मंगळवार, २६ जुलै, २०२२

कम्युनिझम

कम्युनिझम म्हणजे काय? बरीच उत्तरं येतील. कोणी सूत्ररुपात सांगेल. कोणी प्रबंधरुपात. कोणी तात्त्विक तर कोणी व्यावहारिक. मी या क्षणी व्यावहारिक विचार करतो आहे. व्यावहारिक उत्तर असू शकतं - हिंसाचार, असहिष्णुता, साचेबद्धता. ही उत्तरं खरीच आहेत. पण पुन्हा प्रश्न येतो, असे का? त्यांना तसे शिकवले जाते, हे उत्तर येईल. परंतु ते काही उत्तर होऊ शकत नाही. का तसे शिकवतात, हा प्रश्न येईलच. त्याचं उत्तर आहे त्यांच्या मानण्यात. काय मानतात ते? त्यांची एक मान्यता ही आहे की; विचार, भावना, व्यवहार या सगळ्यातच साचेबद्धता असली पाहिजे. सगळ्या गोष्टींना सारखे मापदंड असले पाहिजे तरच माणूस सुखी होईल. त्यांची दुसरी मान्यता आहे की; हे मापदंड अधिकृत असले पाहिजेत. अधिकृतता सत्तेने येते. त्यामुळे सत्तेने शिक्कामोर्तब केले, सत्तेचे प्रमाणपत्र मिळाले की झाले. त्यानंतर तसे प्रत्यक्षात आणण्यासाठी सुक्तासूक्त प्रयत्न करणे. कारण सत्तेने शिक्का मारल्याने तेच योग्य, चांगलं, शाश्वत इत्यादी ठरते. पण खरंच असं असतं का? असू शकतं का? असावं का? यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे; खरंच असं नसतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे; असं असू शकत नाही. तिसऱ्या म्हणजे, असावं का, या प्रश्नाचं उत्तर आहे; सत्ता गाजवायची असल्यास असावं आणि जगाचं कल्याण हवं असल्यास नसावं.

वर्तमानाचा विचार करताना हा सगळा विचार मनात येतो. आज जेव्हा आम्ही म्हणतो की, सगळ्या संस्थांवर त्यांनी कब्जा करून ठेवला होता आणि आता तो दूर करायला हवा; तेव्हा आपण कम्युनिस्ट भाषाच बोलत असतो. भाषेला, इतिहासाला, उपचार पद्धतींना, व्यंजनांना, व्यक्तींना, स्थळांना, शिक्षणाला; अनेक गोष्टींना मान्यता मिळवण्याची धडपड जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कम्युनिस्ट पद्धतीनेच वागत असतो. संस्कृत, संगीत, तत्त्वज्ञान, आहार, भाषा, कला, ईश्वर, उपासना, कुटुंब व्यवस्था; अशा असंख्य गोष्टींना सत्तेची मान्यता वा प्रमाणपत्र नसतानाही त्या युगेयुगे चालत आहेत. का? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की; प्रचार, जाहिरातबाजी किंवा सत्तेची मान्यता आणि प्रमाणपत्रे यांनी गोष्टी टिकत नाहीत; स्वीकारल्या वा नाकारल्या जात नाहीत. त्या टिकतात किंवा स्वीकारल्या वा नाकारल्या जातात त्या त्यातील कसदार सत्वामुळे. उलट; प्रचार, जाहिरातबाजी वा सत्ता यांच्या आश्रयाने जगणाऱ्या गोष्टी अल्पायु असतात. आज आपल्याला सत्तेच्या मान्यतेचा मोह पडत असेल अथवा ती योग्य आणि आवश्यक वाटत असेल तर; आम्ही कम्युनिस्ट झालो आहोत, असा त्याचा अर्थ होईल.

शिक्षणाच्या बाबतीत, इतिहासाच्या बाबतीत, संगीताच्या बाबतीत; schools of thought का नसावेत? छोट्या मतप्रवाहाचे सुद्धा स्थान राहील. मोठ्याचेही स्थान राहील. जे पटेल ते लोक स्वीकारतील, त्याच्या मागे जातील, ते मान्य करतील. सगळ्यांच्या सगळ्या मान्यता सारख्याच असल्या पाहिजेत याचे काय प्रयोजन? अन मान्यता सारख्या करता तरी येऊ शकतात का? फार तर एखादी गोष्ट सत्तास्वीकृत म्हणता येऊ शकेल. म्हणून ती जनस्वीकृत होईल का? मग हा खटाटोपच कशाला? हा सगळा प्रकार गेल्या काही शतकातील सत्तासाम्राज्याच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. हे चूक आहे हे जगाला पटवून आणि दाखवून देण्याची वास्तविक गरज आहे.

मानवाला अत्यावश्यक अशा प्राणवायूचे वातावरणातील प्रमाण २१ टक्के आहे आणि नायट्रोजनचे प्रमाण ७८ टक्के. बाकीचे कार्बन, हायड्रोजन इत्यादी वायू एक टक्क्यात आटोपतात. तेच प्रमाण मानवी शरीरात कसे असते? प्राणवायू ६५ टक्के, हायड्रोजन १० टक्के, कार्बन १८ टक्के, नायट्रोजन तीन टक्के. ज्या मिठाअभावी एखादा खाद्यपदार्थ आपण तोंडातून बाहेर टाकू आणि बाजूला सारू त्यात मीठ किती असते? चिमूटभर. मग जीवनात, जगण्यात, समाजात, व्यवस्थेत कोणत्या गोष्टीचे प्रमाण किती? कोणत्या गोष्टीला मान्यता किती? कोणत्या गोष्टीचे समर्थक किती? याला किती महत्व असावे? प्रमाणपत्र, मान्यता, समर्थन या गोष्टी मनातून, डोक्यातून काढून टाकून; सार्थक, सकस, सत्वयुक्त जीवन जगण्याकडे; उभं करण्याकडे चित्त लावायला हवं. चुकीच्या गोष्टींना विरोध समजूनउमजून करायला हवा. प्रश्नांना योग्य उत्तरे द्यायला हवी. तू तू मी मी हा कोणत्याच गोष्टीवरचा उपाय नसतो.

- श्रीपाद कोठे

२७ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा