शुक्रवार, २२ जुलै, २०२२

सभ्यतेचा कावेबाजपणा

पुन्हा एकदा इंग्रजी की मातृभाषा हा विषय चघळणे सुरु झाले आहे. आज NDTV 24 by 7 वर याविषयी चर्चा झाली. दिल्ली विद्यापीठात २० वर्षे इंग्रजी विषय शिकवलेल्या आणि दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या महिलांच्या `मानुषी' या मासिकाच्या संपादक मधु किश्वर यांनी आजची स्थिती, इंग्रजीचे माजवले जाणारे स्तोम, सर्व भारतीय भाषांची आवश्यकता आणि सगळ्या भारतीय भाषांच्या विकासाची गरज; असा व्यापक विषय मांडला.

महात्मा गांधीही स्वर्गात ज्यासाठी स्वत:च्या दुर्दैवाला दोष देत असतील असे त्यांचे नातू तुषार गांधी हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी हिरीरीने इंग्रजीचे गोडवे गायले. मधु किश्वर यांनी महात्मा गांधींच्या भाषाविषयक मताचा उल्लेख केला तेव्हा, त्यांना या वादात आणू नका, असा विद्वत्तेचा सल्ला या आधुनिक गांधीने दिला. खरे तर देव किती क्रूर थट्टा करतो हेच तुषार गांधी नेहमी दाखवून देत असतात. हे नावालाच गांधीजींचे नातू आहेत. कर्तृत्व तर शून्य आहेच, पण यांचा गांधीजींच्या विचारांशी काहीही संबंध नाही असेच म्हणावे लागेल. त्यांना ना गांधीजी समजले ना त्यांच्या विचारांशी त्यांची बांधिलकी! आपण महात्मा गांधींचे नातू आहोत म्हणजे, जगातील सारे ज्ञान, सारी समज आणि सारे शहाणपण यांचा ठेकाच आपल्याला दिला आहे असाच त्यांचा समज असावा.

तिसरे एक विद्वान होते, दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉ. प्रसाद. दलितांचा उद्धार, दलितांना न्याय, दलितांचे मानवतेचे जगणे म्हणजे; या देशाचे जे जे काही आहे ते ते तोडून फोडून त्याची राखरांगोळी करणे; असा विश्वास असणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. (या ठिकाणी दलित म्हणजे, त्यासोबत पिडीत, शोषित, वंचित, महिला, आदिवासी... वगैरे वगैरेही वाचावे.) हे डॉ. प्रसाद त्यांचेच प्रतिनिधी म्हणायला हवेत. हे अगदी हसत हसत जणू जगातील ब्रम्हसत्य गवसल्याच्या थाटात म्हणाले, `मी तर फार आधीपासूनच म्हणत आहे की, सगळ्या भारतीय भाषांचे एक संग्रहालय तयार करण्यात यावे. त्यात सगळ्या भाषांचे नमूने दाखवायला ठेवावेत आणि संपूर्ण भारताची भाषा इंग्रजी करावी.' यावर कपाळावर हात मारून घेण्याऐवजी काय करता येईल?

गंमत अशी की, आज दलित, पिडीत, शोषित, वंचित वगैरेची लेबले लावली की कोणाचेही तोंड बंद करता येते. नव्हे हे लेबल पाहिले की, तोंड उघडलेच जात नाही. अनेकांची अनेक कारणे असतील, पण परिणाम सारखाच. परंतु आता हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे की, हा प्रकार बंद व्हावा. वडाची साल पिंपळाला लावणे पुरे झाले. त्यातही एखाद्या विषयाला संघ वा संघ संबंधितांनी हात लावला असेल तर विचारायलाच नको. मधु किश्वर या काही संघाच्या नाहीत, ना भाजपच्या. स्वतंत्र विचार करणाऱ्या त्या विद्वान महिला आहेत. पण त्यांचे मुद्दे समजून घ्यायचेच नाहीत हा दुर्दैवी प्रकार आहे. जगभरातील विद्वान मातृभाषेबद्दल काय म्हणतात हे सगळ्या जगाला माहित आहे. तरीही ते ऐकण्याची मात्र आमची तयारी नाही.

या सगळ्या गोंधळातला मुख्य मुद्दा ही भाषा की ती भाषा हा नाहीच. तो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पहिला मुद्दा हा आहे की, आम्हाला विविधतेचे सहअस्तित्व मान्य आहे की नाही हा. आज भाषा, पैसा, महिला, उपभोगवाद, भांडवलशाही, विज्ञान, व्यक्तीस्वातंत्र्य, अशी वेगवेगळी नावे घेऊन अनेक वाद, चर्चा, विश्लेषणे, आग्रह अशा काही एकांगीपणे रेटले जातात की अन्य साऱ्या बाबींचे अस्तित्व शून्य होऊन जावे. भाषा म्हटले की बस, इंग्रजीच. दुसरी कोणतीही भाषा राहायलाच नको. जणू दुसरी भाषा बोलणाऱ्यासाठी हे जग नाहीच. पैसा हा विषय तर असा की सगळ्या गोष्टींचा संबंध पैसा कमावणे, बाळगणे आणि खर्च करणे याच्याशीच असतो. तुम्हाला अस्तित्व हवे असेल तर पैशाशिवाय ते तुम्हाला मिळणार नाही. महिलांची चर्चा पुरुषविहीन जगापाशी पोहोचते. विज्ञानाने तर अशी स्थिती आणली आहे की विचारूच नका. खूप सारे विश्लेषण तर जाऊच द्या, पण विज्ञान वगळता अन्य विषय शिकणे वा शिकवणे हास्यास्पद आणि बावळटपणा ठरतो. विज्ञानात आवड वा गती नसणे किंवा विज्ञानाला मर्यादा आहेत असे म्हणणे म्हणजे केवढा घोर अपराध. वर मागास, जुनाट वगैरे विशेषणे आहेतच.

आज नामशेष होणारे पशु, पक्षी, झाडे यांचे जतन करून जैव विविधता टिकवण्याचा आटापिटा केला जातो. मात्र अतिशय सूक्ष्मपणे मानवी जीवनातील अर्थपूर्ण आणि रसपूर्ण विविधतेचा गळा घोटण्यात आम्ही नकळत सहभागी होतो. त्याचे विचारशून्य समर्थनही करतो. आधुनिक म्हणवणाऱ्या या सभ्यतेचा हा कावेबाजपणा आपण कधी समजून घेणार?

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २३ जुलै २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा