रविवार, २४ जुलै, २०२२

सत्तेचे स्थैर्य

कर्नाटकमधील राजकीय नाट्याचे ना समर्थन करता येत ना आनंद. तांत्रिकता हेच जीवन झाल्यावर काय होते याचे हे उदाहरण आहे. कायद्यासहित अनेक गोष्टींचा कीस पाडण्यातच सगळी शक्ती खर्च करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात सगळेच धन्यता मानतात. मुळात सत्तेचा, राज्याचा हेतू काय? कोणाला याचा विचार करण्याची गरज वाटत नाही. 'प्रजानां विनयाधानात भरणात पोषणादपि... पितर: पितरस्तासां केवलं जन्महेतव:' (संस्कृत चुकलं असल्यास दुरुस्त करून द्यावं.) हा जर हेतू असेल तर एकदा सरकार सत्तारूढ झाले की, पाच वर्षे त्यात काहीही बदल होणार नाही; हे आम्ही का ठरवू शकत नाही. अनेक गोष्टी याने साध्य होतील -

१) सत्ता ग्रहण करणारा पाच वर्षांसाठी निर्भय होईल. सत्ता राहील की जाईल या भीतीपोटी जो अर्धाअधिक वेळ वाया जातो तो जाणार नाही.

२) कितीही पक्ष बदलले तरीही काही हाती लागणार नाही हे नक्की झाल्याने जो बाजार चालतो तो चालणार नाही.

३) पैसा, वेळ, ऊर्जा बचत होईल.

४) कामे न होण्यातील अडथळे आणि बहाणे संपतील.

५) सरकार अधिक उत्तरदायी होईल.

६) केंद्र-राज्य संबंधात जास्त विश्वास उत्पन्न होऊ शकेल.

यासाठी बहुमत, अल्पमत यांची तथाकथित तांत्रिकता बाजूला ठेवावी लागेल. हे आम्ही करू शकू का? आम्हाला लोकशाही दाखवायची आहे की जगायची आहे; यावर ते अवलंबून राहील.

- श्रीपाद कोठे

२४ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा