बुधवार, ६ जुलै, २०२२

दुष्काळा, तुझे स्वागत असो...

दुष्काळा, कालपर्यंत मलाही राग येत होता तुझा. तू लवकरात लवकर निघून जावं असं वाटत होतं. पण आज मला पटलंय की तू येणं आवश्यक आहे. ये दुष्काळा ये, मी तुझं स्वागत करतो. तुझा खरा कावा मला कळला आहे. तुला शिकवायचं आहे या कृतघ्न माणसाला. बऱ्या बोलानं, गोडीगुलाबीनं, सांगून सवरून शिकायची त्याला सवयच नाही. असे प्रयत्न कोणी कधी करतच नाहीत, केलेलेच नाहीत असे नाही. पण उंहू, हुं नाही की चुं नाही. माणूस नावाचा हा माजलेला रेडा नाहीच शिकत. त्याला जेव्हा दणके बसतात, रट्टे बसतात, फाके पडतात तेव्हा तो थोडंफार शिकला तर शिकतो. त्यातूनही १०० टक्के माणूस १०० टक्के समजूतदार वगैरे होईल हा भ्रम तुलाही नाहीच. पण अगदीच रुळावरून उतरला की त्याला परत रुळावर आणायला कशी सणसणीत लाथ घालायची हे तुला पक्कं आणि चांगलं ठाऊक आहे.

तेव्हा तू येच. तुझ्या पूर्ण लवाजम्यासह, पूर्ण शक्तीने, पूर्ण वैभवाने ये. माणूस विसरून गेला आहे की आपणही या निसर्गाचाच एक भाग आहोत. तो स्वत:ला निसर्गाच्या वर मानू लागला आहे आणि म्हणूनच त्याने आपले असे नियम आणि मूल्य तयार केले आहेत. आपल्याजवळचं सगळं काही देऊन टाकणं हा निसर्गाचा गुण. त्याबदल्यात काहीही न मागणे हेही तेवढेच महत्वाचे. माणसाने मात्र लुबाडण्याचा, हडपण्याचा, साठवण्याचा असे गुण विकसित केले आहेत. खरं तर त्याच्यासारखा भिकारी कोणी नाही. सगळं काही हा निसर्ग दोन्ही हातांनी भरभरून देतो म्हणून त्याची मिजास. मात्र त्याची कदर करावी, आदर करावा, सगळ्यांनी मिळून मिसळून वाटून घ्यावं या गोष्टी त्याने केव्हाच धाब्यावर बसवल्या आहेत.

एवढेच नाही तर या सवयींमुळे आपणच गोत्यात येऊ याचंही त्याला भान राहिलेलं नाही. तुझा सखा तो पाऊस काय कमी पाणी देतो? पण ते साठवावं म्हणजे सगळ्यांना पुरेल, अडीअडचणीला कामी पडेल हे समजून घ्यायला त्याची तयारीच नाही. म्हणजे त्याला अडचणी येऊ शकतात पण तुम्हा लोकांना अडचणी यायलाच नको, असा त्याचा उद्दाम माजोरा आग्रह. पाऊस जे पाणी देतो ते मुरण्यासाठी मातीच हवी, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये ते मुरूच शकत नाही हे त्याला माहीत नाही, कळत नाही असं नाही. तरीही लाथा बसल्याशिवाय तो तसं वागणार मात्र नाही. जितकं पाणी तो पितो त्याच्या १० पट पाणी तो शौचालय आणि स्नानगृहात वाया घालवतो. केवळ त्याच्या सवयींमुळे. या दोन्ही गोष्टी जीवनाचा आवश्यक भाग आहेत. त्याला पाणीही लागणारच. पण ते वापरताना फ्लश आणि शॉवर यांची काय गरज? बाकी पद्धतीही आहेत ना? पण तसं केलं तर त्याची शान कमी होईल ना? त्याची ही खोटी शान धुळीत मिळवायला हवी. त्यावर आता दुसरा इलाजच नाही. त्याचा हा नखरा मोडून काढायला तू ये.

त्याला ठाऊक आहे की पाणी जपून वापरलं, शेतीभाती नीट जपली तरच तो विकास बिकास करू शकेल. कारण शेवटी पोटाला दोन वेळ लागतं रे. या हरामखोर माणसाने कितीही गमजा केल्या ना विकास अन फिकासाच्या पण पोटाची खळगी भरायला मात्र पर्याय नाही शोधून काढू शकत तो. पोटात कावळे कोकलायला लागले की उतरते सगळी मिजास. पण कळलं तरी तसं वागेल तो माणूस कुठला? अजूनही त्याला वाटतं की पाकीटभर नोटा पिल्या की आपली तहान भागेल. आणि आम्ही शहरी लोक तर काय, विचारूच नको. नुसता उन्माद चढला आहे उन्माद. सगळं जग, सगळा निसर्ग आमचे नोकर आहेत अशा तोऱ्यात वागतो आम्ही. खरं सांगायचं तर रक्तपिपासू आहोत रक्तपिपासू. याची ही मिजास, हा दिमाख, ही तकलादू प्रतिष्ठा धुळीस मिळवायला ये. हा नाहीच शिकणार त्याशिवाय. तो जर आपली शिकण्याची पद्धत बदलत नाही तर तू तरी का बदलावीस तुझी शिकवण्याची पद्धत?

मरतील १०-२० कोटी लोक, मरू दे. त्याला पर्याय नाही. पण या अवलक्षणी माणसाचा दंभ, दर्प आणि माज उतरवल्याशिवाय राहू नको. मला विचारतील माझ्या जातीचे दीडदमडीचे छटाकभर लोक, अरे बाबा त्या १०-२० कोटीत तुझा नंबर लागणार नाही कशावरून? तुझाही नंबर लागू शकेल. त्यांना देईन मी उत्तर. तुलाही सांगून ठेवतो ते, म्हणजे माझा निर्णय करताना तुलाही संभ्रम व्हायला नको. खुशाल मारून टाक  मला. तसंही मृत्युचं भय नाही वाटलं कधीच. कधीच वाटणारही नाही. आणि चार-दोन लोकांना जर तुझ्या हा फटक्याने उपरती होणार असेल तर त्यासाठी मरण्यातही मजा आहे. मला त्याची चिंता नाही. फक्त तुला हात जोडून विनंती आहे. दुष्काळा तू ये, पूर्ण लवाजम्यासह, पूर्ण ताकदीने ये. मी वाट पाहतोय तुझी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

७ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा