बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

भ्रांती

जयललिता गेल्या. त्या धक्क्याने ७० हून अधिक लोकांनी राम म्हटले. त्या चांगल्या होत्या की वाईट? त्यांच्या जाण्याने जसा अनेकांना दु:खाचा आवेग आला तसा कोणाला सुख वाटलं असेल का? त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली का? इत्यादी इत्यादी प्रश्न बाजूस ठेवू तूर्त. मात्र त्या एका राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. अफाट संपत्तीच्या धनी होत्या. शक्तिमान होत्या. calculated होत्या. तरीही त्यांना dehydration झाले. ते वाढत वाढत त्यांची अखेर झाली. dehydration ही फार मोठी गोष्ट नाही. प्रकृतिकडे दुर्लक्ष केले तरच बहुतेक तो त्रास होतो किंवा अतिश्रम किंवा उन्हं वगैरेमुळे. यातील काहीही जयललिता यांच्या बाबतीत शक्य नव्हतं. वैद्यकसेवा, नोकरचाकर हे तर सदैव हात जोडून उभे. तरीही घडायचे ते घडलेच. खरं तर जे घडायचं तेच घडत असतं. घटना घडत जातात आणि आम्ही त्या घटना निमित्त असतात हे विसरून निमित्तालाच कारण समजत असतो.

सत्ता, संपत्ती किंवा अन्य बाबी यांची काहीच मातब्बरी नाही. चांगल्या वा वाईट गोष्टी यांच्या भरवशावर किंवा यांच्या शिवायही घडत असतातच. dehydration, हृदयविकाराचा झटका, कर्करोग, डेंग्यू, अपघात किंवा असंच काही झाल्याने जर मृत्यू होत असेल तर ते होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू व्हायला हवा. तसे होत नाही. कोणाला वैद्यकीय सेवा क्षणार्धात मिळूनही त्याचा जीव जातो अन एखाद्याला वैद्यकीय सेवेसाठी ताटकळत राहावे लागले तरीही तो ठणठणीत बरा होतो. आम्ही फक्त निमित्त शोधतो, त्याला कारण ठरवतो आणि पुढे सरतो. कारण आमच्या हाती काहीच नसतं, आम्ही या सृष्टीचक्राचा एक भाग आहोत हे आमच्या conscious किंवा unconscious जाणीवेला पटत नाही, उमजत नाही. प्रयत्नांना यश वा अपयशच नव्हे, तर प्रयत्न करणे अथवा न करणे हे सुद्धा कोणाच्याही हाती नसते. it is also destined. यामुळे प्रारब्धवाद वाढतो का? वाढूही शकतो. पण म्हणून सत्य बदलत नाही. एवढेच नाही तर प्रारब्धवाद आणि तो दूर करण्याचे प्रयत्न यांचेही चक्र सतत सुरूच असल्याचा मानवाचा अनुभव आहे. काळाच्या अमक्या टप्प्यावर प्रारब्धवाद राहावा अथवा राहील किंवा अमक्या टप्प्यावर तो दूर करण्याचे प्रयत्न होतील हे सुद्धा कोणाच्या हाती नसतं.

आपण या विश्वब्रम्हांडाचा अविभाज्य घटक वा अंश असूनही, स्वत:ला त्यापासून वेगळं समजून हे विश्व चालवण्याचा अथवा त्याला हातभार लावण्याचा आव आणीत असतो. यालाच म्हणतात भ्रांती. `या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:'

- श्रीपाद कोठे

९ डिसेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा