शनिवार, ९ जुलै, २०२२

गुन्हेगारी

बलात्कार, खून, मारामाऱ्या, जात वा धर्मावरून वाद- भांडणे- संघर्ष-, भ्रष्टाचार, सर्व प्रकारचा अनाचार, सर्व प्रकारची गुन्हेगारी; या सगळ्याचे एकूण समाजाच्या तुलनेत प्रमाण किती? त्या मानाने सर्व प्रकारच्या भलेपणाचे प्रमाण किती? आजही शंभर कोटीहून अधिक लोक रात्री शांतपणे झोपू शकतात ना? मग असे का होते की, एक जरी गुन्हा घडला तरीही संपूर्ण समाज वाईट ठरवला जातो आणि एखादी चांगली कृती ही व्यक्तिगत कृती ठरते. चांगली गोष्ट पाहिली, ऐकली की सहज विचार करतो आपण- `हं, तो माणूस चांगला आहे. त्या संस्थेने चांगले काम केले.' मात्र तेच एखादी चुकीची गोष्ट पाहिली, ऐकली की सहज विचार करतो- `कुठे चाललाय समाज? कसं होईल समाजाचं?' काय असेल ही मानसिकता? याचा शोध घेण्याची, तपास करण्याची, यावर विचार आणि चिंतन करण्याची गरज नाही का? हे अगदी खरे की, एखादी सुद्धा चुकीची गोष्ट होऊ नये. पण त्या विषयात जायचे तर पूर्ण तत्वज्ञानाचा ग्रंथ होईल. व्यावहारिक मर्यादेत विचार केला तर असे म्हणावे लागेल की, मानवी अस्तित्वाच्या इतिहासात कधीही असा क्षण नव्हता आणि असणार नाही की जेव्हा काही चुकीचे घडले नाही वा घडणार नाही. अर्थात त्याबद्दल चिंता, दु:ख, वेदना असायलाच हवी आणि तसे होणार नाही याचा सर्व प्रकारचा प्रयत्नही करायला हवा. पण जेव्हा चांगले पाहण्याची, समजण्याची आणि उचलून धरण्याची आमची तयारी नसते; एवढेच नव्हे तर चांगले म्हणजे व्यक्तिगत आणि वाईट म्हणजे समाज वाईट अशी वृत्ती विकसित होते; तेव्हा ते नक्कीच सुदृढ मानसिकतेचे लक्षण म्हणता येणार नाही. असे तर नाही की आमची समाज म्हणूनच आंतरिक ओढ ज्याला अयोग्य वा चुकीचे म्हटले जाते त्याकडे आहे आणि आम्ही जबरदस्तीने चांगले आहोत? छगन भुजबळांच्या बातम्या पाहताना - `काश... आपल्याला हे जमले असते...' असे वाटणारेच अधिक आहेत का? तसे असेल तर- चांगले म्हणजे व्यक्तिगत, वाईट म्हणजे समाज वाईट- हे ठीक आहे. पण भुजबळांची असूया वाटणारे खूप कमी आहेत असे मला व्यक्तिश: वाटते.कदाचित भाबडेपणा असावा. पण मग चांगले आणि वाईट दोन्हीही व्यक्तिगत किंवा दोन्हीही सामाजिक का नाही? कुठेतरी काहीतरी चुकते आहे एवढे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

१० जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा