गुरुवार, ७ जुलै, २०२२

स्वदेशी

चीनच्या उत्पादनांचा बहिष्कार आणि स्वदेशी हे दोन विषय सध्या सुरू आहेत. त्याचा परिणाम म्हणा वा अन्य काही पण हे दोन्ही विषय एकच आहेत असा समज बरेचदा होतो. मात्र ते वेगळे आहेत. वास्तविक केवळ चीनच नव्हे तर अन्य कोणत्याही देशाची उत्पादने, सेवा, कच्चा माल जेवढा देशात येईल तेवढा देशाचा पैसा बाहेर जाईल. देशाचा पैसा देशात राहावा यासाठी एकूणच आयात आणि आयातीचा वापर कमी होत जायला हवा. तेव्हाच आत्मनिर्भर देश प्रत्यक्षात येईल. चीनच्या मालाचा बहिष्कार या विषयात आत्मनिर्भर देश यासोबत त्याचे भारताशी शत्रुत्व हाही मुद्दा आहे. त्यामुळे चीनच्या मालाचा बहिष्कार आणि आत्मनिर्भर भारत या दोन्ही गोष्टींचं आकलन हवं.

स्वदेशी हा आणखीन वेगळा आणि या दोन्हीहून मोठा विषय आहे. उदा. पतंजलीचा व्यवसाय वाढणे हा आत्मनिर्भरतेचा भाग असू शकतो पण ते स्वदेशी म्हणता येणार नाही. पतंजली देशांतर्गत आहे, त्याचा पैसा देशातच राहील, ते देशाचे शत्रू नाही; हे सगळे खरे आहे पण स्वदेशी नाही. स्वदेशी म्हणजे - पतंजलीची जी जी उत्पादने किमान जिल्हा पातळीवर तयार होऊ शकतात ती स्वतंत्रपणे त्या त्या ठिकाणी तयार होणे. एका महाकाय पतंजली ऐवजी छोट्या छोट्या अनेक पतंजली उभ्या होणे, चालणे म्हणजे स्वदेशी. अरबो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायाऐवजी, लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे हजारो व्यवसाय म्हणजे स्वदेशी. कारण स्वदेशी ही केवळ आर्थिक वा प्रादेशिक कल्पना नाही तर या दोन्हींना कवेत घेणारा त्याहून व्यापक असा तो भावप्रवाह आहे.

स्वदेशी म्हणजे आर्थिक साम्राज्यवाद नाकारणे, थोपवणे. स्वदेशी म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार. स्वदेशी म्हणजे व्यक्तिगत वा व्यावसायिक आर्थिक आकांक्षांना लगाम. स्वदेशी म्हणजे अर्थमानवाचे; अर्थपूर्ण (सहृदयी, समाधानी, सुखी) मानवात रूपांतरण.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ८ जुलै २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा