गुरुवार, २८ जुलै, २०२२

Outlook चा आगाऊपणा

संघविरोधक किती बावचळले आहेत याचा एक उत्तम नमूना Outlook च्या ताज्या अंकात पाहायला मिळेल. नेहा दीक्षित नावाच्या त्यांच्या कोण्या दीड शहाण्या प्रतिनिधीने तब्बल ११ हजार ३५० शब्दांची एक कथा पाच भागात लिहिली असून त्याचे शीर्षक आहे- Operation Beti Uthao'. वनवासी विद्यार्थिनींसाठी चालणाऱ्या सेवाकार्यांसह महिलांच्या संदर्भात संघ आणि संबंधित संस्थांबद्दल जे काही बरळता येईल ते या नेहाबाई बरळल्या आहेत. त्या सगळ्याचा समाचार घ्यायचा तर दीर्घ लेख लिहावा लागेल. फक्त नमूना म्हणून-

या बयेने आपण किती अभ्यासपूर्वक लिखाण करतो हे दाखवण्यासाठी २०१३ साली लिहिलेला राष्ट्र सेविका समितीवरील एक लेखही त्यात आहे. त्यावेळी औरंगाबाद येथे झालेल्या समितीच्या अखिल भारतीय प्रचारिका वर्गाला भेट देऊन तिने तो लिहिला आहे असे तिचे म्हणणे. लेखाचा बाजही तसाच आहे. पण भेट देणे वेगळे अन समजणे वेगळे हे तो लेख वाचताना पदोपदी जाणवते. समितीच्या प्रमुख संचालिका मा. शांताक्का आहेत, पण त्या लेखात त्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी shantakaka असा करण्यात आला आहे. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांचेही त्यात भाषण झाले. यात नवीन काहीच नाही. अनेक ठिकाणी, अनेक संस्थांमध्ये ते मार्गदर्शन करण्यासाठी जातात. मात्र या बयेने शोध लावला की, भय्याजी जोशी या प्रचारिकांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यासाठी तिथे आले होते.

या नेहा दीक्षित बाईची समज-उमज काय अन किती आहे हे या दोनच उल्लेखांवरून स्पष्ट होईल. पण असेच लोक मोठमोठ्या मासिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये लिहितात अन समाजात गोंधळ, भ्रम, द्वेष, असत्य पसरवित राहतात. काही चांगले नाही झाले तर हरकत नाही, पण वाईट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठीच अशा लेखांना, अशा प्रकारांना चोख उत्तर देण्याची गरज असते.

- श्रीपाद कोठे

२९ जुलै २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा