गुरुवार, ७ जुलै, २०२२

अर्थचिंतन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांच्या संदर्भात काही मते काल व्यक्त केली. अधिक उत्पादनाने साखरेचे भाव सावरणे कठीण होईल असाही एक मुद्दा होता. मंत्री, नेता, राजकारणी म्हणून आणि वर्तमान व्यवहार म्हणून, ते ठीकच आहे. पण ज्यांना पुढचा विचार करायचा आहे, समाजाचं भविष्य हा ज्यांचा विषय आहे, ज्यांना statesman म्हणून विचार करायचा आहे; त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, वाढत्या किंमतीचे अर्थशास्त्र मानवाच्या कल्याणाचे नाही. विपुलता आणि उतरत्या किंमतीचे अर्थशास्त्र सगळ्यांच्या हिताचे असू शकते. भारताच्या आर्थिक विकासाचा विचार करताना नेहमी जागतिक मंदीचा मुद्दा मांडला जातो. दोहोंची तुलना मांडली जाते. परंतु एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतं की जागतिक मरगळ दूर का होत नाही? त्याचे कारण आहे, जी दिशा वैश्विक अर्थकारणाने घेतली आहे तीच चुकीची आहे. आपली अंतर्गत बाजारपेठ, आपल्या गरजा आणि आपली उशिरा झालेली सुरुवात; यामुळे दोन-तीन दशके फार समस्या येणार नाहीत; पण त्यानंतर सगळे कठीण होईल. अन दोन-तीन दशके हा फार मोठा काळ होत नाही. चार दशकांहून अधिक काळ झालेली आणीबाणी सुद्धा आपल्याला जुनी वाटत नाही. त्यामुळे वर्तमान, तात्कालिक आणि दूरचा, सातत्यपूर्ण यांचा दुवा कसा सांधायचा यावरही मंथन होणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

८ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा