पावसाने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवल्याने, सध्या पाणी या विषयाला जे attention दिले जात आहे; तेवढे दोन वर्षे आधी दिले असते तरीही, खूप झाले असते. दुर्दैवाने सामान्य माणूस, राज्यकर्ते, यंत्रणा, व्यवस्था, विचारक, मार्गदर्शक; सगळ्यांनाच 'आज आणि आत्ता'चा लघुदृष्टी रोग जडलेला आहे. अन कोणत्याही नेत्र तज्ञाकडे या रोगावर उपाय नाही. निसर्गाचे/ नियतीचे तडाखे... बस्स, हा एकच उपाय. स्वतःची अब्रू झाकायला टँकर बंद करायचे, पैसे देऊन सुद्धा टँकर मिळणार नाही म्हणायचे; अन पाणी व्यापाऱ्यांना नद्या काय वा अन्य जलसाठे काय विकत जायचे. विद्यमान व्यवस्था ढोंगी आणि बुझदिल झाली आहे. जे पाण्याच्या बाबतीत तेच बाकीच्या बाबतीतही. क्षणात ५०-६० किमीचा वेग पकडणारी वाहने रस्त्यावर लोटायची, नवीन रस्ते सुद्धा पुरणार नाहीत एवढ्या लांबी रुंदीच्या गाड्या रस्त्यावर ढकलायच्या, नाईट लाईफ सुखेनैव चालेल अशाच जीवन पद्धतीला प्रोत्साहन देऊन दारू पिऊन गाडी चालवल्यास अमुक होईल इत्यादी दमदाटी करायची; आणि ज्या हेल्मेटचा अपघाताशी अर्थार्थी संबंध नाही ते न घातल्याबद्दल लोकांना गुन्हेगार वा गुंड असल्यासारखे वागवायचे; ही देखील ढोंगबाजी आणि बुझदिली आहे. केवळ माझं/ आपलं यासाठी कोणत्याही गोष्टींचं कौतुक होऊ शकतं का? का व्हावं? तसं होऊ शकत नाही. आजचे सत्ताकारण, राजकारण; विचार, विवेक, तारतम्य यापासून कोसो दूर गेले आहे. सत्तेवर भाजप आहे की काँग्रेस की कम्युनिस्ट की आणखीन कोणी; याने काहीही फरक पडत नाही. सत्ताकारण आणि राजकारण यांचं चालचरित्र बदलावं लागेल. ते बदलायचं असेल तर प्रथम समाजाला, माणसांना प्रवाहपतित न होता, स्वतःची धमक निर्माण करावी लागेल. ही धमक साधनविहीन धमक असेल ज्याला सत्व म्हणतात. आहे का तयारी?
- श्रीपाद कोठे
२४ जुलै २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा