सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

ऐतिहासिकता व्यावहारिक व्हावी

पर्यावरण आणि प्रदूषण हा आजचा सगळ्यात मोठा, महत्वाचा अन चर्चित विषय आहे. एक तर कालच फ्रान्सची राजधानी paris येथे याबाबत एक ऐतिहासिक जागतिक प्रस्ताव पारित करण्यात आला. थोडेथोडके नव्हे तब्बल १३ दिवस जगभरातील नेते, तज्ञ मंडळी यावर खल करीत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली भारताची रोखठोक भूमिकासुद्धा चर्चेत राहिली. विकसित देशांची दादागिरी, त्यांचा बेजबाबदारपणा, आपली जबाबदारी विकसनशील देशांवर ढकलून देण्याची सवय, स्वत:चे चोचले पुरवण्यात कोणतेही व्यवधान येऊ नये यासाठीचे त्यांचे प्रयत्न, अन मुळातच चुकीची मानसिकता आणि विचारांची दिशा; हे सगळे भारताच्या दबंग भूमिकेने पृष्ठभागावर आले. paris येथे झालेला हा प्रस्ताव जसा ऐतिहासिक आहे, तशीच भारताची ही कामगिरीही इतिहासात नोंदली जाणारी ठरेल.

दुसरीकडे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. न्यायालयाचे आदेश, सरकारचे निर्णय, लोकांच्या गरजा- अडचणी- भावना- , या सगळ्यांचा खल होतो आहे. पाय दाबले तर डोकं वर होतं अन डोकं खाली दाबलं तर पाय वर होतात, अशी विचित्र स्थिती झाली आहे. समस्या कमी होतील, त्रास कमी होईल अन संघर्षही वाढणार नाही; यासाठी काय करावे असा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही गोष्टी कठोरपणे सांगण्याची, बोलण्याची, समजून घेण्याची गरज आहे. paris येथे भारताने जसा विकसित देशांचा दबाव झुगारून निश्चित, स्पष्ट भूमिका घेतली; तसेच विविध पातळ्यांवर होण्याची आवश्यकता आहे.

एक गोष्ट निर्विवाद आहे की प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल विकसित देशांमध्ये अधिक ढासळलेला आहे. हा समतोल ढासळण्यासाठी तेच जबाबदार आहेत. त्यांची जीवनशैली आणि आधुनिक यांत्रिकता आणि तांत्रिकता यासाठी जबाबदार आहे. लाकडांच्या चुली, उघड्यावर शौचाला जाणे इत्यादी गोष्टी नसूनही विकसित देशांचा प्रदूषणातील वाटा खूप जास्त आहे.

नेमके हेच देशांतर्गतही पाहायला मिळते. एखाद्या गावातील प्रदूषणापेक्षा राजधानी दिल्लीतील प्रदूषण खूप जास्त आहे. राजधानीतील करोडपती व्यक्तीपुढे असलेल्या समस्या, प्रश्न किंवा त्रास गावातील गरीबापेक्षा जास्त आहेत. (येथे फक्त प्रदूषण आणि पर्यावरण यांच्याच संदर्भात विचार करावयाचा आहे.) अन हे निर्माणही त्यानेच केले आहेत. एखादी व्यक्ती घरी चूल पेटवते तेव्हा जो carbon dioxide निर्माण होतो, तो सहजपणे वातावरणात शोषला जातो. त्या परिसरातील झाडेझुडपे, वने; एवढेच नाही तर शेतात उभी असलेली हिरवी पिकेही प्रकाश संश्लेषणासाठी तो carbon dioxide शोषून घेतात. त्याचा त्रास ना त्यांना होत ना बाकीच्यांना. पण त्यालाच शहाणपण शिकवायला सगळे पुढे असतात. कचरा, घाण यांचेही तसेच. उघड्यावर शौचाला जाण्याचा प्रश्न अनेकदा चर्चेला येतो. उघड्यावर शौचाला जाणे बंद व्हायलाच हवे. स्वच्छता आणि आत्मसन्मान यासाठी ते आवश्यक आहे. पण ते प्रदूषणाचे कारण नाही. गावात उपलब्ध असलेली माती ती घाण जिरवून टाकते. नव्हे, ती निसर्गाला समृद्ध करते. शहरातील घाण, तुंबलेल्या मलवाहिन्या, केरकचरा, अगदी अन्नाचा कचरासुद्धा प्रदूषणात भर घालून पर्यावरणाचा ऱ्हास घडवून आणतो. मात्र, पैसा आणि संघटीत शक्तीच्या बळावर दुबळ्या गावांवर गुरकावता येते. त्यामुळे त्यांना उपदेश करायला सगळे धावतात.

एकीकडे carbon dioxide ची चर्चा होते, पण chlorofluoro compounds चा उल्लेख टाळला जातो. कारण त्याची चर्चा आम्हाला आमच्या सुविधांवर पाणी सोडायला लावू शकते, आमच्या प्रतिष्ठेच्या उथळ- खोट्या- कृत्रिम- कल्पनांना तिलांजली द्यायला लावू शकते. त्यासाठी आमची तयारी नसते. सर्व प्रकारच्या वातानुकूलन यंत्रणा, स्वयंचलित वाहने, मनुष्यनिर्मित उर्जेचा अधिक वापर, कोट्यवधींच्या लोकसंख्येची शहरे, वस्तू वापराच्या पद्धती, मानापमान- प्रतिष्ठा यांच्या कल्पना; यांचा फेरविचार करण्याची, स्वत:ला कठोरपणे तपासण्याची आमची तयारी असते का? राजधानीत वाहतुकीचा जेवढा खोळंबा होतो तेवढा लहान जिल्हा स्थानी होत नाही. स्वाभाविकच पेट्रोलचे ज्वलन, वेळ, ताणतणाव, परिणामी प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी पुष्कळच कमी होते. पण सारे काही एकाच ठिकाणी एकवटणारी धोरणे, व्यवस्था; अन सामान्य माणसाच्या मनातील अवाढव्यपणाची निरर्थक ओढ यांचा विचार किती केला जातो?

शैक्षणिक संस्था, गंभीर- प्रदीर्घ- आजार वा व्याधी यावर उपाय करणाऱ्या वैद्यकीय संस्था शहरांपासून दूर, लहान गावी असणे हितावह असूनही, त्या दृष्टीने प्रयत्न आणि विचार का होत नाही? निवृत्तीचे जीवन जगणारे लोक, कामधंद्याच्या निमित्ताने लहान गावात गेलेले लोक, कामधंद्याच्या निमित्ताने मोठ्या शहरात आलेले लोक लहान गावी स्थायिक होण्याचा प्रयत्न का करीत नाहीत? चांगले, प्रदूषण विरहीत, शांत, आरोग्यदायी जीवन जगण्यापेक्षा; आम्ही अमुक एखाद्या महानगरात राहतो हे सांगण्यात आम्हाला भूषण का वाटते? सरकार, उद्योजक, व्यावसायिक, समाजाचे विविध घटक, सामान्य माणूस या सगळ्यांनी याबाबत आपापल्या भूमिकांचा विचार का करू नये?

जल, वायू, जमीन, प्रकाश, ध्वनी यांचे प्रदूषण वाढवण्यात आणि पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात रसायनांचा वापरही महत्वाचा ठरतो. सौंदर्य प्रसाधने, perfumes, केसांचे वा अन्य रंग, प्लास्टिक, फटाके, आतिषबाजी, चैनीच्या अनेक गोष्टी कमी करण्याचा किती विचार होतो? साधेपणा, आटोपशीरपणा, सुखाचे आणि आनंदाचे विविध पर्याय, आत्मविकास, चिंतनशीलता अशा असंख्य गोष्टींना जीवनात स्थान देण्यावर कितीसा खल होतो? पर्यावरण रक्षणासाठी झाडे हवीत, झाडे वाचवण्यासाठी कागदाचा वापर कमी करा असा एक स्वर ऐकू येतो. पण इमारतींचा अपरिमित सोस सोडून देऊन अधिकाधिक जमीन वृक्षलागवडीखाली आणण्याची चर्चा कितीशी होते?

सगळ्या गोष्टी कायदा, पैसा, नियम याचभोवती फिरत राहतात. श्वासोच्छवासामुळे carbon dioxide सतत तयार होतो. त्यामुळे श्वास घेणे बंद करा किंवा त्यावर कर लावा, अशी भूमिका भविष्यात ऐकू आल्यास नवल वाटू नये; अशी आज स्थिती आहे. आम्ही करतो ते सारे बरोबरच आहे. सुखाचा हव्यास, त्यासाठीचे धावणे, त्यासाठीचे ओरबाडणे हे सगळे असेच सुरु ठेवून पर्यावरण रक्षण वगैरेचा काही विचार करता आला तर करावा, अशी आजची भूमिका आहे. या भूमिकेला छेद देण्याची गरज आहे. खरा प्रश्न पैशाची सोय, तंत्रज्ञान इत्यादी नाहीच. खरा प्रश्न आहे मानसिकता. ही बदलण्यासाठी असंख्य तपशीलांचा सखोल परामर्श घेऊन, जीवन व्यवहाराची आणि त्याआधी जीवनाची फेरमांडणी करायला हवी. त्यासाठी प्रसंगी कठोरही व्हावे लागेल. अगदी स्वत:साठीसुद्धा. ते नाही केले तर ऐतिहासिक प्रस्ताव होतील, ऐतिहासिक भूमिका घेतल्या जातील; पण ही ऐतिहासिकता व्यावहारिकतेत येणार नाही. अन म्हणूनच निरुपयोगी अन निरर्थक ठरेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, १४ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा