मंगळवार, १२ जुलै, २०२२

सभ्यतेची मर्यादा ओलांडण्याची गरज

संजय लीला भन्साळीच्या प्रस्तावित चित्रपटाची चर्चा दोन दिवसांपासून सुरु झाली आहे. आज तर श्रेया घोषाल या गायिकेने त्याचे एक गाणे ध्वनिमुद्रित केल्याची व त्याचा आपल्याला आनंद झाल्याचे तिने म्हटल्याची बातमीही प्रसिद्ध झाली आहे. नेहमीप्रमाणे हा चित्रपट प्रसिद्धीचा कावा असू शकतो. नव्हे तसा तो आहेही. त्यावर समाजाने बहिष्कार घालावा असे आवाहनही सुरु झाले आहे. ते अतिशय योग्यच आहे. मात्र आता सभ्यतेची मर्यादा ओलांडण्याची वेळ आलेली आहे. `ठकासी आणावा ठक, उद्धटासी उद्धट' हेच या लौकिक जगातील अंतिम सत्य आहे. जग जेव्हा केव्हा संतांनी दुथडी भरून वाहील तेव्हाचे तेव्हा पाहता येईल. परंतु या पृथ्वीवर आज विद्यमान असलेल्या समस्त जिवंत प्राण्यांच्या अंतिम श्वासापर्यंत सुद्धा ते तसे होणे शक्य नसल्याने ठेमेठोक भूमिकेची अन व्यवहाराचीही गरज आहे.

काय आहे या प्रस्तावित चित्रपटात? तर चित्तोडची महाराणी पद्मिनी ही अल्लाउद्दीन खिलजी या आक्रमकाची प्रेयसी होती असे दाखवून त्यांच्याभोवती चित्रपट गुंफला जाणार आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पद्मिनी असे नाव नसून पद्मावती असे आहे. म्हणजे उद्या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचीही तयारी करून ठेवलेली दिसते आहे. हा सगळा अतिशय घाणेरडा अन आक्षेपार्ह प्रकार आहे. ज्या महाराणी पद्मिनीने आपले दर्शनही अल्लाउद्दीन खिलजीला होऊ नये अशी इच्छा केली होती. अन नंतर त्याच्या हाती लागू नये यासाठी जोहार केला त्या पद्मिनीलाच त्याची प्रेयसी दाखवण्यामागे कोणती तर्कबुद्धी अथवा कलादृष्टी आहे? एखाद्याच्या मनातील अचकटविचकट, विकृत तरंग म्हणजे सृजनशीलता असते का? `मूंह में आया बक दिया... ####### ### #### ####' याला जर कोणी सृजनशीलता अथवा कलादृष्टी म्हणत असेल तर त्यांना त्यांची जागा साम, दाम, दंड. भेद अशा सगळ्या प्रकारांनी; अन यानेही नाहीच साधले तर त्याहूनही वेगळ्या प्रकारांनी दाखवून द्यायलाच हवी.

जे कोणालाही आपल्या प्राणापलीकडे आपलं म्हणू शकत नाहीत, त्यांना देश- धर्म- राष्ट्र- स्वाभिमान- सत्व- यांच्यासाठी प्राणांची कुरवंडी करण्याची स्वप्नेही पडू शकत नाहीत. पण त्यांच्या पुढील हजारो जन्मांच्या कल्पनाविलासातही ज्या गोष्टी येऊ शकणार नाहीत; त्या प्रकारे जीवन जगून अथवा मरून या देशातील हजारो हजार स्त्री-पुरुषांनी हजारो वर्षे मानवाला वर उचलून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातूनच मानवतेची अन त्याही पल्याडच्या अलौकिकतेची अमाप जिवंत कैलास लेणी या जगाने पाहिली आहेत. महाराणी पद्मिनी त्यापैकीच एक आहेत. अन गेली अनेक शतके त्यांनी मानवी मनातील उर्जस्वलतेला खतपाणी घातले आहे. २४ तासातील एक क्षणही स्वार्थ सोडू नये अशीच धारणा असलेल्यांना अन स्वार्थाचे वन्ही चेतवून समाजाची घडी बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारांना अन व्यक्तींना महाराणी पद्मिनीचा जोहार कळूच शकत नाही. व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीची गुलामी इत्यादी खुळचट चर्चांचे रतीब घालीत आपले विकृत कंडू शमवून घेणाऱ्या या नाठाळांच्या माथी काठी हाणायलाच हवी. खूप झाले हे तमाशे. आधी भारत समजून घ्या. त्याचे महत्व, त्याची श्रेष्ठता, त्याचे उपकार, त्याचे फायदे, त्याची गरज हे नीट समजून घ्या अन मगच तोंड उघडा. त्यावर भाष्य करण्याचीही लायकी नसणाऱ्यांनी आपले उपद्व्याप थांबवायला हवेत.

संजय लीला भन्साळी आपल्या या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरु करणार असल्याचे वृत्त आहे. अनेक `समजूतदार शांततेचे पुजारी' त्यावर विचारतील- `अहो मग आताच एवढा थयथयाट कशासाठी? त्याला चित्रपट तयार करू द्या, त्यात काय आहे नाही पाहा, मग सेन्सॉर बोर्ड आहे, सरकार संस्कृतीरक्षक भाजपचेच आहे; नंतर मग काय ते पाहू.' असा विचार करणारे दुधखुळे आहेत अथवा आम्हास दुधखुळे समजतात एवढेच यावर म्हणता येईल. हे प्रकरण पुढे वाढण्याऐवजी सरकारने अन अन्य सुविचारी लोकांनी त्याची सुरुवातच होऊ नये यासाठी पुढाकार घ्यावा. नेहमी आग लागल्यावरच विझवायला हवी असे नाही. आग लागू शकते याचाही अंदाज घेता यायला हवा अन त्यानुसार उपाय करायला हवेत. हा प्रस्तावित चित्रपट सुरूच होणार नाही असा प्रयत्न झाल्यास मोठा गोंधळ माजवला जाईल हे निश्चित. पण त्याला घाबरण्याचे कारण नाही. साहित्यिकांच्या राजीनामा गोंधळाचे काय झाले ते दिसतेच आहे. अन समजा काही किंमत चुकवावी लागली तरीही हरकत नाही पण आता पसरली आहे त्यापेक्षा अधिक ही विकृत वाळवी पसरू न देण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १३ जुलै २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा