काही लोक असे असतात की, त्यांचे केवळ चष्मे उतरवून तर उपयोग नसतो; पण त्यांचे डोळे काढून घेतले तरीही त्यांना फक्त आणि फक्त राजकारणच राजकारण दिसतं. सतत तू-तू, मी-मी, सतत टीका टोमणे, भांडता कसं येईल, कोणाला कसं ओरबाडता येईल, गांभीर्याचा अभाव; यातच यांचे मेंदू मश्गुल. रस्त्याने सरळ चालणाऱ्या माणसाला विनाकारण धक्का मारण्याची सडकी मनोवृत्ती असणारे हे लोक असतात. आणि मनाने तर इतके महाप्रचंड सडलेले असतात की, जगातले सगळे लोक आपल्यासारखेच आहेत असा त्यांचा विश्वास असतो. असं केल्यावर आपण किती महान कार्य केलं असाही ग्रह ते सतत बाळगतात. बरं त्यांना वारंवार सांगून सवरून देखील काही उपयोग नसतो. यांना शत्रुत्व देखील उमदेपणाने करता येत नाही. काही व्यक्ती असतात, जे म्हणतात की- `ठीक आहे आपले येथे जमत नाही. आपण येथे थांबू.' किंवा ते तर्कपुर्ण किंवा तसे नसलेले पण ठाम आणि अर्थपूर्ण बोलतात, वागतात. पण या लोकांना हा उमदेपणा सुद्धा जमत नाही. अशाच दोन गलीच्छ व्यक्तींनी आजची तिन्हीसांज घाण केली. त्यांना मारवा समजू शकत नाही, त्यांना पुरिया धनाश्री समजू शकत नाही, त्यांना गोरख कल्याण समजू शकत नाही, त्यांना श्रीरामरक्षा समजू शकत नाही, त्यांना प्रार्थना समजू शकत नाही, त्यांना कविता समजू शकत नाही, त्यांना संध्याकाळ समजू शकत नाही, त्यांना माणूस समजू शकत नाही, त्यांना जीवन समजू शकत नाही. हे लोक म्हणजे मानवी जीवनातून निर्माण होणारी विष्ठा असतात फक्त. असो.
- श्रीपाद कोठे
९ जुलै २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा