रविवार, ३१ जुलै, २०२२

राजकीय बांधिलकी

ट्राय अध्यक्षांचे आव्हान, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि आता `आवश्यक नसेल तर आधार देऊ नये' असा झालेला खुलासा; हे सगळेच एका परीने चांगले झाले. लोकशाहीत (खरे तर जीवनातच) possessive राहणे चांगले नसते. त्यातही राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती, राजकीय यंत्रणा, राजकीय व्यवस्था अथवा राजकीय तत्वज्ञान याबाबत possessive असणे अयोग्यच. पण तसे होते. आधारच्या बाबतीतही हे लागू आहे. म्हणूनच बसलेला झटका योग्य आहे. प्रश्न हा येतो की, आपले आहे म्हणून एखाद्या गोष्टीचे समर्थन करून त्याच्या होणाऱ्या नुकसानाकडे डोळेझाक करायची का? असे करणे निश्चितच शहाणपणाचे नसते. समजा उद्या काही महाभयानक घडले असते तर त्यासाठी दोषी कोण राहिले असते? म्हणून सगळ्या गोष्टी तारतम्याने, नीरक्षीर विवेकाने पाहिल्या पाहिजेत. मतदान कोणाला करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आवड आणि सदसद्विवेकबुद्धी यातून लोक मतदान करतात. परंतु एकदा ती प्रक्रिया पार पडल्यावर त्यातून स्वत:ला बाजूला करता आले पाहिजे. भारताचा विचार करायचा तर या तूतू मीमी ची सुरुवात कॉंग्रेसने केली. तीही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून. अन काट्याने काटा काढावा लागतो त्यानुसार भाजपने त्याला धोबीपछाड दिली. परंतु काटा काढण्यासाठी जसा दुसरा काटा लागतो आणि काटा काढून झाल्यावर दोन्ही काटे फेकून द्यावे लागतात, तसेच political affiliation आणि political possessiveness यातून सगळ्यांनीच बाहेर पडणे गरजेचे आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

राष्ट्रीय सुरक्षा असाही एक विषय येतो. एक पक्के लक्षात घ्यायला हवे की, राष्ट्र जन्माला येणे किंवा लयाला जाणे ही विश्वशक्तीची लीला असते. लयास गेलेली राष्ट्रे दुबळी होती म्हणून लयास गेली नाहीत. ती लयास गेली त्यांचा जीवनहेतू पूर्ण झाला होता म्हणून. हिंदू राष्ट्राचा जीवनहेतू पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष परमेश्वरदेखील या राष्ट्राचा लय घडवू शकत नाही. तो जीवनहेतू कधी पूर्ण होईल कोणीही सांगू शकत नाही, पण त्याला अजून भरपूर अवकाश आहे. तो जीवनहेतू पूर्ण होईपर्यंत हे राष्ट्र राखेतूनही उभे राहील. त्याची फार काळजी करण्याची गरज नसते. आमचा विचारव्यवहार हिदू राष्ट्राच्या जीवन हेतूला साजेसा आहे का याचा विचार अधिक हवा. विचारव्यवहारातील सज्जनता, व्यापकता, उत्तुंगता ही या राष्ट्राची मूळ प्रकृती आहे. समग्र जगाची ही मूळ प्रकृती व्हावी हाच या राष्ट्राचा जीवनहेतू आहे. या प्रवृत्तीला छेद देईल ते ते त्याज्य असेच म्हटले पाहिजे. एक गोष्ट अत्यंत नम्रतेने (आणि लायकी नसतानाही) नमूद करावीशी वाटते की, तात्यारावांशी मी थोडासा सहमत नाही. सद्गुण विकृती या राष्ट्राच्या अध:पतनाला जबाबदार आहे असे मला वाटत नाही. तर व्यवहारिक शहाणपण आणि सज्जनतेचा योग्य अन्वयार्थ समजून घेण्यातील चूक; ही कारणे आहेत. तात्यारावांनी तमोग्रस्त हिंदू समाजाला जागे करण्यासाठी त्या पद्धतीची मांडणी केली होती. परंतु सज्जनता, व्यापकता, उत्तुंगता, हार्द यांना बाधा न आणता व्यवहारातील चोखपणा ही आजची गरज आहे. आम्हाला तात्यारावांच्या काळाशी थांबता येणार नाही. थांबूही नये.

@@@@@@@@@@@@@@@@@@@

#श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा