सोमवार, ४ जुलै, २०२२

वक्तव्य सरसंघचालकांचे

सरसंघचालकांच्या कालच्या वक्तव्याची चर्चा सुरू होणे स्वाभाविकच आहे. त्यात जुन्या समजुती, गैरसमज, आवेश असे सगळे असणेही आश्चर्य न वाटणारेच. परंतु दोन गोष्टींची नोंद घेतली पाहिजे. तरच काही सार्थक चर्चा होईल.

१) ते कुठे बोलले हे विचारात घेतलं पाहिजे. ते मुस्लिम बुद्धिजीवी समुदायापुढे बोलले. दोन समाजगटातील आजच्या दुराव्याच्या, अविश्वासाचा पार्श्वभूमीवर एकत्रीकरणाचे बिंदू काय असू शकतात याचा विचार करताना स्वाभाविकच काही मुद्दे येतात. त्यातलाच हा एक. मुस्लिम समाजाने जी अलगता जोपासली आहे त्यावर शांतपणे फेरविचार करण्याचे ते आवाहन आहे.

२) हिंदू समाजापुढे उभ्या असलेल्या मुस्लिम आक्रमणाचा मुकाबला करतानाही हिंदू समाजाने आपले hindu character बदलू नये हा त्याचा दुसरा पैलू.

या दोन्हीत वावगे काय? सरसंघचालक म्हणजे आपल्याशी चहा टपरीवर चर्चा करणारी ओळखीची वा अनोळखी व्यक्ती नाही. समाजाच्या विचार व्यवहारावर ज्या व्यक्तींचा परिणाम होतो त्यातील ते एक आहेत. संपूर्ण समाज, संपूर्ण देश यांचे ऐक्य, शांती, सुख, समाधान हा त्यांच्या विचारांचा परीघ असतो आणि ते अतिशय स्वाभाविक आहे. मग देशातील दोन मोठ्या समुदायांच्या सलोख्याची दृष्टी देणारे विधान त्यांनी करण्यात गैर काय? शिवाय हा आमचा गट, हा तुमचा गट असे त्यांनी करणे एखाद्याला हवे असू शकेल. पण एखाद्याची ती अपेक्षा त्यांनी का पूर्ण करावी? याचा अर्थ झुंडबळी हिंदूंचे नसतात असाही नाहीच. पण अकारण एखाद्याचा जीव घेणे किंवा शारीरिक इजा करणे किंवा दहशत माजवणे; हे जितके वाईट आणि चुकीचे तितकेच; सकारण हे सगळे करणेही चुकीचेच. आत्मरक्षा ही या दोहोंच्या मधली बाब असते. आत्मरक्षा केलीच पाहिजे. ते करताना बळाचा उपयोग करावा लागला तरीही केला पाहिजे. पण मुळात आत्मरक्षेची गरजच उरू नये यासाठी काही करायचे की नाही. याचा अर्थ समस्या निर्मूल होतील असे नाही. जगाच्या अंतापर्यंत ही ओढाताण सुरूच राहणार आहे. तो जगाचा स्वभाव आहे. परंतु समस्या आणि संघर्ष कमी करणे, त्यासाठी प्रयत्न करणे, हाच सभ्यतेचा पाया अन हीच सभ्यता. भारताला सभ्यतेकडे न्यायचे की नाही? सरसंघचालकांनी सभ्यतेच्या पर्यायाची निवड केली आहे.

बाकी प्रत्येक जण स्वतंत्र आहेच म्हणा. अन every reason has a reason which the reason doesn't know हे तर असतंच.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा