साहित्य-संस्कृती हे शब्द जोड शब्दासारखेच पुष्कळदा वापरले जातात. त्यातील साहित्य या शब्दाचा काही ना काही बोध तर सगळ्यांना होतो. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, समीक्षा, वैचारिक लिखाण, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन; अशा विविध प्रकारांनी साहित्याचा कमीअधिक परिचय माणसाला असतो. साहित्य दाखवता येतं, सांगता येतं, त्याचं वर्णन सहजतेने करता येतं. `संस्कृती' या शब्दाचे मात्र तसे नाही. संस्कृती म्हणजे काय हे दाखवता येत नाही, तिचे वर्णन करता येत नाही. आजकाल नृत्य- गायन- नाट्य- चित्रपट- लोककला- इत्यादींना विस्कळीत अर्थाने संस्कृती म्हटले जाते, समजले जाते. परंतु ते योग्य नाही. या कला आहेत. संस्कृती ही अधिक जीवनानुगामी अमूर्त भावात्मक वस्तू आहे. वस्तू हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण ती आहे, ती असते. ती केवळ कल्पना नाही. एवढेच की ती अमूर्त आहे. एखाद्या भौतिक पदार्थासारखे तिचे मोजमाप वा वर्णन करता येत नाही एवढेच. अर्थात हेही तेवढेच खरे की, साहित्य वा विविध कलांमधून संस्कृती अभिव्यक्त होत असते. प्रकट होत असते. एवढेच नाही तर, साहित्य वा विविध कला आणि त्यांचे आविष्कार संस्कृतीला घडवीत किंवा बिघडवित असतात. संस्कृतीला आकार वा घाट देत असतात. दुसरीकडे संस्कृतीही साहित्य वा कलांना घडवीत किंवा बिघडवित असते. त्यांना आकार आणि घाट देत असते. या दोन्ही बाबी अन्योन्याश्रयी असतातच असे नाही. परंतु त्यांचा प्रवास सोबत सोबत, हातात हात घालून होत असतो. साहित्य आणि कला या जीवनानुभवाकडे थोड्या अधिक झुकलेल्या असतात. मनोरंजन, मनोविनोद, मनोरुची त्यात प्रधान असतात. संस्कृती ही जीवनार्थाकडे थोडी अधिक झुकलेली असते. जीवनदृष्टी, जीवनाचे तत्वज्ञान त्यात प्रधान असते एवढेच. म्हणूनच साहित्याचा वा कलेचा विकास आणि संस्कृतीचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावे लागते. साहित्य वा कलांचा विकास होतो आहे का? त्यांची घडण होते आहे का? त्यांची वृद्धी होते आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगळ्या पद्धतीने शोधावी लागतात. जसे- लोक लिहितात की नाही, वाचतात की नाही, लिहीणाऱ्यांची अथवा वाचणाऱ्यांची संख्या, ग्रंथालये, ग्रंथालयांची संख्या, पुस्तक प्रकाशने, त्यांची आकडेवारी, साहित्य संमेलने, साहित्य विषयक अन्य कार्यक्रम आणि आयोजने, या साऱ्यासाठी दिला जाणारा वेळ आणि पैसा, अन्य सोयी- सवलती- साधने- यांची उपलब्धता; हे सारे विचारात घ्यावे लागते. त्यांचा ताळेबंद मांडावा लागतो. अन्य कलांच्या बाबतीतही असाच विचार करावा लागतो. त्यातून त्यांचे घडणे वा बिघडणे, त्यांची वृद्धी वा घट समजून घेता येते; समजून घेतली जाते. संस्कृतीची वाढ-घट कशी मोजायची? कशी समजून घ्यायची? त्याचं माप कोणतं? संस्कृतीचं घडणं बिघडणं अथवा वाढ-घट अशी बाह्य एककांनी समजून घेता येत नाही. संस्कृतीचा विकास समजून घेण्याचे मापदंड आंतरिक आहेत. ज्या मानवाच्या जीवनाचा तो अविच्छेद्य भाग आहे; त्या मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हाच संस्कृतीच्या विकासाचा मापदंड असू शकतो. साहित्य अथवा कला; संस्कृतीच्या या विकासाला किती साहाय्य करतात, त्यासाठी किती पूरक ठरतात, यावरून साहित्य वा कलांच्या दर्जेदार असण्यावर वा नसण्यावर मोहोर उठवता येते.
- श्रीपाद कोठे
११ डिसेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा