शुक्रवार, ८ जुलै, २०२२

संविधानाचे तत्त्वज्ञान समजावणारे पुस्तक

मुंबईच्या `साप्ताहिक विवेक’चे माजी संपादक श्री. रमेश पतंगे हे एक सव्यसाची विचारवंत म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. रा. स्व. संघाशी वैचारिक जवळीक सांगणाऱ्या `साप्ताहिक विवेक’चे संपादक म्हणून त्यांची भारतभरातही वेगळी ओळख आहे. `आपले मौलिक संविधान’ हे त्यांचे भारतीय संविधानाच्या संदर्भातील दुसरे पुस्तक नुकतेच २०१९ च्या एप्रिल महिन्यात प्रकाशित झाले आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजावून सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. श्री. पतंगे यांच्याच शब्दात सांगायचे तर, या पुस्तकाला लिहिलेल्या मनोगतात ते लिहितात - `संविधान म्हणजे केवळ कायदा नव्हे किंवा संविधान म्हणजे या कायद्यावर दिलेले न्यायिक निवाडे नव्हेत. या सर्वांना पार करून जाणारी संविधान ही संकल्पना आहे.’ श्री पतंगे यांनी या पुस्तकाच्या १३ प्रकरणातून हीच संकल्पना स्पष्ट करण्याचा मूलगामी प्रयत्न केलेला आहे. संविधानाकडे पाहण्याची आणि ते समजून घेण्याची वेगळी नजर हे पुस्तक वाचकाला देते हे निश्चित.

`शासनव्यवस्था आणि राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे आणि चालली पाहिजे हे सूत्रबद्ध रीतीने सांगणे हे संविधानाचे काम असते. हे कार्य त्या त्या देशाचा इतिहास, संस्कृती, विचारपरंपरा, मूल्यपरंपरा यांच्या आधारे होत असते. तसे झाले तरच ते टिकाऊ ठरते. परंतु संविधानाचे पुस्तक वाचले तर यातील काहीही फारसे कळत नाही. त्यातील कलमे, पोटकलमे, तरतुदी, भाषा हे सारेच अनाकलनीय असेच वाटते. त्यामुळेच संविधान हा विषय कायदेतज्ञ, वकील, न्यायाधीश यांचाच विषय राहतो. मात्र तो सामान्य माणसाचा विषय असायला हवा. त्याशिवाय सामान्य माणसाला त्याबद्दल आत्मीयता, आदर, बांधिलकी वाटणार नाही. संविधान आणि सामान्य माणूस यांच्यातील ही दरी दूर करण्याचा प्रयत्न हे पुस्तक यशस्वीपणे करते. अमेरिकेच्या संविधानाची मौलिकता `लिबर्टी’ या संकल्पनेत आहे, इंग्लंडच्या संविधानाची मौलिकता `संवैधानिक राजेशाही आणि मौलिक अधिकार आणि कायद्याचे राज्य’ यात आहे; तसेच भारतीय संविधानाची मौलिकता `सामाजिक आशयात’ आहे’, असे श्री पतंगे यांचे मत आहे. याच अंगाने त्यांनी हे पुस्तक लिहिल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.

सर्वसमावेशकता हा जसा भारताचा गुण आहे तसाच तो भारताने स्वीकारलेल्या संविधानाचाही आहे. विविध जाती, पंथ, भाषा, लिंग, प्रांत, वर्ग हे भेद बाजूस सारून आपल्या संविधानाने सगळ्यांना भारतीय म्हणून कसे सामावून घेतले आहे याचे विस्तृत विवेचन या पुस्तकात आहे. ही समावेशकता साध्य करण्यासाठी असलेली कलमे, त्यांची अंमलबजावणी करताना घ्यावयाची काळजी, संविधानातील शब्दांचा भाव, सामाजिक वातावरण अशा विविध अंगांचा विचारही मांडण्यात आलेला आहे. केवळ शब्दार्थ घेऊन समाज वा राज्य चालू शकत नाही. त्या शब्दामागील भाव आणि हेतू हेदेखील महत्वाचे असतात. याची चर्चा करताना संविधानाने स्वीकारलेल्या `समता’ या तत्वाची चर्चा श्री. पतंगे यांनी केली आहे. समता म्हणजे `सब घोडे बारा टक्के’ नाही हे स्वच्छ शब्दात सांगून; समाजातील विषमता दूर करून सगळ्यांना आर्थिक, सामाजिक समतेचा अनुभव प्राप्त करून देणे हा त्याचा आशय आहे हे ते स्पष्ट करतात. त्या दृष्टीने राज्याने कुठे स्वतंत्र तरतूद करायची, आरक्षण, या वेगळ्या तरतुदींच्या बाबतीत घटनाकारांचे मत; आणि हे करतानाच समतेच्या तत्वाचा गळा घोटला जाऊ नये यासाठी घालण्यात आलेल्या मर्यादा; अशा अनेक गोष्टींची या अनुषंगाने चर्चा करण्यात आली आहे.

सर्वसमावेशकते प्रमाणेच भारताच्या हजारो वर्षांच्या वाटचालीत विकसित झालेले सत्व संविधानात कसे प्रतिबिंबित झाले आहे याची चर्चाही श्री. रमेश पतंगे यांनी केलेली आहे. भारतीय संविधान ही विविध देशांच्या संविधानातील थोडे थोडे घेऊन बनवलेले एक कडबोळे आहे. तसेच भारत १९४७ साली जन्माला आलेला देश नसून त्याला हजारो वर्षांचा भूतकाळ आहे. त्याचे स्वत:चे चिंतन आहे. ते चिंतन या संविधानात नाही. त्यामुळे हे संविधान अभारतीय आहे; असा आक्षेप घेणारेही लोक होते आणि आहेत. लेखक हे आरोप फेटाळून लावतात आणि भारतीय आत्म्याचे प्रतिबिंब आपल्या संविधानात कसे पडले आहे याची मांडणी करतात. संविधानात भारतीय चिंतनाची अभिव्यक्ती कशी झालेली आहे हे समजून घेण्यासाठी, संविधान सभेतील चर्चा मुळातून वाचायला हवी. त्याशिवाय ते लक्षात घेणार नाही, असा श्री. पतंगे यांचा अभिप्राय आहे. वानगीदाखल श्रीकृष्ण सिन्हा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, आर. के. सिधवा आदी घटना समितीच्या सदस्यांची मतेही लेखकाने नमूद केलेली आहेत. उपासना स्वातंत्र्य, राष्ट्रध्वज, अस्पृश्यतेला मूठमाती, सगळ्यांनी विचारविनिमय करून निर्णय घेणे; अशा सगळ्या बाबींचा निर्देश या संदर्भात करण्यात आलेला आहे. भारतीय शास्त्रे, दर्शने, महापुरुष यांचे आणि त्यांच्या विचारांचे उल्लेख संविधान सभेतील चर्चेत होत असत याकडेही श्री. पतंगे यांनी लक्ष वेधले आहे. भारतीय सिद्धांत आणि वर्तमान व्यवहार यांची सांगड संविधानाने घेतली आहे असे प्रतिपादन लेखकाने केलेले आहे.

संविधानाच्या उद्देशिकेवर (preamble) या पुस्तकात सर्वाधिक चर्चा आहे. त्यावर चार प्रकरणे आहेत. यात संविधानाची उद्देशिका म्हणजे काय, तिचे महत्व, तिचा विकास, त्यातील गर्भितार्थ; यांचा विचार मांडण्यात आला आहे. त्यासोबतच भारतीय संविधानाची उद्देशिका, तसेच, अमेरिका, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्या उद्देशिकांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि चिकित्सा श्री. पतंगे यांनी केलेली आहे. शिवाय इंग्लंडची लिखित राज्यघटना नाही, तरीही तेथे लोकशाही राज्यव्यवस्था शेकडो वर्षे कशी चालते आहे याचीही तौलनिक चर्चा केलेली आहे. संविधानाची उद्देशिका ही संविधानाचा भाग आहे वा नाही आणि त्यावर न्यायालयाचे काय मत आहे, यावरही पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्देशिका किती महत्वाची असते यासाठी श्री. पतंगे यांनी `केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य’ या खटल्याची चर्चा केली आहे. या खटल्याच्या निकालपत्रातील परिच्छेद ९२ ते परिच्छेद १२४, असे ३३ परिच्छेद उद्देशिकेवर आहेत असे ते नमूद करतात. ही उद्देशिका समजून घेणे संविधान समजून घेण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. विदेशी घटनाकारांनी, घटनातज्ञांनी मांडलेली मते, केलेला विचार यांचेही संदर्भ पुस्तकात आहेत. अमेरिका, फ्रांस, रशिया येथील गृहयुद्धे, जीवितहानी, त्यांच्या संविधानाचा विकास, त्यातील छोटेमोठे तपशील, त्यांचे संदर्भ आणि अर्थ; यांची या लिखाणात रेलचेल आहे. हा सगळाच वाचकासाठी बौद्धिक खुराक आहे.

संविधानाची मौलिकता, कायद्याचे राज्य या विषयांचीही चर्चा श्री. रमेश पतंगे यांनी केलेली आहे. संविधानाच्या या चर्चेत `सार्वभौम’ कोण? याचीही चर्चा लेखकाने केली आहे. भारतीय संविधानाने विधिपालिका, कार्यपालिका, न्यायपालिका यांना सारखा दर्जा आणि अधिकार दिलेले आहेत; पण सार्वभौमत्व दिलेले नाही. जनता सार्वभौम आहे; असे तर्कशुद्ध प्रतिपादन श्री. पतंगे यांनी या पुस्तकात केले आहे. संविधानाच्या विविध कलमांचा, तरतुदींचा विकास होत असतो. काळ, समाज, परिस्थिती बदलत असते. त्याला अनुसरून संविधानाचा अर्थ करावा लागतो. संविधानाचा अर्थ लावण्याचा विकास कसा होत जातो हे समजावून सांगण्यासाठी `केशवानंद भारती’ आणि `मनेका गांधी पासपोर्ट खटला’ या दोन खटल्यांची चर्चा केली आहे. मुलभूत अधिकार आणि संविधानाने दिलेले अधिकार, संविधानाची मूळ चौकट, सामान्य नीतिमत्ता आणि संविधानीय नीतिमत्ता, prospective overruline, due process of law and process established by law, अशा विविध संकल्पनाही श्री. पतंगे यांनी वेळोवेळी उलगडून सांगितल्या आहेत. वाचकाच्या संविधान साक्षरतेत त्याने मोलाची भर घातली जाते.

राष्ट्र आणि राज्य या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. राज्य हे अनेक लक्षणांनी युक्त प्रत्यक्ष भौतिक अस्तित्व असलेलं एक यंत्र आहे, तर राष्ट्र ही जीवमान असली तरीही एक भावना आहे. या दोहोंचे स्वरूप, शक्ती, मर्यादा, परस्पर संबंध हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या कार्यकक्षा आणि परीघ हेदेखील वेगळे आहेत. जगभर त्यावर मंथन होत असते. या राष्ट्र आणि राज्य संकल्पनांना एक करणारे आपले संविधान असून त्याने संविधानीय राष्ट्रवाद आपल्याला दिला आहे; अशी मांडणी श्री. पतंगे यांनी या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात केली आहे.

संविधान आणि त्या संदर्भातील विषयांचा अभ्यास करण्यासाठी अथवा तो विषय समजून घेण्यासाठी मदत करू शकतील अशा ११ पुस्तकांची माहिती पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे. त्या त्या पुस्तकवरील लेखकाचे अभिमतही सोबत आहे. पुस्तकातील लेखांमध्येही ठायीठायी पुष्कळ पुस्तकांचे दाखले आणि उल्लेख आहेत. परिशिष्टात भारत, अमेरिका, फ्रांस, आयर्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांच्या संविधानातील उद्देशिका दिल्या आहेत. जिज्ञासूंना हे सगळे उपयुक्त ठरेल. विविध विषयांचे तपशील आणि संदर्भ वाचकाला संपन्न करणारे आहेत. भारतीय संविधानाबद्दल देखील अनेक माहितीपूर्ण आणि रंजक गोष्टी पुस्तकात आलेल्या आहेत. संविधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान म्हणजे आरक्षण, संविधान म्हणजे किचकटपणा, संविधान म्हणजे वकील- अभ्यासक- न्यायव्यवस्था, संविधान म्हणजे कलमे आणि क्लिष्टता; ही समीकरणे दूर करणारे हे पुस्तक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संविधान निर्माणातील योगदान हा लक्षणीय पैलू श्री. पतंगे यांनी मांडला आहे. अनेक गैरसमज दूर करणारे, माहिती आणि दृष्टी देणारे, संविधानीय साक्षरता वाढवणारे आणि संविधानाच्या तत्वज्ञानाचा विचार उलगडणारे हे पुस्तक आहे. यातून अनेक मुद्दे, विविध विषय पुढे येऊ शकतात. श्री. पतंगे यांनी मांडलेल्या विषयांच्या अन्य बाजू पुढे येऊ शकतात. नव्हे असे मुद्दे आणि विषय पुढे यायलाही हवेत. त्यावर साधकबाधक चर्चा, खंडनमंडन व्हायलाही हवे. त्यानेच भारतीय संविधान सर्वजनाय होईल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

*********************************

पुस्तकाचे नाव- आपले मौलिक संविधान

लेखक- रमेश पतंगे

प्रकाशक- हिंदुस्थान प्रकाशन संस्था

पृष्ठे- १६७

किंमत- २५० रुपये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा