रविवार, ३१ जुलै, २०२२

माणूस व पक्ष

आपल्या लोकशाही व्यवस्थेचे खूप वेगवेगळे विश्लेषण होते. पण या व्यवस्थेने समाजाचे पक्षांमध्ये विभाजन करण्याचा अक्षम्य अपराध केला आहे. पक्ष, पक्षाचे मुखपत्र, पक्षाचे प्रवक्ते यांचे म्हणणे, यांचे विचार; त्या त्या पक्षाचे असतात हे खरेच. पण एखाद्या पक्षाचा समर्थक, मतदाता अशा सामान्य माणसाचे विचार त्याचे स्वत:चे असू शकतात/ असतात हे समजण्याची क्षमताच आम्ही गमावतो आहोत का? एखाद्या व्यक्तीचे मत वा विचार वा भूमिका, त्याची स्वतंत्र असते, विशिष्ट पक्षाचीच री तो ओढत असेल किंवा त्याने ओढावी असे म्हणणे तर्कदुष्ट आहे. मत देण्याचा आशय वेगळा आहे. मत देणे याचा अर्थ त्याने स्वत:ची अक्कल, समज, बुद्धी त्या पक्षाला ना विकलेली असते, ना गहाण टाकलेली. पण त्याने काही मत/ विचार मांडले की लोक आपसात तो अमुक पक्षाचा, तो तमुक पक्षाचा असेच पाहायला लागतात अन त्यानुसारच अर्थ लावू लागतात. हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. ही मानसिक दुर्बलता मनोरोगात बदलण्यापूर्वी टाकून दिली पाहिजे. माणसांचे, समाजाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. माणूस वा समाज पक्षांचा गुलाम नाही.

- श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१५

राजकीय बांधिलकी

ट्राय अध्यक्षांचे आव्हान, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि आता `आवश्यक नसेल तर आधार देऊ नये' असा झालेला खुलासा; हे सगळेच एका परीने चांगले झाले. लोकशाहीत (खरे तर जीवनातच) possessive राहणे चांगले नसते. त्यातही राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती, राजकीय यंत्रणा, राजकीय व्यवस्था अथवा राजकीय तत्वज्ञान याबाबत possessive असणे अयोग्यच. पण तसे होते. आधारच्या बाबतीतही हे लागू आहे. म्हणूनच बसलेला झटका योग्य आहे. प्रश्न हा येतो की, आपले आहे म्हणून एखाद्या गोष्टीचे समर्थन करून त्याच्या होणाऱ्या नुकसानाकडे डोळेझाक करायची का? असे करणे निश्चितच शहाणपणाचे नसते. समजा उद्या काही महाभयानक घडले असते तर त्यासाठी दोषी कोण राहिले असते? म्हणून सगळ्या गोष्टी तारतम्याने, नीरक्षीर विवेकाने पाहिल्या पाहिजेत. मतदान कोणाला करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आवड आणि सदसद्विवेकबुद्धी यातून लोक मतदान करतात. परंतु एकदा ती प्रक्रिया पार पडल्यावर त्यातून स्वत:ला बाजूला करता आले पाहिजे. भारताचा विचार करायचा तर या तूतू मीमी ची सुरुवात कॉंग्रेसने केली. तीही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून. अन काट्याने काटा काढावा लागतो त्यानुसार भाजपने त्याला धोबीपछाड दिली. परंतु काटा काढण्यासाठी जसा दुसरा काटा लागतो आणि काटा काढून झाल्यावर दोन्ही काटे फेकून द्यावे लागतात, तसेच political affiliation आणि political possessiveness यातून सगळ्यांनीच बाहेर पडणे गरजेचे आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

राष्ट्रीय सुरक्षा असाही एक विषय येतो. एक पक्के लक्षात घ्यायला हवे की, राष्ट्र जन्माला येणे किंवा लयाला जाणे ही विश्वशक्तीची लीला असते. लयास गेलेली राष्ट्रे दुबळी होती म्हणून लयास गेली नाहीत. ती लयास गेली त्यांचा जीवनहेतू पूर्ण झाला होता म्हणून. हिंदू राष्ट्राचा जीवनहेतू पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष परमेश्वरदेखील या राष्ट्राचा लय घडवू शकत नाही. तो जीवनहेतू कधी पूर्ण होईल कोणीही सांगू शकत नाही, पण त्याला अजून भरपूर अवकाश आहे. तो जीवनहेतू पूर्ण होईपर्यंत हे राष्ट्र राखेतूनही उभे राहील. त्याची फार काळजी करण्याची गरज नसते. आमचा विचारव्यवहार हिदू राष्ट्राच्या जीवन हेतूला साजेसा आहे का याचा विचार अधिक हवा. विचारव्यवहारातील सज्जनता, व्यापकता, उत्तुंगता ही या राष्ट्राची मूळ प्रकृती आहे. समग्र जगाची ही मूळ प्रकृती व्हावी हाच या राष्ट्राचा जीवनहेतू आहे. या प्रवृत्तीला छेद देईल ते ते त्याज्य असेच म्हटले पाहिजे. एक गोष्ट अत्यंत नम्रतेने (आणि लायकी नसतानाही) नमूद करावीशी वाटते की, तात्यारावांशी मी थोडासा सहमत नाही. सद्गुण विकृती या राष्ट्राच्या अध:पतनाला जबाबदार आहे असे मला वाटत नाही. तर व्यवहारिक शहाणपण आणि सज्जनतेचा योग्य अन्वयार्थ समजून घेण्यातील चूक; ही कारणे आहेत. तात्यारावांनी तमोग्रस्त हिंदू समाजाला जागे करण्यासाठी त्या पद्धतीची मांडणी केली होती. परंतु सज्जनता, व्यापकता, उत्तुंगता, हार्द यांना बाधा न आणता व्यवहारातील चोखपणा ही आजची गरज आहे. आम्हाला तात्यारावांच्या काळाशी थांबता येणार नाही. थांबूही नये.

@@@@@@@@@@@@@@@@@@@

#श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१८

शनिवार, ३० जुलै, २०२२

मातीसाठी जागर हवा

विदर्भात साधारण ४० टक्के अधिक पाऊस झाला असं वाचण्यात आलं. गरमी मात्र म्हणावी तशी कमी झाली नाही. सुमारे महिना झाला असेल. छोट्या पडद्यावर ओरिसातील एक मंदिर दाखवले होते. पाचशे-हजार फुटांच्या टेकडीवर असलेल्या त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, बाहेर ५० अंशाच्या आसपास असलेलं तापमान, पण आत मात्र गारेगार. ना एसी, ना कुलर, ना अन्य काही. त्यावरच्या प्रतिक्रियाही दाखवल्या. भाविक भक्तांच्या प्रतिक्रिया चमत्कार अशाच होत्या. दिल्लीच्या एका वैज्ञानिकाची प्रतिक्रिया यावर प्रकाश टाकणारी होती. ते म्हणाले- या मंदिरात असलेल्या भुयारासारख्या जागेत मंदिरातील उष्ण वारे जात असतील. बांधकाम तसे असेल. त्यामुळे उष्णता जमिनीत शोषली गेल्याने मंदिरातील वातावरण गार होत असेल. याच दिशेने विचार केला तर म्हणावे लागेल की- उष्णता, पाऊस शोषून घेण्यासाठी जमीन नसल्याने उष्णता वातावरणातच फिरत राहते. उष्णता वा पाणी जिरवण्यासाठी माती गरजेची आहे. मातीकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. माती म्हणजे घाण, मातीबद्दल दुरावा हे टाकून द्यायला हवे.

महाराष्ट्रात नुकतेच दोन कोटी वृक्ष लावण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारनेही या अनुकरणीय उपक्रमाचे अनुसरण करीत पाच कोटी वृक्ष लावण्याचे ठरवले. हे प्रयत्न स्त्युत्य आहेतच. मात्र त्यासोबतच माती मोकळी राहील, कमीत कमी झाकली जाईल याचीही चळवळ हवी. अन्यथा, जमिनीत पाणी कमी मुरेल. अधिकची झाडे जमिनीतील पाणी अधिक ओढून घेतील आणि पुन्हा पाण्याची कमतरता जाणवेल. पाण्याची समस्या फक्त पाउस पडण्याची नाही, तर जमिनीत पाणी मुरण्याची देखील आहे. पडणारा पाउस अधिकाधिक मुरण्यासाठी जमीनही अधिक हवी. दिल्ली, बंगलोर, मुंबई, ठाणे येथील पाणी साचण्याची समस्या ही जमिनी झाकून टाकणे आणि पाणी थांबू नये यासाठी अधिकाधिक आणि उंच सिमेंटीकरणाचीही समस्या आहे. काही प्रमाणात तर ही समस्या माती मोकळी केल्याने आणि अनावश्यक उंचवटे कमी करण्याने कमी होऊ शकेल.

कचरा समस्या सोडवण्यासाठीही माती गरजेची आहे. झाडपाला, काडीकचरा, कागदकपटे, कपडे, अन्न, भाजीपाला इत्यादी अनेक गोष्टी सिमेंटवर सडतात. त्या सिमेंटमध्ये, टाईल्समध्ये विघटीत होत नाहीत, शोषल्या जात नाहीत. ठिकठिकाणी मातीचे खड्डे केल्यास त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल. मातीवर पादत्राणे न घालता चालणे हे तर आरोग्यासाठी उत्तमच आहे. आता मातीसाठी जागर करण्याची वेळ आली आहे.

- श्रीपाद कोठे

३१ जुलै २०१६

Hippocrates

Sustainable development can't be a reality without sustainable consumption. Do our society, our economists, our governments aspire for one? Who will bell the cat. Are we not Hippocrates? Even environmentalist don't wish to live simply. To be true, environmentalist are more Hippocrates as they voice for environment and that's it. They even don't labour to articulate links between environmental degradation and day to day living of masses and their self. Their concern about environment ends with plantation and non use of plastic. That's all.

Brodgauge metro is the best example. It's ok that this project will reduce time and misery of lakhs of people. Fine. It's commendable. But what's the need of those bogies to be with TVs and restaurants and hostesses and likewise parafernalia. Why not the metro be the metro train only? No one will voice against it. Instead everybody will rush to praise it. 'Oh our vidarbh metro has this and that and that and that.' we as a society has become so myopic and non sensitive that we even refuse to ponder what is good and what is bad. Alas. God save the nation. God save the humanity.

- श्रीपाद कोठे

३१ जुलै २०२१

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

कलामांवर टीका

तथाकथित धर्मनिरपेक्ष/ बुद्धिवादी/ आधुनिक वगैरे नावांनी वावरणाऱ्या लोकांनी याकुबच्या संबंधात पदरी पडलेल्या निराशेने, आता `मरता क्या न करता' या न्यायाने, आता कलामांच्या बद्दल गलीच्छ कुजबुज आणि चर्चा सुरु केली आहे. काही नमुने-

१) कलामांना `मिसाईलमन' म्हणून गौरवणे किती उचित आहे?

२) त्यांच्यामुळे भारतीय उपखंडात शस्त्रस्पर्धा सुरु झाली आणि पाकिस्तानने आपली शस्त्रक्षमता वाढवली.

३) कलामांच्या नावाने छाती फुगवणे चुकीचे आहे.

४) त्यांच्यात वैज्ञानिक गुण नव्हते आणि ते चांगले राष्ट्रपतीही नव्हते.

या मुक्ताफळांवर काहीही बोलण्याची गरज नाही. फक्त या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रिया देणारे यांची सतत आठवण ठेवून, त्यांच्यावर बारीक लक्षही ठेवायला हवे. सामान्य माणसांनी सुद्धा अशी मुक्ताफळे उधळणाऱ्याना असलेली सामाजिक मान्यता आणि सामाजिक आदर कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करावा.

जी चार मुक्ताफळे वर दिली आहेत, त्यातील पहिला मुद्दा फेसबुकवरच एका महिला कार्यकर्तीने टाकलेला आहे. या महिला पुष्कळदा मराठी वाहिन्यांवर वगैरे असतात. त्यांच्या मुद्याला उत्तर म्हणून मी जी प्रतिक्रिया टाकली ती सगळ्यांसाठी देत आहे. मी प्रतिक्रियेत मांडलेला विषय, केवळ वर्तमान घटनांपुरता नसून व्यापक जागतिक परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा मला महत्वाचा वाटतो. त्यामुळेच त्यावर समाजात विचारमंथन व्हावे अशी माझी भूमिका आहे. त्यासाठीच ती प्रतिक्रिया सगळ्यांच्या विचारार्थ-

`मिसाईलमन' म्हणून गौरव असू शकतो, नव्हे असायलाच हवा. कारण तसा तो नसेल तर तुमच्या माझ्यासारखे लोक धोक्यात येतील. आपण आपल्या पूर्वजांना कितीही घालून पाडून बोलू शकतो. मात्र जीवन, त्याची विविधता, त्याच्या गरजा, एवढेच नाही तर त्याच्या मर्यादा यांची पुरेपूर जाण त्यांना होती आणि त्याची शास्त्रशुद्ध रचना त्यांनी केली होती. म्हणूनच अन्य जगापेक्षा कितीतरी अधिक चांगलं आणि दीर्घ जीवन इथला समाज जगला. त्यासाठी केवळ शास्त्र नव्हे, त्यासोबत शस्त्रसुद्धा महत्वाचं आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र - ही व्यवस्था जेवढी योग्य आणि शास्त्रशुद्ध आहे तेवढी जगातील कोणतीही व्यवस्था नाही. (खूप मोठा विषय आहे. प्रतिक्रिया म्हणून एवढाच पुरे.) केवळ स्वप्नरंजन गोड वाटू शकतं. पण ते अयोग्य असतं.

हो, एक राहिलं. यावर पुन्हा तर्कवितर्क होतील. त्याआधीच फक्त एक आठवण देतो, १९६२ च्या चीन युद्धाची. जरा त्याचा थोडा विचार करावा. पं. नेहरूंसारख्या माणसाचाही शस्त्रांच्या संदर्भात दृष्टीकोन कसा बदलला होता ते लक्षात ठेवावं. उचलली जीभ... ठीक नाही.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०१५

गुरुवार, २८ जुलै, २०२२

Outlook चा आगाऊपणा

संघविरोधक किती बावचळले आहेत याचा एक उत्तम नमूना Outlook च्या ताज्या अंकात पाहायला मिळेल. नेहा दीक्षित नावाच्या त्यांच्या कोण्या दीड शहाण्या प्रतिनिधीने तब्बल ११ हजार ३५० शब्दांची एक कथा पाच भागात लिहिली असून त्याचे शीर्षक आहे- Operation Beti Uthao'. वनवासी विद्यार्थिनींसाठी चालणाऱ्या सेवाकार्यांसह महिलांच्या संदर्भात संघ आणि संबंधित संस्थांबद्दल जे काही बरळता येईल ते या नेहाबाई बरळल्या आहेत. त्या सगळ्याचा समाचार घ्यायचा तर दीर्घ लेख लिहावा लागेल. फक्त नमूना म्हणून-

या बयेने आपण किती अभ्यासपूर्वक लिखाण करतो हे दाखवण्यासाठी २०१३ साली लिहिलेला राष्ट्र सेविका समितीवरील एक लेखही त्यात आहे. त्यावेळी औरंगाबाद येथे झालेल्या समितीच्या अखिल भारतीय प्रचारिका वर्गाला भेट देऊन तिने तो लिहिला आहे असे तिचे म्हणणे. लेखाचा बाजही तसाच आहे. पण भेट देणे वेगळे अन समजणे वेगळे हे तो लेख वाचताना पदोपदी जाणवते. समितीच्या प्रमुख संचालिका मा. शांताक्का आहेत, पण त्या लेखात त्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी shantakaka असा करण्यात आला आहे. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांचेही त्यात भाषण झाले. यात नवीन काहीच नाही. अनेक ठिकाणी, अनेक संस्थांमध्ये ते मार्गदर्शन करण्यासाठी जातात. मात्र या बयेने शोध लावला की, भय्याजी जोशी या प्रचारिकांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यासाठी तिथे आले होते.

या नेहा दीक्षित बाईची समज-उमज काय अन किती आहे हे या दोनच उल्लेखांवरून स्पष्ट होईल. पण असेच लोक मोठमोठ्या मासिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये लिहितात अन समाजात गोंधळ, भ्रम, द्वेष, असत्य पसरवित राहतात. काही चांगले नाही झाले तर हरकत नाही, पण वाईट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठीच अशा लेखांना, अशा प्रकारांना चोख उत्तर देण्याची गरज असते.

- श्रीपाद कोठे

२९ जुलै २०१६

बुधवार, २७ जुलै, २०२२

लोकशाहीचे संकट

crisis of democracy या पुस्तकाची आज आठवण झाली. clashes of civilization लिहिणारे pro. samuel p. huntington यांच्यासोबत pro. michel crozier आणि joji watanuki यांच्या तीन शोध प्रबंधाचे हे पुस्तक. या ग्रंथाचे एकूण पाच विभाग आहेत आणि त्यात एकूण १९ लेख आहेत. त्यांची शीर्षके आहेत-

- the current pessimism about democracy.

- the challenges confronting democratic government.

- are european democracies becoming ungovernable?

(the overload of the decision making system, bureaucratic weight and civic irresponsibility, the european dimension)

- social, economic and cultural causes.

(the increase of social interaction, the impact of economic growth, the collapse of traditional institutions, the upsetting of intellectual world, the mass media, inflation)

- the role and structure of political values.

(the values structure and the problem of rationality, core political beliefs, the impact of social- economic- and cultural changes on the principles of rationality and on the core political beleifs, traditional factors as a counterweight, the risk of social and political regression)

- european vulnerability.

- the viability and governability of american democracy.

- the expansion of governmental activity.

- the decline of governmental authority.

(the democratic challenge to authority, decline in public confidence and trust, the decay of the party system, the shifting balance between government and opposition)

- the democratic distemper - consequences.

- the democratic distemper - causes.

- conclusion- towards a democratic balance.

- japanese democracies governability.

(external conditions, domestic conditions and capabilities)

- changing values, new generations and their impact on the governability of japanese democracy.

(political beliefs, social and economic values)

- consequences for the future perspectives on the governability of japanese democracy.

(time lag, decline of leadership and delay of decisions, vagaries of urban educated nonpartisans, the place of the communists in the multiparty system, what will happen?)

- the changing context of democratic government.

- consensus without purpose : the rise of anomic democracy.

- the dysfunctions of democracy.

(the delegitimation of authority, the overloading of government, the disaggregation of interests, parochialism in international affairs)

- variations among regions.

पश्चिम युरोप, अमेरिका आणि जपान यांच्या लोकशाही व्यवस्थेच्या सद्यस्थितीचा हा अभ्यास आहे. या शीर्षकांवर एक नजर टाकली तरीही या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे समजून येते. आपल्या देशात होणारी लोकशाहीची आणि राजकीय व्यवस्थांची चर्चा याच्या तळाशी तरी पोहोचते का? राजकीय नेते, कार्यकर्ते यांना सोडून द्यावे लागेल. कारण त्यांना यासाठी वेळही नाही आणि त्यांना त्याची गरजही नाही. परंतु सामान्य माणूस, समाजाचे मानस घडवणारे आणि समाजाचे विचार घडवणारे- लेखक, विचारवंत, कलावंत, प्राध्यापक, पत्रकार यांचे चित्र काय आहे? मनमोहनसिंग मौनीबाबा, मोदी हिटलर, व्यवस्थेला लकवा, नोकरशाहीवर पकड नाही, हा हे म्हणाला अन तो ते म्हणाला; हेच करण्यात आपण धन्यता मानायची. बास. आपल्याला कळकळ आहे का? अन ती प्रामाणिक आहे का?

god save the nation.

- श्रीपाद कोठे

२८ जुलै २०१८

मंगळवार, २६ जुलै, २०२२

कम्युनिझम

कम्युनिझम म्हणजे काय? बरीच उत्तरं येतील. कोणी सूत्ररुपात सांगेल. कोणी प्रबंधरुपात. कोणी तात्त्विक तर कोणी व्यावहारिक. मी या क्षणी व्यावहारिक विचार करतो आहे. व्यावहारिक उत्तर असू शकतं - हिंसाचार, असहिष्णुता, साचेबद्धता. ही उत्तरं खरीच आहेत. पण पुन्हा प्रश्न येतो, असे का? त्यांना तसे शिकवले जाते, हे उत्तर येईल. परंतु ते काही उत्तर होऊ शकत नाही. का तसे शिकवतात, हा प्रश्न येईलच. त्याचं उत्तर आहे त्यांच्या मानण्यात. काय मानतात ते? त्यांची एक मान्यता ही आहे की; विचार, भावना, व्यवहार या सगळ्यातच साचेबद्धता असली पाहिजे. सगळ्या गोष्टींना सारखे मापदंड असले पाहिजे तरच माणूस सुखी होईल. त्यांची दुसरी मान्यता आहे की; हे मापदंड अधिकृत असले पाहिजेत. अधिकृतता सत्तेने येते. त्यामुळे सत्तेने शिक्कामोर्तब केले, सत्तेचे प्रमाणपत्र मिळाले की झाले. त्यानंतर तसे प्रत्यक्षात आणण्यासाठी सुक्तासूक्त प्रयत्न करणे. कारण सत्तेने शिक्का मारल्याने तेच योग्य, चांगलं, शाश्वत इत्यादी ठरते. पण खरंच असं असतं का? असू शकतं का? असावं का? यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे; खरंच असं नसतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे; असं असू शकत नाही. तिसऱ्या म्हणजे, असावं का, या प्रश्नाचं उत्तर आहे; सत्ता गाजवायची असल्यास असावं आणि जगाचं कल्याण हवं असल्यास नसावं.

वर्तमानाचा विचार करताना हा सगळा विचार मनात येतो. आज जेव्हा आम्ही म्हणतो की, सगळ्या संस्थांवर त्यांनी कब्जा करून ठेवला होता आणि आता तो दूर करायला हवा; तेव्हा आपण कम्युनिस्ट भाषाच बोलत असतो. भाषेला, इतिहासाला, उपचार पद्धतींना, व्यंजनांना, व्यक्तींना, स्थळांना, शिक्षणाला; अनेक गोष्टींना मान्यता मिळवण्याची धडपड जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कम्युनिस्ट पद्धतीनेच वागत असतो. संस्कृत, संगीत, तत्त्वज्ञान, आहार, भाषा, कला, ईश्वर, उपासना, कुटुंब व्यवस्था; अशा असंख्य गोष्टींना सत्तेची मान्यता वा प्रमाणपत्र नसतानाही त्या युगेयुगे चालत आहेत. का? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की; प्रचार, जाहिरातबाजी किंवा सत्तेची मान्यता आणि प्रमाणपत्रे यांनी गोष्टी टिकत नाहीत; स्वीकारल्या वा नाकारल्या जात नाहीत. त्या टिकतात किंवा स्वीकारल्या वा नाकारल्या जातात त्या त्यातील कसदार सत्वामुळे. उलट; प्रचार, जाहिरातबाजी वा सत्ता यांच्या आश्रयाने जगणाऱ्या गोष्टी अल्पायु असतात. आज आपल्याला सत्तेच्या मान्यतेचा मोह पडत असेल अथवा ती योग्य आणि आवश्यक वाटत असेल तर; आम्ही कम्युनिस्ट झालो आहोत, असा त्याचा अर्थ होईल.

शिक्षणाच्या बाबतीत, इतिहासाच्या बाबतीत, संगीताच्या बाबतीत; schools of thought का नसावेत? छोट्या मतप्रवाहाचे सुद्धा स्थान राहील. मोठ्याचेही स्थान राहील. जे पटेल ते लोक स्वीकारतील, त्याच्या मागे जातील, ते मान्य करतील. सगळ्यांच्या सगळ्या मान्यता सारख्याच असल्या पाहिजेत याचे काय प्रयोजन? अन मान्यता सारख्या करता तरी येऊ शकतात का? फार तर एखादी गोष्ट सत्तास्वीकृत म्हणता येऊ शकेल. म्हणून ती जनस्वीकृत होईल का? मग हा खटाटोपच कशाला? हा सगळा प्रकार गेल्या काही शतकातील सत्तासाम्राज्याच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. हे चूक आहे हे जगाला पटवून आणि दाखवून देण्याची वास्तविक गरज आहे.

मानवाला अत्यावश्यक अशा प्राणवायूचे वातावरणातील प्रमाण २१ टक्के आहे आणि नायट्रोजनचे प्रमाण ७८ टक्के. बाकीचे कार्बन, हायड्रोजन इत्यादी वायू एक टक्क्यात आटोपतात. तेच प्रमाण मानवी शरीरात कसे असते? प्राणवायू ६५ टक्के, हायड्रोजन १० टक्के, कार्बन १८ टक्के, नायट्रोजन तीन टक्के. ज्या मिठाअभावी एखादा खाद्यपदार्थ आपण तोंडातून बाहेर टाकू आणि बाजूला सारू त्यात मीठ किती असते? चिमूटभर. मग जीवनात, जगण्यात, समाजात, व्यवस्थेत कोणत्या गोष्टीचे प्रमाण किती? कोणत्या गोष्टीला मान्यता किती? कोणत्या गोष्टीचे समर्थक किती? याला किती महत्व असावे? प्रमाणपत्र, मान्यता, समर्थन या गोष्टी मनातून, डोक्यातून काढून टाकून; सार्थक, सकस, सत्वयुक्त जीवन जगण्याकडे; उभं करण्याकडे चित्त लावायला हवं. चुकीच्या गोष्टींना विरोध समजूनउमजून करायला हवा. प्रश्नांना योग्य उत्तरे द्यायला हवी. तू तू मी मी हा कोणत्याच गोष्टीवरचा उपाय नसतो.

- श्रीपाद कोठे

२७ जुलै २०१९

रविवार, २४ जुलै, २०२२

लघुदृष्टीचा रोग

पावसाने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवल्याने, सध्या पाणी या विषयाला जे attention दिले जात आहे; तेवढे दोन वर्षे आधी दिले असते तरीही, खूप झाले असते. दुर्दैवाने सामान्य माणूस, राज्यकर्ते, यंत्रणा, व्यवस्था, विचारक, मार्गदर्शक; सगळ्यांनाच 'आज आणि आत्ता'चा लघुदृष्टी रोग जडलेला आहे. अन कोणत्याही नेत्र तज्ञाकडे या रोगावर उपाय नाही. निसर्गाचे/ नियतीचे तडाखे... बस्स, हा एकच उपाय. स्वतःची अब्रू झाकायला टँकर बंद करायचे, पैसे देऊन सुद्धा टँकर मिळणार नाही म्हणायचे; अन पाणी व्यापाऱ्यांना नद्या काय वा अन्य जलसाठे काय विकत जायचे. विद्यमान व्यवस्था ढोंगी आणि बुझदिल झाली आहे. जे पाण्याच्या बाबतीत तेच बाकीच्या बाबतीतही. क्षणात ५०-६० किमीचा वेग पकडणारी वाहने रस्त्यावर लोटायची, नवीन रस्ते सुद्धा पुरणार नाहीत एवढ्या लांबी रुंदीच्या गाड्या रस्त्यावर ढकलायच्या, नाईट लाईफ सुखेनैव चालेल अशाच जीवन पद्धतीला प्रोत्साहन देऊन दारू पिऊन गाडी चालवल्यास अमुक होईल इत्यादी दमदाटी करायची; आणि ज्या हेल्मेटचा अपघाताशी अर्थार्थी संबंध नाही ते न घातल्याबद्दल लोकांना गुन्हेगार वा गुंड असल्यासारखे वागवायचे; ही देखील ढोंगबाजी आणि बुझदिली आहे. केवळ माझं/ आपलं यासाठी कोणत्याही गोष्टींचं कौतुक होऊ शकतं का? का व्हावं? तसं होऊ शकत नाही. आजचे सत्ताकारण, राजकारण; विचार, विवेक, तारतम्य यापासून कोसो दूर गेले आहे. सत्तेवर भाजप आहे की काँग्रेस की कम्युनिस्ट की आणखीन कोणी; याने काहीही फरक पडत नाही. सत्ताकारण आणि राजकारण यांचं चालचरित्र बदलावं लागेल. ते बदलायचं असेल तर प्रथम समाजाला, माणसांना प्रवाहपतित न होता, स्वतःची धमक निर्माण करावी लागेल. ही धमक साधनविहीन धमक असेल ज्याला सत्व म्हणतात. आहे का तयारी?

- श्रीपाद कोठे

२४ जुलै २०१९

सत्तेचे स्थैर्य

कर्नाटकमधील राजकीय नाट्याचे ना समर्थन करता येत ना आनंद. तांत्रिकता हेच जीवन झाल्यावर काय होते याचे हे उदाहरण आहे. कायद्यासहित अनेक गोष्टींचा कीस पाडण्यातच सगळी शक्ती खर्च करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात सगळेच धन्यता मानतात. मुळात सत्तेचा, राज्याचा हेतू काय? कोणाला याचा विचार करण्याची गरज वाटत नाही. 'प्रजानां विनयाधानात भरणात पोषणादपि... पितर: पितरस्तासां केवलं जन्महेतव:' (संस्कृत चुकलं असल्यास दुरुस्त करून द्यावं.) हा जर हेतू असेल तर एकदा सरकार सत्तारूढ झाले की, पाच वर्षे त्यात काहीही बदल होणार नाही; हे आम्ही का ठरवू शकत नाही. अनेक गोष्टी याने साध्य होतील -

१) सत्ता ग्रहण करणारा पाच वर्षांसाठी निर्भय होईल. सत्ता राहील की जाईल या भीतीपोटी जो अर्धाअधिक वेळ वाया जातो तो जाणार नाही.

२) कितीही पक्ष बदलले तरीही काही हाती लागणार नाही हे नक्की झाल्याने जो बाजार चालतो तो चालणार नाही.

३) पैसा, वेळ, ऊर्जा बचत होईल.

४) कामे न होण्यातील अडथळे आणि बहाणे संपतील.

५) सरकार अधिक उत्तरदायी होईल.

६) केंद्र-राज्य संबंधात जास्त विश्वास उत्पन्न होऊ शकेल.

यासाठी बहुमत, अल्पमत यांची तथाकथित तांत्रिकता बाजूला ठेवावी लागेल. हे आम्ही करू शकू का? आम्हाला लोकशाही दाखवायची आहे की जगायची आहे; यावर ते अवलंबून राहील.

- श्रीपाद कोठे

२४ जुलै २०१९

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

सभ्यतेचा कावेबाजपणा

पुन्हा एकदा इंग्रजी की मातृभाषा हा विषय चघळणे सुरु झाले आहे. आज NDTV 24 by 7 वर याविषयी चर्चा झाली. दिल्ली विद्यापीठात २० वर्षे इंग्रजी विषय शिकवलेल्या आणि दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या महिलांच्या `मानुषी' या मासिकाच्या संपादक मधु किश्वर यांनी आजची स्थिती, इंग्रजीचे माजवले जाणारे स्तोम, सर्व भारतीय भाषांची आवश्यकता आणि सगळ्या भारतीय भाषांच्या विकासाची गरज; असा व्यापक विषय मांडला.

महात्मा गांधीही स्वर्गात ज्यासाठी स्वत:च्या दुर्दैवाला दोष देत असतील असे त्यांचे नातू तुषार गांधी हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी हिरीरीने इंग्रजीचे गोडवे गायले. मधु किश्वर यांनी महात्मा गांधींच्या भाषाविषयक मताचा उल्लेख केला तेव्हा, त्यांना या वादात आणू नका, असा विद्वत्तेचा सल्ला या आधुनिक गांधीने दिला. खरे तर देव किती क्रूर थट्टा करतो हेच तुषार गांधी नेहमी दाखवून देत असतात. हे नावालाच गांधीजींचे नातू आहेत. कर्तृत्व तर शून्य आहेच, पण यांचा गांधीजींच्या विचारांशी काहीही संबंध नाही असेच म्हणावे लागेल. त्यांना ना गांधीजी समजले ना त्यांच्या विचारांशी त्यांची बांधिलकी! आपण महात्मा गांधींचे नातू आहोत म्हणजे, जगातील सारे ज्ञान, सारी समज आणि सारे शहाणपण यांचा ठेकाच आपल्याला दिला आहे असाच त्यांचा समज असावा.

तिसरे एक विद्वान होते, दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉ. प्रसाद. दलितांचा उद्धार, दलितांना न्याय, दलितांचे मानवतेचे जगणे म्हणजे; या देशाचे जे जे काही आहे ते ते तोडून फोडून त्याची राखरांगोळी करणे; असा विश्वास असणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. (या ठिकाणी दलित म्हणजे, त्यासोबत पिडीत, शोषित, वंचित, महिला, आदिवासी... वगैरे वगैरेही वाचावे.) हे डॉ. प्रसाद त्यांचेच प्रतिनिधी म्हणायला हवेत. हे अगदी हसत हसत जणू जगातील ब्रम्हसत्य गवसल्याच्या थाटात म्हणाले, `मी तर फार आधीपासूनच म्हणत आहे की, सगळ्या भारतीय भाषांचे एक संग्रहालय तयार करण्यात यावे. त्यात सगळ्या भाषांचे नमूने दाखवायला ठेवावेत आणि संपूर्ण भारताची भाषा इंग्रजी करावी.' यावर कपाळावर हात मारून घेण्याऐवजी काय करता येईल?

गंमत अशी की, आज दलित, पिडीत, शोषित, वंचित वगैरेची लेबले लावली की कोणाचेही तोंड बंद करता येते. नव्हे हे लेबल पाहिले की, तोंड उघडलेच जात नाही. अनेकांची अनेक कारणे असतील, पण परिणाम सारखाच. परंतु आता हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे की, हा प्रकार बंद व्हावा. वडाची साल पिंपळाला लावणे पुरे झाले. त्यातही एखाद्या विषयाला संघ वा संघ संबंधितांनी हात लावला असेल तर विचारायलाच नको. मधु किश्वर या काही संघाच्या नाहीत, ना भाजपच्या. स्वतंत्र विचार करणाऱ्या त्या विद्वान महिला आहेत. पण त्यांचे मुद्दे समजून घ्यायचेच नाहीत हा दुर्दैवी प्रकार आहे. जगभरातील विद्वान मातृभाषेबद्दल काय म्हणतात हे सगळ्या जगाला माहित आहे. तरीही ते ऐकण्याची मात्र आमची तयारी नाही.

या सगळ्या गोंधळातला मुख्य मुद्दा ही भाषा की ती भाषा हा नाहीच. तो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पहिला मुद्दा हा आहे की, आम्हाला विविधतेचे सहअस्तित्व मान्य आहे की नाही हा. आज भाषा, पैसा, महिला, उपभोगवाद, भांडवलशाही, विज्ञान, व्यक्तीस्वातंत्र्य, अशी वेगवेगळी नावे घेऊन अनेक वाद, चर्चा, विश्लेषणे, आग्रह अशा काही एकांगीपणे रेटले जातात की अन्य साऱ्या बाबींचे अस्तित्व शून्य होऊन जावे. भाषा म्हटले की बस, इंग्रजीच. दुसरी कोणतीही भाषा राहायलाच नको. जणू दुसरी भाषा बोलणाऱ्यासाठी हे जग नाहीच. पैसा हा विषय तर असा की सगळ्या गोष्टींचा संबंध पैसा कमावणे, बाळगणे आणि खर्च करणे याच्याशीच असतो. तुम्हाला अस्तित्व हवे असेल तर पैशाशिवाय ते तुम्हाला मिळणार नाही. महिलांची चर्चा पुरुषविहीन जगापाशी पोहोचते. विज्ञानाने तर अशी स्थिती आणली आहे की विचारूच नका. खूप सारे विश्लेषण तर जाऊच द्या, पण विज्ञान वगळता अन्य विषय शिकणे वा शिकवणे हास्यास्पद आणि बावळटपणा ठरतो. विज्ञानात आवड वा गती नसणे किंवा विज्ञानाला मर्यादा आहेत असे म्हणणे म्हणजे केवढा घोर अपराध. वर मागास, जुनाट वगैरे विशेषणे आहेतच.

आज नामशेष होणारे पशु, पक्षी, झाडे यांचे जतन करून जैव विविधता टिकवण्याचा आटापिटा केला जातो. मात्र अतिशय सूक्ष्मपणे मानवी जीवनातील अर्थपूर्ण आणि रसपूर्ण विविधतेचा गळा घोटण्यात आम्ही नकळत सहभागी होतो. त्याचे विचारशून्य समर्थनही करतो. आधुनिक म्हणवणाऱ्या या सभ्यतेचा हा कावेबाजपणा आपण कधी समजून घेणार?

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २३ जुलै २०१३

हेल्मेट अन रजनीकांत

हेल्मेट विवाद आणि रजनीकांत यांच्यात असलेला संबंध कोणाला दिसो न दिसो, मला दिसतो. काय आहे संबंध? उन्माद. हेल्मेट विवादाच्या मुळाशी काय आहे? बेजबाबदार वाहन चालवणे. हा किंवा कोणताही बेजबाबदारपणा येतो कशातून? उन्मादातून. रजनीकांत अन त्याचे चित्रपट उन्माद नाही तर काय पसरवित आहेत? पहाटे ३ वाजता कशाला हवा चित्रपट? का दिली जाते परवानगी? बिनडोकांची फौज लगेच तुटून पडेल ते तामिळनाडूत, आपल्या इथे नाही. पण उन्मादासारखी बाब संसर्गजन्य असते अन उन्माद तयार करण्याला कोणतीही गोष्ट पुरू शकते हे न कळणाऱ्या महाभागांकडे लक्ष देण्याची गरज नाही. असा युक्तिवाद करणारे सुद्धा अन्य कोणत्या तरी उन्मादाच्या आहारी गेलेलेच असतात. कदाचित स्वत:च्या तथाकथित यशाच्या सुद्धा. उन्माद काय कशाचाही असू शकतो. मूळ बाब आहे उन्माद जन्माला घालणाऱ्या बाबींना अटकाव करणे, नियंत्रित करणे. पण करणार कोण? ज्यांनी करायचे तेच राजकारणाच्या (राजकारणी- सत्तारूढ, विरोधक सगळेच), न्यायनिवाड्याची शक्ती मिळाल्याच्या (न्यायव्यवस्था), अन प्रसिद्धी अन त्यामुळे आलेल्या उथळपणाच्या (प्रसिद्धी माध्यमे) उन्मादात आकंठ बुडालेले आहेत. यातील राजकारणी अन प्रसिद्धी माध्यमे यांच्याबाबत मतभेद फार होणार नाहीत. पण न्यायव्यवस्थेबाबत आक्षेप असू शकतील. पण गमतीची बाब अशी की, न्यायव्यवस्थाच सध्या एका paradox मध्ये आहे. कशी? एकच मुद्दा पुरेसा ठरावा. कोणते ना कोणते न्यायालय कोणत्या ना कोणत्या कारणाने रोजच सरकार वा राजकीय पक्षांवर कठोर प्रहार करत असते. दुसरीकडे हीच न्यायव्यवस्था कायद्याच्या चौकटीत काम करीत असल्याचा दावा करते. हे कायदे कोण तयार करतात? संसद वा विधिमंडळे. म्हणजे जे राजकारणी कमी वकुबाचे, स्वार्थी, कमजोर, देशाची चिंता नसलेले आहेत असे स्पष्ट वा आडून म्हणायचे त्याच लोकांनी केलेल्या कायद्यांचा कीस पाडत न्यायदान करायचे...!!! बरे कायदा बदला असे म्हणण्याचेही स्वातंत्र्य नाही. तेही ठरवणार लोकप्रतिनिधी. या लोकप्रतिनिधींवर कोणीही काहीही टीका केली तर चालते मात्र त्यांनी केलेल्या कायद्यांच्या आधारे वाट्याला येणाऱ्या न्यायाबद्दल काही बोलले तर तो न्यायव्यवस्थेचा अवमान होतो. कशाचा कशाला काही ताळमेळ नाही. मग वाहतुकीपासून पर्यावरणापर्यंत, गुन्हेगारीपासून सामाजिक अस्वस्थतेपर्यंत अनेक गोष्टींना जन्म देणारा उन्माद वाढवणाऱ्या असंख्य गोष्टी चालूच राहतात, कायदे, अधिक कायदे, कडक कायदे, कठोर अंमलबजावणी, अन असे सारे सुरूच राहते.

- श्रीपाद कोठे

२३ जुलै २०१६

सोन्याच्या भावांचे गौडबंगाल

२०१५ मध्ये २५ हजार असलेला सोन्याचा भाव आता ५१ हजाराच्या पार पोहोचलेला आहे. चांदीनेही ६० हजारचा आकडा ओलांडला आहे. तेही कोरोनाने आर्थिक दुरवस्था असताना. सोन्याची आयात ९४ टक्के घटलेली आहे हे यातील एक कारण आहेच. पण एकमेव आणि खूप महत्वाचे नाही. कारण आयात गेल्या चार महिन्यात घटलेली आहे. भाव सातत्याने वाढत आहेत. घटलेली आयात आणि चढलेले भाव यांच्या परिणामी सामान्य माणूस सोने चांदीकडे जाणार नाहीच. उलट त्याच्यावर असलेले सोने चांदी विकण्याची वेळ येऊ शकते. कोणावर आलीही असेल. याचाच अर्थ काही विशिष्ट वर्गाकडे या धातूंचा साठा वाढणार. परिणामी आर्थिक दरी आणखी रुंदावणार.

कोरोना हे अशी दरी वाढवण्याचे कारस्थान कदाचित नसेलही पण कोरोनाच्या आडून असे कारस्थान सुरू नसेलच असे म्हणता येणार नाही. मदत आणि पॅकेज वगैरे आपल्या जागी ठीक आहे. पण सोने, चांदी, धान्य इत्यादींचे जे commodity market आहे ते बंद करणे गरजेचे आहे. कोणी त्याकडे लक्ष देईल का? सध्या तरी त्याचे काही चिन्ह नाही.

- श्रीपाद कोठे

२३ जुलै २०२०

बुधवार, २० जुलै, २०२२

हिंदुराष्ट्र

 - हे कोठेंचं घर आहे.

- हे कोठेंचे गुण आहेत.

या दोनमधला फरक काय? फरक हा की पहिल्या वाक्यात `हे कोठेंचं' हे मालकी या अर्थाने आहे; तर दुसऱ्या वाक्यात `हे कोठेंचे' हे लक्षण या अर्थाने आहे. कोठेंचं घर कोणाचंही होऊ शकत नाही. ते तेव्हाच होईल जेव्हा अन्य कोणी कोठे होईल अथवा कोठेंशी जुळवून घेईल, ताळमेळ बसवून घेईल. गुणांच्या बाबतीत मात्र त्यावर कोठेंची मालकी नाही. ते जगात कोणाचेही असू शकतात. कोणाचेही होऊ शकतात.

`भारत हे हिंदूराष्ट्र आहे' याचा या अंगाने विचार केला तर गोंधळ कमी होतो. वरील दोन्ही अर्थ या सिद्धांताला लागू होतात. मूलार्थाने `हिंदू' हे या राष्ट्राचं लक्षण आहे. अन या लक्षणाला अनुरूप विचार व्यवहार करणाऱ्यांचं हे राष्ट्र आहे.

- श्रीपाद कोठे

२१ जुलै २०१८

खेडेकरचा आगाऊपणा

मीडिया वॉच च्या वतीने जो कार्यक्रम गेल्या आठवड्यात नागपुरात झाला त्यावरील दोन लेख आजच्या दैनिक तरुण भारतमध्ये वाचले. एक डॉ. रामभाऊ तुपकरी यांचा आणि दुसरा श्री. विश्राम जामदार यांचा. त्यात एक उल्लेख असा आहे की, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री. मा. गो. वैद्य हे कार्यक्रमातून मधून निघून गेले आणि वक्त्यांपैकी एक असलेल्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी छद्मीपणे त्याचा उल्लेख करून `मखौल' उडवण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक तर आहेच, पण संघेतर व्यक्ती, विचारधारा आणि संस्थांनी गेली अनेक दशके ज्या पद्धतीचा खालच्या पातळीचा विचार व्यवहार केला त्याला हे साजेसेच आहे. श्री. मा. गो. वैद्य आज ९३ वर्षांचे आहेत. शिवाय आपण प्रकृतीच्या कारणाने पूर्ण वेळ थांबू शकणार नाही हेही त्यांनी कार्यक्रमात सांगितले होते. मुख्य म्हणजे त्यांची विद्वत्ता अर्जित करायला खेडेकरच्या एक लाख पिढ्यांचीही बुद्धिमत्ता कमीच पडेल. त्यामुळे जे जे बाबुरावांना ओळखतात किंवा त्यांच्याबद्दल जाणून आहेत त्यांना वाईट वाटले तरी नवल वाटण्याचे कारण नाही. दोन संस्कृतींचा आणि दोन सभ्यतांचा हा फरक आहे. त्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणाऱ्या अन्य विद्वानांची सभ्यता आणि संस्कृतीही यानिमित्ताने पुन्हा एकदा उघडी पडली.

- श्रीपाद कोठे

२१ जुलै २०१८

ब्राह्मण

कालच्या गोंधळात एका विषयावर मुद्दाम लिहिले नाही. परवा प्रसिद्ध लेखिका आशा बगे यांना एक मोठा पुरस्कार मिळाला. त्याची बातमी वृत्तपत्रात आली. त्यात दुसऱ्या प्रसिद्ध लेखिका प्रभा गणोरकर यांच्या भाषणाचाही उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, `आशा बगे यांनी ब्राह्मणी संस्कार त्यांच्या लेखनातून मांडले आहेत असे प्रभा गणोरकर म्हणाल्या.' मला प्रश्न पडला की, गणोरकर असे का बोलल्या असाव्यात? मुळात त्यांनी असे बोलावे का? संस्कार, सत्व, सभ्यता, रीतीरिवाज यांची चर्चा जातीची लेबल्स लावून करावी का? की त्या त्या गोष्टींचे जीवनमूल्य या अंगाने चर्चा व्हावी? गणोरकर यांनी ब्राम्हणीपणा यावर टीकाच केली असेल असे नाही. (कारण बातमीतून तेवढे स्पष्ट होत नाही.) पण त्यांनी तसे बोलणे (टीका किंवा समीक्षा किंवा समर्थन) हा आजच्या सामाजिक विचारप्रक्रियेचा परिणाम आहे. ब्राम्हण आणि त्यातून निर्माण होणारे सगळे शब्द हा गेली अनेक दशके टीका, टिंगलटवाळी आणि हीनत्वबोधाचा विषय झाला आहे. हेतूपुरस्सर करण्यात आला आहे. अगदी ज्याला भारतीय प्रबोधनाचा कालखंड आणि भारतीय प्रबोधन पर्व ज्याला म्हणता येईल त्याचाही यात वाटा आहे. त्या प्रबोधनाचीही तर्ककठोर विषरहित चिकित्सा आवश्यक आहे. ती करण्यासाठी लागणारी हिंमत आणि वातावरण आज नाही.

ब्राम्हणत्व हाच भारताचा आदर्श होता आणि आहे. असायलाही हवा. त्या आदर्शांमुळेच हजारो वर्षे टिकलेले राष्ट्रजीवन भारत उभे करू शकला. हा आदर्श भारताने पूर्ण गाठला होता का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. `ब्राम्हण' हे विशेषनाम लावणाऱ्या सगळ्यांना त्याचे आकलन झाले होते का? त्याचेही उत्तर `नाही' असेच आहे. `ब्राम्हण' हे विशेषनाम लावणाऱ्या सगळ्यांचा व्यवहार ब्राम्हणत्वाला साजेसा होता का? नाही. आज `ब्राम्हण' हे विशेषनाम लावणाऱ्या सगळ्यांना त्याचे आकलन झाले आहे का? त्यांचा तसा व्यवहार आहे का? याही प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. उलट भूतकालापेक्षा आजची स्थिती अधिक वाईट आहे. (त्याची कारणमीमांसा आणि विश्लेषण हा स्वतंत्र विषय आहे.) मात्र त्यामुळे `ब्राम्हणत्वाचा' आदर्श कमी प्रतीचा, हिणकस, त्याज्य ठरत नाही. जगभर माणसाच्या आदर्श स्वरूपाचा जो जो विचार झाला त्यातील `ब्राम्हणत्वाचा' आदर्श हा माझ्या मते सर्वोत्तम आहे. आणि ज्यांना तो सर्वोत्तम वाटत नाही त्यांनाही तो वरच्या दर्जाचा नक्कीच वाटेल असा आहे. गुणपूजक, गुणग्राही, शारीरच नव्हे तर मन बुद्धीच्या शुद्धतेचा साधक अशी त्याची काही लक्षणे सांगता येतील. `ब्राम्हण' जातीशी त्याचा संबंध आहेच असे नाही. नव्हे सगळ्याच गोष्टींचे अथवा संज्ञांचे होते तसेच येथेही झाले. या लक्षणांना धरून जगणारा तो ब्राम्हण याऐवजी ब्राम्हण म्हणजे या लक्षणांना धरून जगणारा असा अर्थ त्याला प्राप्त झाला. ही कालगती असते. पण सोने ते सोनेच. आजची जगाची स्थिती पाहून `लक्षणयुक्त ब्राम्हणत्व' हाच माणसाचा आदर्श असू नये असे कोण म्हणेल? पण त्यासाठी हीनत्वबोध, बचावात्मक पवित्रा, राजकारण सोडून देऊन; किंमत चुकवण्याची तयारी ठेवून वागण्या बोलण्याची इच्छा हवी. अन इच्छा काही आपल्या हाती नसते?

- श्रीपाद कोठे

२१ जुलै २०१८

मंगळवार, १९ जुलै, २०२२

उफराटेपणा

आरोग्यविषयक, कुटुंबविषयक, सामाजिक वा अन्य बरेच प्रश्न, समस्या या नवीन (पाश्चात्य) जीवनशैलीची देणगी आहे, असे मत अनेक तज्ञ, अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते, लेखक वगैरे व्यक्त करत असतात. अन त्यावर मात करण्यासाठी काय करावे याचीही चर्चा, मार्गदर्शन करत असतात. मनात प्रश्न येतो की, ज्या गोष्टीमुळे समस्या निर्माण होतात ती गोष्टच सोडून द्यायला, टाकून द्यायला कोणी का सांगत नाहीत? म्हणजे अमुक जीवनशैलीने समस्या निर्माण होतात हे कळले तरी; समस्या उत्पन्न करत राहा आणि मग त्यावर उपाय करा. मात्र समस्याच कमी होतील असे काही करण्याचा विचारही करू नका. धन्य आहे माणसा तुझी !!! वाट्टेल ते, वाट्टेल तसं, वाट्टेल तेवढं, वाट्टेल तेव्हा खा; इनो आणि कायम चूर्ण घ्या. तरीही आमचं कौतुकच करा, अन आम्हाला काही सांगू नका.

- श्रीपाद कोठे

२० जुलै २०२१५

भारताची उदारता

भारताची उदारता आणि त्याची विचार करण्याची पद्धत यांचा जेवढा विचार करावा तेवढे आपण स्तिमित होतो. आता हेच पहा ना, कोणाचा महिना अमावास्येला संपतो तर कोणाचा पौर्णिमेला. तरीही काही घोळ नाही, वाद नाही, संघर्ष नाही. धार्मिक, सामाजिक, राजकीय सगळ्याच विषयात प्रचंड उदारता आणि सुमेळ हे या देशाचे, इथल्या विचार परंपरेचे वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्ये आली कशातून? याची दोन कारणे सांगता येतील. एक म्हणजे, सगळ्या लौकिक बाबी ही साधने आहेत, साध्य नाहीत; याची सखोल जाण. अन दुसरे म्हणजे, एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतीत होऊ शकते या सत्याचे अपार भान. या दोन गोष्टींनी अनावश्यक कडवेपणा काढून टाकला. त्यामुळे जग समरूप करण्याची भारताला गरजही वाटली नाही आणि त्याने तो प्रयत्नही केला नाही. सगळ्या लौकिक साधनांचा उपयोग करून जीवनाची सरिता अप्रतिहत वाहते. ती तशी वाहू देणेच योग्य. ती सरिता अडवून तिचे डबके करू नये हीच भावना येथे राहिली. मात्र इस्लाम, ख्रिश्चन किंवा भारतेतर पंथ, लोकशाही, आधुनिक विज्ञान, बुद्धिवाद, समाजवाद, साम्यवाद यांनी जीवनाची चौकट निश्चित केली आणि त्या चौकटीत सारं जीवन कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यातून समरुपतेचा दुराग्रह आणि अनावश्यक कडवेपणा जन्माला आला. हा समरुपतेचा दुराग्रह आणि अनावश्यक कडवेपणा  यांना थोपवणे आणि आपल्या स्वभावात, वृत्तीत, DNA मध्ये तो येऊ न देणे; असे द्विविध आव्हान आज भारतासमोर आहे.

- श्रीपाद कोठे

२० जुलै २०२०

शुक्रवार, १५ जुलै, २०२२

वेदप्रताप वैदिक

पिछले दो दिनों से वेदप्रताप वैदिक का मामला गरमा रहा है. उसका जो होना है होगा. लेकिन जो कई मुद्दे उठे उस संदर्भ में पुरानी कुछ बातें याद आयी.

१) कांग्रेस के बड़े नेता थे वसंतरावजी साठे. वर्धा से सांसद थे. श्रीमती इंदिरा गांधी के मंत्रिमंडल में सुचना-प्रसारण मंत्री भी थे. वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक थे. वे स्वयं इस बात को नकारते नहीं थे. संघ के तृतीय सरसंघचालक बालासाहब देवरस के आयु के ८० वर्ष पूर्ण होने पर सहस्रचंद्रदर्शन का जो कार्यक्रम नागपुर के रेशिमबाग मैदान पर आयोजित किया गया था उसमे भी वे संमिलित हुए थे.

२) वर्तमान में महाराष्ट्र के एक बड़े ख्यातनाम संपादक है; जो कुख्यात जर्नैलसिंग भिन्द्रनवाले से मिले थे. जर्नैलसिंग भिन्द्रनवाले ये शख्स था जिसके कारण श्रीमती इंदिरा गांधी को अमृतसर के स्वर्णमंदिर में ऑपरेशन ब्ल्यू स्टार करना पड़ा था और बाद में उसीके कारण जान से हाथ धोना पड़ा था. ये संपादक आतंकवादी जर्नैलसिंग भिन्द्रनवाले से मिलने के बाद बड़े प्रभावित हुए थे. और वो कितने भावुक है, अपनी माँ के बारे में बोलते समय उनके कैसे आंसू निकल आये आदि बाते वे हमेशा बताते रहते है.

३) हजारों लोगों की जान लेनेवाले नक्सलियों का पक्ष लेनेवाले तो खुले आम चैनलों पर देखे जाते है.

४) यूपीए सरकारने कश्मीर के संबंध में जो अधिकृत समिति बनाई थी; जिसमे टाइम्स ऑफ़ इण्डिया के भूतपूर्व संपादक दिलीप पाडगावकर शामिल थे; उसने तो नई दिल्ली के विज्ञान भवन में खुलेआम, जाहिर तौर पर कश्मीर के स्वयंनिर्णय की बात की थी.

- श्रीपाद कोठे

१६ जुलै, २०१४

गुरुवार, १४ जुलै, २०२२

फक्त अर्थकारण

एका मित्राने त्याच्या भिंतीवर दै. सकाळमधील कुंभमेळ्याच्या अर्थकारणाची बातमी टाकली आहे. कित्येक कोटींची उलाढाल या मेळ्यात होणार अशी. माहिती चांगलीच आहे. अन हा मित्रही हिंदुत्व, धर्म वगैरेचा विरोधक नाही. मात्र कुंभमेळ्याचे हे विश्लेषण मर्यादित आणि सदोष वाटल्याने त्यावर प्रतिक्रिया दिली. तीच अन्य मित्रांसाठी, वाचकांसाठी-

हे विवेचन खरेच आहे. पण योग्य नाही. गेल्या शंभरेक वर्षात आपल्याला अनेक सवयी चुकीच्या लावण्यात आल्या. त्याने खूप खोलवर अयोग्य परिणाम केले आहेत. त्यावर सामाजिक मंथन होणे आवश्यक आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता आणि पुढे जाऊन उपयुक्तता म्हणजे त्यातून किती पैसा जमा होतो. महाकुंभाने पैसा गोळा होतही असेल. होवो. ती स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण पैसा समजा गोळा झाला नाही किंवा कमी गोळा झाला, तरीही त्याचे महत्व कमी होण्याचे कारण नाही. राष्ट्राची एकात्मता; भावनिक गुंफण, जपणूक; त्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक आशय, मुख्य म्हणजे पैसा मिळणे किंवा खर्च होणे हे कोट्यवधी लोकांनी काही काळ तरी मनातून बाजूला करणे; या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. पैसा महत्वाचा नक्कीच आहे अन त्याचा योग्य विचार व्हावाही, पण त्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करताना तो आलाच पाहिजे असे नाही. आता तर आईच्या कामाचेही पैशात मूल्यमापन करण्याचे फार काही वाटत नाही. हा चुकीचा प्रकार आहे. नुसत्या पैशाचा विचार करणाऱ्यांना उत्तर देण्याचीही खरे तर गरज नाही.

- श्रीपाद कोठे

१५ जुलै २०१५

श्रीमंत गरीब

जगातील ८० गर्भश्रीमंत millionaires for humanity नावाने एकत्र आले असून, आमच्याकडून अधिक कर वसूल करा, असे पत्र त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. एवढेच नाही तर, जगभरच्या आमच्या बंधूंनो कोरोनाला मुळीच घाबरू नका. आम्ही तुमच्यासाठी आहोत, असे आश्वासनही दिले आहे. ही एक चांगली घडामोड आहे. हे ८० लोक काय आणि किती करतील, करू शकतील किंवा त्यांचे त्यांचे देश त्यांच्यावर अतिरिक्त कर लादतील का? किती लादतील? हे हळूहळू स्पष्ट होईलच. पण यातून व्यक्त झालेली भावना नक्कीच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. अनेकांना ती अशा पुढाकारासाठी प्रेरित करेल. जगभरच्या सरकारांना या दिशेने विचार आणि कृती करण्यासाठी बळ देईल. त्याचे चांगले परिणाम होतील अशी आशा करू या.

या मानवीय कृतीतून अर्थकारणाची मूलभूत चर्चा सुरू होईल की नाही हे सांगणे कठीण आहे पण ती व्हावी असे वाटते. कालच पुन्हा एकदा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत असल्याचा एक ताजा अभ्यास पाहिला. हा विषय तसा जुना असला तरी तो सत्य आहे आणि अजून त्यावर समाधान सापडलेले नाही. त्यासाठी मूलभूत विचार गरजेचा आहे. काही बिंदू फक्त या दृष्टीने पुढे ठेवतो. आज गृहित धरून चाललेल्या आणि त्यांना ध्रुव सत्य मानून चाललेल्या मानवाने हे समजून घेणे आवश्यक वाटते.

- प्रत्येक काम पैसा निर्माण करू शकत नाही.

- पैसा निर्मिती करणारी सगळी कामे सारखा पैसा निर्माण करू शकत नाहीत.

- मेहनत करा, क्षमता आणि कौशल्य मिळवा आणि करा कमाई; हे ऐकायला फार महान वाटले तरी तसे होऊ शकत नाही, होत नाही.

- अधिकाधिक मिळवण्याची लालसा आणि त्यासाठीची चढाओढ यातून समन्यायी व्यवस्था, सगळ्यांना सन्मानजनक जीवन; साकारू शकत नाही.

- शहरे, कारखाने, व्यवसाय, प्रशासन; या सगळ्यांचे आकार आटोपशीर असायला हवेत.

- 'एकमेका साह्य करू' हा जीवनाचा मंत्र व्हायला हवा. त्यासाठी सुपंथाची प्रेरणा मानवी मनात जागवावी लागेल.

- not uncontrolled self but controlling the self. ही विचारांची दिशा असावी लागेल.

- मदत आणि सेवा यांच्या मर्यादा असून; जीवनाची घडी नव्याने बसवावी लागेल.

- श्रीपाद कोठे

बुधवार, १५ जुलै २०२०

मंगळवार, १२ जुलै, २०२२

सभ्यतेची मर्यादा ओलांडण्याची गरज

संजय लीला भन्साळीच्या प्रस्तावित चित्रपटाची चर्चा दोन दिवसांपासून सुरु झाली आहे. आज तर श्रेया घोषाल या गायिकेने त्याचे एक गाणे ध्वनिमुद्रित केल्याची व त्याचा आपल्याला आनंद झाल्याचे तिने म्हटल्याची बातमीही प्रसिद्ध झाली आहे. नेहमीप्रमाणे हा चित्रपट प्रसिद्धीचा कावा असू शकतो. नव्हे तसा तो आहेही. त्यावर समाजाने बहिष्कार घालावा असे आवाहनही सुरु झाले आहे. ते अतिशय योग्यच आहे. मात्र आता सभ्यतेची मर्यादा ओलांडण्याची वेळ आलेली आहे. `ठकासी आणावा ठक, उद्धटासी उद्धट' हेच या लौकिक जगातील अंतिम सत्य आहे. जग जेव्हा केव्हा संतांनी दुथडी भरून वाहील तेव्हाचे तेव्हा पाहता येईल. परंतु या पृथ्वीवर आज विद्यमान असलेल्या समस्त जिवंत प्राण्यांच्या अंतिम श्वासापर्यंत सुद्धा ते तसे होणे शक्य नसल्याने ठेमेठोक भूमिकेची अन व्यवहाराचीही गरज आहे.

काय आहे या प्रस्तावित चित्रपटात? तर चित्तोडची महाराणी पद्मिनी ही अल्लाउद्दीन खिलजी या आक्रमकाची प्रेयसी होती असे दाखवून त्यांच्याभोवती चित्रपट गुंफला जाणार आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पद्मिनी असे नाव नसून पद्मावती असे आहे. म्हणजे उद्या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचीही तयारी करून ठेवलेली दिसते आहे. हा सगळा अतिशय घाणेरडा अन आक्षेपार्ह प्रकार आहे. ज्या महाराणी पद्मिनीने आपले दर्शनही अल्लाउद्दीन खिलजीला होऊ नये अशी इच्छा केली होती. अन नंतर त्याच्या हाती लागू नये यासाठी जोहार केला त्या पद्मिनीलाच त्याची प्रेयसी दाखवण्यामागे कोणती तर्कबुद्धी अथवा कलादृष्टी आहे? एखाद्याच्या मनातील अचकटविचकट, विकृत तरंग म्हणजे सृजनशीलता असते का? `मूंह में आया बक दिया... ####### ### #### ####' याला जर कोणी सृजनशीलता अथवा कलादृष्टी म्हणत असेल तर त्यांना त्यांची जागा साम, दाम, दंड. भेद अशा सगळ्या प्रकारांनी; अन यानेही नाहीच साधले तर त्याहूनही वेगळ्या प्रकारांनी दाखवून द्यायलाच हवी.

जे कोणालाही आपल्या प्राणापलीकडे आपलं म्हणू शकत नाहीत, त्यांना देश- धर्म- राष्ट्र- स्वाभिमान- सत्व- यांच्यासाठी प्राणांची कुरवंडी करण्याची स्वप्नेही पडू शकत नाहीत. पण त्यांच्या पुढील हजारो जन्मांच्या कल्पनाविलासातही ज्या गोष्टी येऊ शकणार नाहीत; त्या प्रकारे जीवन जगून अथवा मरून या देशातील हजारो हजार स्त्री-पुरुषांनी हजारो वर्षे मानवाला वर उचलून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातूनच मानवतेची अन त्याही पल्याडच्या अलौकिकतेची अमाप जिवंत कैलास लेणी या जगाने पाहिली आहेत. महाराणी पद्मिनी त्यापैकीच एक आहेत. अन गेली अनेक शतके त्यांनी मानवी मनातील उर्जस्वलतेला खतपाणी घातले आहे. २४ तासातील एक क्षणही स्वार्थ सोडू नये अशीच धारणा असलेल्यांना अन स्वार्थाचे वन्ही चेतवून समाजाची घडी बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारांना अन व्यक्तींना महाराणी पद्मिनीचा जोहार कळूच शकत नाही. व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीची गुलामी इत्यादी खुळचट चर्चांचे रतीब घालीत आपले विकृत कंडू शमवून घेणाऱ्या या नाठाळांच्या माथी काठी हाणायलाच हवी. खूप झाले हे तमाशे. आधी भारत समजून घ्या. त्याचे महत्व, त्याची श्रेष्ठता, त्याचे उपकार, त्याचे फायदे, त्याची गरज हे नीट समजून घ्या अन मगच तोंड उघडा. त्यावर भाष्य करण्याचीही लायकी नसणाऱ्यांनी आपले उपद्व्याप थांबवायला हवेत.

संजय लीला भन्साळी आपल्या या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरु करणार असल्याचे वृत्त आहे. अनेक `समजूतदार शांततेचे पुजारी' त्यावर विचारतील- `अहो मग आताच एवढा थयथयाट कशासाठी? त्याला चित्रपट तयार करू द्या, त्यात काय आहे नाही पाहा, मग सेन्सॉर बोर्ड आहे, सरकार संस्कृतीरक्षक भाजपचेच आहे; नंतर मग काय ते पाहू.' असा विचार करणारे दुधखुळे आहेत अथवा आम्हास दुधखुळे समजतात एवढेच यावर म्हणता येईल. हे प्रकरण पुढे वाढण्याऐवजी सरकारने अन अन्य सुविचारी लोकांनी त्याची सुरुवातच होऊ नये यासाठी पुढाकार घ्यावा. नेहमी आग लागल्यावरच विझवायला हवी असे नाही. आग लागू शकते याचाही अंदाज घेता यायला हवा अन त्यानुसार उपाय करायला हवेत. हा प्रस्तावित चित्रपट सुरूच होणार नाही असा प्रयत्न झाल्यास मोठा गोंधळ माजवला जाईल हे निश्चित. पण त्याला घाबरण्याचे कारण नाही. साहित्यिकांच्या राजीनामा गोंधळाचे काय झाले ते दिसतेच आहे. अन समजा काही किंमत चुकवावी लागली तरीही हरकत नाही पण आता पसरली आहे त्यापेक्षा अधिक ही विकृत वाळवी पसरू न देण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १३ जुलै २०१६

कोरोना आणि वाहतूक

देशात मोठमोठी शहरे आहेत. त्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. किमान ऑटोरिक्षा आहेत. छोट्या छोट्या गावांच्या मार्गावर जीप चालतात. मात्र कोरोनामुळे ही व्यवस्था ठप्प आहे. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल कुठे काही चर्चा, माहिती मात्र पाहायला, वाचायला, ऐकायला मिळाली नाही. खाजगी वाहने आहेत त्यांना तेवढी समस्या नसणार पण ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत किंवा असून ती वापरण्याची स्थिती नाही त्यांच्या वाहतुकीचा, जाण्यायेण्याचा प्रश्न फार मोठा असू शकतो. वृद्ध, एकटे किंवा जोडीने राहणारे वृद्ध, आजारी लोक, अडीअडचणी, आवश्यक कामे यासाठी या करोडो लोकांनी जाणेयेणे कसे करायचे? छोट्या छोट्या गावात रात्री बेरात्री कोणाची तब्येत बिघडली तर तालुक्याला किंवा जवळच्या मोठ्या गावाला कसे नेणार? गावातील दोन चार ऑटोरिक्षा अशा वेळी कामी येत असतात. अशा घटना मला स्वतःला माहिती आहेत. शहरात सुद्धा अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे बँकेत किंवा नियमित वैद्यकीय तपासणी किंवा किराणा आदी आणण्यासाठी ऑटोरिक्षाचा वापर करत असतात. एखादा ओळखीतला, वस्तीतील ऑटोवाला ठरलेला असतो. त्याला फोन केला की तो येऊन विश्वासाने घेऊन जाणे, परत आणून पोहोचवणे, कामात मदत करणे, हात धरणे इत्यादी करतात. पण आता त्यांचीही पंचाईत झालेली आहे. शहर बस वाहतूकही बंद आहे. मुंबईबद्दल थोडीफार माहिती मिळते पण अन्यत्र काय स्थिती आहे? यावर उपाय काय? यातून मार्ग कसा? कारण जाणेयेणे ही एक मोठी गरज आहे आणि स्वतःचे वाहन नसणारे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. सगळ्या गोष्टींवर online हा उपाय असू शकत नाही. ही एक मोठी समस्या जरा दुर्लक्षित झाल्यासारखी वाटते.

- श्रीपाद कोठे

१३ जुलै २०२०

सोमवार, ११ जुलै, २०२२

पाक समाप्ती

७० वर्षांपूर्वी पाकिस्तान जन्माला घालण्यासाठी धडपड करणारे पाश्चात्य देश, आज पाकिस्तानला ठेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचेच पुढचे पाऊल पाकिस्तानची समाप्ती राहील. भस्मासुराची कथा आठवावी असा हा प्रवास आहे. दोनच गोष्टी वाटतात- १) पाकिस्तान जन्माला आले त्याचा भारताला उपयोग तर काहीच झाला नाही, उलट कायमची डोकेदुखी मागे लागली. पाकिस्तानची समाप्तीदेखील नवीन डोकेदुखीच्या रुपात मागे लागू नये. पाकिस्तानच्या भावी समाप्तीचे समाधान वा आनंद यात वावगे काही नसले तरीही, त्यात सहभागी असणाऱ्या आणि रुची घेणाऱ्या पाश्चात्य देशांना भारताबद्दल प्रेम नाही. याचा विसर पडणे धोकादायक ठरू शकते. २) अशाच प्रकारच्या घडामोडीतून माणूस सभ्य, सुसंस्कृत, विकसित होत आला आहे. त्याच्या जाणीवा, त्याचे विचार समृद्ध होत आले आहेत. जीवनाची मूल्ये रुजत आलेली आहेत. नवीन जागतिक राजकीय घडामोडी, नवीन मानवीय आणि मानवी राजकीय संस्कृती आणि व्यवस्था यांच्याकडे घेऊन जाणाऱ्या ठरोत.

- श्रीपाद कोठे

१२ जुलै २०१७

रविवार, १० जुलै, २०२२

आमूल परिवर्तनाची बीजं

आत्ताच `सीएनबीसी आवाज' वाहिनीवर रोहिणी निलेकणी यांची मुलाखत पाहिली. रोहिणी निलेकणी या इन्फोसिसचे माजी संचालक नंदन निलेकणी यांच्या पत्नी. कॉंग्रेसने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नंदन निलेकणी यांना घोषित केले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत:चे घर सावरणेच काँग्रेसला जमत नाही तर निलेकणी यांच्याकडे कुठले लक्ष देणार. त्यामुळे निलेकणी काँग्रेस सोडणार अशीही बातमी आहे. आपल्या `आधार कार्ड'चे जनक हेच नंदन निलेकणी. परंतु रोहिणी निलेकणी या मुलाखतीत जे काही बोलल्या त्याचा या राजकारणाशी संबंध न जोडलेलाच बरा. रोहिणी निलेकणी anthropology च्या क्षेत्रासह बऱ्याच क्षेत्रात काम करतात. सामाजिक सेवेच्या अनेक संस्था त्या चालवतात.

या मुलाखतीत त्यांच्या बोलण्यात काही महत्वाच्या बाबी आल्या.

१) पैसा अमाप असला तरीही तो कसा वापरायचा हे महत्वाचे.

२) पैशाची निर्मिती ही समाजातूनच होत असते. हा पैसा पुन्हा समाजात जायला आणि पसरायला हवा.

३) सुरुवातीला पैशाचे केंद्रीकरण होईल आणि नंतर तो समाजातील सगळ्यांपर्यंत पोहोचेल, हा भांडवलशाहीचा सिद्धांत खोटा ठरला असून; भांडवलशाही देशातच त्यावर मंथन सुरु आहे.

४) यासाठी आवश्यक ती संस्थात्मक पुनर्रचना आणि नियम आदी नव्याने करायला हवेतच. मात्र त्याहून आधी पैसा, संपत्ती याकडे पाहण्याची दृष्टी तयार व्हायला हवी.

५) धनवान लोकांनी अधिक दानशूर व्हायला हवे.

६) संपत्तीच्या योग्य नियोजनासाठी समाजाचा दबावही तयार व्हायला हवा.

थोडक्यात म्हणजे अर्थकारण खूप झाले, आता अर्थनीतीचा विचार आवश्यक आहे. हे खूप म्हणजे खूपच महत्वाचे आहे. `सीएनबीसी आवाज' सारख्या वाहिनीवर ही चर्चा होते आणि भारतातील अति उच्चभ्रू वर्गातील एक कर्तबगार महिला हे विचार व्यक्त करते ही गोष्ट फार मोलाची आणि महत्वाची आहे. विचारी लोक कोणत्या दिशेने विचार करीत आहेत, काळाचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो आहे, अन भविष्यकाळ काय असू शकेल; याचे आडाखे यावरून नक्कीच बांधता येतील. संपूर्ण जगाच्या आमूल परिवर्तनाची ही बीजं आहेत.

रोहिणी निलेकणी यांनी व्यक्त केलेले विचार `हिंदुत्व' याच सदरात मोडतात, हे मुद्दाम नमूद करणे गरजेचे वाटते. याचा विस्तार योग्य वेळी करेन, पण हे हिंदुत्वच आहे. ज्यांना माझ्या म्हणण्याचा आशय समजून घ्यायचा असेल त्यांनी `hindu economics' by do. m.g. bokare, तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे अर्थविचार, स्वामी विवेकानंद, गोळवलकर गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी आदींचे अर्थविचार पाहावेत.

या मुलाखती दरम्यान देण्यात आलेल्या माहितीवरून लक्षात आलं की, भारतातील अझीम प्रेमजी, मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल आणि अशा अन्य लोकांनी सुमारे १ लाख कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दिले आहेत. त्यातील ५३ हजार कोटीहून अधिक निधी एकट्या अझीम प्रेमजी यांनी दिला आहे. मुकेश अंबानी यांचा वाटा मात्र फार कमी आहे.

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०१५

अभिषेकला उत्तर

माझ्या कालच्या पोस्टवर Abhishek Khandalkar ने प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याचे मुद्दे समजावून द्यावेत असंही म्हटलं आहे. परंतु दुपारपासून प्रयत्न करूनही माझी प्रतिक्रिया तिथे पोस्ट होत नाही. कारण कोणास ठाऊक. काही तांत्रिक बाब असेल. त्यामुळे अभिषेकच्या प्रतिक्रियेवरील माझे मत इथे स्वतंत्रपणे पोस्ट करतो आहे...

- आनंदवनभुवन आज तरी आहे का? तुझा प्रश्न बरोबर आहे. पण दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे शिवाजींचेही आनंदवनभुवन नव्हतेच. ती फक्त सुरुवात होती आणि तो प्रयत्न अल्पायु ठरला. ते आनंदवनभुवन होते असं म्हटलं तरी त्याची व्याप्ती केवढी होती? त्यात विदर्भ, मराठवाडा सुद्धा नव्हते. आज त्या मानाने आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत. व्याप्ती खूप मोठी आहे. मुख्य म्हणजे अनागोंदी नाही. आनंदवनभुवन होईल तेव्हा होईल पण आज एका स्थिर सुव्यवस्थेत आपण आहोत.

- मी वचनं सांगायला आक्षेप घेतलेलाच नाही. ते सांगताना काळ, परिस्थिती यांचा विवेक असावा आणि तात्कालिक, चिरकालीक हे तारतम्य हवे इतकंच.

- गुरू गोविंद सिंह अवतार नाही मानले जात. अवतार नानकदेव आहेत.

- समर्थ शस्त्र बाळगीत. पुन्हा तोच मुद्दा की अनागोंदीचा काळ होता. आज आपण मोदींनी शस्त्र हाती घ्यावे असं म्हणणार नाही. व्यवस्था आहे ती पाहील. दुसरे म्हणजे शस्त्रत्याग करावा असं मी म्हटलेलं नाही. उलट पूर्ण शस्त्रत्यागाची वेळ आलेली नाही असाच पोस्टचा आशय आहे. या ठिकाणीच हे स्पष्ट होतं की, पोस्ट वाचतानाही आपले अभिनिवेश कायम असतात. नेमकं हेच, आक्रमकतेसंबंधी सर्वसामान्य माणसाची जी अधिरता आणि ओढ असते ती कमी होत जायला हवी. शस्त्र अपरिहार्य म्हणून वापरणे हा वेगळा भाग आणि त्याबद्दल काही ऐकताना किंवा वाचताना नीट आशय समजून घेऊ न शकण्याची अधिरता वेगळी.

- संतांचे सगळे देव शस्त्रधारी आहेत हे बरोबर नाही. विठ्ठलाच्या हाती काहीही नाही. तो तर मोठा उपास्य आहे. समर्थांनी त्यालाही प्रश्न केला होता. पण परिस्थिती हेच त्याचे कारण. अन्यथा देव म्हणजे काय याचे समर्थांनी दासबोधात केलेले विवेचन वेगळे कसे राहिले असते.

- देव ही संकल्पना काळाबरोबर विकसित होत आलेली आहे. त्यात बदल होत आलेले आहेत. पुढेही होतील. असे बदल झाले नाहीत आणि जुन्यालाच चिकटून राहिलं तर त्यातूनच इस्लामसारखी कट्टरता जन्माला येते आणि जगाला त्रासदायक ठरते.

- संघर्ष अपरिहार्य आहे हे मान्य केले तरी, संघर्ष म्हणजे शस्त्र वा आक्रमकता असे होत नाही. संघर्ष खूप प्रकारे केला जातो. बायको बोलत नाही तेव्हा तोही संघर्ष असतोच. कोरोना हेही ताजे उदाहरण.

- त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, मानवी जीवनातली सुष्टता वाढायला हवी की नाही. मानवी समस्यांवरचा उपाय मानवी सुष्टता वाढणे हाच असू शकतो. दुष्टतेचा सामना अपरिहार्य असला तरी त्याने मानवाची उन्नती होत नाही. माणसाची आध्यात्मिकता जसजशी वाढेल तसं मानवी व्यवहाराचं स्वरूप बदलेल. अन या बदलाचे संकेतच मिळत आहेत.

- तुझ्या पोस्टमध्ये नसलेला पण, ज्याला between the lines म्हणतात असा एक मुद्दा.  भक्तीची यमुना ज्ञानाच्या भागिरथीला मिळायला हवी. आणि त्यात मिसळून जायला हवी. जसे सरबतात साखर आपले रूप सोडते तसे भक्तीने विलीन व्हावे ज्ञानात. ज्ञानाने भक्तीचा गोडवा स्वीकारून पुढे जावे. केवळ भक्ती ही नेहमीच लंगडी आणि अपुरी असते. ती कितीही छान वाटली तरी केवळ भक्ती नुकसान करते. त्याला ज्ञानाचे अस्तर हवे. त्याने आपली भक्ती, उपास्य, अगदी गुरू यांची सुद्धा चिकित्सा करणे शक्य होते. जी आवश्यक असते. या सगळ्यातला गाभा, आशय, चिरंतन तत्व हे तेव्हाच लक्षात येते. दासबोध सुद्धा हेच सांगतो. त्याचा व्यासंग जसजसा वाढत जातो हे सारे आकलन होत जाते. दुसरे म्हणजे अपूर्णता. कितीही मोठी व्यक्ती, कितीही उदात्त विचार असला तरी तो अपूर्ण राहतो. अगदी ईश्वराचा अवतार सुद्धा अपूर्णच. कारण ईश्वर एखाद्या माध्यमातून व्यक्त होतो तेव्हा ते माध्यम आणि उरलेलं विश्व असं आकाराला येतं. ईश्वर माध्यमात बांधला जातो आणि अपूर्ण होतो. म्हणूनच गीतेने भक्तांच्या लक्षणात निर्मम हेही सांगितले आहे. तसं निर्मम होता यायला हवं.

- शेवटला मुद्दा : या विश्वातील काहीही आधी होतं तसंच राहत नाही. देव, धर्म, माणूस, समाज... अगदी काहीही. अन हे तुमच्या आमच्या इच्छेवर अवलंबून नसतं. तो या सृष्टीचा गुण आहे. त्यामुळे जुन्या सगळ्याच गोष्टींकडे आशयाचे नीट आकलन करूनच पाहिले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०२०

शनिवार, ९ जुलै, २०२२

गुन्हेगारी

बलात्कार, खून, मारामाऱ्या, जात वा धर्मावरून वाद- भांडणे- संघर्ष-, भ्रष्टाचार, सर्व प्रकारचा अनाचार, सर्व प्रकारची गुन्हेगारी; या सगळ्याचे एकूण समाजाच्या तुलनेत प्रमाण किती? त्या मानाने सर्व प्रकारच्या भलेपणाचे प्रमाण किती? आजही शंभर कोटीहून अधिक लोक रात्री शांतपणे झोपू शकतात ना? मग असे का होते की, एक जरी गुन्हा घडला तरीही संपूर्ण समाज वाईट ठरवला जातो आणि एखादी चांगली कृती ही व्यक्तिगत कृती ठरते. चांगली गोष्ट पाहिली, ऐकली की सहज विचार करतो आपण- `हं, तो माणूस चांगला आहे. त्या संस्थेने चांगले काम केले.' मात्र तेच एखादी चुकीची गोष्ट पाहिली, ऐकली की सहज विचार करतो- `कुठे चाललाय समाज? कसं होईल समाजाचं?' काय असेल ही मानसिकता? याचा शोध घेण्याची, तपास करण्याची, यावर विचार आणि चिंतन करण्याची गरज नाही का? हे अगदी खरे की, एखादी सुद्धा चुकीची गोष्ट होऊ नये. पण त्या विषयात जायचे तर पूर्ण तत्वज्ञानाचा ग्रंथ होईल. व्यावहारिक मर्यादेत विचार केला तर असे म्हणावे लागेल की, मानवी अस्तित्वाच्या इतिहासात कधीही असा क्षण नव्हता आणि असणार नाही की जेव्हा काही चुकीचे घडले नाही वा घडणार नाही. अर्थात त्याबद्दल चिंता, दु:ख, वेदना असायलाच हवी आणि तसे होणार नाही याचा सर्व प्रकारचा प्रयत्नही करायला हवा. पण जेव्हा चांगले पाहण्याची, समजण्याची आणि उचलून धरण्याची आमची तयारी नसते; एवढेच नव्हे तर चांगले म्हणजे व्यक्तिगत आणि वाईट म्हणजे समाज वाईट अशी वृत्ती विकसित होते; तेव्हा ते नक्कीच सुदृढ मानसिकतेचे लक्षण म्हणता येणार नाही. असे तर नाही की आमची समाज म्हणूनच आंतरिक ओढ ज्याला अयोग्य वा चुकीचे म्हटले जाते त्याकडे आहे आणि आम्ही जबरदस्तीने चांगले आहोत? छगन भुजबळांच्या बातम्या पाहताना - `काश... आपल्याला हे जमले असते...' असे वाटणारेच अधिक आहेत का? तसे असेल तर- चांगले म्हणजे व्यक्तिगत, वाईट म्हणजे समाज वाईट- हे ठीक आहे. पण भुजबळांची असूया वाटणारे खूप कमी आहेत असे मला व्यक्तिश: वाटते.कदाचित भाबडेपणा असावा. पण मग चांगले आणि वाईट दोन्हीही व्यक्तिगत किंवा दोन्हीही सामाजिक का नाही? कुठेतरी काहीतरी चुकते आहे एवढे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

१० जुलै २०१५

राष्ट्रगीत आणि रवींद्रनाथ

राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंग यांनी राष्ट्रगीतातील `अधिनायक' या शब्दाबद्दल त्यांचे मत जाहीरपणे मांडले. त्यांनी मांडलेल्या मुद्याचे काय होईल ते काळ सांगेलच. पण त्यावरून संघ, हिंदुत्व वगैरेवर तोंडसुख घेणाऱ्यांसाठी काही माहिती. संघ स्थापनेच्या कितीतरी आधीचा हा वाद आहे. त्यावेळच्या नामांकित वृत्तपत्रांनी काय म्हटले होते, वाद वाढल्यानंतर स्वत: टागोरांनी त्यांची काय भूमिका मांडली होती; हे पाहणे ठीक राहील. मुख्य म्हणजे टागोरांची भूमिका पाहिल्यानंतर- या वादासाठी संघ, हिंदुत्व यांना जबाबदार धरणारे आणि या वादाच्या निमित्ताने टागोरांविषयी वेगळी भावना बाळगणारे हिंदुत्वाचे समर्थक - या दोघांनाही फेरविचार करावा लागेल. `टागोर आणि हिंदुत्व' याचाही वेगळा विचार करावा लागेल.

संबंधित माहिती-

"The proceedings began with the singing by Rabindranath Tagore of a song specially composed by him in honour of the Emperor."

– The Englishman, December 28, 1911)


"The Bengali poet Rabindranath Tagore sang a song composed by him specially to welcome the Emperor."

– The Statesman, December 28, 1911)


"When the proceedings of the Indian National Congress began on Wednesday 27th December 1911, a Bengali song in welcome of the Emperor was sung. A resolution welcoming the Emperor and Empress was also adopted unanimously."

– The Indian, Dec. 29, 1911)

"The annual session of Congress began by singing a song composed by the great Bengali poet Ravindranath Tagore. Then a resolution expressing loyalty to King George V was passed. A song paying a heartfelt homage to King George V was then sung by a group of boys and girls."

– The Bengalee, December 28, 1911)


"The proceedings of the Congress party session started with a prayer in Bengali to praise God (song of benediction). This was followed by a resolution expressing loyalty to King George V. Then another song was sung welcoming King George V."

– The Amrita Bazar Patrika, December 28,1911)

While the Indian National Congress discussed the status of Vande Mataram, Tagore himself wrote about the genesis of the controversy about the Jana Gana Mana in a letter on November 10, 1937 to Pulin Bihari Sen, which is included in Ravindrajivani, Prabhatkumar Mukherjee's biography of Tagore:

"A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."


This should have settled the controversy, but because it continued to swirl around, Tagore was irked enough to write on March 13, 1939:

"I should only insult myself if I cared to answer those who consider me capable of such unbounded stupidity as to sing in praise of George the Fourth or George the Fifth as the Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind."


Indeed, anyone who reads the full five stanzas of the poem – in original Bengali or in its translation – and not just the first stanza that was adopted, and is sung, as the national anthem, would be able to see the absurdity of the charge, for the poem, if anything, clearly mocks the idea of a mortal king being the"Bharata bhagyaa vidhaataa" deciding the fate of the country. In fact, the fifth and concluding stanza of the poem includes a ringing exhortation: "Nidrito Bharato Jaagey" (Sleeping India awakens), a phrase that eventually finds itself invoked even in Nehru's famous Freedom at Midnight speech.

- श्रीपाद कोठे

१० जुलै २०१५

मूलभूत विचार हवा

विचार करताना केवळ शब्द लक्षात घेऊन चालत नाही. आज हे पुन्हा नोंदवण्याचे निमित्त उत्तर प्रदेशातील घटना आहेत. अनेक ठिकाणी 'ठकासी आणावा महाठक' वाचायला मिळाले. समर्थांचे हे वचन अनेकदा सांगितले जाते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, संपूर्ण अनागोंदीच्या काळात त्यांनी हा उपदेश केला होता. 'आनंदवनभुवनात' हेच करावं का? समर्थांनी त्याबद्दल काही सांगितलेलं नाही. प्रश्न हा आहे की, व्यवस्था आणि व्यवस्था विहिनता यांचा सारखाच विचार नाही करता येत. चाणक्याने परिश्रमपूर्वक उभे केलेल्या साम्राज्यापेक्षाही १९४७ पासून आजपर्यंतचा कालावधी मोठा आहे. ज्ञात इतिहासात एखाद्या व्यवस्थेत संपूर्ण भारत नांदण्याची ही घटना लक्षणीय आहे. यातील जीवनाची सूत्र पुन्हा व्यवस्थित मांडण्याची गरज आहे. केवळ काही वचने सांगून चालणार नाही.

याचा अर्थ हा नाही की, या व्यवस्थेत त्रुटी नाहीत. याचा अर्थ हाही नाही की; लोकांना, समाजाला काही सोसावे लागत नाही. कसाब सारख्यावर १०० कोटी रुपये खर्च करण्याचे समर्थन होऊच शकत नाही. मुद्दाम दुबेचे उदाहरण न घेता कसाबचे घेतले कारण तटस्थपणे विचार करता यावा. त्यामुळे या व्यवस्थेत सुधारणेला भरपूर वाव आहेच. पण सोबत हाही विचार करावा लागेल की, या व्यवस्थेत सुधारणांची शक्यता किती आहे? व्यवस्थेचे जुने होणे आणि त्याची मूळ रचना या दोन गोष्टींसाठी सुधारणेच्या शक्यतेचा विचार करावा लागतो.

सहजच गांधी आठवतात. त्यांच्यावर टीका जरूर करावी पण किती जण त्यांचे 'हिंद स्वराज' समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या व्यवस्थेवर, त्याच्या मूलतत्वांवर त्यांनी जे प्रहार केले ते समजून घेण्याची तयारी किती असते? त्यांनी शस्त्रांना विरोध केला यावरून तर टीका करता येते पण त्यांनी वापरलेल्या शस्त्रांचा विचार किती केला जातो?

माणसाच्या जैविक क्रमविकासाचा विचार तर आपण करतो पण त्याहून सूक्ष्म अशा मनोबौद्धिक क्रमविकासाचा विचार केला जात नाही. त्या अंगाने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. त्या दृष्टीने पाहिले तर काय दिसते? आपल्याला आवडो की न आवडो काळाने गांधीजींच्या गळ्यात माळ घातली. पण केवळ गांधीजी हे उदाहरण आहे का? तर तसे नाही. योगी अरविंद यांनी क्रांती सोडून योगाचा हात धरला. डॉ. हेडगेवार यांनी क्रांती सोडून संघाची स्थापना केली. काळाने दोघांच्याही गळ्यात माळ घातली. एवढेच नाही तर सावरकरांचे क्रांतिकारी आणि क्रांती सोडून दिलेले अशी दोन रूपे आहेत. या बदलात केवळ इंग्रजी सत्तेने लावलेली बंधने एवढेच होते की काही वेगळे realization होते? आपल्याला आवडणाऱ्याच पद्धतीने विचार का करावा? हा काळाचा आणि नियतीचा विकासक्रम आहे. भगवान बुद्धपासून ज्या ज्या लोकांना ईश्वरावतार म्हणून मान्यता प्राप्त झाली त्या कोणाच्याही हाती शस्त्र नाहीत. या सगळ्याचा अतिशय खोलवर विचार करायला हवा. हे केवळ भारतापुरते नाही तर जगात युद्धासाठी बाह्या सरसावणारे वारंवार शांत होत आहेत हे जग पाहतं आहे. हे संकेत आहेत. याचा अर्थ शौर्य, शस्त्र, आक्रमकपणा हे सगळं लगेच सोडावं असं नाही. हा एक transition period आहे. याचा उपयोग जगभरच्या मानव समाजाला अधिक खोल आणि समजूतदार विचारांकडे नेण्याचा प्रयत्न व्हायला हवा एवढाच याचा अर्थ.

व्यवहारात याचा अर्थ होईल; राजकारण, प्रशासन, पैसा आणि गुंडगिरी यांचे संबंध कसे तोडता येतील; ही अभद्र युती कशी संपवता येईल. या दिशेने अधिक विचार आणि कृती व्हावी. शौर्याच्या प्रवाहात प्रवाहपतित होऊ नये एवढेच.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १० जुलै २०२०

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

फक्त राजकारण

काही लोक असे असतात की, त्यांचे केवळ चष्मे उतरवून तर उपयोग नसतो; पण त्यांचे डोळे काढून घेतले तरीही त्यांना फक्त आणि फक्त राजकारणच राजकारण दिसतं. सतत तू-तू, मी-मी, सतत टीका टोमणे, भांडता कसं येईल, कोणाला कसं ओरबाडता येईल, गांभीर्याचा अभाव; यातच यांचे मेंदू मश्गुल. रस्त्याने सरळ चालणाऱ्या माणसाला विनाकारण धक्का मारण्याची सडकी मनोवृत्ती असणारे हे लोक असतात. आणि मनाने तर इतके महाप्रचंड सडलेले असतात की, जगातले सगळे लोक आपल्यासारखेच आहेत असा त्यांचा विश्वास असतो. असं केल्यावर आपण किती महान कार्य केलं असाही ग्रह ते सतत बाळगतात. बरं त्यांना वारंवार सांगून सवरून देखील काही उपयोग नसतो. यांना शत्रुत्व देखील उमदेपणाने करता येत नाही. काही व्यक्ती असतात, जे म्हणतात की- `ठीक आहे आपले येथे जमत नाही. आपण येथे थांबू.' किंवा ते तर्कपुर्ण किंवा तसे नसलेले पण ठाम आणि अर्थपूर्ण बोलतात, वागतात. पण या लोकांना हा उमदेपणा सुद्धा जमत नाही. अशाच दोन गलीच्छ व्यक्तींनी आजची तिन्हीसांज घाण केली. त्यांना मारवा समजू शकत नाही, त्यांना पुरिया धनाश्री समजू शकत नाही, त्यांना गोरख कल्याण समजू शकत नाही, त्यांना श्रीरामरक्षा समजू शकत नाही, त्यांना प्रार्थना समजू शकत नाही, त्यांना कविता समजू शकत नाही, त्यांना संध्याकाळ समजू शकत नाही, त्यांना माणूस समजू शकत नाही, त्यांना जीवन समजू शकत नाही. हे लोक म्हणजे मानवी जीवनातून निर्माण होणारी विष्ठा असतात फक्त. असो.

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१८

संविधानाचे तत्त्वज्ञान समजावणारे पुस्तक

मुंबईच्या `साप्ताहिक विवेक’चे माजी संपादक श्री. रमेश पतंगे हे एक सव्यसाची विचारवंत म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. रा. स्व. संघाशी वैचारिक जवळीक सांगणाऱ्या `साप्ताहिक विवेक’चे संपादक म्हणून त्यांची भारतभरातही वेगळी ओळख आहे. `आपले मौलिक संविधान’ हे त्यांचे भारतीय संविधानाच्या संदर्भातील दुसरे पुस्तक नुकतेच २०१९ च्या एप्रिल महिन्यात प्रकाशित झाले आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजावून सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. श्री. पतंगे यांच्याच शब्दात सांगायचे तर, या पुस्तकाला लिहिलेल्या मनोगतात ते लिहितात - `संविधान म्हणजे केवळ कायदा नव्हे किंवा संविधान म्हणजे या कायद्यावर दिलेले न्यायिक निवाडे नव्हेत. या सर्वांना पार करून जाणारी संविधान ही संकल्पना आहे.’ श्री पतंगे यांनी या पुस्तकाच्या १३ प्रकरणातून हीच संकल्पना स्पष्ट करण्याचा मूलगामी प्रयत्न केलेला आहे. संविधानाकडे पाहण्याची आणि ते समजून घेण्याची वेगळी नजर हे पुस्तक वाचकाला देते हे निश्चित.

`शासनव्यवस्था आणि राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे आणि चालली पाहिजे हे सूत्रबद्ध रीतीने सांगणे हे संविधानाचे काम असते. हे कार्य त्या त्या देशाचा इतिहास, संस्कृती, विचारपरंपरा, मूल्यपरंपरा यांच्या आधारे होत असते. तसे झाले तरच ते टिकाऊ ठरते. परंतु संविधानाचे पुस्तक वाचले तर यातील काहीही फारसे कळत नाही. त्यातील कलमे, पोटकलमे, तरतुदी, भाषा हे सारेच अनाकलनीय असेच वाटते. त्यामुळेच संविधान हा विषय कायदेतज्ञ, वकील, न्यायाधीश यांचाच विषय राहतो. मात्र तो सामान्य माणसाचा विषय असायला हवा. त्याशिवाय सामान्य माणसाला त्याबद्दल आत्मीयता, आदर, बांधिलकी वाटणार नाही. संविधान आणि सामान्य माणूस यांच्यातील ही दरी दूर करण्याचा प्रयत्न हे पुस्तक यशस्वीपणे करते. अमेरिकेच्या संविधानाची मौलिकता `लिबर्टी’ या संकल्पनेत आहे, इंग्लंडच्या संविधानाची मौलिकता `संवैधानिक राजेशाही आणि मौलिक अधिकार आणि कायद्याचे राज्य’ यात आहे; तसेच भारतीय संविधानाची मौलिकता `सामाजिक आशयात’ आहे’, असे श्री पतंगे यांचे मत आहे. याच अंगाने त्यांनी हे पुस्तक लिहिल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.

सर्वसमावेशकता हा जसा भारताचा गुण आहे तसाच तो भारताने स्वीकारलेल्या संविधानाचाही आहे. विविध जाती, पंथ, भाषा, लिंग, प्रांत, वर्ग हे भेद बाजूस सारून आपल्या संविधानाने सगळ्यांना भारतीय म्हणून कसे सामावून घेतले आहे याचे विस्तृत विवेचन या पुस्तकात आहे. ही समावेशकता साध्य करण्यासाठी असलेली कलमे, त्यांची अंमलबजावणी करताना घ्यावयाची काळजी, संविधानातील शब्दांचा भाव, सामाजिक वातावरण अशा विविध अंगांचा विचारही मांडण्यात आलेला आहे. केवळ शब्दार्थ घेऊन समाज वा राज्य चालू शकत नाही. त्या शब्दामागील भाव आणि हेतू हेदेखील महत्वाचे असतात. याची चर्चा करताना संविधानाने स्वीकारलेल्या `समता’ या तत्वाची चर्चा श्री. पतंगे यांनी केली आहे. समता म्हणजे `सब घोडे बारा टक्के’ नाही हे स्वच्छ शब्दात सांगून; समाजातील विषमता दूर करून सगळ्यांना आर्थिक, सामाजिक समतेचा अनुभव प्राप्त करून देणे हा त्याचा आशय आहे हे ते स्पष्ट करतात. त्या दृष्टीने राज्याने कुठे स्वतंत्र तरतूद करायची, आरक्षण, या वेगळ्या तरतुदींच्या बाबतीत घटनाकारांचे मत; आणि हे करतानाच समतेच्या तत्वाचा गळा घोटला जाऊ नये यासाठी घालण्यात आलेल्या मर्यादा; अशा अनेक गोष्टींची या अनुषंगाने चर्चा करण्यात आली आहे.

सर्वसमावेशकते प्रमाणेच भारताच्या हजारो वर्षांच्या वाटचालीत विकसित झालेले सत्व संविधानात कसे प्रतिबिंबित झाले आहे याची चर्चाही श्री. रमेश पतंगे यांनी केलेली आहे. भारतीय संविधान ही विविध देशांच्या संविधानातील थोडे थोडे घेऊन बनवलेले एक कडबोळे आहे. तसेच भारत १९४७ साली जन्माला आलेला देश नसून त्याला हजारो वर्षांचा भूतकाळ आहे. त्याचे स्वत:चे चिंतन आहे. ते चिंतन या संविधानात नाही. त्यामुळे हे संविधान अभारतीय आहे; असा आक्षेप घेणारेही लोक होते आणि आहेत. लेखक हे आरोप फेटाळून लावतात आणि भारतीय आत्म्याचे प्रतिबिंब आपल्या संविधानात कसे पडले आहे याची मांडणी करतात. संविधानात भारतीय चिंतनाची अभिव्यक्ती कशी झालेली आहे हे समजून घेण्यासाठी, संविधान सभेतील चर्चा मुळातून वाचायला हवी. त्याशिवाय ते लक्षात घेणार नाही, असा श्री. पतंगे यांचा अभिप्राय आहे. वानगीदाखल श्रीकृष्ण सिन्हा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, आर. के. सिधवा आदी घटना समितीच्या सदस्यांची मतेही लेखकाने नमूद केलेली आहेत. उपासना स्वातंत्र्य, राष्ट्रध्वज, अस्पृश्यतेला मूठमाती, सगळ्यांनी विचारविनिमय करून निर्णय घेणे; अशा सगळ्या बाबींचा निर्देश या संदर्भात करण्यात आलेला आहे. भारतीय शास्त्रे, दर्शने, महापुरुष यांचे आणि त्यांच्या विचारांचे उल्लेख संविधान सभेतील चर्चेत होत असत याकडेही श्री. पतंगे यांनी लक्ष वेधले आहे. भारतीय सिद्धांत आणि वर्तमान व्यवहार यांची सांगड संविधानाने घेतली आहे असे प्रतिपादन लेखकाने केलेले आहे.

संविधानाच्या उद्देशिकेवर (preamble) या पुस्तकात सर्वाधिक चर्चा आहे. त्यावर चार प्रकरणे आहेत. यात संविधानाची उद्देशिका म्हणजे काय, तिचे महत्व, तिचा विकास, त्यातील गर्भितार्थ; यांचा विचार मांडण्यात आला आहे. त्यासोबतच भारतीय संविधानाची उद्देशिका, तसेच, अमेरिका, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्या उद्देशिकांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि चिकित्सा श्री. पतंगे यांनी केलेली आहे. शिवाय इंग्लंडची लिखित राज्यघटना नाही, तरीही तेथे लोकशाही राज्यव्यवस्था शेकडो वर्षे कशी चालते आहे याचीही तौलनिक चर्चा केलेली आहे. संविधानाची उद्देशिका ही संविधानाचा भाग आहे वा नाही आणि त्यावर न्यायालयाचे काय मत आहे, यावरही पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्देशिका किती महत्वाची असते यासाठी श्री. पतंगे यांनी `केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य’ या खटल्याची चर्चा केली आहे. या खटल्याच्या निकालपत्रातील परिच्छेद ९२ ते परिच्छेद १२४, असे ३३ परिच्छेद उद्देशिकेवर आहेत असे ते नमूद करतात. ही उद्देशिका समजून घेणे संविधान समजून घेण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. विदेशी घटनाकारांनी, घटनातज्ञांनी मांडलेली मते, केलेला विचार यांचेही संदर्भ पुस्तकात आहेत. अमेरिका, फ्रांस, रशिया येथील गृहयुद्धे, जीवितहानी, त्यांच्या संविधानाचा विकास, त्यातील छोटेमोठे तपशील, त्यांचे संदर्भ आणि अर्थ; यांची या लिखाणात रेलचेल आहे. हा सगळाच वाचकासाठी बौद्धिक खुराक आहे.

संविधानाची मौलिकता, कायद्याचे राज्य या विषयांचीही चर्चा श्री. रमेश पतंगे यांनी केलेली आहे. संविधानाच्या या चर्चेत `सार्वभौम’ कोण? याचीही चर्चा लेखकाने केली आहे. भारतीय संविधानाने विधिपालिका, कार्यपालिका, न्यायपालिका यांना सारखा दर्जा आणि अधिकार दिलेले आहेत; पण सार्वभौमत्व दिलेले नाही. जनता सार्वभौम आहे; असे तर्कशुद्ध प्रतिपादन श्री. पतंगे यांनी या पुस्तकात केले आहे. संविधानाच्या विविध कलमांचा, तरतुदींचा विकास होत असतो. काळ, समाज, परिस्थिती बदलत असते. त्याला अनुसरून संविधानाचा अर्थ करावा लागतो. संविधानाचा अर्थ लावण्याचा विकास कसा होत जातो हे समजावून सांगण्यासाठी `केशवानंद भारती’ आणि `मनेका गांधी पासपोर्ट खटला’ या दोन खटल्यांची चर्चा केली आहे. मुलभूत अधिकार आणि संविधानाने दिलेले अधिकार, संविधानाची मूळ चौकट, सामान्य नीतिमत्ता आणि संविधानीय नीतिमत्ता, prospective overruline, due process of law and process established by law, अशा विविध संकल्पनाही श्री. पतंगे यांनी वेळोवेळी उलगडून सांगितल्या आहेत. वाचकाच्या संविधान साक्षरतेत त्याने मोलाची भर घातली जाते.

राष्ट्र आणि राज्य या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. राज्य हे अनेक लक्षणांनी युक्त प्रत्यक्ष भौतिक अस्तित्व असलेलं एक यंत्र आहे, तर राष्ट्र ही जीवमान असली तरीही एक भावना आहे. या दोहोंचे स्वरूप, शक्ती, मर्यादा, परस्पर संबंध हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या कार्यकक्षा आणि परीघ हेदेखील वेगळे आहेत. जगभर त्यावर मंथन होत असते. या राष्ट्र आणि राज्य संकल्पनांना एक करणारे आपले संविधान असून त्याने संविधानीय राष्ट्रवाद आपल्याला दिला आहे; अशी मांडणी श्री. पतंगे यांनी या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात केली आहे.

संविधान आणि त्या संदर्भातील विषयांचा अभ्यास करण्यासाठी अथवा तो विषय समजून घेण्यासाठी मदत करू शकतील अशा ११ पुस्तकांची माहिती पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे. त्या त्या पुस्तकवरील लेखकाचे अभिमतही सोबत आहे. पुस्तकातील लेखांमध्येही ठायीठायी पुष्कळ पुस्तकांचे दाखले आणि उल्लेख आहेत. परिशिष्टात भारत, अमेरिका, फ्रांस, आयर्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांच्या संविधानातील उद्देशिका दिल्या आहेत. जिज्ञासूंना हे सगळे उपयुक्त ठरेल. विविध विषयांचे तपशील आणि संदर्भ वाचकाला संपन्न करणारे आहेत. भारतीय संविधानाबद्दल देखील अनेक माहितीपूर्ण आणि रंजक गोष्टी पुस्तकात आलेल्या आहेत. संविधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान म्हणजे आरक्षण, संविधान म्हणजे किचकटपणा, संविधान म्हणजे वकील- अभ्यासक- न्यायव्यवस्था, संविधान म्हणजे कलमे आणि क्लिष्टता; ही समीकरणे दूर करणारे हे पुस्तक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संविधान निर्माणातील योगदान हा लक्षणीय पैलू श्री. पतंगे यांनी मांडला आहे. अनेक गैरसमज दूर करणारे, माहिती आणि दृष्टी देणारे, संविधानीय साक्षरता वाढवणारे आणि संविधानाच्या तत्वज्ञानाचा विचार उलगडणारे हे पुस्तक आहे. यातून अनेक मुद्दे, विविध विषय पुढे येऊ शकतात. श्री. पतंगे यांनी मांडलेल्या विषयांच्या अन्य बाजू पुढे येऊ शकतात. नव्हे असे मुद्दे आणि विषय पुढे यायलाही हवेत. त्यावर साधकबाधक चर्चा, खंडनमंडन व्हायलाही हवे. त्यानेच भारतीय संविधान सर्वजनाय होईल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

*********************************

पुस्तकाचे नाव- आपले मौलिक संविधान

लेखक- रमेश पतंगे

प्रकाशक- हिंदुस्थान प्रकाशन संस्था

पृष्ठे- १६७

किंमत- २५० रुपये

राजेशाही

आम्ही प्रचंड conditioned असतो. उदा. लोकशाही. कोणी याबद्दल बोलायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्याकडे असं पाहिलं जातं की; हा किती वाईट, हा किती मागासलेला, हा किती दुष्ट. पण आमची विचार करण्याची तयारी नसते. जिथे लोकशाही नावाची ही व्यवस्था प्रथम विकसित झाली तिथे राजे फारसे चांगले, आश्वासक नव्हते. आमच्या देशात (भारतात) ही स्थिती नव्हती. रामापासून तर अगदी अलीकडच्या शिवाजी महाराज, शाहू महाराज, गायकवाड महाराज, अहिल्यादेवी होळकर किंवा थोडे त्यापूर्वीचे; विक्रमादित्य, अशोक, हरिहर बुक्कराय; किंवा स्वामी विवेकानंद यांना अनेक प्रकारे साहाय्य करणारे राजे वा संस्थानिक; किंवा छोट्या छोट्या राजांनी केलेल्या कामांचे मिळणारे ऐतिहासिक पुरावे; या सगळ्यातून लक्षात येते की, राजे सुद्धा चांगले होते. याचा अर्थ हा नक्कीच नाही की, लोकशाही सोडून राजेशाही स्वीकारावी. तसे तर अगदी कम्युनिस्ट वा हुकूमशाही पद्धतीत सुद्धा काही तरी चांगले असू शकते दाखवायला. चीन हे अलीकडचं उदाहरण. सारांश एवढाच की, कोणत्याही व्यवस्थेबद्दल अवास्तव ममत्व न बाळगता, गुणदोषांची, अनुभवांची, क्षमतांची आणि मर्यादांची मोकळी चर्चा करायला हवी आणि त्यात बदलाची/ सुधारणेची तयारी ठेवायला हवी.

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०२०

गुरुवार, ७ जुलै, २०२२

अर्थचिंतन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांच्या संदर्भात काही मते काल व्यक्त केली. अधिक उत्पादनाने साखरेचे भाव सावरणे कठीण होईल असाही एक मुद्दा होता. मंत्री, नेता, राजकारणी म्हणून आणि वर्तमान व्यवहार म्हणून, ते ठीकच आहे. पण ज्यांना पुढचा विचार करायचा आहे, समाजाचं भविष्य हा ज्यांचा विषय आहे, ज्यांना statesman म्हणून विचार करायचा आहे; त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, वाढत्या किंमतीचे अर्थशास्त्र मानवाच्या कल्याणाचे नाही. विपुलता आणि उतरत्या किंमतीचे अर्थशास्त्र सगळ्यांच्या हिताचे असू शकते. भारताच्या आर्थिक विकासाचा विचार करताना नेहमी जागतिक मंदीचा मुद्दा मांडला जातो. दोहोंची तुलना मांडली जाते. परंतु एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतं की जागतिक मरगळ दूर का होत नाही? त्याचे कारण आहे, जी दिशा वैश्विक अर्थकारणाने घेतली आहे तीच चुकीची आहे. आपली अंतर्गत बाजारपेठ, आपल्या गरजा आणि आपली उशिरा झालेली सुरुवात; यामुळे दोन-तीन दशके फार समस्या येणार नाहीत; पण त्यानंतर सगळे कठीण होईल. अन दोन-तीन दशके हा फार मोठा काळ होत नाही. चार दशकांहून अधिक काळ झालेली आणीबाणी सुद्धा आपल्याला जुनी वाटत नाही. त्यामुळे वर्तमान, तात्कालिक आणि दूरचा, सातत्यपूर्ण यांचा दुवा कसा सांधायचा यावरही मंथन होणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

८ जुलै २०१९

स्वदेशी

चीनच्या उत्पादनांचा बहिष्कार आणि स्वदेशी हे दोन विषय सध्या सुरू आहेत. त्याचा परिणाम म्हणा वा अन्य काही पण हे दोन्ही विषय एकच आहेत असा समज बरेचदा होतो. मात्र ते वेगळे आहेत. वास्तविक केवळ चीनच नव्हे तर अन्य कोणत्याही देशाची उत्पादने, सेवा, कच्चा माल जेवढा देशात येईल तेवढा देशाचा पैसा बाहेर जाईल. देशाचा पैसा देशात राहावा यासाठी एकूणच आयात आणि आयातीचा वापर कमी होत जायला हवा. तेव्हाच आत्मनिर्भर देश प्रत्यक्षात येईल. चीनच्या मालाचा बहिष्कार या विषयात आत्मनिर्भर देश यासोबत त्याचे भारताशी शत्रुत्व हाही मुद्दा आहे. त्यामुळे चीनच्या मालाचा बहिष्कार आणि आत्मनिर्भर भारत या दोन्ही गोष्टींचं आकलन हवं.

स्वदेशी हा आणखीन वेगळा आणि या दोन्हीहून मोठा विषय आहे. उदा. पतंजलीचा व्यवसाय वाढणे हा आत्मनिर्भरतेचा भाग असू शकतो पण ते स्वदेशी म्हणता येणार नाही. पतंजली देशांतर्गत आहे, त्याचा पैसा देशातच राहील, ते देशाचे शत्रू नाही; हे सगळे खरे आहे पण स्वदेशी नाही. स्वदेशी म्हणजे - पतंजलीची जी जी उत्पादने किमान जिल्हा पातळीवर तयार होऊ शकतात ती स्वतंत्रपणे त्या त्या ठिकाणी तयार होणे. एका महाकाय पतंजली ऐवजी छोट्या छोट्या अनेक पतंजली उभ्या होणे, चालणे म्हणजे स्वदेशी. अरबो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायाऐवजी, लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे हजारो व्यवसाय म्हणजे स्वदेशी. कारण स्वदेशी ही केवळ आर्थिक वा प्रादेशिक कल्पना नाही तर या दोन्हींना कवेत घेणारा त्याहून व्यापक असा तो भावप्रवाह आहे.

स्वदेशी म्हणजे आर्थिक साम्राज्यवाद नाकारणे, थोपवणे. स्वदेशी म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार. स्वदेशी म्हणजे व्यक्तिगत वा व्यावसायिक आर्थिक आकांक्षांना लगाम. स्वदेशी म्हणजे अर्थमानवाचे; अर्थपूर्ण (सहृदयी, समाधानी, सुखी) मानवात रूपांतरण.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ८ जुलै २०२०

बुधवार, ६ जुलै, २०२२

स्वातंत्र्य लढ्याचा वाद

स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणे न घेणे याचा वाद हा मूर्खपणा आहे. स्वातंत्र्य लढ्याचे किंवा कोणत्याही कामाचे असे वर्गीकरण हा नीचपणा आहे. कोणत्याही चांगल्या कामाची आपली प्रेरणा काय असते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेट्टी यांचं विधान चूक आहेच पण या नीचपणाची सुरुवात काँग्रेसने केली आहे. संघ सहभागी होता नव्हता ही चर्चा काँग्रेसनेच सुरू केली. अन त्यांना उत्तरे देणाऱ्यांचीही चूक आहे. काँग्रेसने फक्त काँग्रेससाठी लढा दिला होता का? हा प्रश्न विचारला जायला हवा. जो पिकवेल तो खाईल, जो कमवेल तोच खर्च करेल, ज्याने लढा दिला त्याचंच स्वातंत्र्य; ही सगळी गाढव विचारसरणी आहे. त्या तर्कटांना उत्तरे देण्यापेक्षा त्याच्या मुळाशी असलेली वृत्ती किती क्षुद्र आहे हे मांडण्याची अन समजून घेण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

७ जुलै २०१८

दुष्काळा, तुझे स्वागत असो...

दुष्काळा, कालपर्यंत मलाही राग येत होता तुझा. तू लवकरात लवकर निघून जावं असं वाटत होतं. पण आज मला पटलंय की तू येणं आवश्यक आहे. ये दुष्काळा ये, मी तुझं स्वागत करतो. तुझा खरा कावा मला कळला आहे. तुला शिकवायचं आहे या कृतघ्न माणसाला. बऱ्या बोलानं, गोडीगुलाबीनं, सांगून सवरून शिकायची त्याला सवयच नाही. असे प्रयत्न कोणी कधी करतच नाहीत, केलेलेच नाहीत असे नाही. पण उंहू, हुं नाही की चुं नाही. माणूस नावाचा हा माजलेला रेडा नाहीच शिकत. त्याला जेव्हा दणके बसतात, रट्टे बसतात, फाके पडतात तेव्हा तो थोडंफार शिकला तर शिकतो. त्यातूनही १०० टक्के माणूस १०० टक्के समजूतदार वगैरे होईल हा भ्रम तुलाही नाहीच. पण अगदीच रुळावरून उतरला की त्याला परत रुळावर आणायला कशी सणसणीत लाथ घालायची हे तुला पक्कं आणि चांगलं ठाऊक आहे.

तेव्हा तू येच. तुझ्या पूर्ण लवाजम्यासह, पूर्ण शक्तीने, पूर्ण वैभवाने ये. माणूस विसरून गेला आहे की आपणही या निसर्गाचाच एक भाग आहोत. तो स्वत:ला निसर्गाच्या वर मानू लागला आहे आणि म्हणूनच त्याने आपले असे नियम आणि मूल्य तयार केले आहेत. आपल्याजवळचं सगळं काही देऊन टाकणं हा निसर्गाचा गुण. त्याबदल्यात काहीही न मागणे हेही तेवढेच महत्वाचे. माणसाने मात्र लुबाडण्याचा, हडपण्याचा, साठवण्याचा असे गुण विकसित केले आहेत. खरं तर त्याच्यासारखा भिकारी कोणी नाही. सगळं काही हा निसर्ग दोन्ही हातांनी भरभरून देतो म्हणून त्याची मिजास. मात्र त्याची कदर करावी, आदर करावा, सगळ्यांनी मिळून मिसळून वाटून घ्यावं या गोष्टी त्याने केव्हाच धाब्यावर बसवल्या आहेत.

एवढेच नाही तर या सवयींमुळे आपणच गोत्यात येऊ याचंही त्याला भान राहिलेलं नाही. तुझा सखा तो पाऊस काय कमी पाणी देतो? पण ते साठवावं म्हणजे सगळ्यांना पुरेल, अडीअडचणीला कामी पडेल हे समजून घ्यायला त्याची तयारीच नाही. म्हणजे त्याला अडचणी येऊ शकतात पण तुम्हा लोकांना अडचणी यायलाच नको, असा त्याचा उद्दाम माजोरा आग्रह. पाऊस जे पाणी देतो ते मुरण्यासाठी मातीच हवी, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये ते मुरूच शकत नाही हे त्याला माहीत नाही, कळत नाही असं नाही. तरीही लाथा बसल्याशिवाय तो तसं वागणार मात्र नाही. जितकं पाणी तो पितो त्याच्या १० पट पाणी तो शौचालय आणि स्नानगृहात वाया घालवतो. केवळ त्याच्या सवयींमुळे. या दोन्ही गोष्टी जीवनाचा आवश्यक भाग आहेत. त्याला पाणीही लागणारच. पण ते वापरताना फ्लश आणि शॉवर यांची काय गरज? बाकी पद्धतीही आहेत ना? पण तसं केलं तर त्याची शान कमी होईल ना? त्याची ही खोटी शान धुळीत मिळवायला हवी. त्यावर आता दुसरा इलाजच नाही. त्याचा हा नखरा मोडून काढायला तू ये.

त्याला ठाऊक आहे की पाणी जपून वापरलं, शेतीभाती नीट जपली तरच तो विकास बिकास करू शकेल. कारण शेवटी पोटाला दोन वेळ लागतं रे. या हरामखोर माणसाने कितीही गमजा केल्या ना विकास अन फिकासाच्या पण पोटाची खळगी भरायला मात्र पर्याय नाही शोधून काढू शकत तो. पोटात कावळे कोकलायला लागले की उतरते सगळी मिजास. पण कळलं तरी तसं वागेल तो माणूस कुठला? अजूनही त्याला वाटतं की पाकीटभर नोटा पिल्या की आपली तहान भागेल. आणि आम्ही शहरी लोक तर काय, विचारूच नको. नुसता उन्माद चढला आहे उन्माद. सगळं जग, सगळा निसर्ग आमचे नोकर आहेत अशा तोऱ्यात वागतो आम्ही. खरं सांगायचं तर रक्तपिपासू आहोत रक्तपिपासू. याची ही मिजास, हा दिमाख, ही तकलादू प्रतिष्ठा धुळीस मिळवायला ये. हा नाहीच शिकणार त्याशिवाय. तो जर आपली शिकण्याची पद्धत बदलत नाही तर तू तरी का बदलावीस तुझी शिकवण्याची पद्धत?

मरतील १०-२० कोटी लोक, मरू दे. त्याला पर्याय नाही. पण या अवलक्षणी माणसाचा दंभ, दर्प आणि माज उतरवल्याशिवाय राहू नको. मला विचारतील माझ्या जातीचे दीडदमडीचे छटाकभर लोक, अरे बाबा त्या १०-२० कोटीत तुझा नंबर लागणार नाही कशावरून? तुझाही नंबर लागू शकेल. त्यांना देईन मी उत्तर. तुलाही सांगून ठेवतो ते, म्हणजे माझा निर्णय करताना तुलाही संभ्रम व्हायला नको. खुशाल मारून टाक  मला. तसंही मृत्युचं भय नाही वाटलं कधीच. कधीच वाटणारही नाही. आणि चार-दोन लोकांना जर तुझ्या हा फटक्याने उपरती होणार असेल तर त्यासाठी मरण्यातही मजा आहे. मला त्याची चिंता नाही. फक्त तुला हात जोडून विनंती आहे. दुष्काळा तू ये, पूर्ण लवाजम्यासह, पूर्ण ताकदीने ये. मी वाट पाहतोय तुझी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

७ जुलै २०१४

सोमवार, ४ जुलै, २०२२

shut up mr. Arnab

just SHUT UP mr. arnab goswami. u can shout at mr. sudhanshu triwedi and ask him in ur typically shrill irritating voice whether he is a custodian of Hindu Dharm? but keep in mind that u r not the custodian of BHARAT. i know that u haven't seen bharat as much as i saw it. still u pose to be a sole custodian of BHARAT. stop this nonsense and shut up.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०१४

हाहा आणि हाहाहा

मी फेसबुक वापरू लागलो तेव्हा माझे नाव आणि जन्मतारीख याशिवाय अन्य कोणतीही माहिती प्रोफाईलमध्ये भरली नव्हती. त्याकडे कधी पाहतही नव्हतो. आज अचानक कसे लक्ष गेले कोणास ठाऊक? पण माझी माहिती पाहिली आणि चक्करच आली. माझी मलाच माहिती नव्हती अशा तीन गोष्टींची माहिती मला झाली. १) माझे मूळ गाव पाटणबोरी हे आहे. २) मी वर्धा येथे शिक्षण घेतले आहे. ३) मी लोकमतला काम केले आहे. यातील एकही गोष्ट खरी नाही, मला लागू होत नाही आणि मी प्रोफाईलमध्ये भरलेली नाही. ही गंमत सगळ्यांना कळावी आणि असे प्रकार होऊ शकतात हे कळावे, म्हणून दोन दिवस मी ते तसेच राहू देणार आहे. नंतर माझी माहिती भरेन. परंतु सगळ्यांनी सतत जागरूक आणि सतर्क राहावे, तसेच मर्यादित माहितीची देवाणघेवाण करावी, हाच या प्रकारचा इशारा समजायला हरकत नाही.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०१४

सत्ता

- पूर्वी एका राजाचा लहरीपणा चालायचा. लोकशाहीत राजांची संख्या अमाप झाली.

- पूर्वी सत्तेसाठी फक्त राजे संघर्ष करीत. लोकशाहीत समाज वा समाजगट सत्तेसाठी संघर्ष करतात.

- मानवी इतिहासात सत्तेचे असंख्य प्रयोग झाले. सगळ्यांनी सत्ता चाखली. सहभागीता वगैरे उलटी व्हावी इतपत झाले. तरीही एकुणात माणूस सुखी झाला नाही.

- सत्तेला पर्याय नाही. पण विचारी, समजूतदार, जबाबदार; चांगल्या अन व्यापक मनाचा, चांगल्या अन व्यापक वृत्तीचा मनुष्यसमाज ही कोणत्याही व्यवस्थेची पूर्वअट असते. असायला हवी. खरं तर अशा समाजाला सत्तेची गरजच अत्यल्प राहील.

- माणसे सत्तेचा खूप विचार करतात. कारण त्यांना चांगले अन व्यापक होणे आवडत नाही वा जमत नाही.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०१८

वक्तव्य सरसंघचालकांचे

सरसंघचालकांच्या कालच्या वक्तव्याची चर्चा सुरू होणे स्वाभाविकच आहे. त्यात जुन्या समजुती, गैरसमज, आवेश असे सगळे असणेही आश्चर्य न वाटणारेच. परंतु दोन गोष्टींची नोंद घेतली पाहिजे. तरच काही सार्थक चर्चा होईल.

१) ते कुठे बोलले हे विचारात घेतलं पाहिजे. ते मुस्लिम बुद्धिजीवी समुदायापुढे बोलले. दोन समाजगटातील आजच्या दुराव्याच्या, अविश्वासाचा पार्श्वभूमीवर एकत्रीकरणाचे बिंदू काय असू शकतात याचा विचार करताना स्वाभाविकच काही मुद्दे येतात. त्यातलाच हा एक. मुस्लिम समाजाने जी अलगता जोपासली आहे त्यावर शांतपणे फेरविचार करण्याचे ते आवाहन आहे.

२) हिंदू समाजापुढे उभ्या असलेल्या मुस्लिम आक्रमणाचा मुकाबला करतानाही हिंदू समाजाने आपले hindu character बदलू नये हा त्याचा दुसरा पैलू.

या दोन्हीत वावगे काय? सरसंघचालक म्हणजे आपल्याशी चहा टपरीवर चर्चा करणारी ओळखीची वा अनोळखी व्यक्ती नाही. समाजाच्या विचार व्यवहारावर ज्या व्यक्तींचा परिणाम होतो त्यातील ते एक आहेत. संपूर्ण समाज, संपूर्ण देश यांचे ऐक्य, शांती, सुख, समाधान हा त्यांच्या विचारांचा परीघ असतो आणि ते अतिशय स्वाभाविक आहे. मग देशातील दोन मोठ्या समुदायांच्या सलोख्याची दृष्टी देणारे विधान त्यांनी करण्यात गैर काय? शिवाय हा आमचा गट, हा तुमचा गट असे त्यांनी करणे एखाद्याला हवे असू शकेल. पण एखाद्याची ती अपेक्षा त्यांनी का पूर्ण करावी? याचा अर्थ झुंडबळी हिंदूंचे नसतात असाही नाहीच. पण अकारण एखाद्याचा जीव घेणे किंवा शारीरिक इजा करणे किंवा दहशत माजवणे; हे जितके वाईट आणि चुकीचे तितकेच; सकारण हे सगळे करणेही चुकीचेच. आत्मरक्षा ही या दोहोंच्या मधली बाब असते. आत्मरक्षा केलीच पाहिजे. ते करताना बळाचा उपयोग करावा लागला तरीही केला पाहिजे. पण मुळात आत्मरक्षेची गरजच उरू नये यासाठी काही करायचे की नाही. याचा अर्थ समस्या निर्मूल होतील असे नाही. जगाच्या अंतापर्यंत ही ओढाताण सुरूच राहणार आहे. तो जगाचा स्वभाव आहे. परंतु समस्या आणि संघर्ष कमी करणे, त्यासाठी प्रयत्न करणे, हाच सभ्यतेचा पाया अन हीच सभ्यता. भारताला सभ्यतेकडे न्यायचे की नाही? सरसंघचालकांनी सभ्यतेच्या पर्यायाची निवड केली आहे.

बाकी प्रत्येक जण स्वतंत्र आहेच म्हणा. अन every reason has a reason which the reason doesn't know हे तर असतंच.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०२१

घटस्फोट

मध्यंतरी खूपच मरगळ आली होती. प्रचलित घटनांपासून अलीकडे मी जाणीवपूर्वक थोडा दूर राहत असलो तरी कानावर आणि डोळ्यासमोर काही ना काही येत असतंच. एवढ्यात काहीच नव्हतं. अन ही मरगळ काल एकदम दूर झाली. एक नव्हे चक्क दोन विषय आले पुढे. एक सरसंघचालकांचे वक्तव्य आणि दुसरे आमिर खान, किरण राव यांचा घटस्फोट. त्यातील सरसंघचालकांच्या वक्तव्यावर एक टिपण लिहिलं. आता आमिर किरण घटस्फोटाबद्दल. हे तर नक्की की, या जोडीने काही वर्षांपूर्वी भारताबद्दल जे अगोचर विधान केले होते त्याची प्रतिक्रिया त्यांच्या घटस्फोटावरील प्रतिक्रियांमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. अन्यथा एखाद्या घटस्फोटावर आजकाल कोणी प्रतिक्रिया देत नाहीत. तसेही चित्रपट क्षेत्रातील घटस्फोट ही काही आता चघळायची सुद्धा गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे या घटनेकडे दुर्लक्ष करता येते.

पण या निमित्ताने घटस्फोटाबद्दल भारतीय समाजाचे विचार कसे चुकीचे अन बुरसटलेले आहेत याचंही चर्वण होतं आहे. वास्तविक घटस्फोट ही गोष्ट आता भारतीय समाजाने स्वीकारलेली आहे. परंतु एखादी गोष्ट स्वीकारणे याचा अर्थ ती उचलून धरणे, त्या गोष्टींचं कौतुक करणे किंवा त्या गोष्टीवर वेगळा विचार न करणे; असा होत नाही. आमिर किरण यांच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत ही अपेक्षा पाहायला मिळाली. तुम्ही घटस्फोट ही गोष्ट स्वीकारली आहे नं, मग त्यावर काहीच बोलायचं नाही. गेल्या काही दशकात व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने बोकाळलेल्या बौद्धिक दहशतवादाचा हा परिणाम आहे. म्हणूनच याबाबत लिहिण्याची गरज आहे.

वास्तविक मनुष्यजीवन शांततेने, सुरळीतपणे केव्हा चालतं आणि केव्हा त्यात असंतोष, अशांती निर्माण होते? त्याचं एका वाक्यात उत्तर आहे की, जेव्हा जगण्याच्या प्रेरणा अभौतिक असतील तेव्हा जीवनात शांति, समाधान असते. अन जेव्हा जगण्याच्या प्रेरणा भौतिक असतील तेव्हा जीवनात अशांती, असमाधान असते. आज जर सर्वत्र भौतिक प्रेरणाच जीवनाचा ताबा घेत असतील अन ते वैध आणि योग्य ठरवले जात असेल तर, जीवनात अशांती आणि असमाधान हेच राहणार. जीवनात याचा अर्थ परस्पर संबंधात सुद्धा. कारण परस्पर संबंध हा जीवनाचाच भाग असतात. भौतिक प्रेरणा असतील तर कपड्यांच्या रंगापासून कोणत्याही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. यात वस्तू, आवडी, इच्छा, कल्पना, प्रतिष्ठा किंवा असेच कोणतेही विषय येऊ शकतात. अन अभौतिक प्रेरणा असतील तर संघर्षाची स्थिती फारशी येतच नाही. मी अभौतिक हा शब्द वापरतो आहे, आध्यात्मिक नाही. धर्म, ईश्वर इत्यादी इत्यादी शब्दांची सुद्धा ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तीच्या जगण्याच्या प्रेरणा अभौतिक असू शकतात. प्रश्न आहे आज जगण्याच्या कोणत्या प्रेरणा वैध आणि प्रतिष्ठित आहेत? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर भौतिक हे आहे. त्यामुळे संघर्ष, असमाधान, अशांती, एकाकीपण यांना पर्याय नाहीत. मुद्दा एक लग्न करावं की दोन हा नाहीच. वाटलं तर पाच करा. काहीच हरकत नाही. पण त्या प्रत्येक संबंधात प्रेम, स्नेह, ओढ, आपुलकी राहू द्या. असे संबंध जोपासायला अभौतिक प्रेरणा हव्यात, ज्या 'अहं'चे कंगोरे बोचू देत नाहीत. अन जोवर 'अहं'चे कंगोरे बोचरे आहेत तोवर कितीही धरले अन कितीही सोडले तरी हाती काहीच लागणार नाही. एखाद्याने आयुष्यभर एखादी साथ निभावणे यातही खूप मोठं काही नाही आणि, आत्मशोधासाठी किंवा आत्मसंतोषासाठी दहा लोकांना सोडण्यातही काहीच महान नाही. प्रश्न आहे अभौतिक प्रेरणांनी 'अहं'चे कंगोरे तासले गेले आहेत की नाहीत हा.

साधारण वीसेक वर्षांपूर्वी एका विशीतील तरुणीने मला विचारले होते, 'एका वेळी एकापेक्षा जास्त लोकांवर प्रेम नाही का होऊ शकत?' मी तिला म्हटले, 'नक्की होऊ शकतं. अगदी गंभीरपणे मी हे म्हणतो आहे. शिवाय ज्यांच्याकडे द्वेष, असूया नाहीच; त्याच्या बाबतीत तर असं होऊच शकेल. प्रश्न फक्त एवढाच की, प्रत्येक संबंधाला न्याय देता येतो का?'

विषय किती लोकांवर प्रेम करावं, किती वेळा करावं हे नाहीतच. मुद्दा आहे परस्पर संबंध टिकवण्यासाठी तुमच्या जगण्याच्या प्रेरणा काय आहेत? त्या सशक्त अभौतिक असतील तर कोणाला सोडण्याची गरजच पडणार नाही अन त्या तकलादू भौतिक असतील तर कितीही संबंध तोडले अन जोडले तरी रिक्तता भरून येणार नाही. आजचा प्रश्न हा जगण्याच्या प्रेरणांचा आहे.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०२१

रविवार, ३ जुलै, २०२२

पुरुषसूक्ताचा डॉ. आंबेडकरांचा अर्थ

धर्मांतराच्या घोषणेनंतर सुमारे पाच महिन्यांनी `जनता' पत्रात लिहिलेल्या लेखात ऋग्वेदातील पुरुषसुक्ताविषयी त्यांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी) मोठी विचारप्रवर्तक भूमिका मांडली आहे. ती अशी- `चातुर्वर्ण्याचा मुख्य आधार म्हणजे ऋग्वेदातील पुरुषसुक्त होय. आमच्या मते या पुरुषसूक्ताचा मुख्य उद्देश या चातुर्वर्णीय वर्णभेदापासून लोकांस परावृत्त करणे हा आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र अशा प्रकारे गुणकर्मानुसार जरी चार वर्ण (वर्ग) उत्पन्न झाले तरी ज्याप्रमाणे राष्ट्रातील लोकांनी कामाची वाटणी केली म्हणजे त्यांचे एकराष्ट्रीयत्व नाहीसे होऊ शकत नाही किंवा शरीराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्यामुळे ते एकाच शरीराचे भाग नाहीत असे होऊ शकत नाही. तद्वत क्षत्रिय बाहुपासून, ब्राम्हण मुखापासून, वैश्य मांड्यापासून व शुद्र पायापासून उत्पन्न झाले असले तरी ते एकाच शरीराचे अवयव आहेत हे दाखविण्याचा या पुरुषसूक्ताचा मूळ उद्देश होता असे आम्हास वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. श्रमविभागणीने झालेला भेद निरर्थक आहे याची शिकवण लोकांना प्राप्त होऊन त्यांच्या मनावर ऐक्याचा ठसा उमटवावा एवढ्याच हेतूने हे सूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे.' (डॉ. आंबेडकरांचे जातीविषयक विचार- डॉ. शेषराव मोरे- विमर्श त्रैमासिक- एप्रिल- जून २०१४)

- श्रीपाद कोठे

४ जुलै २०१४

शुक्रवार, १ जुलै, २०२२

हेल्मेट सक्ती

वाहतुकीचे नियम आणखीन कडक होणार आणि दंडही वाढणार; असा प्रस्ताव असल्याचे वाचले. कोणता नियम मोडल्यास दंडाची रक्कम किती वाढणार याचाही तपशील त्यात होता. स्वाभाविकच हेल्मेट हाही मुद्दा होताच. कायदे करताना मर्यादा काय असावी हा नेहमीच वादाचा विषय असतो आणि राहील. परंतु कधीकधी काही बाबी अनाकलनीय अशाच असतात. हेल्मेटसक्ती ही त्यातलीच एक. वाहन चालवताना घालण्यात आलेली अन्य बंधने आणि हेल्मेटसक्ती यात एक मुलभूत फरक आहे. मोबाईलवर न बोलणे, दारू पिऊन गाडी न चालवणे, डाव्या बाजूने वाहन चालवणे, चौकातील दिव्यांचे संकेत न मोडणे, परवाना घेतल्याशिवाय गाडी न चालवणे, वेगाची मर्यादा पाळणे; अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संबंधात; ते नियम मोडणारेही मानतात की, ही बंधने मोडणे योग्य नाही, चुकीचे आहे. म्हणजे जो हे नियम पाळत नाही त्याच्या मनातही, ही बंधने योग्य आहेत याबद्दल शंका नसते. हेल्मेटच्या बाबतीत मात्र स्थिती वेगळी आहे. यात नियम मोडणाऱ्यांना मनापासून असेच वाटते की, सक्ती चुकीची आहे. गंमत पुढे आहे. ती अशी की, जे हेल्मेटसक्ती असावी अशा मताचे आहेत त्यांच्याकडेही; `अरे बाबांनो तुमच्याच भल्यासाठी सांगतो' यापलीकडे दुसरा कोणताही तर्क वा युक्तिवाद नाही. हेल्मेट शिवाय अन्य जी बंधने आहेत ती पटवून देण्याची अनेक कारणे आहेत आणि ती सगळ्यांना पटतातही. हेल्मेट सक्तीसाठी मात्र `तुमच्या जीवाची काळजी' या अति उदार, अति उदात्त तर्कापलीकडे काहीही नाही. हा भंपकपणा आहे, अन्याय आहे. उलट `हेल्मेटसक्ती नको' असे म्हणणाऱ्यांची पुष्कळ कारणे आहेत. त्यात केवळ गैरसोय हा विषय नसून, त्रास आणि अन्य व्यक्तिगत विषय आहेत. मात्र एखादी गोष्ट कोणासाठी अडचणीची, गैरसोयीची, त्रासदायक असू शकते; हे मुळातच मान्य न करणे ही सरळ सरळ हुकुमशाही आहे. तुमचे त्रास वगैरे आम्ही जाणत नाही तुमच्या भल्यासाठी आम्ही हे ठरवले आहे अन तुम्ही असेच वागले पाहिजे; ही दरोडेखोरी आहे. मानवी जगणे हा इतका संवेदनशील विषय असतो की त्याखाली अनेक प्रकारे मनमानी करता येऊ शकते, पुष्कळदा केलीही जाते. हेल्मेटसक्ती हा तशातलाच प्रकार आहे. आजवर झालेला विरोध कठोरपणे मोडीत काढलेला आहे अन पुढेही मोडीत काढू असे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेता येईल. पण ते भूषणावह नक्कीच नसणार.

टीप - पाण्यासाठी पेट्रोल, डिझेलवर अतिरिक्त भार लावणार अशी चर्चा आहे. असा निर्णय झाला तर तोही अयोग्य निर्णय म्हणावा लागेल.

- श्रीपाद कोठे

२ जुलै २०१९