गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

दुर्दैव

आजकाल सगळीकडे kyc आवश्यक असतं. मीही केली आहे ती औपचारिकता पुष्कळ ठिकाणी. काही ठिकाणी मलाच फॉर्म भरावे लागले तर काही ठिकाणी मी फक्त सही केली आणि संबंधिताने फॉर्म भरला. त्यातील एका ठिकाणाहून आज फोन. सर, तुमच्या kyc मध्ये एक त्रुटी आहे. कृपया ती माहिती सांगता का? म्हटलं- हो. तो म्हणाला- या फॉर्ममध्ये तुमच्या आईचं नाव लिहिलेलं नाही. ते हवंय. त्याला नाव सांगितलं. spelling सांगितलं आणि फोन संपला. आईचं नाव सांगण्यात कमीपणा वाटण्याचं, त्रास होण्याचं वगैरे काहीच कारण नाही. निदान मला तरी. पण हा प्रकार मला पटला नाही अन आवडलाही नाही. `आवश्यक' ही बाब आजकाल इतकी वाढली आहे की कमालीच्या बाहेर. अमुक आवश्यक, तमुक आवश्यक, हे आवश्यक, ते आवश्यक.... कशासाठी? कधी प्रतिष्ठेसाठी, कधी सन्मानासाठी, कधी समानतेसाठी, कधी हक्कासाठी, कधी कर्तव्यासाठी, कधी सुरक्षेसाठी. अन हे सगळे ठरवणारे भलतेच कोणीतरी. कधी कधी जनप्रतिनिधी. कधी अन्य अधिकारी किंवा कोणीही. बरे समाजाच्या भल्याची वगैरे चिंता करणारे इतके उपटसुंभ आज जागोजागी उगवले आहेत की विचारता सोय नाही. ते चार लोक मिळून कोणते सर्व्हे, कोणते अभ्यास, कोणते अहवाल अन काय काय करणार. परस्पर सरकारकडे जाणार. त्यांना पटवणार अन मग सरकार आदेश काढणार. संबंधित लोक तो माना डोलवत राबवणार आणि तुम्ही आम्ही पटो न पटो फरपटत जाणार. सगळाच मूर्खांचा बाजार.


आज मला जी त्रुटी सांगण्यात आली तिचे कारण समान हक्क हे असावे किंवा आजकाल २-४ आया वा २-४ बाप राहतात तसले काही कारण असावे. २-४ आईबाप अशा प्रकारात खरे तर फक्त प्रथम नाम पुरेसे ठेवावे. अन समान हक्कवाला मामला असेल तर तो मुळीच पटणारा नाही. या अशा प्रकारांनी समानता वा आदर निर्माण होतात का? समानता, आदर इत्यादी बाबी सरकार दरबारी सिद्ध करण्याच्या गोष्टी आहेत का? माझ्या मनात समानता वा आदर आहे अथवा नाही याची शहानिशा करणारे तुम्ही कोण? दुसरे- हक्क अथवा अधिकारांचा संघर्ष हीच मुळात गाढव गोष्ट आहे. ते मार्क्सवादी मूल्य आहे. ते मार्क्सवादी मूल्य आहे म्हणून तो गाढवपणा आहे असे नाही. मार्क्स झाला असता वा नसता तरीही ती गोष्ट गाढवपणाच राहिली असती. मानवी जीवनात अनेक मूर्त आणि अमूर्त गोष्टी असतात. अमूर्त गोष्टींना मूर्त रुपात आणण्याचा अन प्रमाणित करण्याचा हास्यास्पद प्रकार व्यवस्थांच्या बंदिस्त लोहचौकटी तयार करतो, त्यांचा जाच होतो आणि क्रमशः मनुष्यत्व संपत जातं. आज नेमकं तेच सुरु आहे. लाटा खूप लहान वाटल्या तरीही त्याच हळूहळू सुनामीत परिवर्तीत होत असतात. मानवी सभ्यतेत अशी सुनामी केव्हा येईल काहीही सांगता येत नाही. आपली वाटचाल मात्र त्याच दिशेने सुरु आहे.


हिंदुत्वनिष्ठ लोकांना खरे तर हे पटायला हवे. पण दुर्दैव हे की त्यांना या गोष्टीची समजच नाही. ज्या गोष्टींना ते सिद्धांतत: विरोध करतात त्याच्याच गाळात ते बुडत चालले आहेत. त्याच चुकीच्या मार्गावर ते चालले आहेत. ज्या विचारांना, सिद्धांतांना त्यांचा विरोध आहे, त्या विचारांनी प्रचलित केलेली भाषा, त्यांचे मापदंड, त्यांची शैली यातून स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ते मुळीच कसूर सोडत नाहीत. दोहोतील भेद, वेगळेपण, योग्य-अयोग्यता यांचा विचक्षण विचार करण्याची हिंदुत्व समर्थकांची क्षमता अत्यंत हलाखीची आहे हे त्यांच्या आणि जगाच्या दृष्टीनेही दुर्दैवाचे आहे.

- ३ डिसेंबर २०१६

#श्रीपादचीलेखणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा