शुक्रवार, १ जुलै, २०२२

हेल्मेट सक्ती

वाहतुकीचे नियम आणखीन कडक होणार आणि दंडही वाढणार; असा प्रस्ताव असल्याचे वाचले. कोणता नियम मोडल्यास दंडाची रक्कम किती वाढणार याचाही तपशील त्यात होता. स्वाभाविकच हेल्मेट हाही मुद्दा होताच. कायदे करताना मर्यादा काय असावी हा नेहमीच वादाचा विषय असतो आणि राहील. परंतु कधीकधी काही बाबी अनाकलनीय अशाच असतात. हेल्मेटसक्ती ही त्यातलीच एक. वाहन चालवताना घालण्यात आलेली अन्य बंधने आणि हेल्मेटसक्ती यात एक मुलभूत फरक आहे. मोबाईलवर न बोलणे, दारू पिऊन गाडी न चालवणे, डाव्या बाजूने वाहन चालवणे, चौकातील दिव्यांचे संकेत न मोडणे, परवाना घेतल्याशिवाय गाडी न चालवणे, वेगाची मर्यादा पाळणे; अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संबंधात; ते नियम मोडणारेही मानतात की, ही बंधने मोडणे योग्य नाही, चुकीचे आहे. म्हणजे जो हे नियम पाळत नाही त्याच्या मनातही, ही बंधने योग्य आहेत याबद्दल शंका नसते. हेल्मेटच्या बाबतीत मात्र स्थिती वेगळी आहे. यात नियम मोडणाऱ्यांना मनापासून असेच वाटते की, सक्ती चुकीची आहे. गंमत पुढे आहे. ती अशी की, जे हेल्मेटसक्ती असावी अशा मताचे आहेत त्यांच्याकडेही; `अरे बाबांनो तुमच्याच भल्यासाठी सांगतो' यापलीकडे दुसरा कोणताही तर्क वा युक्तिवाद नाही. हेल्मेट शिवाय अन्य जी बंधने आहेत ती पटवून देण्याची अनेक कारणे आहेत आणि ती सगळ्यांना पटतातही. हेल्मेट सक्तीसाठी मात्र `तुमच्या जीवाची काळजी' या अति उदार, अति उदात्त तर्कापलीकडे काहीही नाही. हा भंपकपणा आहे, अन्याय आहे. उलट `हेल्मेटसक्ती नको' असे म्हणणाऱ्यांची पुष्कळ कारणे आहेत. त्यात केवळ गैरसोय हा विषय नसून, त्रास आणि अन्य व्यक्तिगत विषय आहेत. मात्र एखादी गोष्ट कोणासाठी अडचणीची, गैरसोयीची, त्रासदायक असू शकते; हे मुळातच मान्य न करणे ही सरळ सरळ हुकुमशाही आहे. तुमचे त्रास वगैरे आम्ही जाणत नाही तुमच्या भल्यासाठी आम्ही हे ठरवले आहे अन तुम्ही असेच वागले पाहिजे; ही दरोडेखोरी आहे. मानवी जगणे हा इतका संवेदनशील विषय असतो की त्याखाली अनेक प्रकारे मनमानी करता येऊ शकते, पुष्कळदा केलीही जाते. हेल्मेटसक्ती हा तशातलाच प्रकार आहे. आजवर झालेला विरोध कठोरपणे मोडीत काढलेला आहे अन पुढेही मोडीत काढू असे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेता येईल. पण ते भूषणावह नक्कीच नसणार.

टीप - पाण्यासाठी पेट्रोल, डिझेलवर अतिरिक्त भार लावणार अशी चर्चा आहे. असा निर्णय झाला तर तोही अयोग्य निर्णय म्हणावा लागेल.

- श्रीपाद कोठे

२ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा