रविवार, ५ डिसेंबर, २०२१

महिला मागेच

होय, महिला मागेच आहेत. हे वाक्य वाचताच; नव्हे सुरुवातच अशी पाहून तमाम महिला वर्ग आणि बराचसा पुरुष वर्गही रागावणार यात वाद नाही. पण प्रतिक्रिया न देता विचार करावा ही विनंती. तर... महिला मागेच आहेत. का? सांगतो. आज सकाळी लग्न या विषयाची चर्चा ऐकायला मिळाली. माझा सहभाग नव्हता. फक्त श्रवणभक्ती. त्यातले अनेक मुद्दे विचार करायला लावणारे होते. फार जुने नाही, अगदी पाच-पन्नास वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती किती बदलली आहे हाही मुद्दा होताच. चांगली, निर्व्यसनी मुलं मिळणं कठीण आहेच, पण मुली मिळणंही अवघडच आहे. म्हणजे मुलींचं वागणं, व्यसने हा वेगळा भाग. ते प्रमाण अल्पच आहे. मग, मुली मिळण्यात अडचणी कोणत्या? तर त्यांच्या अपेक्षा. शिकलेली, कमावणारी मुलगी असेल तर तिच्या अपेक्षा अधिकच असतात. अन इथेच तो मुद्दा आला- महिला मागेच आहेत. लग्नसंस्था, तिचा इतिहास, त्यातील वाटावळणे बाजूस ठेवू. पण जोवर मागे पाहता येते तोवर दिसते की, पुरुषांनी चरितार्थ चालवण्याची जबाबदारी बिनबोभाट पार पाडली. बायको कमावणारी नसली तरीही तिचा सांभाळ, प्रतिपाळ केला. ती शिकलेली किंवा न शिकलेली असली तरीही तिला स्वीकारली. डॉक्टर, अभियंते, वकील मुलांनीही सर्वसामान्य मुलींशी लग्ने केली. आज मुली शिकतायत, कमावताहेत. चांगली गोष्ट आहे. पण न शिकलेला, न कमावणारा, आपल्यापेक्षा शैक्षणिक वा आर्थिक स्तर कमी असलेला मुलगा नवरा म्हणून पत्करण्याची तयारी, मानसिकता किती आहे. अपवाद हे अपवाद असतात. बरे, आता शिक्षण, कमाई यात महिला सहभागी होण्याला तीनेक पिढ्या तरी झाल्या आहेतच. पण मुलीपेक्षा कमी मुलगा स्वीकारण्याचा विचार फारसा बोललासुद्धा जात नाही. कुठे कुठे असा स्वीकार झालाच तर त्यासाठी काही कारणे असतात आणि जसा महिलांना जाच सोसावा लागतो तसाच पुरुषांनाही सोसावा लागतोच. परंतु गेली कित्येक शतके, पुरुषांनी ज्या सहजतेने स्त्रियांचा स्वीकार केला त्या संदर्भात महिला अजूनही मागेच आहेत हे मात्र खरे. विकृती, चुका, स्वभाववैचित्र्ये हे मुद्दे इथे अपेक्षित नाहीत. सामान्य समजूतदार असा सर्वसामान्य समाज याच अर्थाने चर्चेचा समारोप झाला- महिला अजून मागेच आहेत.

- श्रीपाद कोठे

६ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा