हेल्मेट विवाद आणि रजनीकांत यांच्यात असलेला संबंध कोणाला दिसो न दिसो, मला दिसतो. काय आहे संबंध? उन्माद. हेल्मेट विवादाच्या मुळाशी काय आहे? बेजबाबदार वाहन चालवणे. हा किंवा कोणताही बेजबाबदारपणा येतो कशातून? उन्मादातून. रजनीकांत अन त्याचे चित्रपट उन्माद नाही तर काय पसरवित आहेत? पहाटे ३ वाजता कशाला हवा चित्रपट? का दिली जाते परवानगी? बिनडोकांची फौज लगेच तुटून पडेल ते तामिळनाडूत, आपल्या इथे नाही. पण उन्मादासारखी बाब संसर्गजन्य असते अन उन्माद तयार करण्याला कोणतीही गोष्ट पुरू शकते हे न कळणाऱ्या महाभागांकडे लक्ष देण्याची गरज नाही. असा युक्तिवाद करणारे सुद्धा अन्य कोणत्या तरी उन्मादाच्या आहारी गेलेलेच असतात. कदाचित स्वत:च्या तथाकथित यशाच्या सुद्धा. उन्माद काय कशाचाही असू शकतो. मूळ बाब आहे उन्माद जन्माला घालणाऱ्या बाबींना अटकाव करणे, नियंत्रित करणे. पण करणार कोण? ज्यांनी करायचे तेच राजकारणाच्या (राजकारणी- सत्तारूढ, विरोधक सगळेच), न्यायनिवाड्याची शक्ती मिळाल्याच्या (न्यायव्यवस्था), अन प्रसिद्धी अन त्यामुळे आलेल्या उथळपणाच्या (प्रसिद्धी माध्यमे) उन्मादात आकंठ बुडालेले आहेत. यातील राजकारणी अन प्रसिद्धी माध्यमे यांच्याबाबत मतभेद फार होणार नाहीत. पण न्यायव्यवस्थेबाबत आक्षेप असू शकतील. पण गमतीची बाब अशी की, न्यायव्यवस्थाच सध्या एका paradox मध्ये आहे. कशी? एकच मुद्दा पुरेसा ठरावा. कोणते ना कोणते न्यायालय कोणत्या ना कोणत्या कारणाने रोजच सरकार वा राजकीय पक्षांवर कठोर प्रहार करत असते. दुसरीकडे हीच न्यायव्यवस्था कायद्याच्या चौकटीत काम करीत असल्याचा दावा करते. हे कायदे कोण तयार करतात? संसद वा विधिमंडळे. म्हणजे जे राजकारणी कमी वकुबाचे, स्वार्थी, कमजोर, देशाची चिंता नसलेले आहेत असे स्पष्ट वा आडून म्हणायचे त्याच लोकांनी केलेल्या कायद्यांचा कीस पाडत न्यायदान करायचे...!!! बरे कायदा बदला असे म्हणण्याचेही स्वातंत्र्य नाही. तेही ठरवणार लोकप्रतिनिधी. या लोकप्रतिनिधींवर कोणीही काहीही टीका केली तर चालते मात्र त्यांनी केलेल्या कायद्यांच्या आधारे वाट्याला येणाऱ्या न्यायाबद्दल काही बोलले तर तो न्यायव्यवस्थेचा अवमान होतो. कशाचा कशाला काही ताळमेळ नाही. मग वाहतुकीपासून पर्यावरणापर्यंत, गुन्हेगारीपासून सामाजिक अस्वस्थतेपर्यंत अनेक गोष्टींना जन्म देणारा उन्माद वाढवणाऱ्या असंख्य गोष्टी चालूच राहतात, कायदे, अधिक कायदे, कडक कायदे, कठोर अंमलबजावणी, अन असे सारे सुरूच राहते.
- श्रीपाद कोठे
२३ जुलै २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा