शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

सहस्रकाच्या प्रारंभी

३१ डिसेंबर २००० - एका सहस्रकाचा अखेरचा दिवस. १ जानेवारी २००१ - एका सहस्रकाचा पहिला दिवस. हे दोन्ही दिवस कन्याकुमारीला घालवावेत म्हणून खूप पूर्वतयारी केली होती. ठरल्याप्रमाणे ३० डिसेंबर २००० ला कन्याकुमारीला पोहोचलो. परंतु मी पाठवलेला धनाकर्ष व पत्र व्यवस्थापकांना मिळालेच नव्हते. कालबंधनात अडकलेला, आपला कालसापेक्ष आनंद, त्या कालातीत श्रीचरणांशी बसून लुटता यावा; या आंतरिक इच्छेला व्यवहाराची अशी ठोकर बसली. पण कन्याकुमारी सोडताना एक जाणवलं की, जे झालं ते योग्यच झालं.

निवासाचं आरक्षण झालं नव्हतं. गर्दीही भरपूर होती. हो-ना करता करता व्यवस्थापकांनी तीन जण राहू शकतील अशा खोलीत माझी व्यवस्था केली. खोलीत तीन बिछाने व तीन कपाटे. प्रत्येकाची स्वतंत्र, वेगळी. खोलीत गेलो तर ती रिकामी होती. सायंकाळी समुद्रावर फिरायला गेलो. त्यावेळी `तो' कोणासोबत तरी फिरताना दिसला. त्याचं नावगाव ठाऊक नव्हतं, पण लक्ष वेधून घ्यावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. सहा फुटापेक्षा काकणभर अधिकच उंची. डोक्यावर विरळ तांबूस केस. विदेशी लालगोरा रंग. जीन्स व टी शर्ट घातलेला. आणि समोरून जाणाऱ्या येणाऱ्याकडे पाहून स्वागताचं स्मित करणारा !!! त्या सायंकाळची त्याची मूर्ती लक्षात राहिली.

भरपूर भटकून, जेवून वगैरे रात्री उशिराच खोलीवर गेलो. बाजूच्या दोन्ही बिछान्यांवर कोणीतरी ढाराढूर झोपी गेले होते. सकाळी उठलो तेव्हा दोन्ही बिछान्यांवर कोणीही नव्हते. लगबग करीत सूर्योदय पाहायला समुद्रावर गेलो. सूर्योदयाचा आनंद घेऊन परतू लागलो तेव्हा तो पुन्हा दिसला. तेच स्वागतशील हास्य ओठांवर खेळत होते. आज मात्र तो एकटाच होता. खोलीवर परतलो. आंघोळ वगैरे आटोपली आणि श्रीपादशिलेवर गेलो. दुपारी जगदंबा कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. जेवलो, गावात भटकलो. संध्याकाळी खोलीवर परतलो तर धक्काच बसला. कालपासून दोनदा भेटलेला तो विदेशी पाहुणा माझ्याच खोलीत राहायला असल्याचे दिसले. तो थोडासा हसला व लगेच बाहेर पडला. त्याच्याशी ओळख करून घेण्याचे राहूनच गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चांगला योग आला. कन्याकुमारीला विवेकानंद केंद्राच्या परिसरात सकाळी, आजूबाजूच्या गावातील बाया दही, दुध, ताक विकायला येतात. हा पाहुणा बाहेरच्या पडवीत एका दहीवालीशी बोलत होता. ग्रामीण तामिळ भाषेपलीकडे झेप नसलेली ती माउली व त्या भाषेचा गंधही नसलेला हा पाहुणा यांचा संवाद व व्यवहार पाहण्यासारखाच होता. त्याने दही घेतले होते. मीही त्याच्याजवळ गेलो. मी ताक घेतले. तो हसला. अन दही ताक प्राशनासोबतच आम्हा दोघातील संवादाची सुरुवात झाली. दीड दिवसापासून मनात रेंगाळणाऱ्या या पाहुण्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मूर्त रूप घेऊ लागली. हा पाहुणा केवळ विदेशी आहे एवढेच त्याचे वेगळेपण नाही, हे एव्हाना लक्षात आले होतेच. तो इतर विदेशी पाहुण्यांसारखाही नव्हता. तो निवांत होता. इथल्या छोट्यामोठ्या गोष्टींशी समरस व्हायचा त्याचा प्रयत्न होता. त्याला सारं जाणून घ्यायचं होतं. oh, marvelous, wonderful अशा शेलक्या प्रतिक्रियांपुरता तो मर्यादित नव्हता. त्याला इथली माणसं, इथलं वातावरण, इथलं जीवन, तऱ्हा, रीती यांच्यातला अशरीरी आनंद त्याच पद्धतीने अनुभवायचा होता.

`तो' एक जर्मन नाट्य दिग्दर्शक होता. २-३ दिवसांपासून कन्याकुमारीत राहत होता. अन आणखीन २-३ दिवस राहणार होता. कन्याकुमारी पाहणं तर एका दिवसात होतं. त्याला ती अनुभवायची होती. आदल्या, म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्री, तेथे फिरायला आलेले पर्यटक गाणीबजावणी करीत होते तेव्हा, हा मात्र गाढ झोपला होता. त्याला त्याबद्दल छेडले तेव्हा मंदमंद हसत तो एवढंच म्हणाला- `मला हे आवडत नाही.' नंतरचे दोन दिवस आम्ही एकत्र खूप हिंडलो, गप्पा मारल्या. त्यातून एक वेगळा माणूस मला भेटला.

संध्याकाळी दोघेही फिरायला एकत्रच बाहेर पडलो. अचानक पावसाची एक सर आली. विवेकानंदपूरमच्या आवारात विवेकानंद केंद्राची माहिती देणारी एक प्रदर्शनी आहे. तेथे आडोशाला गेलो. मग दोघांनी मिळून ती प्रदर्शनी पाहिली. गप्पाही सुरूच होत्या. त्यातून कळलं की, त्याने वयाच्या १७ व्या- १८ व्या वर्षीच रामकृष्ण- विवेकानंद वाचले होते. त्याच्यावर खूप खोलवर परिणाम करून गेलेला श्रीरामकृष्णांच्या जीवनातील एक प्रसंग त्याने सांगितला. तो प्रसंग असा-

`श्रीरामकृष्णांना भेटायला, शंकासमाधान करून घ्यायला, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला, त्यांच्याशी चर्चा करायला कोलकाता शहरातील खूप लोक रोज येत असत. एक दिवस एक प्राध्यापक महाशय आले आणि त्यांनी श्रीरामकृष्णांना खूप प्रश्न विचारले. परमेश्वर, त्याचं अस्तित्व वगैरेबद्दल ते प्रश्न होते. प्रश्न ऐकता ऐकताच श्रीरामकृष्णांची भावसमाधी लागली. ते आनंदाने नाचूगाऊ लागले. त्यातच त्यांचं बाह्य जगाचं ज्ञान नाहीसं झालं. त्यानंतर काही वेळाने ते हळूहळू पूर्ववत झाले. त्यावेळी प्राध्यापक महोदयांनी त्यांना पुन्हा विचारलं- माझ्या प्रश्नाचं उत्तर तर आपण दिलंच नाहीत. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले- उत्तर तर मी दिलं. तुला ते समजलं नाही. प्राध्यापक आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले- अरे, काय तुझी विलक्षण बुद्धिमत्ता? तुझी तर्कबुद्धी, तो बुद्धीचा विलास. ही सारी बुद्धी कुठून आली रे? श्रीरामकृष्णांचा अभिप्राय स्पष्ट होता. मानवी बुद्धीला अगम्य अशा ईश्वरी शक्तीचीच ती देणगी होती. प्राध्यापक मजकुरांचे समाधान झाले होते.

हा सारा प्रसंग सांगताना, तो जर्मन नाट्यदिग्दर्शक जणू काही तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत होता. इतका तो त्या प्रसंगाशी, त्यातील पात्रांशी, त्यांच्या विचारांशी, भावांशी एकरूप झालेला होता. समरस होण्याचा त्याचा हा स्वभाव नंतरही अनुभवाला आला. कन्याकुमारीत चोल राजांनी बांधलेलं हजार-बाराशे वर्षांच पुरातन शिवमंदिर आहे. दुसऱ्या दिवशी तोच मला तिथे घेऊन गेला. अतिशय शांत, लोभसवाणा परिसर असलेलं, आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारं ते मंदिर !! त्या मंदिरात दर सोमवारी दरिद्रीनारायणांसाठी भोजनाचं आयोजन असतं. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने चक्क दरिद्रीनारायणांच्या पंगतीला बसून तिथे भोजन केलं होतं.

याच मंदिरात भगवे कपडे घातलेला, पण विदेशी गोऱ्या रंगाचा व चेहेरेपट्टीचा एक तरुण दिसला. एका मोठ्या पडवीत दूर कोपऱ्यात एक वळकटी. त्याच्या शेजारी बसून तो कुठलासा ग्रंथ वाचण्यात दंग होता. जर्मन मित्रानेच त्याची माहिती दिली. तो तरुण झेकोस्लोव्हाकियाचा. भारतात आला. हिमालयापासून भटकंती सुरु केली. आता कन्याकुमारीत आला होता आणि प्राचीन शिवमंदिरात राहत होता. काय करत असेल तो दिवसभर? विरंगुळा कोणता असेल त्याच्यासाठी? नेमका कशाचा शोध तो घेत होता? आपली माणसं, आपला देश; सारं सोडून तो असा भणंगासारखा का भटकत असेल? तो साधा पर्यटक तर नक्कीच नव्हता. त्याच्याशी संवाद झाला नाही. पण झेकोस्लोव्हाकियाचा तो तरुण मनावर मात्र कायमचा कोरला गेला.

जर्मन मित्राने मग मला कन्याकुमारीच्या भव्य चर्चमध्ये नेले. चर्चमध्ये जाण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता. मंदिरात जातात त्याप्रमाणे पादत्राणे बाहेरच काढून ठेवून आम्ही चर्चमध्ये गेलो. नुकताच नाताळ आटोपला असल्याने येशूच्या जन्माचे अनेक देखावे तेथे होते. येशू व मेरीच्या प्रतिमांना मी चक्क हिंदू पद्धतीने हात जोडले. तो मनमोकळं हसला. समजूतदारपणे. त्यानंतर एका तामिळ कुटुंबातील तामिळ पद्धतीच्या घरगुती मंदिरालाही आम्ही भेट दिली.

दुसऱ्या दिवशी दिवसभर तो कुठे गायब होता कुणास ठाऊक? सायंकाळी मात्र आम्ही एकत्रच सूर्यास्त पाहिला व संध्याकाळ समुद्रावर घालवली. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या उन्मत्त वाऱ्याच्या साथीने तो आपलं मनही मोकळं करीत होता. स्वत:बद्दल मात्र तो फार बोलला नाही. इथली माणसं, इथलं जीवन, इथले अनुभव याबद्दलच तो बोलत होता. तो म्हणाला- `लोक मला विचारतात, तुम्ही इथे काय करता? तेही एकट्यानेच. तुमचा वेळ कसा जातो? तुम्हाला कंटाळा नाही येत? मी त्यांना म्हणतो- इथे समुद्र आहे, एवढी झाडे आहेत, जाणारी येणारी माणसं आहेत. एखाद्या झाडाखाली बसून राहिलं तरीही दिवस निघून जातो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकताना. आणखी काय हवं आनंदासाठी? वेळ घालवण्यासाठी?' त्याचं म्हणणं खरंही होतं अन कठीणही. कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला त्याचा हा आनंद हेवा करण्यासारखाच.

हा त्याचा स्वभाव होता, ही त्याची वृत्ती होती, हा त्याचा नेहमीचाच अनुभव होता किंवा कसे हे मला जाणून घ्यायचे होते. पण त्याने लगेच विषय बदलला. म्हणाला- उद्या सकाळी मी जातोय. `कुठे?' या माझ्या प्रश्नावर त्याचे उत्तर होते, `चेन्नईला.' त्या रात्री आम्ही पहिल्यांदाच एकत्र भोजन केले. रात्री गप्पा मारत मारतच आम्ही झोपी गेलो. तो पहाटेच जाणार होता. सकाळी उठण्यात मी पक्का. त्यामुळे त्याला म्हटलं- सकाळी जाण्यापूर्वी मला नक्की उठव. तो `हो' म्हणाला. सकाळी उठलो आणि पाहिलं तर त्याचा बिछाना मात्र रिकामा होता. त्याचे कपाटही उघडे. मला न सांगताच तो पहाटे निघून गेला होता.

अनेक गोष्टींसाठी माझ्या लेखी पहिला असलेला `तो' - व्यक्ती, घटना, पात्र, प्रसंग, विचार, भावना यांच्याशी समरस होण्याच्या आपल्या स्वभावाशी विपरीत अशा पद्धतीने, न सांगता निघून गेला होता. हा कोरडेपणा, तटस्थपणा, त्रयस्थपणा की आणखी काही? का गेला असेल तो असे न सांगता?

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, ३१ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा