अनंत काणेकर हे मराठीतील एक प्रसिद्ध आणि सिद्धहस्त लेखक. १९३७ साली ते एप्रिल ते जून या काळात दोन- सव्वादोन महिने युरोपला गेले होते. निमित्त होते- मे महिन्यात होणारा सहाव्या जॉर्जचा राज्यारोहण समारंभ. अन हेतू होता- दोन दशकांपूर्वी ज्या देशात कम्युनिस्ट क्रांती झाली तो रशिया पाहण्याचा, अनुभवण्याचा. कारण अनंत काणेकर हे पुरोगामी कम्युनिस्ट विचारांचे होते. या प्रवासावरील लेखमाला किर्लोस्कर मासिकाने छापली होती. त्या लेखमालेवर आधारित असे काणेकर यांचे एक प्रवासवर्णनपर पुस्तक `धुक्यातून लाल ताऱ्याकडे' शीर्षकाने प्रसिद्ध झाले आहे.
२३ जून १९३७ रोजी त्यांनी paris शहरातील एक नोंद केली आहे. ही नोंद छोटी पण अतिशय महत्वाची अन लक्षणीय आहे. अनंत काणेकर लिहितात- `कुणाही हिंदुस्थानी माणसाला, मग तो मुसलमान असो की हिंदू असो; फ्रेंच लोक `आयंदू' म्हणजे हिंदू म्हणतात. मुसलमानालाही आपण `आयंदू' आहोत म्हणून सांगावे लागते. मुंजे-सावरकरांना हे ऐकून आनंदाचे भरते येईल !'
कम्युनिस्ट साहित्यिक असलेल्या काणेकर यांची ही नोंद आणि त्यांनी केलेला मुंजे-सावरकरांचा उल्लेख इतका स्पष्ट व सूचक आहे की त्यावर टिप्पणी करण्याची गरज नाही.
- श्रीपाद कोठे
८ डिसेंबर १९१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा