विचार करताना केवळ शब्द लक्षात घेऊन चालत नाही. आज हे पुन्हा नोंदवण्याचे निमित्त उत्तर प्रदेशातील घटना आहेत. अनेक ठिकाणी 'ठकासी आणावा महाठक' वाचायला मिळाले. समर्थांचे हे वचन अनेकदा सांगितले जाते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, संपूर्ण अनागोंदीच्या काळात त्यांनी हा उपदेश केला होता. 'आनंदवनभुवनात' हेच करावं का? समर्थांनी त्याबद्दल काही सांगितलेलं नाही. प्रश्न हा आहे की, व्यवस्था आणि व्यवस्था विहिनता यांचा सारखाच विचार नाही करता येत. चाणक्याने परिश्रमपूर्वक उभे केलेल्या साम्राज्यापेक्षाही १९४७ पासून आजपर्यंतचा कालावधी मोठा आहे. ज्ञात इतिहासात एखाद्या व्यवस्थेत संपूर्ण भारत नांदण्याची ही घटना लक्षणीय आहे. यातील जीवनाची सूत्र पुन्हा व्यवस्थित मांडण्याची गरज आहे. केवळ काही वचने सांगून चालणार नाही.
याचा अर्थ हा नाही की, या व्यवस्थेत त्रुटी नाहीत. याचा अर्थ हाही नाही की; लोकांना, समाजाला काही सोसावे लागत नाही. कसाब सारख्यावर १०० कोटी रुपये खर्च करण्याचे समर्थन होऊच शकत नाही. मुद्दाम दुबेचे उदाहरण न घेता कसाबचे घेतले कारण तटस्थपणे विचार करता यावा. त्यामुळे या व्यवस्थेत सुधारणेला भरपूर वाव आहेच. पण सोबत हाही विचार करावा लागेल की, या व्यवस्थेत सुधारणांची शक्यता किती आहे? व्यवस्थेचे जुने होणे आणि त्याची मूळ रचना या दोन गोष्टींसाठी सुधारणेच्या शक्यतेचा विचार करावा लागतो.
सहजच गांधी आठवतात. त्यांच्यावर टीका जरूर करावी पण किती जण त्यांचे 'हिंद स्वराज' समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या व्यवस्थेवर, त्याच्या मूलतत्वांवर त्यांनी जे प्रहार केले ते समजून घेण्याची तयारी किती असते? त्यांनी शस्त्रांना विरोध केला यावरून तर टीका करता येते पण त्यांनी वापरलेल्या शस्त्रांचा विचार किती केला जातो?
माणसाच्या जैविक क्रमविकासाचा विचार तर आपण करतो पण त्याहून सूक्ष्म अशा मनोबौद्धिक क्रमविकासाचा विचार केला जात नाही. त्या अंगाने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. त्या दृष्टीने पाहिले तर काय दिसते? आपल्याला आवडो की न आवडो काळाने गांधीजींच्या गळ्यात माळ घातली. पण केवळ गांधीजी हे उदाहरण आहे का? तर तसे नाही. योगी अरविंद यांनी क्रांती सोडून योगाचा हात धरला. डॉ. हेडगेवार यांनी क्रांती सोडून संघाची स्थापना केली. काळाने दोघांच्याही गळ्यात माळ घातली. एवढेच नाही तर सावरकरांचे क्रांतिकारी आणि क्रांती सोडून दिलेले अशी दोन रूपे आहेत. या बदलात केवळ इंग्रजी सत्तेने लावलेली बंधने एवढेच होते की काही वेगळे realization होते? आपल्याला आवडणाऱ्याच पद्धतीने विचार का करावा? हा काळाचा आणि नियतीचा विकासक्रम आहे. भगवान बुद्धपासून ज्या ज्या लोकांना ईश्वरावतार म्हणून मान्यता प्राप्त झाली त्या कोणाच्याही हाती शस्त्र नाहीत. या सगळ्याचा अतिशय खोलवर विचार करायला हवा. हे केवळ भारतापुरते नाही तर जगात युद्धासाठी बाह्या सरसावणारे वारंवार शांत होत आहेत हे जग पाहतं आहे. हे संकेत आहेत. याचा अर्थ शौर्य, शस्त्र, आक्रमकपणा हे सगळं लगेच सोडावं असं नाही. हा एक transition period आहे. याचा उपयोग जगभरच्या मानव समाजाला अधिक खोल आणि समजूतदार विचारांकडे नेण्याचा प्रयत्न व्हायला हवा एवढाच याचा अर्थ.
व्यवहारात याचा अर्थ होईल; राजकारण, प्रशासन, पैसा आणि गुंडगिरी यांचे संबंध कसे तोडता येतील; ही अभद्र युती कशी संपवता येईल. या दिशेने अधिक विचार आणि कृती व्हावी. शौर्याच्या प्रवाहात प्रवाहपतित होऊ नये एवढेच.
- श्रीपाद कोठे
शुक्रवार, १० जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा