शुक्रवार, २९ जुलै, २०२२

कलामांवर टीका

तथाकथित धर्मनिरपेक्ष/ बुद्धिवादी/ आधुनिक वगैरे नावांनी वावरणाऱ्या लोकांनी याकुबच्या संबंधात पदरी पडलेल्या निराशेने, आता `मरता क्या न करता' या न्यायाने, आता कलामांच्या बद्दल गलीच्छ कुजबुज आणि चर्चा सुरु केली आहे. काही नमुने-

१) कलामांना `मिसाईलमन' म्हणून गौरवणे किती उचित आहे?

२) त्यांच्यामुळे भारतीय उपखंडात शस्त्रस्पर्धा सुरु झाली आणि पाकिस्तानने आपली शस्त्रक्षमता वाढवली.

३) कलामांच्या नावाने छाती फुगवणे चुकीचे आहे.

४) त्यांच्यात वैज्ञानिक गुण नव्हते आणि ते चांगले राष्ट्रपतीही नव्हते.

या मुक्ताफळांवर काहीही बोलण्याची गरज नाही. फक्त या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रिया देणारे यांची सतत आठवण ठेवून, त्यांच्यावर बारीक लक्षही ठेवायला हवे. सामान्य माणसांनी सुद्धा अशी मुक्ताफळे उधळणाऱ्याना असलेली सामाजिक मान्यता आणि सामाजिक आदर कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करावा.

जी चार मुक्ताफळे वर दिली आहेत, त्यातील पहिला मुद्दा फेसबुकवरच एका महिला कार्यकर्तीने टाकलेला आहे. या महिला पुष्कळदा मराठी वाहिन्यांवर वगैरे असतात. त्यांच्या मुद्याला उत्तर म्हणून मी जी प्रतिक्रिया टाकली ती सगळ्यांसाठी देत आहे. मी प्रतिक्रियेत मांडलेला विषय, केवळ वर्तमान घटनांपुरता नसून व्यापक जागतिक परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा मला महत्वाचा वाटतो. त्यामुळेच त्यावर समाजात विचारमंथन व्हावे अशी माझी भूमिका आहे. त्यासाठीच ती प्रतिक्रिया सगळ्यांच्या विचारार्थ-

`मिसाईलमन' म्हणून गौरव असू शकतो, नव्हे असायलाच हवा. कारण तसा तो नसेल तर तुमच्या माझ्यासारखे लोक धोक्यात येतील. आपण आपल्या पूर्वजांना कितीही घालून पाडून बोलू शकतो. मात्र जीवन, त्याची विविधता, त्याच्या गरजा, एवढेच नाही तर त्याच्या मर्यादा यांची पुरेपूर जाण त्यांना होती आणि त्याची शास्त्रशुद्ध रचना त्यांनी केली होती. म्हणूनच अन्य जगापेक्षा कितीतरी अधिक चांगलं आणि दीर्घ जीवन इथला समाज जगला. त्यासाठी केवळ शास्त्र नव्हे, त्यासोबत शस्त्रसुद्धा महत्वाचं आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र - ही व्यवस्था जेवढी योग्य आणि शास्त्रशुद्ध आहे तेवढी जगातील कोणतीही व्यवस्था नाही. (खूप मोठा विषय आहे. प्रतिक्रिया म्हणून एवढाच पुरे.) केवळ स्वप्नरंजन गोड वाटू शकतं. पण ते अयोग्य असतं.

हो, एक राहिलं. यावर पुन्हा तर्कवितर्क होतील. त्याआधीच फक्त एक आठवण देतो, १९६२ च्या चीन युद्धाची. जरा त्याचा थोडा विचार करावा. पं. नेहरूंसारख्या माणसाचाही शस्त्रांच्या संदर्भात दृष्टीकोन कसा बदलला होता ते लक्षात ठेवावं. उचलली जीभ... ठीक नाही.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा