बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

`भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे'...

मन अचानक भूतकाळात गेलं. का? ते कळेल शेवटी.

सुमारे ४८ वर्षांपूर्वी वडिलांनी घर बांधलं, तेव्हा तो नागपूरचा अगदी नवा भाग होता. नागपूरबाहेर म्हणावा असा. पण लोक राहायला जाण्यापूर्वीच विकासकामे होण्याचा तो काळ नसल्याने- वीज, नळ, रस्ते अशा सोयी नव्हत्याच. पलीकडच्या जंगलातील कोल्हे रात्री घराच्या जवळ येत असत, असे सांगतात. त्या काळातली गोष्ट. घर पूर्ण झाले. आम्ही राहायला गेलो. घराच्या बांधकामावर असलेल्या बायांपैकीच एक बाई घरच्या कामासाठी येऊ लागल्या. बांधकामेही आजच्यासारखी मोठ्या प्रमाणात होत नसत. तिलाही काम हवे होते. आईलाही मदतीचा हात हवा होता. अन भागीरथी बाई घरच्या कामाला येऊ लागली. पाचसहा वर्षांनंतर तिने काम सोडले. पण दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत ती येत असे वर्षातून एकदोनदा. भेटायला, बोलायला.

एकदा भागीरथी बाईने आम्हा मुलांना तिच्या घरी बोलावले. दिवाळीच्या फराळासाठी. अर्थात, आईला तिने तसे सांगितले. आईही तिला हो म्हणाली. अन फराळासाठी आम्ही तिच्या घरी गेलोही. अन्य काही घरी ती काम करीत असे. तेथीलही काही मुले होती. घर माहीत नव्हते. पण एकूणच विरळ वस्ती असल्याने घर शोधणे कठीण गेले नाही. घर मोठेसे. मातीचे. मोठे अंगण. मेंदीच्या झाडांचे कुंपण. अंगणात शेणाचा सडा टाकलेला. नारळाच्या दोरीने विणलेल्या एक-दोन खाटा. तिच्या घरी पोहोचल्यावर त्या खाटांवरच आम्ही बसलो. तिचा छोटा मुलगा होता- संतोष. तोही आमच्याजवळ येउन बसला. जरा वेळाने तिने आम्हाला घरात बोलावले. पडवीतून आम्ही आतल्या खोलीत गेलो. सामानसुमान थोडेसेच. खोलीत भिंतीला लागून सतरंजीच्या घड्या टाकल्या होत्या. त्यावर आम्ही बसलो. प्रत्येकाला एक छोटी थाळी, एक पितळी पेला असे ठेवले होते. थाळी आणि पेला एकदम चकाचक होते. मग तिने त्यात फराळाचे पदार्थ वगैरे वाढले. सगळ्यांनी ते आनंदाने खाल्ले. भागीरथीबाई, तिच्यासोबत आणखीन एक बाई होती- तिला शांताबाई म्हणत होते- ती, संतोषचे वडील आमच्याशी बोलत होते. खाणेपिणे झाले. आम्ही घरी परत आलो.

यानंतर एक-दोन वर्षांनी आम्हाला तिचे पुन्हा निमंत्रण मिळाले. यावेळी निमित्त होते- शांताबाईचे संतोषी मातेचे शुक्रवारचे व्रत. त्यालाही आम्ही मुले गेलो होतो. या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्यांना जेवायला बोलावतात त्यांनीही काही गोष्टी पाळायच्या असतात. जसे, त्या दिवशी आंबट खायचे नाही. घरच्या एखाद्या गोष्टीसाठी काही नियम पाळावे तसा तो नियम आम्ही त्या दिवशी पाळला होता. त्या दिवशी त्यांच्याकडे पूर्ण जेवणच होते. नंतर कधीतरी कळले की, भागीरथी बाई आणि शांताबाई या दोघी बहिणी अन सवतीही. संतोषचे वडील नागपूरच्या महाराजबागेत माळीकाम करीत असत. पुढे हे सगळे संबंध कालक्रमाने विरळ होत संपले. भागीरथी बाई कधीतरी येत असे तेवढाच संबंध. पण त्यावेळीही अन अजूनही- त्यांची जात कोणती वगैरे चर्चा आम्ही कधी केली नाही. त्यांची जात वगैरे माहीतही नाही, त्याची गरजही नाही अन इच्छाही नाही. किंवा हे लोक आपल्याकडे काम करतात म्हणजे त्यांचा सामाजिक, आर्थिक दर्जा कमी; आपण त्यांच्यात मिसळायचे नाही इत्यादी भाव, विचार कधीही मनातही आले नाहीत. उलट त्यांचे व्रत पूर्ण व्हावे यासाठी नियम पाळले. आईवडील अन सामाजिक वातावरण याशिवाय हे शक्य होते का? घरात आजोबांपासून संघाचे वातावरण होते. त्याचा वाटा तर निर्विवाद आहेच. मनात जात, पंथ, सामाजिक-आर्थिक दर्जा येऊही नये; असाच संस्कार असल्याशिवाय अन तसा प्रयत्न प्रदीर्घ काळ केल्याशिवाय हे होईल?

त्यानंतर एक बाई होत्या कामासाठी. त्यांचे नाक इतके चपटे अन थोडेसे विचित्र होते. एकदम पाहिले तर कुष्ठरोग आहे की काय असे वाटावे असे. अर्थात तसे काही नव्हते. मुळात ठेवणच तशी. त्यांना या जगात काहीही पाश नव्हते. कौटुंबिक माहिती काही माहीत नाही, पण त्या एकट्या होत्या. त्यांना आम्ही गमतीने त्रिशूल म्हणत असू. कुणीही काहीही म्हटले तरीही फक्त हसून द्यायचे, एवढेच त्या कदाचित शिकल्या असाव्या. कुठे तरी खोली घेऊन राहत असत. ती सोडावी लागली. काय करायचे हा प्रश्न आला. त्यांनी आईला विचारले. घरी माडीवर बांधलेले नव्हते. आम्ही एकूण ९ सदस्य. स्वयंपाकघर, बैठकीची खोली सगळे मिळून ६ खोल्या. संडास, बाथरूम एकेकच. पण परिस्थिती पाहता आईवडिलांनी तिला राहायला परवानगी दिली. दिवसभर घरचे वा तिची अन्य कामे होत असत. जेवण घरीच होत असे. रात्री ती स्वयंपाकघरात झोपत असे. सकाळी उठून तिचे सगळे आवरून मागील अंगणात ठेवून कामाला सुरुवात. ती कोण, कुठली, जात, नाव, kyc, आर्थिक-सामाजिक दर्जा वगैरे काहीही नाही. पुढे ती गेली सोडून. ज्याचं जिथे, जेवढं असेल तेवढं संपलं की प्रत्येक जण आपापल्या मार्गाला जातो. तीही गेली. पण जी काही वर्षं ती राहिली, त्या काळात ती एक माणूस आहे; यापलिकडे दुसरा काहीच विचार नव्हता.

आज होणाऱ्या चर्चा ऐकतो, खूप वेगवेगळ्या नावांनी होणारी भांडणे, अभिनिवेशपूर्ण वादविवाद पाहतो- ऐकतो- वाचतो- अनुभवतो- , तेव्हा विषाद दाटतो. अन्यथा गोष्टी मनातही येऊ नयेत असा संस्कार अन वातावरण मिळाल्याबद्दल धन्यता वाटते. अन विचारी मन विचार करू लागतं- आज जे काही सुरु आहे त्याने खरंच काही चांगलं साधेल? चांगलं काही साधण्यासाठी खूप वेगळं काही लागत असतं. होईल याची जाण कधीतरी? तशी जाण होवो हीच ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी, त्यांच्या संजीवन समाधीनिमित्त विनवणी. `भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे'...

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ९ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा