धर्मांतराच्या घोषणेनंतर सुमारे पाच महिन्यांनी `जनता' पत्रात लिहिलेल्या लेखात ऋग्वेदातील पुरुषसुक्ताविषयी त्यांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी) मोठी विचारप्रवर्तक भूमिका मांडली आहे. ती अशी- `चातुर्वर्ण्याचा मुख्य आधार म्हणजे ऋग्वेदातील पुरुषसुक्त होय. आमच्या मते या पुरुषसूक्ताचा मुख्य उद्देश या चातुर्वर्णीय वर्णभेदापासून लोकांस परावृत्त करणे हा आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र अशा प्रकारे गुणकर्मानुसार जरी चार वर्ण (वर्ग) उत्पन्न झाले तरी ज्याप्रमाणे राष्ट्रातील लोकांनी कामाची वाटणी केली म्हणजे त्यांचे एकराष्ट्रीयत्व नाहीसे होऊ शकत नाही किंवा शरीराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्यामुळे ते एकाच शरीराचे भाग नाहीत असे होऊ शकत नाही. तद्वत क्षत्रिय बाहुपासून, ब्राम्हण मुखापासून, वैश्य मांड्यापासून व शुद्र पायापासून उत्पन्न झाले असले तरी ते एकाच शरीराचे अवयव आहेत हे दाखविण्याचा या पुरुषसूक्ताचा मूळ उद्देश होता असे आम्हास वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. श्रमविभागणीने झालेला भेद निरर्थक आहे याची शिकवण लोकांना प्राप्त होऊन त्यांच्या मनावर ऐक्याचा ठसा उमटवावा एवढ्याच हेतूने हे सूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे.' (डॉ. आंबेडकरांचे जातीविषयक विचार- डॉ. शेषराव मोरे- विमर्श त्रैमासिक- एप्रिल- जून २०१४)
- श्रीपाद कोठे
४ जुलै २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा