त्यांच्या मनातील हे भाव
 थेट त्या वेश्यांच्या हृदयाला भिडले त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले. 
त्यातील एकीने त्यांच्या वस्त्राला आदरपूर्वक किंचित स्पर्श केला आणि ती 
उद्गारली, `साधू पुरुष. ईश्वरी आत्मा.' एम्मा काल्व्हेने हा प्रसंग लिहून 
ठेवताना म्हटले आहे, समाज ज्यांची हेटाळणी करतो त्यांच्याबद्दल दाटून आलेली
 ही अपार करुणा पाहून मला येशु ख्रिस्ताची आठवण आली.
स्वामीजींच्या 
जीवनातील एक प्रसंग असाच हृद्य आहे. इ.स. १९०१ चा अखेरचा काळ होता. कोलकाता
 येथे गंगेच्या किनाऱ्यावर बेलूर मठाचे काम सुरु होते. या कामावर अनेक 
संथाळ मजूर काम करत होते. स्वामीजी त्यांच्याशी बोलत असत. त्यांच्या 
सुखदु:खाच्या गोष्टी ऐकत असत. कधी कधी ते म्हणतही असत, `महाराज तुम्ही 
आमच्याशी बोलत नका जाऊ. आमचं काम नाही झालं किंवा उशीर झाला तर आम्हाला 
रागावतील.' पण स्वामीजी त्यांना अभय देत. म्हणत, घाबरू नका. मी पाहून घेईन 
ते. तुम्ही तुमच्या गोष्टी सांगा. त्या मजुरांना तेवढेच बरे वाटे की 
कोणीतरी आपले म्हणणे ऐकतो. आपली विचारपूस करतो. पुष्कळदा त्या मजुरांची 
दु:ख ऐकून स्वामीजी भावनावश होऊन जात असत. एक दिवस त्यांनी त्या मजुरांचा 
प्रमुख केष्टो याला विचारले, `तुम्हाला इथे जेवण दिले तर चालेल का?' त्यावर
 केष्टो म्हणाला, `तुमच्या हातचं मीठ खाल्लं तर आमची जात बुडेल ना?' त्यावर
 स्वामीजी म्हणाले, `स्वयंपाकात मीठ घालणार नाही. मीठ वेगळे ठेवू. लागेल 
तसे घ्यावे.' तसा बेत ठरला आणि एक दिवस बेलूर मठात सगळ्या मजुरांना सुग्रास
 जेवण देण्यात आले. त्या मजुरांनी असे जेवण कधीही जेवले नव्हते. ते 
म्हणाले, `महाराज, कसे बनवले हे सारे पदार्थ. आम्ही तर आजपर्यंत कधीच एवढं 
चांगलं जेवलो नाही.' स्वामीजी पंक्तीतून फिरून सगळ्यांचा समाचार घेत होते. 
आग्रह करत होते. ज्या दरिद्री नारायणाच्या सेवेचा संदेश त्यांनी आयुष्यभर 
दिला, त्या दरिद्री नारायणाला प्रातिनिधिक रुपात का होईना, पण एक दिवस तरी 
चांगले पोटभर जेवायला घालावे ही त्यांची इच्छा होती. त्या दिवशी आपल्या 
शिष्यांशी बोलतानाही ते याच विषयावर बोलले. ते म्हणाले, `दारिद्र्य हा आपला
 खूप मोठा अन महत्वाचा प्रश्न आहे. हा मठ, पूजाअर्चा, धर्माची शिकवण हे 
सारे करीत राहून आपण काय करणार आहोत? हे सारे विकून टाकावे. येणारा पैसा 
गोरगरिबांना वाटून टाकावा आणि आपण सगळ्यांनी भिक्षा मागून गुजराण करावी. 
गरिबांची सेवा करावी.' अर्थात भावनावेगातील या उद्गारांच्या मर्यादाही 
त्यांना माहिती होत्या. ज्या समाजासाठी त्यांचे मन तळमळत होते त्या 
समाजाच्या कल्याणासाठीच बेलूर मठासारख्या कायमस्वरूपी व्यवस्थेची गरज असते 
हे त्यांनाही ठाऊक होतेच. पण त्यांच्या मनातील करुणा मात्र अशी ओसंडून वाहत
 असे.
आपल्या या व्याकूळ करुणाशीलतेला अनेकदा त्यांनी आपल्या 
पत्रातूनही वाट मोकळी करून दिली आहे. शिकागो सर्वधर्म परिषदेच्या त्या 
जगप्रसिद्ध पहिल्या भाषणानंतरच्या मन:स्थितीचे वर्णन करताना आपल्या 
गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `कालपर्यंत जगाला अनभिज्ञ 
असलेला मी आज जगप्रसिद्ध होऊन गेलो होतो. सारी सुखे माझ्या दाराशी हात 
जोडून उभी होती. पण रात्रभर माझा डोळ्याला डोळा लागला नाही. सतत माझ्या 
नजरेपुढे माझ्या देशबांधवांची खपाटीला गेलेली पोटे येत होती. त्यांच्या 
अज्ञान, हलाखीची आठवण मनाला अस्वस्थ करीत होती. माझी उशी आसवांनी भरून गेली
 होती.'
दक्षिणेश्वर येथे आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्मदिन 
साजरा झाला. मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या या उत्सवात काही उपद्रवी 
लोक, चोर, वेश्या आदीही आले होते. त्यांनीही प्रसाद वगैरे घेतला याबद्दल 
त्यांच्या गुरुबंधूंनी आपली नाराजी स्वामीजींना पत्रातून कळवली होती. 
त्यावर स्वामीजींनी पाठवलेले उत्तर स्वामीजींचे अलौकिकत्व सांगून जाते. 
आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `काय म्हणता तुम्ही? हे 
लोक आलेत म्हणून काय झाले? त्यांनाच तर ठाकुरांची खरी गरज आहे. जे जीवनातून
 विचलित झाले आहेत. भरकटले आहेत त्यांनाच तर प्रकाश हवा. चांगले सभ्य लोक 
नाराज झाले आणि आले नाहीत तरी चालेल. पण या लोकांना थांबवू नका. त्यांनाच 
ठाकुरांच्या कृपेची गरज जास्त आहे.' अर्थात हा भावात्मक आशय सांगतानाच 
त्यांची दृष्टी व्यवहारावरून ढळली नाही. या लोकांमुळे कार्यक्रमात व्यत्यय 
वा गोंधळ निर्माण होऊ नये. कार्यक्रमाची शिस्त आणि गांभीर्य कायम राहावे 
याकडे लक्ष देण्यात यावे, असे सांगून त्यासाठी काय उपाय करावे हे देखील 
स्वामीजींनी याच पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांच्यातील करड्या 
व्यवस्थापकाचे दर्शनही या पत्रात होऊन जाते. पण म्हणून त्यांच्या मनातील 
सहृदयता मात्र कोणत्याही स्थितीत झाकोळून जात नाही.
त्यांची अनेक 
पत्रे; विशेषत: आपल्या शिष्यांना आणि गुरुबंधूंना लिहिलेली अनेक पत्रे, 
त्यांच्या अतिशय कोमल, कारुण्यपूर्ण मनाची साक्ष देतात. आपल्या पाश्चात्य 
शिष्यांना लिहिलेल्या एका पत्रात स्वामीजी म्हणतात, `माझ्या मनात 
सगळ्यांबद्दलच कणव दाटून येते. वाटते की सगळ्यांचे भले होवो. मग मी तशीच 
प्रार्थना करू लागतो. त्यानंतर मी काहीच करू शकत नाही. माझे डोळे भरून 
येतात, वाहायला लागतात. सगळ्या जगाबद्दलचे अपार निरपेक्ष प्रेम मनात खूप 
दाटून येते.' एकदा गप्पांच्या ओघात ते म्हणाले, माझ्या हृदयातील भावनांचा 
आवेग इतका अधिक असतो की त्यामुळे माझे हृदय मोठे होत आहे. एखादे वेळी ते 
फुटून जाईल की काय अशी मला भीती वाटते.
दु:खीतांची सेवा, 
भुकेल्यांचा कळवळा, अज्ञानाची कणव, साहाय्यासाठी धावून जाण्याची तत्परता, 
हलाखीतील देशबांधवांचे सतत स्मरण, मोक्ष साधनेइतकेच एखाद्याचा दु:खभार हलका
 करण्याचे महत्व, मानवाच्या सेवेसाठी पुन:पुन्हा जन्म घेण्याची सिद्धता; या
 साऱ्यातून अपार करुणाशीलतेचे दर्शन होते. त्यांनी बेलूर मठात अनेक 
पशुपक्षीही पाळले होते. सहृदयता सगळ्यात महत्वाची असे त्यांनी अनेकदा 
म्हटले आहे. ही सहृदयता, करुणाशीलता त्यांच्या जीवनाचा प्रधान स्वर होता.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ फेब्रुवारी २०१३                 
                            
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा