रविवार, १० जुलै, २०२२

आमूल परिवर्तनाची बीजं

आत्ताच `सीएनबीसी आवाज' वाहिनीवर रोहिणी निलेकणी यांची मुलाखत पाहिली. रोहिणी निलेकणी या इन्फोसिसचे माजी संचालक नंदन निलेकणी यांच्या पत्नी. कॉंग्रेसने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नंदन निलेकणी यांना घोषित केले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत:चे घर सावरणेच काँग्रेसला जमत नाही तर निलेकणी यांच्याकडे कुठले लक्ष देणार. त्यामुळे निलेकणी काँग्रेस सोडणार अशीही बातमी आहे. आपल्या `आधार कार्ड'चे जनक हेच नंदन निलेकणी. परंतु रोहिणी निलेकणी या मुलाखतीत जे काही बोलल्या त्याचा या राजकारणाशी संबंध न जोडलेलाच बरा. रोहिणी निलेकणी anthropology च्या क्षेत्रासह बऱ्याच क्षेत्रात काम करतात. सामाजिक सेवेच्या अनेक संस्था त्या चालवतात.

या मुलाखतीत त्यांच्या बोलण्यात काही महत्वाच्या बाबी आल्या.

१) पैसा अमाप असला तरीही तो कसा वापरायचा हे महत्वाचे.

२) पैशाची निर्मिती ही समाजातूनच होत असते. हा पैसा पुन्हा समाजात जायला आणि पसरायला हवा.

३) सुरुवातीला पैशाचे केंद्रीकरण होईल आणि नंतर तो समाजातील सगळ्यांपर्यंत पोहोचेल, हा भांडवलशाहीचा सिद्धांत खोटा ठरला असून; भांडवलशाही देशातच त्यावर मंथन सुरु आहे.

४) यासाठी आवश्यक ती संस्थात्मक पुनर्रचना आणि नियम आदी नव्याने करायला हवेतच. मात्र त्याहून आधी पैसा, संपत्ती याकडे पाहण्याची दृष्टी तयार व्हायला हवी.

५) धनवान लोकांनी अधिक दानशूर व्हायला हवे.

६) संपत्तीच्या योग्य नियोजनासाठी समाजाचा दबावही तयार व्हायला हवा.

थोडक्यात म्हणजे अर्थकारण खूप झाले, आता अर्थनीतीचा विचार आवश्यक आहे. हे खूप म्हणजे खूपच महत्वाचे आहे. `सीएनबीसी आवाज' सारख्या वाहिनीवर ही चर्चा होते आणि भारतातील अति उच्चभ्रू वर्गातील एक कर्तबगार महिला हे विचार व्यक्त करते ही गोष्ट फार मोलाची आणि महत्वाची आहे. विचारी लोक कोणत्या दिशेने विचार करीत आहेत, काळाचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो आहे, अन भविष्यकाळ काय असू शकेल; याचे आडाखे यावरून नक्कीच बांधता येतील. संपूर्ण जगाच्या आमूल परिवर्तनाची ही बीजं आहेत.

रोहिणी निलेकणी यांनी व्यक्त केलेले विचार `हिंदुत्व' याच सदरात मोडतात, हे मुद्दाम नमूद करणे गरजेचे वाटते. याचा विस्तार योग्य वेळी करेन, पण हे हिंदुत्वच आहे. ज्यांना माझ्या म्हणण्याचा आशय समजून घ्यायचा असेल त्यांनी `hindu economics' by do. m.g. bokare, तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे अर्थविचार, स्वामी विवेकानंद, गोळवलकर गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी आदींचे अर्थविचार पाहावेत.

या मुलाखती दरम्यान देण्यात आलेल्या माहितीवरून लक्षात आलं की, भारतातील अझीम प्रेमजी, मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल आणि अशा अन्य लोकांनी सुमारे १ लाख कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दिले आहेत. त्यातील ५३ हजार कोटीहून अधिक निधी एकट्या अझीम प्रेमजी यांनी दिला आहे. मुकेश अंबानी यांचा वाटा मात्र फार कमी आहे.

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा