विदर्भात साधारण ४० टक्के अधिक पाऊस झाला असं वाचण्यात आलं. गरमी मात्र म्हणावी तशी कमी झाली नाही. सुमारे महिना झाला असेल. छोट्या पडद्यावर ओरिसातील एक मंदिर दाखवले होते. पाचशे-हजार फुटांच्या टेकडीवर असलेल्या त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, बाहेर ५० अंशाच्या आसपास असलेलं तापमान, पण आत मात्र गारेगार. ना एसी, ना कुलर, ना अन्य काही. त्यावरच्या प्रतिक्रियाही दाखवल्या. भाविक भक्तांच्या प्रतिक्रिया चमत्कार अशाच होत्या. दिल्लीच्या एका वैज्ञानिकाची प्रतिक्रिया यावर प्रकाश टाकणारी होती. ते म्हणाले- या मंदिरात असलेल्या भुयारासारख्या जागेत मंदिरातील उष्ण वारे जात असतील. बांधकाम तसे असेल. त्यामुळे उष्णता जमिनीत शोषली गेल्याने मंदिरातील वातावरण गार होत असेल. याच दिशेने विचार केला तर म्हणावे लागेल की- उष्णता, पाऊस शोषून घेण्यासाठी जमीन नसल्याने उष्णता वातावरणातच फिरत राहते. उष्णता वा पाणी जिरवण्यासाठी माती गरजेची आहे. मातीकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. माती म्हणजे घाण, मातीबद्दल दुरावा हे टाकून द्यायला हवे.
महाराष्ट्रात नुकतेच दोन कोटी वृक्ष लावण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारनेही या अनुकरणीय उपक्रमाचे अनुसरण करीत पाच कोटी वृक्ष लावण्याचे ठरवले. हे प्रयत्न स्त्युत्य आहेतच. मात्र त्यासोबतच माती मोकळी राहील, कमीत कमी झाकली जाईल याचीही चळवळ हवी. अन्यथा, जमिनीत पाणी कमी मुरेल. अधिकची झाडे जमिनीतील पाणी अधिक ओढून घेतील आणि पुन्हा पाण्याची कमतरता जाणवेल. पाण्याची समस्या फक्त पाउस पडण्याची नाही, तर जमिनीत पाणी मुरण्याची देखील आहे. पडणारा पाउस अधिकाधिक मुरण्यासाठी जमीनही अधिक हवी. दिल्ली, बंगलोर, मुंबई, ठाणे येथील पाणी साचण्याची समस्या ही जमिनी झाकून टाकणे आणि पाणी थांबू नये यासाठी अधिकाधिक आणि उंच सिमेंटीकरणाचीही समस्या आहे. काही प्रमाणात तर ही समस्या माती मोकळी केल्याने आणि अनावश्यक उंचवटे कमी करण्याने कमी होऊ शकेल.
कचरा समस्या सोडवण्यासाठीही माती गरजेची आहे. झाडपाला, काडीकचरा, कागदकपटे, कपडे, अन्न, भाजीपाला इत्यादी अनेक गोष्टी सिमेंटवर सडतात. त्या सिमेंटमध्ये, टाईल्समध्ये विघटीत होत नाहीत, शोषल्या जात नाहीत. ठिकठिकाणी मातीचे खड्डे केल्यास त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल. मातीवर पादत्राणे न घालता चालणे हे तर आरोग्यासाठी उत्तमच आहे. आता मातीसाठी जागर करण्याची वेळ आली आहे.
- श्रीपाद कोठे
३१ जुलै २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा