जगातील ८० गर्भश्रीमंत millionaires for humanity नावाने एकत्र आले असून, आमच्याकडून अधिक कर वसूल करा, असे पत्र त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. एवढेच नाही तर, जगभरच्या आमच्या बंधूंनो कोरोनाला मुळीच घाबरू नका. आम्ही तुमच्यासाठी आहोत, असे आश्वासनही दिले आहे. ही एक चांगली घडामोड आहे. हे ८० लोक काय आणि किती करतील, करू शकतील किंवा त्यांचे त्यांचे देश त्यांच्यावर अतिरिक्त कर लादतील का? किती लादतील? हे हळूहळू स्पष्ट होईलच. पण यातून व्यक्त झालेली भावना नक्कीच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. अनेकांना ती अशा पुढाकारासाठी प्रेरित करेल. जगभरच्या सरकारांना या दिशेने विचार आणि कृती करण्यासाठी बळ देईल. त्याचे चांगले परिणाम होतील अशी आशा करू या.
या मानवीय कृतीतून अर्थकारणाची मूलभूत चर्चा सुरू होईल की नाही हे सांगणे कठीण आहे पण ती व्हावी असे वाटते. कालच पुन्हा एकदा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत असल्याचा एक ताजा अभ्यास पाहिला. हा विषय तसा जुना असला तरी तो सत्य आहे आणि अजून त्यावर समाधान सापडलेले नाही. त्यासाठी मूलभूत विचार गरजेचा आहे. काही बिंदू फक्त या दृष्टीने पुढे ठेवतो. आज गृहित धरून चाललेल्या आणि त्यांना ध्रुव सत्य मानून चाललेल्या मानवाने हे समजून घेणे आवश्यक वाटते.
- प्रत्येक काम पैसा निर्माण करू शकत नाही.
- पैसा निर्मिती करणारी सगळी कामे सारखा पैसा निर्माण करू शकत नाहीत.
- मेहनत करा, क्षमता आणि कौशल्य मिळवा आणि करा कमाई; हे ऐकायला फार महान वाटले तरी तसे होऊ शकत नाही, होत नाही.
- अधिकाधिक मिळवण्याची लालसा आणि त्यासाठीची चढाओढ यातून समन्यायी व्यवस्था, सगळ्यांना सन्मानजनक जीवन; साकारू शकत नाही.
- शहरे, कारखाने, व्यवसाय, प्रशासन; या सगळ्यांचे आकार आटोपशीर असायला हवेत.
- 'एकमेका साह्य करू' हा जीवनाचा मंत्र व्हायला हवा. त्यासाठी सुपंथाची प्रेरणा मानवी मनात जागवावी लागेल.
- not uncontrolled self but controlling the self. ही विचारांची दिशा असावी लागेल.
- मदत आणि सेवा यांच्या मर्यादा असून; जीवनाची घडी नव्याने बसवावी लागेल.
- श्रीपाद कोठे
बुधवार, १५ जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा