भारताची उदारता आणि त्याची विचार करण्याची पद्धत यांचा जेवढा विचार करावा तेवढे आपण स्तिमित होतो. आता हेच पहा ना, कोणाचा महिना अमावास्येला संपतो तर कोणाचा पौर्णिमेला. तरीही काही घोळ नाही, वाद नाही, संघर्ष नाही. धार्मिक, सामाजिक, राजकीय सगळ्याच विषयात प्रचंड उदारता आणि सुमेळ हे या देशाचे, इथल्या विचार परंपरेचे वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्ये आली कशातून? याची दोन कारणे सांगता येतील. एक म्हणजे, सगळ्या लौकिक बाबी ही साधने आहेत, साध्य नाहीत; याची सखोल जाण. अन दुसरे म्हणजे, एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतीत होऊ शकते या सत्याचे अपार भान. या दोन गोष्टींनी अनावश्यक कडवेपणा काढून टाकला. त्यामुळे जग समरूप करण्याची भारताला गरजही वाटली नाही आणि त्याने तो प्रयत्नही केला नाही. सगळ्या लौकिक साधनांचा उपयोग करून जीवनाची सरिता अप्रतिहत वाहते. ती तशी वाहू देणेच योग्य. ती सरिता अडवून तिचे डबके करू नये हीच भावना येथे राहिली. मात्र इस्लाम, ख्रिश्चन किंवा भारतेतर पंथ, लोकशाही, आधुनिक विज्ञान, बुद्धिवाद, समाजवाद, साम्यवाद यांनी जीवनाची चौकट निश्चित केली आणि त्या चौकटीत सारं जीवन कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यातून समरुपतेचा दुराग्रह आणि अनावश्यक कडवेपणा जन्माला आला. हा समरुपतेचा दुराग्रह आणि अनावश्यक कडवेपणा यांना थोपवणे आणि आपल्या स्वभावात, वृत्तीत, DNA मध्ये तो येऊ न देणे; असे द्विविध आव्हान आज भारतासमोर आहे.
- श्रीपाद कोठे
२० जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा