सोमवार, ४ जुलै, २०२२

घटस्फोट

मध्यंतरी खूपच मरगळ आली होती. प्रचलित घटनांपासून अलीकडे मी जाणीवपूर्वक थोडा दूर राहत असलो तरी कानावर आणि डोळ्यासमोर काही ना काही येत असतंच. एवढ्यात काहीच नव्हतं. अन ही मरगळ काल एकदम दूर झाली. एक नव्हे चक्क दोन विषय आले पुढे. एक सरसंघचालकांचे वक्तव्य आणि दुसरे आमिर खान, किरण राव यांचा घटस्फोट. त्यातील सरसंघचालकांच्या वक्तव्यावर एक टिपण लिहिलं. आता आमिर किरण घटस्फोटाबद्दल. हे तर नक्की की, या जोडीने काही वर्षांपूर्वी भारताबद्दल जे अगोचर विधान केले होते त्याची प्रतिक्रिया त्यांच्या घटस्फोटावरील प्रतिक्रियांमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. अन्यथा एखाद्या घटस्फोटावर आजकाल कोणी प्रतिक्रिया देत नाहीत. तसेही चित्रपट क्षेत्रातील घटस्फोट ही काही आता चघळायची सुद्धा गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे या घटनेकडे दुर्लक्ष करता येते.

पण या निमित्ताने घटस्फोटाबद्दल भारतीय समाजाचे विचार कसे चुकीचे अन बुरसटलेले आहेत याचंही चर्वण होतं आहे. वास्तविक घटस्फोट ही गोष्ट आता भारतीय समाजाने स्वीकारलेली आहे. परंतु एखादी गोष्ट स्वीकारणे याचा अर्थ ती उचलून धरणे, त्या गोष्टींचं कौतुक करणे किंवा त्या गोष्टीवर वेगळा विचार न करणे; असा होत नाही. आमिर किरण यांच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत ही अपेक्षा पाहायला मिळाली. तुम्ही घटस्फोट ही गोष्ट स्वीकारली आहे नं, मग त्यावर काहीच बोलायचं नाही. गेल्या काही दशकात व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने बोकाळलेल्या बौद्धिक दहशतवादाचा हा परिणाम आहे. म्हणूनच याबाबत लिहिण्याची गरज आहे.

वास्तविक मनुष्यजीवन शांततेने, सुरळीतपणे केव्हा चालतं आणि केव्हा त्यात असंतोष, अशांती निर्माण होते? त्याचं एका वाक्यात उत्तर आहे की, जेव्हा जगण्याच्या प्रेरणा अभौतिक असतील तेव्हा जीवनात शांति, समाधान असते. अन जेव्हा जगण्याच्या प्रेरणा भौतिक असतील तेव्हा जीवनात अशांती, असमाधान असते. आज जर सर्वत्र भौतिक प्रेरणाच जीवनाचा ताबा घेत असतील अन ते वैध आणि योग्य ठरवले जात असेल तर, जीवनात अशांती आणि असमाधान हेच राहणार. जीवनात याचा अर्थ परस्पर संबंधात सुद्धा. कारण परस्पर संबंध हा जीवनाचाच भाग असतात. भौतिक प्रेरणा असतील तर कपड्यांच्या रंगापासून कोणत्याही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. यात वस्तू, आवडी, इच्छा, कल्पना, प्रतिष्ठा किंवा असेच कोणतेही विषय येऊ शकतात. अन अभौतिक प्रेरणा असतील तर संघर्षाची स्थिती फारशी येतच नाही. मी अभौतिक हा शब्द वापरतो आहे, आध्यात्मिक नाही. धर्म, ईश्वर इत्यादी इत्यादी शब्दांची सुद्धा ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तीच्या जगण्याच्या प्रेरणा अभौतिक असू शकतात. प्रश्न आहे आज जगण्याच्या कोणत्या प्रेरणा वैध आणि प्रतिष्ठित आहेत? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर भौतिक हे आहे. त्यामुळे संघर्ष, असमाधान, अशांती, एकाकीपण यांना पर्याय नाहीत. मुद्दा एक लग्न करावं की दोन हा नाहीच. वाटलं तर पाच करा. काहीच हरकत नाही. पण त्या प्रत्येक संबंधात प्रेम, स्नेह, ओढ, आपुलकी राहू द्या. असे संबंध जोपासायला अभौतिक प्रेरणा हव्यात, ज्या 'अहं'चे कंगोरे बोचू देत नाहीत. अन जोवर 'अहं'चे कंगोरे बोचरे आहेत तोवर कितीही धरले अन कितीही सोडले तरी हाती काहीच लागणार नाही. एखाद्याने आयुष्यभर एखादी साथ निभावणे यातही खूप मोठं काही नाही आणि, आत्मशोधासाठी किंवा आत्मसंतोषासाठी दहा लोकांना सोडण्यातही काहीच महान नाही. प्रश्न आहे अभौतिक प्रेरणांनी 'अहं'चे कंगोरे तासले गेले आहेत की नाहीत हा.

साधारण वीसेक वर्षांपूर्वी एका विशीतील तरुणीने मला विचारले होते, 'एका वेळी एकापेक्षा जास्त लोकांवर प्रेम नाही का होऊ शकत?' मी तिला म्हटले, 'नक्की होऊ शकतं. अगदी गंभीरपणे मी हे म्हणतो आहे. शिवाय ज्यांच्याकडे द्वेष, असूया नाहीच; त्याच्या बाबतीत तर असं होऊच शकेल. प्रश्न फक्त एवढाच की, प्रत्येक संबंधाला न्याय देता येतो का?'

विषय किती लोकांवर प्रेम करावं, किती वेळा करावं हे नाहीतच. मुद्दा आहे परस्पर संबंध टिकवण्यासाठी तुमच्या जगण्याच्या प्रेरणा काय आहेत? त्या सशक्त अभौतिक असतील तर कोणाला सोडण्याची गरजच पडणार नाही अन त्या तकलादू भौतिक असतील तर कितीही संबंध तोडले अन जोडले तरी रिक्तता भरून येणार नाही. आजचा प्रश्न हा जगण्याच्या प्रेरणांचा आहे.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा