गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो,
दोन दिवसांसाठी. तेथील नगर वाचनालयाच्या `हेमंत व्याख्यानमाले'साठी.
दुसऱ्या व्याख्यानाचा संपूर्ण दिवस रिकामाच होता. वाचनालयाच्या
अध्यक्षांबरोबर तेथील प्रसिद्ध जैताई देवीच्या मंदिरात गेलो. तेथील काही
लोकांनी जवळच्या कासुर्डी जंगलात वनभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता.
जाण्यासाठी दोन गाड्या ठरवल्या होत्या. काही लोक स्वयंचलित दुचाकीवरून आले
होते. स्वयंपाक मंदिराच्या स्वयंपाकघरातच काही महिलांनी तयार केला होता आणि
डब्बे भरून नेण्यात आला होता.
शहरापेक्षा एकदम वेगळा अनुभव.
क्याटरिंगवाल्याला ऑर्डर देऊन जेवण न बोलावता, सगळ्यांनी मिळून केलेला
स्वयंपाक. चर्चा न करता सहजीवनाचा धडा. गाडीतून जाता-येताना पाहुण्यांची
व्यवस्था आधी झाली पाहिजे हा आग्रह. गाणी, मोबाईल, कॅमेरा यांचा अभाव.
सतरंजी अंथरण्यापासून सगळ्या छोट्या मोठ्या कामांसाठी सहज पुढे होण्याचा
साधेपणा. सारं काही अस्सल.
सहज गप्पागोष्टीत कळलं की, मंदिरातर्फे रोज,
वर्षाचे ३६५ दिवस, सामान्य रुग्णालयातील रुग्णांना जेवणाचा डबा पोहोचवला
जातो. कधी ५-६ रुग्ण असतात तर कधी ३०-३२. जेवढे रुग्ण असतील तेवढ्यांना
जेवण पोहोचवायचे हे ठरलेले. त्यासाठी पैसा, धान्य, अन्य सामुग्री, स्वयंपाक
तयार करणे, किती रुग्ण आहेत किती नाहीत हे पाहणे, त्यांना डबे पोहोचवणे...
असे सारे काही मंदिरातर्फेच. सरकारी मदत, आदेश, अध्यादेश, निरीक्षक,
आढावा... काही नाही. भक्तिभावना आणि त्यापोटी असणारी कर्तव्यभावना या
भरवशावर अनेक वर्षांपासून हे सुरळीत सुरु आहे. नियोजन, आखणी वगैरेपेक्षा
मनातील विशाल आणि व्यापक प्रेरणा याच शेवटी महत्वाच्या नाहीत का?
नगर
वाचनालय देखील मागे नाही. वणीतील एका चौकात लावलेले साने गुरुजींचे
छायाचित्र जुने झाले होते. खराब झाले होते. वाचनालयाने पुढाकार घेऊन चौकात
नवीन चित्र लावले. नानाजी देशमुखांच्या चित्रकुट प्रकल्पात आणि अन्यही
मोठमोठ्या प्रकल्पात आपल्या चित्रकला व शिल्पकलेने ठसा उमटविणारा
चित्रकारही भेटला. एखादा रस्त्यावरील सामान्य ग्रामीण माणूस असेच त्याचे
दर्शन होते. कोणी सांगितल्याशिवाय हा मोठा कलाकार आहे हे कळणार सुद्धा
नाही. `sms पाठवून मला मत द्या'च्या आजच्या जमान्यात हा अनाम कलाकार लक्षात
राहून गेला.
७०-८० हजार वस्तीचं छोटंसं शहर. पण तिथे असं बरंच काही
अनुभवायला मिळालं. चांगलं, अर्थपूर्ण जगण्यासाठी मुंबई, पुणेच हवं असं कुठे
आहे?
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ८ फेब्रुवारी २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा