बुधवार, २० जुलै, २०२२

ब्राह्मण

कालच्या गोंधळात एका विषयावर मुद्दाम लिहिले नाही. परवा प्रसिद्ध लेखिका आशा बगे यांना एक मोठा पुरस्कार मिळाला. त्याची बातमी वृत्तपत्रात आली. त्यात दुसऱ्या प्रसिद्ध लेखिका प्रभा गणोरकर यांच्या भाषणाचाही उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, `आशा बगे यांनी ब्राह्मणी संस्कार त्यांच्या लेखनातून मांडले आहेत असे प्रभा गणोरकर म्हणाल्या.' मला प्रश्न पडला की, गणोरकर असे का बोलल्या असाव्यात? मुळात त्यांनी असे बोलावे का? संस्कार, सत्व, सभ्यता, रीतीरिवाज यांची चर्चा जातीची लेबल्स लावून करावी का? की त्या त्या गोष्टींचे जीवनमूल्य या अंगाने चर्चा व्हावी? गणोरकर यांनी ब्राम्हणीपणा यावर टीकाच केली असेल असे नाही. (कारण बातमीतून तेवढे स्पष्ट होत नाही.) पण त्यांनी तसे बोलणे (टीका किंवा समीक्षा किंवा समर्थन) हा आजच्या सामाजिक विचारप्रक्रियेचा परिणाम आहे. ब्राम्हण आणि त्यातून निर्माण होणारे सगळे शब्द हा गेली अनेक दशके टीका, टिंगलटवाळी आणि हीनत्वबोधाचा विषय झाला आहे. हेतूपुरस्सर करण्यात आला आहे. अगदी ज्याला भारतीय प्रबोधनाचा कालखंड आणि भारतीय प्रबोधन पर्व ज्याला म्हणता येईल त्याचाही यात वाटा आहे. त्या प्रबोधनाचीही तर्ककठोर विषरहित चिकित्सा आवश्यक आहे. ती करण्यासाठी लागणारी हिंमत आणि वातावरण आज नाही.

ब्राम्हणत्व हाच भारताचा आदर्श होता आणि आहे. असायलाही हवा. त्या आदर्शांमुळेच हजारो वर्षे टिकलेले राष्ट्रजीवन भारत उभे करू शकला. हा आदर्श भारताने पूर्ण गाठला होता का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. `ब्राम्हण' हे विशेषनाम लावणाऱ्या सगळ्यांना त्याचे आकलन झाले होते का? त्याचेही उत्तर `नाही' असेच आहे. `ब्राम्हण' हे विशेषनाम लावणाऱ्या सगळ्यांचा व्यवहार ब्राम्हणत्वाला साजेसा होता का? नाही. आज `ब्राम्हण' हे विशेषनाम लावणाऱ्या सगळ्यांना त्याचे आकलन झाले आहे का? त्यांचा तसा व्यवहार आहे का? याही प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. उलट भूतकालापेक्षा आजची स्थिती अधिक वाईट आहे. (त्याची कारणमीमांसा आणि विश्लेषण हा स्वतंत्र विषय आहे.) मात्र त्यामुळे `ब्राम्हणत्वाचा' आदर्श कमी प्रतीचा, हिणकस, त्याज्य ठरत नाही. जगभर माणसाच्या आदर्श स्वरूपाचा जो जो विचार झाला त्यातील `ब्राम्हणत्वाचा' आदर्श हा माझ्या मते सर्वोत्तम आहे. आणि ज्यांना तो सर्वोत्तम वाटत नाही त्यांनाही तो वरच्या दर्जाचा नक्कीच वाटेल असा आहे. गुणपूजक, गुणग्राही, शारीरच नव्हे तर मन बुद्धीच्या शुद्धतेचा साधक अशी त्याची काही लक्षणे सांगता येतील. `ब्राम्हण' जातीशी त्याचा संबंध आहेच असे नाही. नव्हे सगळ्याच गोष्टींचे अथवा संज्ञांचे होते तसेच येथेही झाले. या लक्षणांना धरून जगणारा तो ब्राम्हण याऐवजी ब्राम्हण म्हणजे या लक्षणांना धरून जगणारा असा अर्थ त्याला प्राप्त झाला. ही कालगती असते. पण सोने ते सोनेच. आजची जगाची स्थिती पाहून `लक्षणयुक्त ब्राम्हणत्व' हाच माणसाचा आदर्श असू नये असे कोण म्हणेल? पण त्यासाठी हीनत्वबोध, बचावात्मक पवित्रा, राजकारण सोडून देऊन; किंमत चुकवण्याची तयारी ठेवून वागण्या बोलण्याची इच्छा हवी. अन इच्छा काही आपल्या हाती नसते?

- श्रीपाद कोठे

२१ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा