मंगळवार, १२ जुलै, २०२२

कोरोना आणि वाहतूक

देशात मोठमोठी शहरे आहेत. त्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. किमान ऑटोरिक्षा आहेत. छोट्या छोट्या गावांच्या मार्गावर जीप चालतात. मात्र कोरोनामुळे ही व्यवस्था ठप्प आहे. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल कुठे काही चर्चा, माहिती मात्र पाहायला, वाचायला, ऐकायला मिळाली नाही. खाजगी वाहने आहेत त्यांना तेवढी समस्या नसणार पण ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत किंवा असून ती वापरण्याची स्थिती नाही त्यांच्या वाहतुकीचा, जाण्यायेण्याचा प्रश्न फार मोठा असू शकतो. वृद्ध, एकटे किंवा जोडीने राहणारे वृद्ध, आजारी लोक, अडीअडचणी, आवश्यक कामे यासाठी या करोडो लोकांनी जाणेयेणे कसे करायचे? छोट्या छोट्या गावात रात्री बेरात्री कोणाची तब्येत बिघडली तर तालुक्याला किंवा जवळच्या मोठ्या गावाला कसे नेणार? गावातील दोन चार ऑटोरिक्षा अशा वेळी कामी येत असतात. अशा घटना मला स्वतःला माहिती आहेत. शहरात सुद्धा अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे बँकेत किंवा नियमित वैद्यकीय तपासणी किंवा किराणा आदी आणण्यासाठी ऑटोरिक्षाचा वापर करत असतात. एखादा ओळखीतला, वस्तीतील ऑटोवाला ठरलेला असतो. त्याला फोन केला की तो येऊन विश्वासाने घेऊन जाणे, परत आणून पोहोचवणे, कामात मदत करणे, हात धरणे इत्यादी करतात. पण आता त्यांचीही पंचाईत झालेली आहे. शहर बस वाहतूकही बंद आहे. मुंबईबद्दल थोडीफार माहिती मिळते पण अन्यत्र काय स्थिती आहे? यावर उपाय काय? यातून मार्ग कसा? कारण जाणेयेणे ही एक मोठी गरज आहे आणि स्वतःचे वाहन नसणारे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. सगळ्या गोष्टींवर online हा उपाय असू शकत नाही. ही एक मोठी समस्या जरा दुर्लक्षित झाल्यासारखी वाटते.

- श्रीपाद कोठे

१३ जुलै २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा