राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक भय्याजी गाडे यांचे ७ 
फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी वर्धा येथे निधन 
झाले. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक सभा झाली. यात
 संघाच्या अधिकाऱ्यानसोबतच एन. सुलताना शेख यांनीही भय्याजी गाडे यांना 
श्रद्धांजली वाहिली. सुलताना शेख या मुस्लिम महिला आहेत हे तर न सांगताही 
कळणारे आहे. हिंदू राष्ट्राच्या उभारणीचा ध्यास घेतलेल्या संघाचे आजीवन 
प्रचारक राहिलेले भय्याजी गाडे यांचा आणि त्यांचा काय संबंध? या दोघांचा 
संबंध हा पिता- पुत्रीचा संबंध होता. सुलताना शेख या मूळ आर्वीच्या. लग्न 
होऊन त्या वर्धेला आल्या. भय्याजी काही काळ आर्वी शहरात प्रचारक होते. 
अन्यत्रही प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. अखेर ते वर्धेला जिल्हा 
कार्यालयात वास्तव्याला आले. प्रदीर्घ काळ त्यांचे वास्तव्य वर्धा 
कार्यालयात होते. सुलताना शेख या वर्धा संघ कार्यालयाच्या जवळच राहतात. 
आर्वीची जुनी ओळख या ठिकाणीच नात्यात परिवर्तित झाली. मग काय? भय्याजींचे 
दुखणे-खुपणे, चहापाणी अशा सगळ्या गोष्टींकडे स्वयंसेवकांसोबतच सुलताना शेख 
देखील लक्ष देऊ लागल्या.
तब्येत ठणठणीत होती तोवर भय्याजींचीही 
सुलताना यांच्या घरी चक्कर ठरलेलीच. प्रसंगविशेषी जेवणखावण पण होत असे. 
भय्याजींच्या आवडीनिवडी देखील सुलताना यांना ठाऊक आहेत. भय्याजींनी दिलेली 
शाल आपण सांभाळून ठेवली आहे, असेही त्यांनी श्रद्धांजली सभेत सांगितले. 
सुलताना यांचे पती आणि मुले यांच्याशीही भय्याजींचा स्नेह जुळला होता. 
आर्वीचे कोणी वर्धेला आले तर ते, आवर्जून त्यांना सुलताना यांच्याकडे घेऊन 
जात. त्यांची ओळख करून देत. आपुलकीचा परीघ वाढवीत असत. म्हणूनच श्रद्धांजली
 सभेत सुलताना शेख यांनाही गहिवरून आले होते.
विशेष म्हणजे, 
संघालाही यात काही गैर वाटले नाही. कधी कोणी या संबंधांबद्दल नाराजी व्यक्त
 केली नाही. श्रद्धांजली सभेत तर भय्याजी नव्हते; मंचावर विदर्भ प्रांताचे 
संघचालक दादासाहेब भडके, महाराष्ट्र- गुजरात- गोवा या तीन राज्यांचा मिळून 
असलेल्या संघ व्यवस्थेतील पश्चिम क्षेत्राचे प्रचारक सुनील देशपांडे आदी 
मंडळी होती. तरीही सुलताना यांना बोलावण्यात आले. सभेत आपल्या भावना व्यक्त
 करण्याची संधी देण्यात आली. संघ मुसलमानांविषयी द्वेष पसरवतो, संघ 
मुसलमानांचा शत्रू आहे, वगैरे जे समज बाळगले जातात किंवा पसरवले जातात 
त्यात तथ्य आहे असे, हा प्रसंग पाहून म्हणता येईल का? संघाच्या कामाची एक 
विशिष्ट शैली आणि पद्धत आहे. ती समजली की मग अनेक गैरसमज दूर होतात.
संघ
 ब्राम्हणांचा आहे आणि अन्य जातींच्या विरोधात आहे, असेही एक वातावरण 
सुरुवातीला अनेक वर्षे होते. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने संघाने 
आता तो समज मोठ्या प्रमाणात दूर केला आहे. स्वत: महात्मा गांधी आणि डॉ. 
आंबेडकर यांनीही संघाच्या या शैलीचा अनुभव घेतला आहे आणि प्रत्यक्ष संघ 
संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्याशी त्याविषयी चर्चा केली आहे. मुसलमानांच्या 
बाबतीतही कालांतराने गैरसमज दूर होतील. समाजातील प्रत्येक माणूस जोडत जायचा
 आणि प्रेम पेरत जायचे ही ती शैली. कार्यकर्त्याची क्षमता, त्याचे गुणदोष, 
परिस्थिती यानुसार या शैलीचे परिणाम पाहायला मिळतात.
तत्व आणि 
व्यवहार यातील तफावत जगात सगळीचकडे, सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते, 
अनुभवाला येते. परंतु ही तफावत सुद्धा नीट समजून घ्यायला हवी. तत्व ही 
एखाद्या महान व्यक्तीने त्याच्या आयुष्याची किंमत देऊन सिद्ध केलेली बाब 
असते. अन्य सामान्य लोकांना त्याविषयी आस्था आणि ओढ असते. त्यानुसार 
वागण्याचा प्रयत्नही ते करतात. पण त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, 
आत्मिक मर्यादा असतात. मग तो चुकतो, गैर वागतो. अशा गैर वागण्यामागे 
स्वार्थ वा काही निराळा हेतूही असू शकतो, पण नेहमीच तसा काही हेतू असतो असे
 मानण्याची गरज नाही. ही एक संपूर्ण निराळी, दीर्घकालीन प्रक्रिया असते. 
नियम, कायदे करून, आक्रस्ताळेपणा करून त्यातून फारसे साध्य होत नाही. हे 
सारे नीट समजून घेणे याचेच नाव परिपक्वता. संघाचा यावरच भर असतो.
याशिवाय
 आणखीन एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, एखादी व्यक्ती व विचार यांची 
चिकित्सा, विश्लेषण आदी तटस्थपणे आणि कठोरपणे करतानाही त्याच्याबद्दल स्नेह
 आणि सहानुभूती बाळगता येते. संघर्ष करतानाही ज्याच्याशी संघर्ष करायचा 
त्याच्याबद्दल मनात दुष्टावा असण्याचे कारण नाही. पण स्नेह, सहानुभूती आहे 
याचा अर्थ कणखर चिकित्सा करायची नाही, हे धोरण योग्य नाही. हे नीट समजून 
घेतले की मग बराच गोंधळ कमी होतो. पुरोगामी, सेक्युलर (धर्मनिरपेक्ष, 
निधार्मिक, धर्मविरोधक, इहवादी) संघाच्या बाबतीत कधी हे समजून घेतील का? 
समजून घेऊ शकतील का?
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०१३                 
                            
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा