माझ्या कालच्या पोस्टवर Abhishek Khandalkar ने प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याचे मुद्दे समजावून द्यावेत असंही म्हटलं आहे. परंतु दुपारपासून प्रयत्न करूनही माझी प्रतिक्रिया तिथे पोस्ट होत नाही. कारण कोणास ठाऊक. काही तांत्रिक बाब असेल. त्यामुळे अभिषेकच्या प्रतिक्रियेवरील माझे मत इथे स्वतंत्रपणे पोस्ट करतो आहे...
- आनंदवनभुवन आज तरी आहे का? तुझा प्रश्न बरोबर आहे. पण दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे शिवाजींचेही आनंदवनभुवन नव्हतेच. ती फक्त सुरुवात होती आणि तो प्रयत्न अल्पायु ठरला. ते आनंदवनभुवन होते असं म्हटलं तरी त्याची व्याप्ती केवढी होती? त्यात विदर्भ, मराठवाडा सुद्धा नव्हते. आज त्या मानाने आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत. व्याप्ती खूप मोठी आहे. मुख्य म्हणजे अनागोंदी नाही. आनंदवनभुवन होईल तेव्हा होईल पण आज एका स्थिर सुव्यवस्थेत आपण आहोत.
- मी वचनं सांगायला आक्षेप घेतलेलाच नाही. ते सांगताना काळ, परिस्थिती यांचा विवेक असावा आणि तात्कालिक, चिरकालीक हे तारतम्य हवे इतकंच.
- गुरू गोविंद सिंह अवतार नाही मानले जात. अवतार नानकदेव आहेत.
- समर्थ शस्त्र बाळगीत. पुन्हा तोच मुद्दा की अनागोंदीचा काळ होता. आज आपण मोदींनी शस्त्र हाती घ्यावे असं म्हणणार नाही. व्यवस्था आहे ती पाहील. दुसरे म्हणजे शस्त्रत्याग करावा असं मी म्हटलेलं नाही. उलट पूर्ण शस्त्रत्यागाची वेळ आलेली नाही असाच पोस्टचा आशय आहे. या ठिकाणीच हे स्पष्ट होतं की, पोस्ट वाचतानाही आपले अभिनिवेश कायम असतात. नेमकं हेच, आक्रमकतेसंबंधी सर्वसामान्य माणसाची जी अधिरता आणि ओढ असते ती कमी होत जायला हवी. शस्त्र अपरिहार्य म्हणून वापरणे हा वेगळा भाग आणि त्याबद्दल काही ऐकताना किंवा वाचताना नीट आशय समजून घेऊ न शकण्याची अधिरता वेगळी.
- संतांचे सगळे देव शस्त्रधारी आहेत हे बरोबर नाही. विठ्ठलाच्या हाती काहीही नाही. तो तर मोठा उपास्य आहे. समर्थांनी त्यालाही प्रश्न केला होता. पण परिस्थिती हेच त्याचे कारण. अन्यथा देव म्हणजे काय याचे समर्थांनी दासबोधात केलेले विवेचन वेगळे कसे राहिले असते.
- देव ही संकल्पना काळाबरोबर विकसित होत आलेली आहे. त्यात बदल होत आलेले आहेत. पुढेही होतील. असे बदल झाले नाहीत आणि जुन्यालाच चिकटून राहिलं तर त्यातूनच इस्लामसारखी कट्टरता जन्माला येते आणि जगाला त्रासदायक ठरते.
- संघर्ष अपरिहार्य आहे हे मान्य केले तरी, संघर्ष म्हणजे शस्त्र वा आक्रमकता असे होत नाही. संघर्ष खूप प्रकारे केला जातो. बायको बोलत नाही तेव्हा तोही संघर्ष असतोच. कोरोना हेही ताजे उदाहरण.
- त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, मानवी जीवनातली सुष्टता वाढायला हवी की नाही. मानवी समस्यांवरचा उपाय मानवी सुष्टता वाढणे हाच असू शकतो. दुष्टतेचा सामना अपरिहार्य असला तरी त्याने मानवाची उन्नती होत नाही. माणसाची आध्यात्मिकता जसजशी वाढेल तसं मानवी व्यवहाराचं स्वरूप बदलेल. अन या बदलाचे संकेतच मिळत आहेत.
- तुझ्या पोस्टमध्ये नसलेला पण, ज्याला between the lines म्हणतात असा एक मुद्दा. भक्तीची यमुना ज्ञानाच्या भागिरथीला मिळायला हवी. आणि त्यात मिसळून जायला हवी. जसे सरबतात साखर आपले रूप सोडते तसे भक्तीने विलीन व्हावे ज्ञानात. ज्ञानाने भक्तीचा गोडवा स्वीकारून पुढे जावे. केवळ भक्ती ही नेहमीच लंगडी आणि अपुरी असते. ती कितीही छान वाटली तरी केवळ भक्ती नुकसान करते. त्याला ज्ञानाचे अस्तर हवे. त्याने आपली भक्ती, उपास्य, अगदी गुरू यांची सुद्धा चिकित्सा करणे शक्य होते. जी आवश्यक असते. या सगळ्यातला गाभा, आशय, चिरंतन तत्व हे तेव्हाच लक्षात येते. दासबोध सुद्धा हेच सांगतो. त्याचा व्यासंग जसजसा वाढत जातो हे सारे आकलन होत जाते. दुसरे म्हणजे अपूर्णता. कितीही मोठी व्यक्ती, कितीही उदात्त विचार असला तरी तो अपूर्ण राहतो. अगदी ईश्वराचा अवतार सुद्धा अपूर्णच. कारण ईश्वर एखाद्या माध्यमातून व्यक्त होतो तेव्हा ते माध्यम आणि उरलेलं विश्व असं आकाराला येतं. ईश्वर माध्यमात बांधला जातो आणि अपूर्ण होतो. म्हणूनच गीतेने भक्तांच्या लक्षणात निर्मम हेही सांगितले आहे. तसं निर्मम होता यायला हवं.
- शेवटला मुद्दा : या विश्वातील काहीही आधी होतं तसंच राहत नाही. देव, धर्म, माणूस, समाज... अगदी काहीही. अन हे तुमच्या आमच्या इच्छेवर अवलंबून नसतं. तो या सृष्टीचा गुण आहे. त्यामुळे जुन्या सगळ्याच गोष्टींकडे आशयाचे नीट आकलन करूनच पाहिले पाहिजे.
- श्रीपाद कोठे
११ जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा